डिप्रेशन आणि आत्महत्या

विवेक मराठी    22-Jun-2020
Total Views |
@डॉ. शुभांगी पारकर

डिप्रेशनसारख्या आजारात व्यक्तीला समजून उमजून घेणाऱ्या एका व्यक्तीची गरज लागते. याचा अर्थ आपण त्या व्यक्तीच्या निराशेत शिरावे असा होत नाही, तर त्या व्यक्तीला आपल्या आशावादी दृष्टीकोनातून साथ द्यायला हवी. अशा व्यक्तींना एकटे न सोडता त्यांच्याबरोबर राहून त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जाऊन उपचार देणे आवश्यक आहे.


Depression and suicide_1&

कोविड-१९च्या रखरखत्या उन्हाळ्यात संपूर्ण जगाची त्रेधातिरपिट उडाली. कोविड-१९ची बाधा होऊ नये, म्हणून प्रत्येक देश पराकोटीचे प्रयत्न करून या विषाणूला कसे पसरू द्यायचे नाही, याची डोळ्यात तेल घालून काळजी घेत होता. तरीही कित्येक कोटी लोक बाधित झाले. कित्येकांनी त्यात प्राण गमावले. पण बऱ्याच लोकांच्या बाबतीत सगळ्यात मोठी एक गोष्ट झाली, ती म्हणजे सामाजिक एकटेपणा. अलगीकरण आणि विलगीकरण करता करता लोकांच्या मनात कोविड-१९मुळे चिंता, त्याच्याबद्दलची सगळीच अनिश्चितता, मृत्यूचे भय, आयसीयूचे बिल यामुळे तणाव आणि विभ्रम निर्माण झाला. या काळात ज्याचे मानसिक आरोग्य पूर्णपणे शाबूत राहिले, तो माणूस खरेच महान असला पाहिजे. बऱ्यापैकी माणसांना आणि त्यातल्या त्यात आधीपासून मानसिक आरोग्याची समस्या असलेल्यांना हा काळ कसा घालवायचा, त्याला कसे सामोरे जायचे ही भयानक समस्या निर्माण झाली. बरे, या काळात डॉक्टरला शोधणे, आपल्या मित्रमंडळींचा प्रत्यक्ष आधार मिळणे खूप कठीण होऊन बसले आहे. या मानसिक आजारात सगळ्यात सर्वसामान्य आजार म्हणजे डिप्रेशन किंवा निराशेचा आजार.

