येणें येणें वो श्रीरंगे । नवनीत माझें भक्षिलें

विवेक मराठी    24-Jun-2020
Total Views |

आज आपण संत नामदेव महाराजांची गवळण पाहणार आहोत. ही गवळण खूप लोकप्रिय आहे. अहो, या सर्व गौळणींना कृष्णाने अगदी वेड लावलं होतं. कारण कृष्णाने त्यांचं चित्त चोरून घेतलं होतं. कृष्णाचे वर्णन करताना कृष्ण या शब्दाची फोड अशी सांगतात – ‘कर्षयति इति कृष्ण:’ म्हणजे जो आपल्याला आकर्षून घेतो तो भगवान श्रीकृष्ण होय. या सर्व गवळणीचे चित्त या कृष्णाने आकर्षून घेतले होते आणि सगुणभक्ति करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवंताकडे आपलं मन हे वेलं गेलं पाहिजे. ज्याप्रमाणे या गौळणी भगवंताने वेधून घेतलं होतं त्याप्रमाणे ‘झणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा भगवंताच्या सगुण रूपाकडे आपलं चित्त वेलं गेलं पाहिजे हीच सर्व संतांची मागणी आहे, हे आपण येथे लक्षात घेतले पाहिजे.


pandharpur ashadhi ekadas

गोकुळातल्या सर्व गौळणींना भगवान श्रीकृष्णाचं फार मोठं आकर्षण होतं आणि मग त्या गौळणी जाऊन यशोदामाईला या भगवान श्रीकृष्णाच्या खोड्या आणि गार्‍हाणी सांगत असत. गवळण जसवंती ही यशोदामाईकडे आलेली आहे आणि ती यशोदामाईला काय गार्‍हाणे सांगते आहे, ते आपण बघूया.

तळवे तळहात टेकीत । डाव्या गुडघ्यात रांगत ।।

रंगणी रंगनाथ । तो म्यां देखिला सये ।

गवळण जसवंती पै सांगे । आले या कृष्णाचेनि मागें ।

येणें येणें वो श्रीरंगे । नवनीत माझें भक्षिलें । ॥२ ॥

अहो, या कृष्णाचं रंगनाथ असं वर्णन करत ही जसवंती सांगते आहे – अहो, मी या कान्हाला चोरी करताना प्रत्यक्ष पाहिलेलं आहे आणि त्याची अतिशय गोंडस मूर्ती माझ्या मनामध्ये ठसली आहे. जमिनीवर आपल्या हाताचे तळवे टेकत टेकत आणि डाव्या गुडघ्यावर रांगत हा कान्हा माझ्या घरी अआला. तो काय करतोय ते पाहण्यासाठी मी त्याच्या मागोमाग गेली आणि काय चमत्कार पहा! या बाळकृष्णाने संपूर्ण लोणी खाऊन टाकलं आहे आणि त्याचा पुरावा काय आहे तर त्याचा तोंड आहे संपूर्ण लोण्याने माखले आहे, त्याच्या हातामध्ये सुद्धा एवढा मोठा लोण्याचा गोळा आहे. अजून तुम्हाला पुरावा पाहिजे असेल तर या बाळकृष्णाच्या मुखाचे चुंबन घेऊन बघा! याला संपूर्ण लोण्याचा सुवास येईल.

एक्या हाती लोण्याचा कवळु । मुख माखिलें अळुमाळु ॥

चुंबन देतां येतो परिमळु । नवनीताचा गे सये । ॥३ ॥

येणें माझें कवाड उघडिलें । येणे शिकें हो तोडिलें ॥

दह्यादुधातें भक्षिलें । उलंडिलें ताकातें । ॥४ ॥

हा बाळकृष्ण अतिशय खोडकर आहे. माझ्या घराचा दरवाजा उघडून हा बाळकृष्ण आ शिरला. मी शिंके वर टांगून ठेवलं होतं, पण त्याने ते तोडून खाली पाडलं. त्यातल्या मडक्यातून दूध आणि दही मोठे जपून ठेवलं होतं ते त्याने संपूर्ण खाऊन टाकलं आणि मी गाडग्यातून ताक भरून ठेवलं होतं. ते संपूर्ण गाडगे त्याने उपडं केलं.

याचं आमच्या घरावर लक्ष असतं. आम्ही घरातून जरा कुठे लांब गेलो म्हणजे समजा, यमुनेवर पाणी आणायला जरी गेलो तरी हा आमच्या घरात शिरतो. याला काहीतरी शिक्षा केली पाहिजे. याला आपण खांबालाच बांधून ठेवलं पाहिजे.

ऐसें जरी मी जाणतें । यमुना पाणिया नच जाते ॥

धरूनि खांबासी बांधितें । शिक्षा लावितें गोविंदा । ॥५ ॥

ऐसा पुराण - प्रसिद्ध चोर । केशव नाम्याचा दातार ।।

पंढरपुरीं उभा विटेवरी । भक्त पुंडलिकासाठी । ॥६ ॥

ह्या गवळणीचा गाऱ्हाणं तर आपण आता ऐकलं परंतु नामदेव महाराज सांगतात की, हा काही साधासुधा चोर नाही. हा पुराण-प्रसिद्ध चोर आहे म्हणजे प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेला असा हा चोर आहे आणि आपण पुराणे जर वाचून पाहिली तर त्याच्यातील कथांमध्ये देखील याचा खोडकरपणा वर्णन करून सांगितलेला आहे. हा केशव या नामदेवाचा दाता आहे आणि भक्त पुंडलिकाची वाट पाहत श्री क्षेत्र पंढरपूर येथे हा भगवंत अठ्ठावीस युगे विटेवरी उभा राहिलेला आहे. संतांनी आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी, आपला भाव व्यक्त करण्यासाठी त्यांनी अतिशय सुंदर गवळणी रचलेल्या आहेत आणि या गवळणीतून भगवंताच्या बाललीलांचे अतिशय सुंदर असे वर्णन केलेले आहे. त्यामुळे खरं पाहिलं तर कृष्णाची गौळणींना खरोखर तक्रार करायची नाही, त्याच्या उलट त्यांना आपलं भगवंतावर प्रेम व्यक्त करायचं आहे आणि त्यामुळे त्यांची ही तक्रार लटकी आहे, हे नामदेव आपल्याला सांगतात. त्यामुळे अतिशय सुंदर असे वर्णन या ठिकाणी संत नामदेवांनी केलेलं आहे.