भारत - चीन संबंध पुनर्आखणी गरजेची

विवेक मराठी    22-Jun-2020
Total Views |
@दिवाकर देशपांडे

"चीनने भारतीय प्रदेशात घुसखोरी केलेली नाही" हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीत केलेले विधान ऐकून सगळेच जण आश्चर्यचकित झाले आहेत. "ही घुसखोरी नाही" असे पंतप्रधान म्हणत असतील, तर मग सीमेवर वाद का निर्माण झाला? २० भारतीय जवानांना हौतात्म्य का पत्करावे लागले? दोन्ही बाजूंनी युद्धाचे हाकारे दिले जात आहेत ते कशासाठी? आदी प्रश्न निर्माण होऊन लोकांमधला संभ्रम वाढीस लागला आहे.


china_1  H x W:

"चीनने घुसखोरी केलेली नाही" या विधानाचा एक अर्थ असा आहे की, ही घुसखोरी नसल्यामुळे भारत लष्करी बळाचा वापर करून चिनी सैन्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करणार नाही. चीनने आक्रमण केले, चीनने घुसखोरी केली अशा बातम्या गेले काही दिवस सतत येत असल्या व टीव्हीवरच्या चर्चेत तशी विधानेही केली जात असली, तरी सरकारी पातळीवर भारताने हा शब्द वापरलेला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. याचे मूळ भारत आणि चीन यांच्यात झालेल्या सीमा व्यवस्थापनाच्या करारात आहे.

१९८८ साली राजीव गांधी प्रथम चीनला गेल्यानंतर दोन्ही देशांनी आपला सीमाप्रश्न सामोपचाराने सोडवावा असे ठरले व त्याबाबत प्राथमिक चाचपणी सुरू झाली.

चीनने लष्करी बळाने जिंकलेला प्रदेश आपल्या ताब्यात ठेवत, न जिंकलेला प्रदेश ही नियंत्रण रेषा ठरविण्याच्या निमित्ताने ताब्यात घेण्याचा डाव मांडला. युद्ध थांबल्यानंतर दोन्ही देशांचे जवान एकमेकांसमोर कायमचे कधीच नव्हते, ते फक्त आपापल्या प्रदेशात गस्त घालीत असत. त्यामुळे या गस्तीच्या प्रदेशात कुठेतरी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आहे, हे तत्त्व चर्चेत मान्य झाले. पण दोन्ही देशांच्या जवानांचा गस्ती प्रदेश हा एकमेकांच्या प्रदेशांना ओलांडून जाणारा किंवा छेद देणारा होता. त्यामुळे चीनने त्यांचे सैनिक गस्त जिथपर्यंत घालत जात तिथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आहे असा दावा केला, तर भारताने आपले सैनिक जिथपर्यंत गस्त घालीत तिथेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आहे असा दावा केला. यामुळे असे झाले की, प्रत्यक्ष नियंत्रण रेषाही बाजूला पडली व भारत व चीनची अशा दोन 'दावा रेषा' तयार झाल्या. आता यातली कोणती 'दावा रेषा' ही नियंत्रण रेषा आहे हे ठरवायचे तर दोनच मार्ग होते, ते म्हणजे ती लष्करी बळाने ठरविणे किवा चर्चेने ठरविणे. पण दोन्ही देशांनी हा प्रश्न चर्चेने सोडवायचे ठरविल्यामुळे दोन करार केले. एकतर हा प्रश्न लष्करी बळाने सोडवायचा नसल्यामुळे सीमेवर शांतता राखणे आवश्यक आहे, त्यामुळे तेथे शांतता राहील अशा तऱ्हेनेच वागायचे आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ठरत नाही तोपर्यंत दोघांनीही आपल्या सीमेपासून दावा रेषेपर्यंत गस्त घालायची पण तेथे कायम वास्तव्य करायचे नाही, तेथे कोणतेही कायम बांधकाम करायचे नाही, तसेच गस्त घालताना दोन्ही देशांचे सैनिक एकमेकासमोर आले तर कोणताही संघर्ष न करता त्यांना शांततापूर्वक मार्गाने आपापल्या सीमेत परतण्याची विनंती करायची, गस्त घालताना दोन्ही देशांच्या सैनिकांना रायफल किवा शस्त्र बाळगायची परवानगी असेल, पण तिचा एकमेकाविरुद्ध वापर करता येणार नाही, ही रायफल अशा प्रकारे खांद्याला अडकवावी की तिच्या नळीचे तोंड खाली असेल, ही रायफल कोणत्याही परिस्थितीत रोखलेली असणार नाही वगैरे, असा तो करार आहे.

