ऑनलाईन सोपस्कार नको, जीवनशिक्षण हवे

विवेक मराठी    22-Jun-2020
Total Views |
@वैद्य ज्योत्स्ना पेठकर

 जिज्ञासासारख्या वेगळ्या वाटेवर चालणारा ‘जिज्ञासाचा पालक’ मला खूप महत्त्वाचा वाटतो. लॉकडाउन चालू असताना मुलांबरोबर ऑनलाइन किंवा झूम मीटिंग्ज शक्य नाही आणि ते आम्ही करणार नाही, याला त्यांचाही तेवढाच पाठिंबा होता. जून सुरू झाला आणि सेंटर सुरू करण्याचे वेध लागले, तसे पालकांनीच ‘जिज्ञासा’ सुरू करा म्हणून आग्रह धरला आहे. आजूबाजूला इतके घाबरवून सोडणारे वातावरण असतानाही ‘मुलांचे natural immune’ जिज्ञासातूनच त्यांना मिळेल, याची त्यांना जणू पुरेपूर खात्री आहे.

online_1  H x W

महासंक्रमण टाळण्यासाठी आपण आर्थिक नुकसान सोसून लॉकडाउनसारखा पर्याय निवडला खरा, पण या उपायाला आपल्या मर्यादा आहेत हे लक्षात आल्यावर हळूहळू जनजीवन पूर्ववत आणण्याची धडपड दिसून येतेय. हळूहळू सुरू होणाऱ्या गोष्टींमध्ये शाळांचा क्रमांक कधी येणार, हे अद्याप अनिश्चित आहे.

संकटकाळ जसा ‘परीक्षेचा’ असतो, तसाच ‘लर्निंग’चा आणि अनेक गोष्टींबद्दल ‘फेरविचार’करायला लावणारादेखील असतो. गेले अनेक दिवस या संदर्भात चालू असलेल्या चर्चेतून अनेकांचा ‘शिक्षणाविषयक दृष्टीकोन’ अथवा धोरण अनुभवायला मिळाला. पर्यायी मार्ग स्वीकारताना ‘ऑनलाइन’ पद्धतीचा विचार जोर धरतोय. अर्थातच याचे आर्थिक, सामाजिक आणि वैयक्तिक तोटे अनेकांना जाणवत आहेत.

शाळा हे जणू फक्त अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे ठिकाण.. मुलांच्या स्वाभाविक उत्सुकता काय आहेत, त्यांना पडणारे प्रश्न कुठले याचा कुठलाही विचार करणे इथे गरजेचे नसते. ते वर्गात बसून जे काही शिकत आहेत, ते त्यांना सुसंबद्ध, सुसंगत (relevant) वाटतेय का, हा विचार तर येतच नसावा. संपूर्ण व्यवस्थाच ‘अध्यापनकेंद्रित' (teaching centric)! त्यात मुलांचे आकलन अथवा लर्निंग काय झाले, त्या विषयावर त्याची मते तो कशी व्यक्त करतोय ही बाब गौण! अशा पठडीतल्या शिक्षण व्यवस्थेला ‘ऑनलाइन सोपस्कार’ पूर्ण करणे फारसे कठीण नसावे. पण 'जिज्ञासा'सारख्या ‘अभ्यासक्रमाच्या’ चौकटीतून मुक्त असलेल्या ‘अध्ययनकेंद्रित’ (learning centric) शिक्षण पद्धतीसाठी हे ऑनलाइन सोपस्कार निव्वळ अशक्य!

मुलांच्या स्वाभाविक उत्सुकतेला खतपाणी घालून त्याला ‘स्व-अध्ययनाला’ प्रेरित करताना हा त्याच्या एकट्याचा ‘सगळ्या विविधतेबरोबर’ प्रवास चालू असतो. एक वर्ग भरवून सगळ्यांना एकच गोष्ट ‘शिकवणे’ तिथे होतच नाही. शेत, स्वयंपाकघर आणि वर्कशॉप यासारख्या ठिकाणी हाताने काम करण्याने त्यांचा आत्मविश्वास वाढत असतो, अनेक संकल्पनांची ‘अनुभूती’ ते स्वत: घेत असतात, यामुळे संकल्पना डोक्यात मनात घट्ट रुजतात.. हे ऑनलाइन कसे करणार? त्यांन सुचणाऱ्या ‘उत्स्फूर्त’ गोष्टींनुसार पटापट योजना करून त्यांच्या सर्जकतेला प्रतिसाद दिला जातो. ही उत्स्फूर्तता आणि कल्पकता ऑनलाइन कशी जपणार? जिज्ञासाची रचना हेच त्याचे वैशिष्ट्यं आहे. इथल्या सकारात्मक वातावरणाची ऊब मी मुलांना झूम कॉलमधून कशी देणार?


