कोविड-१९बरोबरचे शैक्षणिक जगत

विवेक मराठी    23-Jun-2020
Total Views |
@प्रा.डॉ. माया रंभाळे

 भारतात ऑनलाइन शिक्षण पद्धतीला भविष्यात चांगल्या संधी उपलब्ध असल्या, तरी देशातील एक मोठा वर्ग या शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहील. कारण काही ग्रामीण किंवा आदिवासी भागापर्यंत अजूनही नेटवर्क पोहोचलेले नाही किंवा नेटवर्क पोहोचले असेल तर रेंज उपलब्ध होईलच असे सांगता येत नाही. त्यामुळे या विषयावर ही वेळ भारतात येऊ नये यासाठी विविध चर्चासत्रांच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षणाला पर्याय शोधणे सुरू आहे. लॉकडाउनच्या काळात ऑनलाइन शिक्षण हा एक पर्याय असला, तरी यामुळे राज्यघटनेतील शिक्षण हक्क आणि बालहक्क संहितेनुसार सर्वच घटकांतील बालकांना शिक्षण मिळू शकले पाहिजे आणि त्यांचा शिक्षणाचा हक्क अबाधित राहिला पाहिजे, यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करावे लागणार आहेत.

online_1  H x W
कोविड-१९ विषाणू ही आताच्या घडीला जागतिक स्तरावर सर्वात मोठी समस्या आहे. या विषाणूने जगभर थैमान घातले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराला वैश्विक महामारी घोषित केले आहे. दुसर्‍या महायुद्धानंतरचे हे सर्वात मोठे संकट अवघ्या जगापुढे उभे ठाकले आहे. यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून जीवनाच्या सर्वच घटकांवर याने आपला प्रभाव टाकला आहे. देशाची अर्थव्यवस्थादेखील यामुळे डळमळीत झाली आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जगभर संशोधन सुरू आहे. कोविड-१९चे हे संकट लवकर संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे आता एकूणच जग, जीवनशैली बदलेल. नवीन जीवनशैली आपल्याला आचरणात आणावी लागेल. संयम आणि धैर्य बाळगूनच आपल्याला या कोविडबरोबर नवी वाटचाल करावी लागणार आहे.

कोविड-१९ची साथ आटोक्यात राहावी, यासाठी भारतासह सर्वच देशांनी टाळेबंदीचा - अर्थात लॉकडाउनचा अवलंब केला आहे. या लॉकडाउनमुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले, कंपन्या बंद पडल्या, बेरोजगारी वाढली. मजुरांवर, तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गावर उपासमारीची पाळी आली आहे. एकूणच जनजीवन सैरभैर झाले आहे. हे संकट कधी टळेल हे माहीत नसल्याने आपण किती दिवस सगळे व्यवहार ठप्प करून घरी बसणार? कधीतरी यातून आपल्याला बाहेर पडावेच लागेल. ‘थांबला तो संपला’ ही खूणगाठ मनाशी बांधून कोविड-१९वर मात करायची आहे - नव्हे, कोविडबरोबरच आपल्याला जगायचे आहे. लॉकडाउनमुळे आलेले सक्तीचे रिकामपण आणि एकटेपण यामुळे कौटुंबिक, सामाजिक आणि मानसिक आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत. शिक्षण क्षेत्रही यातून सुटले नाही. कोविड-१९चे सर्वच क्षेत्रांवर दूरगामी परिणाम होणार असल्याने त्याच्याबरोबरच पुढे जाणे आपल्याला क्रमप्राप्त आहे.