तसे पाहिले, तर प्रत्येकाला उदास वाटते. आपल्या आयुष्यात काहीतरी नकारार्थी झाले की माणसाला विमनस्क वाटते. प्रेमभंग किंवा अपेक्षाभंग झाला की मनात खिन्नतेची लहर येते. पण कधीकधी कुठलेही कारण नसतानासुद्धा मन खिन्न होते. अशा पद्धतीने मन खिन्न होणे, कधीमधी रडवेले वाटणे, दाटून फार काळ उदास वाटणे यात काही फरक असतो का? ज्यांना ज्यांना निराशेचा मानसिक आजार झाला आहे, ते या प्रश्नाचे उत्तर शंभर टक्के होय असे देतील. कधीमधी काही काळांसाठी उद्विग्न वाटणे आणि दीर्घकाळ मनात खोलवर उतरलेली निराशा यात खूप फरक आहे. परिस्थितीजन्य खिन्नता आणि निराशेचा मानसिक आजार या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या दोन्हीही अनुभवांत सुरुवातीला निराशेची भावना कदाचित सारखीच वाटेल, पण जसजसे दिवस जातात, तसतशी परिस्थितीजन्य आलेली निराशेची लाट हळूहळू आपला जोर कमी करत मागे वळत जाते. व्यक्तीलाही हे पटकन जाणवते. या परिस्थितीजन्य खिन्नतेच्या भावनेचा उद्रेक खूप महत्त्वाचा आहे. शिवाय हा उद्रेक व्यक्तीच्या आयुष्यातील एखाद्या गंभीर घटनेशी सरळसरळ संबंधित असतो. निराशेच्या मानसिक आजारात उदासीनतेची पातळी अत्यंत गंभीर असते. यात या आजाराची इतर लक्षणे - मुख्यत: जैविक लक्षणे आणि मानसिक लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून येतात. जैविक लक्षणांत झोप न येणे किंवा लवकर जाग येणे, भूक कमी होणे, वजन कमी होणे ही मुख्य लक्षणे आहेत. निराशेच्या आजारात व्यक्तीला त्याच्या कुठल्याही कृतीत आनंद वाटत नाही, मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवतो, मन एकाग्र होत नाही, विसरल्यासारखे वाटते. आपण काही करण्यास पात्र नाही, आपले आयुष्य व्यर्थ आहे आणि आपले आयुष्य तसेच राहील, त्यात सुख वा आनंद येणारच नाही व आपणही ते मिळवण्यास असमर्थ आहोत असे व्यक्तीस सतत वाटत असते. बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीला आपण आयुष्यात काहीतरी चुका केल्या आहेत, आपल्यावरच्या जबाबदाऱ्या नीट निभावल्या नाहीत असे वाटून मनात अपराधीपणाची भावना जोम धरते. कधी काही जणांना आपल्या जगण्यात आता अर्थ उरला नाही असे वाटते. असे जगण्यापेक्षा आपण या जगात राहिलो नाही म्हणजे आपल्या प्रियजनांवर आपण भार म्हणून राहणार नाही, या भावनेने निराश व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करतात. निराशेने गंभीरपणे ग्रस्त झालेल्या व्यक्तीच्या मनात जेव्हा आत्महत्येचे विचार येतात, तेव्हा ती निराशेची भावना अत्यवस्थ डिप्रेशनचे लक्षण आहे. बऱ्याच वेळा आत्महत्येचे प्रयत्न करून बऱ्याच व्यक्ती उपचारासाठी जेव्हा दाखल होतात, तेव्हा त्यांच्या मानसिक आजाराचे स्वरूप कळते. मानसिक आजार हे आत्महत्येचे महत्त्वाचे कारण आहे. किंबहुना आत्महत्या केलेल्या व्यक्तींमध्ये ९० टक्के व्यक्ती मानसिक आजाराने ग्रस्त असतात. बऱ्याच वेळा आत्महत्येचे विचार मनात आलेल्या व्यक्ती खूप रडतात. त्यांच्या मनात येणाऱ्या असह्य वेदनेला कधीकधी प्रत्यक्ष, तर कधी अप्रत्यक्ष वाट करून देतात. बऱ्याच वेळ इतर लोकांचा मूड खूप वेगळा असतो, आनंद घ्यायचा असतो, अशा वेळी या व्यक्ती रडके सूर आळवत राहतात. कित्येक वेळा चिडचिड करतात. ही चिडचिड स्वत:वर तर असतेच, तसेच आपल्या माणसांना मनातली वेदना का कळत नाही, म्हणून दुसऱ्यांवरसुद्धा ती चीड असते. कधीकधी हे निराश, अविचारी विचार दुसऱ्यांना कळू द्यायचे नाही, म्हणून एकटे राहणे पसंत करतात.