थोडक्यात, दोन्ही देशांमधल्या या दोन नियंत्रण रेषांमध्ये निर्मनुष्य प्रदेश निर्माण झाला आहे, जो कोणालाही कायम व्यापता येणार नाही. गेली अनेक वर्षे हा प्रदेश निर्मनुष्य आहे. तेथे दोन्ही देशांचे सैनिक त्यांना हवे तेव्हा जातात व परततात. कुणीही तिथे कायम वास्तव्य करीत नाही व कायम बांधकामही करीत नाही. काही वेळेला दोन्ही देशांच्या सैनिकांनी असे प्रयत्न केले, तेव्हा त्यांना ते कराराचा नियमभंग करीत आहेत हे निदर्शनास आणून एकमेकांचे सैनिक परत पाठवत आले आहेत. गेल्या पाच-सहा वर्षांपासून भारताने आपल्या सीमाभागात पक्के व मजबूत रस्ते बांधण्याचे काम सुरू केल्यामुळे भारतीय पथकांकडून गस्त घालण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे चिनी सैनिकांनीही आपली गस्त वाढविली आहे. त्यामुळे दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांसमोर येण्याचे प्रमाण वाढल्याने एकमेकांना मागे ढकलण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत.

मात्र गेल्या एप्रिलमध्ये फिंगर व गलवान खोऱ्यातील निर्मनुष्य प्रदेशात आलेल्या चिनी सैनिकांनी परत जाण्यास नकार दिला. अगदी लेफ्टनंट जनरल पातळीवर चर्चा होईपर्यंत ते अडून राहिले. या चर्चेत चिनी सैन्याने मागे जाण्याचे मान्य केले. त्यानुसार ज्या चार-पाच ठिकाणी चिनी सैन्याने मुक्काम ठोकला होता, तेथून सैन्य मागे घेतले होते. फक्त गलवान आणि पँगाँग त्सोजवळील फिंगर भागातून माघार घेणे बाकी होते. गलवान भागातील भारतीय गस्ती चौकी १४ येथून चिनी सैन्याने ठरल्याप्रमाणे माघार घेतली की नाही हे पाहण्यासाठी आलेल्या भारतीय पथकावर चिनी सैनिकांनी अचानक हल्ला करून २० भारतीय सैनिकांना ठार केले, तर दहा भारतीय सैनिकांना ताब्यात घेतले. या दोन्ही घटना दोन्ही देशांतील शांतता व सीमा व्यवस्थापन कराराचा भंग करणाऱ्या होत्या. या घटनेमुळे भारतीय सैनिकांनी चिडून गोळीबार करावा व हा करार मोडावा अशी चीनची अपेक्षा होती. तसे झाले असते तर चीनला सशस्त्र आक्रमण करण्याची संधी मिळाली असती. मात्र भारतीय सैनिकांनी प्राण गमावले पण शस्त्र न वापरण्याचा करार पाळल्याने चीनची पंचाईत झाली. त्यानंतर चीनने भारताचे पकडलेले १० सैनिक कोणताही गाजावाजा न करता सोडले, कारण त्यांना ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदेशीर व कराराचा भंग करणारे आहे. हे सैनिक शस्त्र वापरून स्वतःला सोडवून घेऊ शकले असते, पण त्यांचे हात कराराने बांधलेले असल्यामुळे त्यांनी प्रतिकार केला नाही. आता चीनचे सैन्य फक्त फिंगर विभागात आहे व ते कोणत्याही परिस्थितीत चीनला मागे घ्यावे लागणार आहे, कारण भारत करारातील तरतुदींना चिकटून बसला आहे. हे सैनिक आणखी महिनाभर तिथे राहिले तरी भारत त्यांना शस्त्रबळाने हुसकावून लावण्याऐवजी परत जाण्याची विनंती करीत राहील असे दिसते. त्यामुळेच मोदी यांनी चीनने घुसखोरी केली नाही, असे विधान केले आहे. चीनने गलवान खोऱ्यावर दावा केला आहे, पण त्यात नवीन काहीच नाही, कारण हा प्रदेश त्यांच्या दावा रेषेच्या जवळ आहे. मात्र जोपर्यंत दोन्ही देशांतील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ठरत नाही, तोपर्यंत चीनला गलवान किवा फिंगर क्षेत्रात कायम वास्तव्य करता येणार नाही. त्यासाठी त्याला भारताला आव्हान द्यावे लागेल व करार मोडावा लागेल. तसे झाले, तरच भारत शस्त्रांचा वापर करून हा प्रश्न सोडवू शकेल. भारताचे २० सैनिक मरण पावले असूनही भारत अजून चीनशी चर्चा करीत आहे, त्याचे कारण हेच आहे.