कोविड-१९ आणि शिक्षण
कोविड-१९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांनी शिक्षणसंस्था बंद केल्या आहेत. ‘युनेस्को’च्या अहवालानुसार १८८ देशांत दीड अब्जपेक्षा अधिक विद्यार्थी (९१%) शिक्षणापासून सध्या दुरावले गेले आहेत. भारतातही जवळजवळ १५ लाख शाळा बंद आहेत. परीक्षाही रद्द कराव्या लागल्या आहेत. यावरून शिक्षण क्षेत्रावर कोविड-१९चा फार मोठा परिणाम झाला असल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांचे भवितव्य इथे पणाला लागले आहे. यामुळे शाळा बंद असल्या, तरी शिक्षण सुरू राहिले पाहिजे यासाठी सर्वच देशात ‘ऑनलाइन’ पद्धतीने शिक्षण देण्याचे ठरविले आहे. यापुढे कोविडसदृश आपत्तीमध्ये शिक्षणाचे धडे सुरू ठेवण्यासाठी आपल्याला काही उपाययोजना कराव्याच लागतील. यासाठी सर्वप्रथम ‘ऑनलाइन’ शिक्षण सुरू करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे, जेणेकरून विद्यार्थी शिक्षणप्रवाहापासून दूर जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न असल्याने शासनस्तरावरूनदेखील प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये भारतासारख्या जास्त लोकसंख्येच्या देशात अडचणीदेखील खूप आहेत. परंतु सद्य:स्थितीत आपल्याजवळ ऑनलाइन शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही.

या परिस्थितीत शिक्षकांनीच सजग राहून विद्यार्थिविकास करण्याच्या दृष्टीने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे आहे. आपला विद्यार्थी गरीब-श्रीमंत, शहरी-ग्रामीण आहे. त्यामुळे शिक्षणाची ही गंगा त्याच्यापर्यंत कशी पोहोचवता येईल, याचा शिक्षकांनी विचार करावा. ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थ्याकडे स्मार्ट फोन असणे आवश्यक आहे, त्याबरोबरच त्यात इंटरनेट सुविधा असणेही आवश्यक आहे. स्मार्ट फोन वापरण्यात येणार्‍या समस्या दूर सारून आपल्याला विद्यार्थ्यापर्यंत ऑनलाइन शिक्षण पोहोचवायचे आहे. भविष्यकाळात लॉकडाउन वाढले, तर स्मार्ट फोनऐवजी टीव्ही किंवा रेडिओदेखील शिक्षणाचे माध्यम होऊ शकेल.


E-School_1  H x
कोविड-१९मुळे आता शिक्षणाची भूमिका बदलली आहे. पूर्वीचे शिक्षण केवळ घर आणि शाळा एवढेच मर्यादित क्षेत्रात होत होते. परंतु आता विद्यार्थ्यांसाठी अवघे जगच शाळा बनले आहे. आपल्याला भविष्यकाळाचा वेध घेऊनच विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या अभ्यासाबरोबर सर्वांगीण विकासास पूरक शिक्षण देणे गरजेचे आहे. सद्य:स्थितीत याला ऑनलाइन हाच पर्याय आहे. आताच्या काळात शाळा, महाविद्यालये कागदोपत्री प्रगत होण्यापेक्षा खर्‍या अर्थाने डिजिटल होणे फर गरजेचे आहे. पारंपरिक शिक्षण पद्धतीला तंत्रस्नेही चळवळीची जोड देऊन अध्ययन-अध्यापनाची प्रक्रिया या आणीबाणीच्या परिस्थितीतही सुरू ठेवायची आहे. ‘संकट हीच संधी’ समजून आपल्याला या ऑनलाइन शिक्षणपद्धतीचा स्वीकार करावाच लागेल.

ऑनलाइन शिक्षण
वर्ग पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता शासनाने दूरदर्शनवर अभ्यासक्रमाशी निगडित वर्ग सुरू केले आहेत. लॉकडाउनच्या काळात अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू राहावी, यासाठी ‘लर्निंग फ्रॉम होम’ ही संकल्पना राबविण्याबाबत परिपत्रक काढण्यात आले. ही संकल्पना राबविण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक शिक्षण व विद्यार्थी यांना मोफत व मुबलक प्रमाणात ई-लर्निंग साहित्य मिळावे, म्हणून केंद्र शासन मनुष्यबळ संसाधन विभाग (एमएचआरडी) आणि महाराष्ट्र शासन यांनी 'दीक्षा' हा ई-लर्निंग प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. सरकारच्या वतीने शालेय अभ्यासक्रमाची पुस्तकेही ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शिक्षकांना व विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा करून घेता येईल.


शिक्षणाचा बदलेला पॅटर्न
ऑनलाइन पर्याय स्वीकारताना सर्वप्रथम शासनाने, तसेच शाळा, महाविद्यालये, संस्था, पालक यांनी आपली शिक्षणविषयक पॉलिसी तयार करणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षणविषयक निर्माण झालेले संभ्रम दूर होऊन लोकांना ऑनलाइनचा खरा अर्थ, त्यातून मिळणार्‍या संधी, उपयोग समजून त्यांच्यात याबद्दल जागरूकता निर्माण होईल.