निराश व्यक्ती आपल्या या विचारांपासून स्वत:ला परावृत्त करायची खूप धडपड करतात. केविलवाणी धडपड करतात. बऱ्याच व्यक्तींसाठी आत्महत्येचा प्रयत्न ही मदतीसाठी केलेली आर्त हाक असते. यासाठी ते त्यांच्या कृतीतून वा बोलण्यातून आपले आत्महत्येचे विचार प्रकट करत असतात. बऱ्याच वेळा या व्यक्तींची ही आर्त आणि असाहाय्य हाक आणि त्यांच्या निराश मनाची गंभीर परिस्थिती मित्रमंडळींच्या, नातेवाइकांच्या लक्षात येत नाही किंवा ती त्यांना अपेक्षित नसते. इथेच सगळे गणित चुकते. ती व्यक्ती जेव्हा आत्महत्या करून या जगाचा निरोप घेते, तेव्हा सगळ्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडतो. तेव्हा लक्षात येते की ही व्यक्ती आपल्याला किती प्रकारांनी आत्महत्येचा सिग्नल देत होती. मित्रमंडळी, नातेवाईक जेव्हा व्यथित होतात, अपराधी मनाने मान झुकवतात, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. मानसिक रोगाने एक बळी घेतलेला असतो. जर या व्यक्तीला वेळीच मानसोपचारतज्ज्ञाकडे नेले असते, तर त्याच्या डिप्रेशनचे निदान तरी झाले असते. त्याला योग्य उपचार तरी मिळाले असते. त्याचा जीव वाचला असता. आपले माणूस आपल्यात राहिले असते. अनेक नातेवाईक नंतर सांगतात की, त्यांनी त्याला खूप समजावले होते, पण तो ऐकतच नव्हता. कसा ऐकेल? का ऐकेल? हार्ट अ‍ॅटॅक आला, तर एखाद्या रुग्णाला घरी बसून आता बरे वाटेल, धीर धर असे सांगून तो बरा होईल का? योग्य वेळी हृदयरोगतज्ज्ञाकडे नेऊन त्याला वैद्यकीय उपचार दिले, तरच ती व्यक्ती वाचेल, नाहीतर तिचाही जीव जाईल. तसाच डिप्रेशन किंवा निराशेचा मानसिक आजार हा मेंदूतल्या रसायनांचा समतोल बिघडल्यामुळे होतो आणि तीव्र डिप्रेशनमध्ये आत्महत्यासुद्धा घडते. वेळीच उपचार दिले, तर केवळ त्या व्यक्तीची आत्महत्या तर आपण थांबवू शकूच, शिवाय निराश मनाच्या अंधारात लपेटलेल्या त्या व्यक्तीला जीवनाच्या प्रकाशात आणता येईल.

Depression and suicide_1& 
डिप्रेशनच्या स्वरूपानुसार आज अनेक औषधे आहेत, जी घेऊन लोक उत्तम विधायक आयुष्य जगत आहेत. जे लोक आत्महत्येबद्दल बोलतात, ते आत्महत्या करत नाहीत असा अनेक लोकांचा भ्रम आहे. आत्महत्येच्या धमक्या या मानसिकदृष्ट्या चंचल झाल्याचे आणि मानसिक रोग असल्याचे लक्षण आहे. हे लोक कदाचित टाहो फोडून त्यांच्या संभ्रमात मदत मागत असतात. त्यांची ही मदतीची हाक आपण तत्काळ ऐकली पाहिजे. आत्महत्या हा त्या व्यक्तीचा स्वयंपूर्ण निर्णय असतो, हा अनेक लोकांचा असमंजस युक्तिवाद आहे. कदाचित आपल्या मनात वाटणाऱ्या अपराधावर पांघरूण घालण्याचा हा असाहाय्य प्रयत्न असावा. तो पूर्ण चुकीचा आहे. कारण एका व्यक्तीच्या आत्महत्येने तिच्या आयुष्याशी निगडित असलेल्या अनेकांच्या जीवनावर दीर्घकाळ परिणाम होतो. अनेक कुटुंबांना जिवंत राहून मरणप्राय वेदना भोगाव्या लागतात.

डिप्रेशनसारख्या आजारात व्यक्तीला समजून उमजून घेणाऱ्या एका व्यक्तीची गरज लागते. याचा अर्थ आपण त्या व्यक्तीच्या निराशेत शिरावे असा होत नाही, तर त्या व्यक्तीला आपल्या आशावादी दृष्टीकोनातून साथ द्यायला हवी. अशा व्यक्तींना एकटे न सोडता त्यांच्याबरोबर राहून त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जाऊन उपचार देणे आवश्यक आहे. उपदेशाचे डोस न पाजता त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी लवकरात लवकर घेऊन जाणे आवश्यक आहे. निराशेच्या मानसिक आजारात जेव्हा आत्महत्येचे विचार येतात, तेव्हा हार्ट अ‍ॅटॅकच्या रुग्णाला ज्या प्रेरणेने प्रियजन उपचारासाठी नेतात, त्याच प्रेरणेने याही रुग्णांना शास्त्रीय वैद्यकीय उपचारांसाठी न्यायला पाहिजे. वेळ कमी असतो आणि इमर्जन्सी गंभीर असते. प्रियजनांनी काहीही झाले तरी अशा रुग्णांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करायची गरज आहे.
एम.डी., पीएच.डी.