जोगी

विवेक मराठी    22-Jun-2020
Total Views |


jogi_1  H x W:

पाहा ना! आपल्याला जागे करण्यासाठी वासुदेव येतो
, जागल्या येतो, एव्हढेच नव्हे तर लोक
सुद्धा हेच काम करतो. प्रश्न असा आहे की आपण खरोखरच जागे होतो का
?

भाव धरी तया तारील पाषाण असे संतांनी सांगितले आहे. पण या जगात परमेश्वर आहे असा भाव आपल्या मनात आहे का?

जग जोगी जग जोगी । जागे जागे बोलती ॥1 ॥

जागता जगदेव । राखा काही भाव ॥ धृ ॥

अवघा क्षेत्रपाळ । पुजावा सकळ ॥3 ॥

भगवद्गीतेतील क्षेत्र-क्षेत्रज्ञ योगात सांगितले आहे की,

इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते ।

एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः ॥ १३-१ ॥

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे कौंतेया (कुंतीपुत्र अर्जुना), हे शरीर क्षेत्र या नावाने संबोधिले जाते आणि याला जो जाणतो त्याला, त्याचे तत्त्व जाणणारे ज्ञानी लोक, क्षेत्रज्ञ असे म्हणतात. क्षेत्र असे म्हणन्याचे कारण म्हणजे येथे शरीर हे हळूहळू क्षीण होते किंवा शेताप्रमाणे या ठिकाणी कर्माचे फ़ल निर्माण होते. म्हणून शरीराला क्षेत्र असे म्हणतात. याला जाणणारा क्षेत्रज्ञ आणि या दोहोंना जाणणारा ज्ञानी होय. सर्व शरीरांमध्ये-ब्रह्मदेवापासून गवताच्या पात्यापर्यंत अनेकांना शरीराची उपाधी असते. या उपाधींपासून विभक्त असलेल्याला क्षेत्रज्ञ म्हणतात.तो उपाधिभेदांशिवाय एवं सत् आणि असत् वगैरे शब्दानुभेदाने जाणण्यास योग्य नाही असे समज.ज्या ज्ञानाच्या योगाने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याबद्दलचे जे ज्ञान आहे, ज्या ज्ञानाच्या योगाने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ प्रत्ययाला येतात ते ज्ञान यथार्थ ज्ञान होय.

ज्ञानमूलक भक्तिप्रधान कर्मयोग हे गीतेचे तात्पर्य आहे. म्हणजेच ज्ञान व भक्ती ह्यांचा समन्वय आहे व त्यात भक्ती प्रधान आहे. ईश्वर: सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति”–सर्व भूतांच्या हृदयात ईश्वर आहे. हे समजले म्हणजे ज्ञान, कर्म व भक्ती एकच आहेत हे ध्यानात येईल.

गीतेचा सर्वोत्कृष्ट विचार म्हणजे ईश्वर सर्वांच्या हृदयात आहे.या ईश्वरालाच जाणण्याचा प्रयत्न करायला हवा.त्यासाठी ध्यान आवश्यक. तसेच नामस्मरणाने अंतरंगातील ईश्वराचा साक्षात्कार होण्याच्या दिशेने प्रगती होते. हा ईश्वरच आपला क्षेत्रपाळ होय. बरे! या क्षेत्रपाळाची पूजा कशी करावी?

पुजा पत्र काही । फळ पुष्प तोय ॥4 ॥

पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति।

तदह्म भक्त्युहृतमश्रामि प्रयतात्मनः॥ गीता ९-२६.

परमेश्वराला जो कोणी कांहीं भक्तीनें अर्पण करतो त्याचा परमेश्वर मोठया प्रेमाणें स्वीकार करतो. पान, फूल, फळ अगदी पाणीसुद्धा जो मला भक्तिभावानं देतो ते प्रेमपूर्वक अर्पण केलेले मी आनंदानं ग्रहण करतो, असे भगवंत सांगतात. इथं वस्तू किंवा पदार्थ अर्पण करणं या उपचाराला महत्त्व नाही, तर जीवनात जे जे काम आपल्या वाट्याला आलंय ते कोरड्या कर्तव्यभावनेनं न करता प्रेमानं, आपुलकीनं, आत्मियतेच्या भावनेनं केलं पाहिजे. जसं आपले हात आपल्याला भरवतात अन् त्यात काहीही विशेष करतो असं आपल्याला वाटत नाही तितक्या सहजपणे इतरांसाठी काम करणं, त्यांची सेवा करणं महत्त्वाचं. खर्‍या भक्तीचंच नव्हे तर समाधानी, संपन्न व धन्य जीवनाचं हेच रहस्य आहे. इतकं सोपं व सहज असूनही आपल्याला का जमत नाही? हाच मोठा प्रश्न आहे.

बहुता दिसा फेरा । आला या नगरा ॥5 ॥

नका घेऊ भार । धर्म तोची सार ॥6 ॥

तुका मागे दान । द्यावे जी अनन्य ॥7 ॥

असे प्रबोधन करून आपला लोकगायक पुढच्या नगराला जाण्यास निघताना म्हणतो, आपल्या गावात माझा फेरा बऱ्याच दिवसांनी आलेला आहे. तेव्हा काहीतरी दानधर्म करा. संत तुकाराम महाराज हेच भक्तीचे अनन्य दान मागत आहेत. आपल्या गहन भाषेतील ज्ञान संतांनी असे सोपे करून मांडले आहे.