पूर्वी शिक्षण फक्त वर्गामध्येच दिले जात होते. परंतु आता ऑनलाइनच्या माध्यमातून विविध ऍप्सद्वारे किंवा टूल्सद्वारे कधीही, कुठेही शिक्षण उपलब्ध होऊन शकेल. सुरुवातीला याच्याशी जुळवून घेताना किंवा हाताळताना खूप अडचणी येतील. परंतु मोठ्या मुलांना स्मार्ट फोनची सवय असल्याने ते याला लवकर स्वीकारतील. हे तंत्रज्ञान परिणामकारक व्हायला थोडा वेळ लागेल, परंतु एकदा त्याचे ज्ञान अवगत झाले की त्यात विद्यार्थ्यांना आवड निर्माण होईल. मात्र सध्या विज्ञान विषयांना ऑनलाइन प्रॅक्टिकलची कदाचित जोड देता येणार नाही. परंतु भविष्यात त्यावरही पर्याय निघेलच. ऑनलाइनमुळे विद्यार्थी स्वावलंबी होऊन त्याला स्वयंअध्ययनाची सवय लागेल.

कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांकरिता अभ्यासाच्या दृष्टीने ऑनलाइन शिक्षण देताना पुढील माध्यमाचा वापर करता येईल -
१) ग्रामीण व शहरी भागासाठी ई-लर्निंग. व्हर्च्युअल क्लासरूम सुरू करणे.
२) झूम, व्हॉट्स ऍप, बोला ऍप, यू ट्यूब, गूगल मीट, पीडीएफ, फ्लिपबुक या सर्व माध्यमांच्या वापराबद्दल मुलांना मार्गदर्शन करणे.
३) दूरदर्शनवरील बालचित्रवाणीसारखे कार्यक्रम.
४) शिक्षकांनी स्वत:ची संकेतस्थळे किंवा यू ट्यूब चॅनल तयार करून विद्यार्थ्यांपर्यंत ऑडिओ, व्हिडिओ किंवा पीडीएफ पोहोचविणे.
५) ई-लर्निंगचा वापर करणे.

शिक्षक-विद्यार्थ्यांचा व्हॉट्स ऍप ग्रूप तयार करून त्याद्वारेदेखील ऑडिओ, व्हिडिओ, पीडीएफ स्वत: तयार करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकतात. ग्रामीण तसेच शहरी विद्यार्थ्यांना या सार्‍याचा फायदा होऊ शकतो. एका अर्थाने ‘वर्ल्ड इज माय क्लासरूम’ असेच म्हणावे लागेल. शिक्षणाचा पॅटर्न बदलल्याने मुले यात समरस व्हायला थोडा वेळ लागेल. अनेक अडचणी येतील, विशेषत: ग्रामीण विद्यार्थ्यांना. परंतु विद्यार्थिदशेत मुले लवकर नवीन गोष्टी शिकतात. त्यामुळे ऑनलाइनबाबतही तसेच होईल आणि विद्यार्थी लवकरच याला स्वीकारतील, यात शंका नाही. एकंदरीत कोणत्याही प्रकारे शिक्षणप्रक्रिया खंडित होणार नाही, याची काळजी आपणा सर्वांना घ्यावी लागणार आहे.
वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीदेखील सद्य:स्थितीत शिक्षणाचा पॅटर्न बदलला आहे. वर्गातील शिक्षणाऐवजी आता विस्तारित ऑनलाइनचे क्षेत्र त्यांच्यापुढे उभे आहे. वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या तुलनेत स्मार्ट फोटची अधिक माहिती असते. ते वयानेही मोठे असतात. त्यामुळे ते हा फोन सहज हाताळताना दिसतात आणि त्यांना ऑनलाइन शिक्षणाचा हा पॅटर्न फारसा जड जाऊ नये, असे अपेक्षित आहे. थोड्याफार मार्गदर्शनाने ते याचा वापर सहजरीत्या करतील. सध्या कोविडच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाकडे पाहण्याचा संपूर्ण जगाचा दृष्टीकोन बदलला आहे. ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा मोठा गाजावाजा सुरू आहे. तो योग्य की अयोग्य यावर चर्चा, विचारविमर्श, संशोधन सुरू आहे. या बाबतीत अनेक मतमतांतरेही आहेत. परंतु सध्याच्या परिस्थितीत ऑनलाइनला पर्याय नसल्याने सर्वांनी ते स्वीकारून पुढे जाणे अपरिहार्य आहे.