online_1  H x W

बऱ्याच जणांना असे वाटेल की ६ महिन्यांचा तर प्रश्न आहे, थोडेसे जुळवून घ्यायला काय हरकत आहे. ६ महिने काय, पण १ महिना हादेखील खूप मोठा कालावधी आहे. याचे शारीरिक आणि मानसिक दूरगामी परिणाम दिसणार आहेतच. पण शिक्षण हा फक्त एक व्यवहार आहे, जो कशाही पद्धतीने पूर्ण करता येतो, हेदेखील नकळत भासवले जातेय. मुळात ‘जाणिवा’ बोथट झाल्या असताना आपण हा व्यवहार्य विचार रुजवण्याची जोखीम घ्यायची का?

प्रचलित असो अथवा जिज्ञासासारख्या वेगळ्या वाटेवरच्या शिक्षण संस्था, ठरावीक संख्येत मुले बोलवून ‘प्रत्यक्ष काम’ सुरू केले जाऊ शकतेय. मुलांसाठी त्यांची शाळा हे त्यांच्या ‘सर्वांगीण विकासाचे केंद्र’ असते. ते त्यांचे भावविश्व असते. आधीच ३ महिने ती घरात कोंडून आहेत, आवतीभोवती फक्त नैराश्याचे आणि चिंतेचे वातावरण आहे. त्यांच्या बाबतीत विचार करताना आपण फक्त ‘अभ्यासक्रमाचा’ विचार करतो, त्यांच्या ‘मनोभावाचा’ विचार कधी करणार आहोत? अशात त्यांना खरी गरज आहे ‘आश्वस्त’ करण्याची. आली संकटे की घे घरात कोंडून ही चुकीची शिकवण दिली जातेय. खरे तर संकटातून मार्ग काढत ‘जीवनाचा आणि शिक्षणाचा प्रवाह’ अविरत कसा ठेवावा, ही मोठी शिकवण आपण त्यांना देऊ शकतोय. या निमित्ताने उत्तम प्रतिकारक्षमता कशी राखायची, याचे शिक्षण आपसूकच होणार आहे.

लॉकडाउन सुरू झाल्यापासूनच आम्ही सगळे facilitators मुलांशी सातत्याने संपर्कात होतो. फोन करून गोष्टी ऐकवणे, एखाद्या कवितेबद्दल बोलणे, किंवा घरकामात काय मदत चाललीये, एखाद्या पाककृतीविषयी बोलणे.. प्रत्येक मुलाच्या आम्हाला माहीत असलेल्या आवडीनिवडीनुसार छान गप्पा मारायचो. प्रत्येक वेळी फोन ठेवताना "ताई, जिज्ञासा सुरू कर नं" म्हणून आग्रह ठरलेलाच असायचा. १५ दिवसांचे २ महिने झाले, तेव्हा मात्र त्यांच्यातली निराशा मला अगदीच जाणवू लागली. कोरोना सोडून घरात अथवा कुठेही दुसरा विषय नाही. टीव्हीवर हॉस्पिटलच्या गलथानपणाबद्दलच्या बातम्या दाखवताना प्लास्टिकमध्ये गुंडाळलेली प्रेते बघून त्यांनी चांगलीच धास्ती घेतली होती. "आईबाबांना काही होणार नाही नं..?" असेही प्रश्न वेळोवेळी विचारले जात होते. शब्दांनी कितीही आश्वस्त केले, तरी ‘शाळेसारख्या गोष्टी सुरळीत’ दिसून येणे हे जास्त आश्वस्त करणारे ठरणार आहे.