भारत-चीन संबंधांच्या पुनर्आखणीची तातडीची निकडच हा घटनाक्रम अधोरेखित करतो.

china_1  H x W:

गेल्या सोमवारी रात्री भारत-चीन सीमेवरच्या गलवान खोऱ्यातील गस्ती ठाणे क्रमांक १४वर झालेल्या चकमकीत एका अधिकाऱ्यासह २० भारतीय जवानांनी पत्करलेल्या हौतात्म्यानंतर भारत-चीन संबंधाची पुनर्आखणी करणे गरजेचे झाले आहे. गेल्या ४५ वर्षांत प्रथमच दोन्ही देशांच्या सीमेवर रक्तपाती संघर्ष होण्याची ही पहिलीच वेळ असली तरी ती अखेरची असेल असे म्हणणे आता धाडसाचे ठरेल. १९६२चे युद्ध, १९६७ साली सिक्कीमजवळील नाथुला खिंडीत भारतीय सैन्याने चिनी सैन्याची उडवलेली दाणादाण आणि १९८७ साली अरुणाचलच्या सुमदोरांग चू नदीच्या खोऱ्यात चीनला घ्यायला लावलेली बिनशर्त माघार अशा मजबूत स्थितीत भारताने चीनशी सहकार्याचा हात पुढे केला. त्यानंतर १९७५चा एक प्रसंग सोडला, तर भारत-चीन सीमा शांत राहिली. त्यामुळेच नंतर राजीव गांधी, नरसिंहराव, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहनसिंग आणि आता नरेंद्र मोदी यांच्या सरकारांनी चीनशी सतत चर्चा करून सौहार्दपूर्ण संबंध वाढविण्यावर भर दिला. चीन हा एक झपाट्याने आर्थिक प्रगती करणारा देश आहे व महासत्ता होण्याकडे त्याची वाटचाल चालू आहे, हे लक्षात घेऊन दोन्ही देशांतील संशयाचे वातावरण नष्ट होऊन आर्थिक व लष्करी क्षेत्रातही सहकार्य वाढविण्यावर भारताने भर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानापासूनच त्यांनी चीनचे महत्त्व ओळखून हे संबंध अधिक घनिष्ट करण्यावर भर दिला. चीनला सर्वाधिक वेळा भेट देणारे, तसेच चिनी नेत्यांची सर्वाधिक वेळा भेट घेणारे ते एकमेव भारतीय पंतप्रधान आहेत. भारत-चीन संबंधातील विश्वासाला भक्कम आधार देण्यासाठी त्यांनी प्रथम चीनमधील वुहान व नंतर भारतातील मामलापुरम येथे चीनच्या पंतप्रधानांशी जिनपिंग यांच्याशी धोरणात्मक चर्चा केली. या सर्व गोष्टींमुळे भारत-चीन संबंध परस्परविश्वासाच्या पायावर अधिक दृढ होतील, अशी अपेक्षा होती. दोन्ही देशांत पूर्णपणे नवी पिढी नेतृत्वपदी आहे. त्यामुळे नवे चिनी नेते आता भारताशी असलेल्या संबंधांकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहत असतील, असे वाटले होते. दोन्ही देशांत सीमाप्रश्नाचे घोंगडे भिजत पडले असले, तरी अन्य क्षेत्रांत आधी संबंध वाढवून मग अत्यंत जटिल असलेल्या सीमाप्रश्नाला हात घालता येईल, असेही वाटत होते. कारण आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक व लष्करी संबंधात स्थैर्य निर्माण होत असल्यामुळे सीमाप्रश्न सोडविण्यासाठी जे विश्वासाचे वातावरण लागते, ते निर्माण होऊ लागले होते. दोन्ही देशांनी आपले सीमेसंबंधीचे दावे मागे घेतले नसले, तरी त्या दाव्यांबाबतचा आग्रह कमी झाला होता. दोन्ही देशांत एक नियंत्रण रेषा आहे व ती दोघांचे समाधान होईल अशा प्रकारे निश्चित करणे हे एकच काम उरले होते. पण तिथेच चीनच्या मनात खोट होती, हे आता उघडकीस आले आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी भारताने तिबेटप्रश्नी चीनची भूमिका मान्य केली होती. अमेरिकेने चीनला घेरण्याचा जो व्यूह आखला आहे, त्यात सामील होणे भारताने टाळले होते, तसेच चीनच्या पाकिस्तानबरोबरच्या संबंधांना आक्षेपही घेतला नव्हता.