E-School_1  H x
सध्या 'यंग टेक्नॉलॉजी'चा किंवा प्रगत तंत्रज्ञानाचा जमाना आहे. आपल्याला शैक्षणिक क्षेत्रासाठीही त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेता येईल. या यंग टेक्नॉलॉजीद्वारे शिक्षण विषयाशी निगडित अनेक ऑनलाइन माध्यमे आज आपल्याला उपलब्ध झाली आहेत. वरिष्ठ महाविद्यालयीन वर्गासाठी तर याद्वारे अक्षरश: ज्ञानाचे भांडारच खुले होणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकरिता, सर्वांगीण विकासाकरिता त्याचा नक्कीच मोठा फायदा होईल. आजच्या घडीला शिक्षणात ट्रान्स्फॉर्मेशन, डिस्ट्रप्शन टेक्नॉलॉजीचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे. दूरस्थ शिक्षणाचा (Distance Educationचा) बोलबाला असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणात अनेक ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मचा उपयोग करून घ्यावा लागेल. झूम किंवा आभासी (व्हर्च्युअल) प्लॅटफॉर्मचाही त्यांना यासाठी उपयोग करता येईल. अनेक ऑडिओ, व्हिडिओ टूल्सच्या आणि तंत्रांच्या वापराने त्यांना त्यांचे ज्ञान वृद्धिंगत करता येईल.
 
 
* वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मूक (MOOK - मॅसिव ओपन ऑनलाइन कोर्स) ही अधिकृत वेबसाइट उपलब्ध असून त्यांना त्याअंतर्गत येणाऱ्या स्वयं, कोर्सेरा, ईडीएक्स यासारख्या देशी-विदेशी पोर्टलचा वापर करता येईल.
* हॉवर्ड, ड्युक, एमआयटी युनिव्हर्सिटी कोर्सेसदेखील विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध आहेत.
* याशिवाय विद्यार्थ्यांकरिता अनेक ओपन ऍक्सेस रिसोसेर्स उपलब्ध आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासात जर्नल, आर्टिकल, हॅण्डबुक्स, साइट्‌स, मॅन्युअल, डिजिटल लायब्ररी यांचा उपयोग करता येईल. त्याचबरोबर त्यातून त्यांना प्रश्नपत्रिका, व्हिडिओज, ऑडिओजदेखील उपलब्ध होतील.
* आयआयटी खरगपूर आणि मानव संसाधन विकास मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केली गेलेली ‘नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया’ याचाही विद्यार्थ्यांना उपयोग करून घेता येईल.
* गूगल क्लासरूम हादेखील शिक्षणाचा एक प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. हा व्हॅलिड प्लॅटफॉर्म असून शहरातील बर्‍याच विद्यार्थ्यांना याची सवय आहे.
* याशिवाय गूगल मीट हे ऍप उपलब्ध आहे. त्याच्या वापराने तर शिक्षण अधिकच इंटरेस्टिंग होईल. याद्वारे प्रेझेंटेशनबरोबरच एमसीक्यू घेऊ शकतो. याला आपण परस्परसंवादी (इंटरॅक्टिव्ह) करू शकतो. शिक्षकांसह विद्यार्थीही यात सहभागी होऊ शकतात.
* एआयसीटीईच्या अंतर्गत येणारे एनपीटीइएल हे पोर्टल इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल.
* याबरोबरच झूम, व्हॉट्स ऍप, बोलो ऍप, यू ट्यूब, पीडीएफ, फ्लिपबुक या सर्व आणि यासारख्या अनेक साधनांच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण इंटरेस्टिंग होऊन विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरू शकेल.
 
