॥ आता जाग बा विठ्ठला॥

विवेक मराठी    22-Jun-2020
Total Views |

pandharpur ashadhi ekadas

प्रभातसमयो पातला, आता जाग बा विठ्ठला !
संत जनाबाई या चित्रपटातली ही भूपाळी रचली 'आधुनिक संत' ग.दि. माडगूळकर म्हणजे गदिमांनी. सुधीर फडके म्हणजे बाबूजींचं संगीत आणि स्वरही त्यांचाच. विठ्ठल, चित्रपट, गदिमा, बाबूजी अशी मराठी माणसाची सगळी प्रेमं एकाठायी एकवटलेल्या गीताची माधुरी अवीट असणारच!

१९४९ साली हा चित्रपट आला.
१ जून १९२९ला स्थापन झालेल्या प्रभात कंपनीची तुतारी चांगलीच दुमदुमू लागली होती. गदिमा व बाबूजी ही जोडीही गीत-संगीतामुळे लोकप्रिय होत होती. पण दुसर्‍या महायुद्धाच्या काळात कच्च्या फिल्मच्या तुटवड्यामुळे चित्रपटनिर्मितीला परत उतरती कळा लागली. त्यातच हिंदी चित्रपटांची स्पर्धा सुरू झालेली. त्यात टिकून राहण्याकरता प्रभातनेही अनेक हिंदी चित्रपट काढले. प्रभातचा शेवटचा चाललेला मराठी चित्रपट म्हणजे संत जनाबाई. तोही सध्या यूट्यूबवर उपलब्ध आहे, तो हिंदीत केलेला. संत जनाबाई चित्रपटातल्या २२ गाण्यांपैकी १५ गाणी गदिमांनी लिहिली होती.

गदिमांनी चित्रपटांकरता अनेक अभंग लिहिले. अनेकदा ज्या संतावरचा तो चित्रपट आहे, त्याच्या रचनांव्यतिरिक्तही काही रचना चित्रपटाची गरज म्हणून हव्या असत. गदिमांच्या या रचना पाहिल्या, तर ते त्या संतांचेच अभंग वाटावेत इतक्या त्या शब्द व भाव यांनी संतरचनांच्या जवळ जातात.

प्रभातसमयो पातला, आता जाग बा विठ्ठला!
दारी तव नामाचा चालला गजरू
देव-देवांगना गाती नारद-तुंबरू
दिंड्या-पताकांचा मेळा
तुझिया आंगणी थाटला!
दिठी दिठी लागली तुझिया श्रीमुखकमलावरी
श्रवणीमुखी रंगली श्रीधरा नामाची माधुरी
प्राणांची आरती काकडा नयनी चेतविला!
विठ्ठलाच्याच निद्रिस्त रूपासारखी भासणारी निशा सरते आहे.. आकाशाचा निळसर काळा पडदा हळूहळू उतरतोय नि तिथे उगवतीचा लालिमा फुटायच्या बेतात आहे.. चंद्रभागेच्या काठची वाळू अोलसर झाली आहे नि सुटलेल्या पहाटवार्‍यांनी तिचं पाणी हळूहळू हेलकावे घेतं आहे.. वाळवंटात देवळाच्या प्रांगणात विठ्ठलाचे भक्तगण जमलेत. आत तो त्रिभुवनाचा स्वामी निद्रेत आहे. खरं तर तो अहर्निश जागृत आहे, म्हणूनच तर हे विश्व चालतंय. आपण त्याला आपल्या त्रासापासून थोडा काळ मुक्ती देतो! मग आता परत आपली गार्‍हाणी ऐकवण्याकरता त्याला सामोरं जायचं, तर त्याला आधी हळुवारपणे विनंती करायला हवी! मग त्याच्या अंगणात दाटी करायची. टाळ-मृदंगाचा दंगा न करता हलकेच वीणेच्या, एकतारीच्या साथीने हलक्या, मऊ आवाजात भूपाळ्या गायच्या.. जणू देव-देवांगना अन् नारदादी दिग्गज आपल्यासाठी गाताहेत असं ते गायन त्याला कर्णसुखद वाटायला हवं! डोळे उघडताच त्याला दिंड्या-पताकांचे धुमारे दृष्टीस पडायला हवेत.
आणि मग त्याला हलकेच सादावायचं, जाग बा जगजेठी.. जाग रे भक्तश्रेष्ठी.. तुझे कमलनयन कधी उघडतात अन तुझ्या कृपादृष्टीचं चांदणं कधी बरसतं, याकरता आमची दिठी तहानली आहे. हजारो नेत्र टक लावून वाट पाहत आहेत तुझ्या दर्शनाची! आमच्या वाणीतून येणारं तुझं नाम ऐकून आमचेच कान धन्य होत आहेत. आम्ही दीनदुबळे भक्त तुला अर्पण तरी करणार! तुझ्या तेजाला अोवाळता येईल अशा ज्योतीतरी कुठून आणणार! घे, आमच्या प्राणांनीच आरती करतोय आणि आमच्या नेत्रज्योतींचाच काकडा शिलगावलाय.. स्वीकार ही आरती आणि लवकर आम्हाला तुझं श्रीमुखकमल दिसू दे! कृपा कर, दर्शन दे, जाग पांडुरंगा, जाग बा विठ्ठला!
सोबतच्या लिंकमध्ये हे नितांतमधुर, सौम्यशीतल, साक्षात पांडुरंगासारखं सोज्ज्वळ गीत जरूर ऐका आणि त्यासह त्या सुवर्णकाळाची आठवण देणारी प्रभातची तुतारीही!