China's Attack On Indian
असे सांगितले जाते की, भारताने काश्मीरमधील ३७० कलम रद्द करून लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यानंतर चीनमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. पण हे तितके बरोबर वाटत नाही. भारताने संपूर्ण लडाखवरचा दावा मागे घेतला नसला, तरी काराकोरम पर्वतरांगांच्या पलीकडचा लडाख चीनने आधीच बळकावला होता व तेथे रस्तेबांधणीही केली होती. वाटाघाटीनंतर भारताने या क्षेत्रावरील दावा कदाचित मागे घेतला असता, कारण काराकोरम पर्वताच्या दुर्गम रांग ओलांडून तो प्रदेश सांभाळणे भारताला अवघड आहे. अरुणाचल भागात चीन तवांगवर दावा सांगत असला, तरी तो प्रदेश भारताच्या ताब्यात असल्यामुळे तो चीनला देण्याचा प्रश्न उद्भवत नव्हता व चीनचा हा दावाही भारताच्या संपूर्ण लडाखवरील दाव्याप्रमाणेच डावपेचात्मक होता. त्यामुळे दोन्ही देशांतील सीमा ठरविताना या प्रदेशांबाबत देवाणघेवाण शक्य होती. पण चर्चेतून हा प्रश्न आपल्याला हवा तसा सुटणार नाही, याची चीनची खात्री पटलेली होती. दरम्यान भारताने आपल्या क्षेत्रात गेल्या पाच वर्षांत मोठी पायाभूत सुधारणा केली आहे. नियंत्रण रेषेकडे जाणारे अनेक भक्कम रस्ते तयार केले आहेत. या रस्त्यांचा वापर करून भारताने आपली लष्करी स्थितीही भक्कम केली, तर सीमाप्रश्नावरील चर्चेत आपण दुबळे पडू अशी भीती वाटल्याने चीनने गेल्या महिन्यापासून आपली दावा रेषा इंचइंच पुढे सरकविण्यास सुरुवात केली. सुरुवातीला चिनी सैनिक नेहमी आपल्या दावा रेषेपर्यंत येतात तसे येत आहेत व नेहमी परत जातात तसे जातील असे वाटत होते. पण नंतर चिनी सैनिकांनी त्या भागात पक्के रस्ते, बंकर बांधण्यास व खंदक खोदण्यास सुरुवात केल्यावर भारताने दोन्ही देशांतील शांततेच्या विविध कराराअंतर्गत चर्चा सुरू केली व चिनी सैन्याने भारतीय दावा रेषेपर्यंत मागे जावे यासाठी खटपट सुरू केली. आतापर्यंत अशा चर्चेनंतर चिनी सेना मागे जाते असा अनुभव आहे. पण यावेळी चीनने मागे जाण्यास नकार दिला. स्थानिक बटालियन कमांडरच्या पातळीवर ही चर्चा झाली तरी काही फरक पडत नाही, हे पाहून नंतर ब्रिगेडिअर, मेजर जनरल पातळीवरही चर्चा झाली तरी चीनने आपला हेका सोडला नाही, तेव्हा परिस्थिती गंभीर आहे हे लक्षात आले आणि राजकीय पातळीवर संपर्क साधण्यात आला. त्यानंतर लेफ्टनंट जनरल या अतिउच्च अशा अधिकारी पातळीवर चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या चर्चेनंतर चिनी सैन्याने काही ठिकाणी माघार घेतली, तरी गलवान खोऱ्यातील फिंगर भागातून माघार घेण्यास नकार दिला. पण चीनने जे ठाणे व्यापले होते, ते निर्मनुष्य क्षेत्रात असल्यामुळे ते ठाणे रिकामे करण्याबाबत भारत ठाम राहिला व त्याने चिनी सैन्याच्या समोर आपले सैन्य उभे केले व चिनी सैन्य मागे हटल्याशिवाय भारतीय सैन्य मागे हटणार नाही हे ठामपणे स्पष्ट केले. पीपी १४ या नावाने ओळखले जाणारे ठाणे कोणत्याही परिस्थितीत सोडायचे नाही, हे तेथील चिनी सैन्य तुकडीला सांगण्यात आले होते. पण भारताने या तुकडीसमोर काही फुटांवरच आपले सैन्य उभे केल्यामुळे चीनची पंचाईत झाली. त्याला शेवटी आपल्या तुकडीला मागे हटण्याचा आदेश द्यावा लागला. हा आदेश चिनी तुकडीला खूपच मानहानिकारक वाटला व ही मानहानी त्यांच्या मनात खदखदत राहिली. चिनी सैन्य पूर्णपणे मागे गेले आहे की नाही, हे पाहण्यासाठी तेथे असलेल्या १६व्या बिहार बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू हे आपल्या दोन सहकाऱ्यांसह गेले असता, त्या तिघांवर चिनी सैनिकांनी हल्ला केला व त्यांना ठार मारले. ते पाहताच या बटालियनचे बाकी सैनिक धावून गेले व त्यांनी चिनी सैन्याचा निःशस्त्रपणेच प्रतिकार करण्यास सुरुवात केली, पण चिनी सैन्य खिळे लावलेल्या लाठ्या, लोखंडी कांबी व पहारी आणि दगडधोंडयांनी सज्ज होते, त्यामुळे २० भारतीय जवानांना गंभीर जखमा झाल्या, त्यातले काही उंच शिखरावरून खाली दरीतून वाहणाऱ्या गलवान नदीत पडले. रात्रीच्या वेळी ही घटना घडली, शिवाय त्या वेळी तापमान शून्याखाली गेलेले असल्यामुळे अनेक जवान थंडीने काकडून मरण पावले. पण नंतर भारतीय सैन्यानेही चिनी सैनिकांवर जबर हल्ला करून त्यांच्या ३५ ते ४३ सैनिकांना यमसदनास धाडले.