 
सर्व शिक्षकांना या सर्वांची माहिती असेलच असे नाही. त्यामुळे, याचा वापर कसा करतात हे प्रथम शिक्षकांना शिकून घ्यावे लागेल. विद्यार्थीही शिकतीलच. शिक्षणाच्या विविध संधी याद्वारे विद्यार्थ्यांकडे उपलब्ध आहेत. यामुळे कोविडच्या संकटात ऑनलाइनच्या या पोर्टल, ऍपशी मैत्री करून स्वत:बरोबरच विद्यार्थ्यांचा विकास करणे श्रेयस्कर होईल. या शिक्षणाचे दुरगामी परिणामही आहेतच. त्यामुळे ते स्वीकारण्याची तयारीही आपल्याला ठेवावी लागेल.
 
 
ऑनलाइन शिक्षणाचे परिणाम
ऑनलाइन शिक्षणामुळे यापुढे शाळा-महाविद्यालयांत शिक्षणाचे डिजिटल माध्यम वाढेल. या विषयावर झालेले संशोधन किंवा चर्चा यातून असाही निष्कर्ष काढला जात आहे की यापुढे शाळा-महाविद्यालयांना तंत्रज्ञानात कायमस्वरूपी गुंतवणूक करावी लागणार आहे. शिक्षण-प्रशिक्षणात डिजिटल कौशल्याचां अंतर्भाव करावा लागेल. उच्च शिक्षण क्षेत्रातदेखील पारंपरिक परीक्षांच्या जागी ऑनलाइन परीक्षा घेतल्या जातील. सध्याच्या परिस्थितीत जगभर डिजिटल लर्निंगचा स्वीकार मोठ्या प्रमाणात होत आहे. लॉकडाउनने निर्माण झालेल्या मर्यादांमुळे ऑनलाइन शिक्षणाला गती आली असून शिक्षणाचे हे नवीन क्षेत्र अंगीकारण्याची गरज आज निर्माण झाली आहे.
ऑनलाइन शिक्षणातील धोके
शिक्षण क्षेत्रातील ऑनलाइनच्या वापराने शिक्षणाचा पॅटर्नच पार बदलून गेला आहे. परंतु ऑनलाइन शिक्षणामुळे अनेक फायदे होणार असले, तरी त्यापासून होणार्‍या धोक्यांकडे किंवा तोट्यांकडेही नजर वळवावीच लागेल. यामुळे होणार्‍या तोट्यांचाही विचार या निमित्ताने व्हायलाच हवा. भारत हा खेड्यांचा देश आहे आणि येथील मोठी लोकसंख्या खेड्यात वसते. गरिबीही आहेच. अशा पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षणाच्या धोक्यांनाही दुर्लक्षून चालणार नाही.
* मानसशास्त्रज्ञांच्या मतानुसार ऑनलाइनमुळे विद्यार्थी मोबाइलचा जास्तीत जास्त वेळ वापर करीत असल्याने त्यांच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर विघातक परिणाम होऊ शकतात.
* नेटचा वापर ही खर्चीक बाब आहे.
* स्मार्ट फोनचा गैरवापरही होऊ शकतो.
* ग्रामीण विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण थोडे अडचणीचे जाऊ शकते.
या आणि अशा अनेक समस्या यामुळे उद्भवू शकतात.
भारतात ऑनलाइन शिक्षण पद्धतीला भविष्यात चांगल्या संधी उपलब्ध असल्या, तरी देशातील एक मोठा वर्ग या शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहील. कारण काही ग्रामीण किंवा आदिवासी भागापर्यंत अजूनही नेटवर्क पोहोचलेले नाही किंवा नेटवर्क पोहोचले असेल तर रेंज उपलब्ध होईलच असे सांगता येत नाही. त्यामुळे या विषयावर ही वेळ भारतात येऊ नये यासाठी विविध चर्चासत्रांच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षणाला पर्याय शोधणे सुरू आहे. लॉकडाउनच्या काळात ऑनलाइन शिक्षण हा एक पर्याय असला, तरी यामुळे राज्यघटनेतील शिक्षण हक्क आणि बालहक्क संहितेनुसार सर्वच घटकांतील बालकांना शिक्षण मिळू शकले पाहिजे आणि त्यांचा शिक्षणाचा हक्क अबाधित राहिला पाहिजे, यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करावे लागणार आहेत. परंतु सध्यातरी कोविडबरोबर जगत असताना ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही, हेच खरे आहे.

आर.एस. मुंडले धरमपेठ कला व वाणिज्य महाविद्यालय, नागपूर
७०३८४२२४४७