राहिला प्रश्न ‘महासंक्रमणाचा’. शब्द पुन्हा नीट वाचा - ‘महासंक्रमण’, ‘महामारी’ नव्हे. एकुणातच मृत्युदर अत्यल्प असताना आपण कशाची भीती घेतोय? बाधित होणे हा अपराध नाहीये, ती एक उत्तम संधी आहे ‘प्रतिकारशक्ती’ वाढीस लागण्याची. शाळेतून नियमितता सुरू झाली की आपोआप त्यांची मने प्रसन्न राहतील. काही वेळासाठी कोरोना नामक बागुलबुवाची भीती वाटेनाशी होईल. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रसन्न मने आत्यंतिक आवश्यक आहेत. यासाठी पालकांचे सहकार्य अपेक्षित आहे. चिंता करत बसायचे की योग्य मार्ग काढायचा, हा महत्त्वाचा निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे.

जिज्ञासासारख्या वेगळ्या वाटेवर चालणारा ‘जिज्ञासाचा पालक’ मला खूप महत्त्वाचा वाटतो. लॉकडाउन चालू असताना मुलांबरोबर ऑनलाइन किंवा झूम मीटिंग्ज शक्य नाही आणि ते आम्ही करणार नाही, याला त्यांचाही तेवढाच पाठिंबा होता. जून सुरू झाला आणि सेंटर सुरू करण्याचे वेध लागले, तसे पालकांनीच ‘जिज्ञासा’ सुरू करा म्हणून आग्रह धरला आहे. आम्ही वेगवेगळ्या मार्गांचा विचार करतच होतो. कुणाच्या घरी एकाच विभागातील मुलांना एकत्र करायचे का? एके दिवशी आम्ही एका लर्नरकडे जायचे का? अशा सगळ्या पर्यायांना ८५पैकी ७० पालकांचा पुरेपूर पाठिंबा होता. आजूबाजूला इतके घाबरवून सोडणारे वातावरण असतानाही ‘मुलांचे natural immune’ जिज्ञासातूनच त्यांना मिळेल, याची त्यांना जणू पुरेपूर खात्री आहे.

या प्रसंगातून मला त्यांच्या विचारांची स्पष्टता (clarity of thoughts) अधिकच आली आणि कदाचित त्यामुळेच वेगळ्या वाटेवरचे धाडस त्यांना करता आले असावे. पालकांनी मुलांच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त ‘शाळेचे’ महत्त्व समजून घेऊन सगळी काळजी-खबरदारी घेऊन योग्य निर्णय घ्यायला हवे आहेत.

या निमित्ताने आपल्याला शिक्षणाची व्याख्या पुन्हा पुन्हा तपासणे गरजेचे आहे. 'अभ्यासक्रम पूर्ण करून पैकीच्या पैकी मार्क्स, डॉक्टर्स-इंजीनिअरची प्रस्थापित वाट आणि उत्तम पगाराची नोकरी अथवा व्यवसाय या सगळ्याची ‘सुरक्षा’ (security) देणारे ते शिक्षण' ही व्याख्या आता बदलायला हवी आहे.

शिक्षण हे जीवनाभिमुख असावे. कुठल्याही कसोटीच्या प्रसंगी मुलांचा ‘विवेक’ जागृत राहून निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात यावी, त्यांच्या स्वाभाविक क्षमतेला ओळखणारे आणि त्यानुसार दिशा देणारे शिक्षण असावे, शिकवण्यापेक्षा ‘शिकण्यावर’ भर देणारे शिक्षण असावे, मी जे काही शिकतोय ते फक्त ‘परीक्षेसाठी नाही, तर आयुष्यभर उपयोगी पडणारे आहे ही जाणीव त्यांना असावी, विविध संकल्पना स्वानुभूतीने घट्ट रुजाव्यात, कुठलेही काम करण्यास हलकेपणा त्यांना वाटू नये, समाजाशी, राष्ट्राशी आणि संपूर्ण विश्वाशी जाणीवपूर्वक ‘साहचर्य’ राखणारा तो एक उत्तम माणूस व्हावा यासाठी ‘शिक्षण’ असावे आणि हे सगळे अगदी सहज असावे.

अशा पद्धतीचे शिक्षण ‘ऑनलाइन सोपस्कारात’ शक्य नाही.. नक्कीच नाही.

(जिज्ञासा लर्निंग सेंटर)