china_1  H x W:
ही घटना तर घडून गेली, पण ती भारत-चीन संबंधांवर एक न मिटणारा ओरखडा निर्माण करून गेली. आता पुढे काय? हा मोठा प्रश्न आहे. चीन ही एक महासत्ता म्हणून उदयाला येत आहे व भारत तिच्या या मार्गात एक अडथळा ठरू शकतो हे चीनला माहीत आहे, त्यामुळे हा अडथळा अधिक मोठा होण्यापूर्वीच दाबून टाकणे चीनला आवश्यक वाटते. त्यामुळे भारत हा चीनच्या रडारवर नेहमीच राहणार आहे. भारताला दाबात ठेवण्यासाठी दोन्ही देशांतील न सुटलेला सीमाप्रश्न चीनच्या हाताशी आहे. किंबहुना तो न सोडविण्यामागे चीनचे तेच कारण आहे. त्यामुळे यापुढे भारताला आधी सीमाप्रश्न सोडवा असा आग्रह चीनकडे धरणे भाग आहे. चीनने गलवान भागावर हक्क सांगून हा प्रश्न चिघळेल अशी व्यवस्था करून ठेवली आहे. भारत चीनचा हा दावा मान्य करण्यास तयार नाही.

यापुढच्या काळात भारताला चीनसंबंधी धोरणाचा समग्र विचार करताना धोरणात आक्रमकता आणावी लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वुहान आणि मामलापुरम भेटींतून चीनला चुचकारण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा उपयोग झाला नाही. यापुढे अशा परिषदा टाळून चीनपुढे आर्थिक व लष्करी आव्हान उभे करण्यासाठी आपली शक्ती लावली पाहिजे.

आधुनिक प्रचारतंत्रात पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनता पक्ष अग्रेसर आहे. आता हे प्रचारतंत्र चीनविरुद्ध वापरणे आवश्यक आहे. भारताने आमचा प्रदेश बळकावला आहे हे चीन सतत सांगत होता, एवढेच नाही, तर गलवान घटनेतील दोषींना भारताने शिक्षा करावी अशी जाहीर मागणी केली. खरे तर या प्रचाराला आक्रमक उत्तर देऊन भारताने गलवानमधील चिनी कमांडरला आपल्या ताब्यात देण्याची मागणी करायला हवी होती. भारत अशा तंत्रात मागे पडतो. येत्या वर्ष-दीड वर्षात भारताने सीमाप्रश्नावरील चर्चा सुरू करायला पाहिजे, तरच या चर्चेतून फलनिष्पत्ती निघेल. अन्यथा हा प्रश्न चीन कधीच निकालात काढणार नाही, उलट भारताला दाबात ठेवण्यासाठी या प्रश्नाचा वापर करीत राहील.

लेखक आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहेत.