॥ समचरण सुंदर ॥

विवेक मराठी    24-Jun-2020
Total Views |

pandharpur ashadhi ekadas

विठ्ठलाच्या श्रीमूर्तीचं वर्णन अनेक संतांनी केलं आहे. काळ्या पाषाणात कोरलेली ही मूर्ती काही कोरीवकामाने नटलेली वा शिल्पकलेची अद्भुत किमया वाटावी अशी नाही. पण शतकानुशतकं तिने जनमानसाला वेड लावलं आहे, हे मात्र खरं. कुणाला तो 'राजस सुकुमार मदनाचा पुतळा' दिसतो, कुणाला 'योगियांचे ब्रह्म उभे विटेवरी' असं त्याचं रूप दिसतं. वालुकाश्मात घडवलेली ही मूर्त कोणी घडवली ठाऊक नाही. अन्य देवस्थानांप्रमाणे देवाचे अलंकार, वैभव याकरताही ती प्रसिद्ध नाही. ती मनाचा ठाव घेते ती तिच्या मुखावरील सौम्यशीतल भावामुळे. तिच्यात वसत असलेलं चैतन्यतत्त्व आपल्याला जाणवतं. विठ्ठल हा पूजण्यापेक्षा भेटण्याचा देव आहे. त्याला अमुक वाहा, तमुक चढवा अशा पद्धती इथे नाहीत. त्याला हवा फक्त भक्तिभाव.

त्याला उराउरी भेटायचं असतं. तो आपल्याला चरणांना स्पर्श करू देतो, म्हणूनच तो आपला सखा, आई, बाप, बंधू वाटतो.
सगळे समान आहेत असं सांगणारे, संसारात तोल सावरणारे त्याचे समचरण, त्यावरदेखील खूण आहे ती मुक्तकेशी दासीच्या बोटांची. त्याच्या चरणाशी गेल्याने मुक्ती मिळते, पण त्याचं अधिष्ठान मात्र आहे भक्तीचं.
 
पुंडलीकाने सर्वसामान्यांच्या मातीतल्या जगण्याच्या विटेवर त्याला तिष्ठत उभं केलं आहे. कानातली मकरकुंडलं विकार विसरायला सांगतात. मस्तकी शिवलिंग आहे. जणू मातीच्या जिवापासून चिदाकाशात वास करणार्‍या शिवापर्यंतचा प्रवास तो आपल्याला एका दर्शनात घडवतो. विठ्ठल कटीखाली ब्रह्मस्वरूप, मानेपर्यंत विष्णू, तर मस्तकाचा भाग शिवस्वरूप असं मानतात. कटीवर असलेले हात ज्ञानेंद्रियांच्या व कर्मेंद्रियांच्या सीमा सांगतात व दोन्हींवरचं नियंत्रण शिकवतात. अशी ही साक्षात योगमूर्ती.
पण हे झालं पांडित्य. तत्त्वज्ञान.
साध्याभोळ्या भक्ताला दिसतं, भावतं ते त्याचं गोजिरं सगुण रूपच. तो मूळचा कान्हाच. गायींच्या खुरांनी उडालेली धूळ बसल्यामुळे त्याचं सावळं रूप पांढुरकं दिसतंय. त्याचे समचरण अतिशय मृदू, देखणे आहेत. कासेच्या पीतांबरातून दिसणार्‍या नाभीपर्यंत गळ्यातल्या माळा रुळत आहेत. त्यात सर्वात ठळक शोभिवंत आहे त्याची लाडकी वैजयंती माळ. तुळशीचा हार. तो श्रीवत्सलांच्छन आहे - छातीवर भृगुऋषींच्या लत्तेच्या प्रहाराची खूण तो मिरवतो आहे. शंख, चक्र, गदा, पद्म ही श्रीविष्णूंची सारी आयुधं त्याच्या हाती आहेत. भालप्रदेशी असलेल्या आज्ञाचक्रातून तेजाची उधळण होत असल्यामुळे कोटी कोटी सूर्यांची प्रभा एकवटल्यासारखं त्याचं मुखमंडळ तेजस्वी आहे. याच्या केवळ दर्शनानेच मुक्ती मिळते. आणखी काही मागावं अशी वासनाच राहत नाही. याच्या भक्तीनेच सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता अशा चारी मुक्ती मिळतात.
मी त्याला आलिंगन देतो, तोही बाहू पसरून मला कवेत घेतो, तो न मी एकच होऊन जातो..
संत गोरोबांनी लिहिलेलं हे विठ्ठलाचं वर्णन करणारं गीत. पहाटेच्या अंधारात, उगवतीच्या गारव्यात, देवघरातल्या समईच्या लवलवत्या पाकळ्यांच्या सौम्य उजेडात, तुळशी-धूपाच्या मंद सुवासात आणि अापल्या मनाच्या हळव्या अवस्थेत त्याला आपण पाहतो आहोत.. फक्त आपण आणि तोच आहोत अशी अनुभूती देणारं हे गीत!
समचरण सुंदर
कासे ल्याला पीतांबर
आनाभि या माळा रुळती
मुख्य त्यात वैजयंती ।
उरी वत्साचे लांछन
ऐसा उभा नारायण
हाती धरितो आयुधा
शंख चक्र पद्म गदा ।
मुखमंडळाची शोभा
कोटिसूर्या ऐशीं प्रभा
काय मागावे आणिक
उभे ठाके मोक्षसुख ।
धन्य झाली माझी भक्ती
वोळंगिल्या चारी मुक्ती
पसरोनि दोन्ही बाहू
आलंगिला पंढरीराऊ ।
१९६७ साली आलेला चित्रपट संत गोरा कुंभार. गोरोबाकाकांची रचना. बाबूजींचं संगीत व स्वर. अवश्य ऐका!