॥ बहुत सुकृतांची जोडी ॥

विवेक मराठी    25-Jun-2020
Total Views |
विठ्ठलपंत कुलकर्णी व रुक्मिणीबाई या लोकविलक्षण दांपत्याच्या पोटची चार अपत्यं. या दोघांबरोबरच या लेकरांनाही समाजाने वाळीत टाकलेलं. आपल्यामुळे या सोन्यासारख्या लेकरांचं भविष्य नासायला नको, म्हणून त्या संन्यस्त वृत्तीच्या मायबापांनी इंद्रायणीच्या डोहाला आपलंसं केलं. सिद्धबेटावरच्या वास्तव्यात मायनं कोंड्याचा मांडा करून केलेलं कवतिक, वडिलांच्या मुखातून सतत स्रवत असलेली ज्ञानाची गंगा यावर पोसलेले ते कैवल्याचे चार कंद! नुकते भुईतून वर आलेले, कोंभांची लसलस नुक्ती दिसू लागलेली, अशा कोवळ्या वयात मायबापांनी त्यांना त्यागलं अन जगण्याच्या प्रवाहात लोटून दिलं. त्यांच्याकडूनच मिळालेलं वेदान्ताच्या ज्ञानाचं वल्हं करून त्यांनी हा भवसागर पार करायचं ठरवलं. अापल्या आत उसळलेला आकांत गिळून त्यांना मिळालेलं अनुभवामृत लोकांना मुक्तहस्ते वाटलं.


pandharpur ashadhi ekadas
चारी भावंडे मिळून यात्रा करत पंढरपुरास आली आहेत. वडिलांच्या मुखातून ज्याचं वर्णन ऐकलं, ते सावळं सगुण रूप ज्ञानदेवांनी साक्षात पाहिलं असेल, तेव्हा विठ्ठलही त्या बालयोग्याला पाहून गहिवरला असेल!
आणि आपण आईकलं त्याहीपेक्षा या सावळ्याचं रूप साजिरं आहे, अलौकिक आहे हे पाहून मनात उठलेल्या आनंदकल्लोळात ज्ञानदेवांच्या मुखातून हे मधाळ शब्द अोघळले असतील!
'साच आणि मवाळ ।
मितुले आणि रसाळ ।
शब्द जैसे कल्लोळ ।
अमृताचे ॥'
या ज्ञानेश्वरांच्या वचनाचं उदाहरण म्हणजे त्यांच्याच रचना!
ज्ञानदेव आपला न मावणारा आनंद भावंडांना सांगत आहेत -
रूप पाहता लोचनी
सुख जाले वो साजणी
तो हा विठ्ठल बरवा
तो हा माधव बरवा ।
याचं हे सुंदर ध्यान पाहून माझी जाणीवच हरपली गे मुक्ते! याला डोळाभरून पाहण्यात काय अपार सुख आहे, ते मला समजतं आहे! हा विठ्ठल, हा माधव किती किती साजिरा आहे म्हणून सांगू! आणि हे भाग्य आपल्याला लाभलं याकरता मला माझाच हेवा वाटतो आहे, कारण या पांडुरंगाचं वेड लागणं सार्‍यांच्या भाग्यात नसतं बरं! त्याकरता फार पुण्य जोडावं लागतं, तेव्हा मनात विठ्ठलभक्तीचं बीज अंकुरतं!
बहुत सुकृतांची जोडी
म्हणुनी विठ्ठल आवडी
मायबापांनी आपली सारी पुण्याई खर्चून यांना देहरूपात आणलं अन् यांनी आपल्या मनाची भुई नांगरून घेतली लोकांकडून मिळालेली उपेक्षा, उपासमार, अपमान यांनी! सुखाचा एक दिवसही न पाहिलेला हा कोवळा कुमार म्हणतो आहे, "सर्व सुखाचे आगर मला मिळाले आहे!" 'बापरखुमादेवीवरु' हे शब्द वाचताना घशात आवंढा दाटतो... धीरोदात्तपणे मायबापांचा आत्मत्याग त्यांनी कसा सोसला असेल? विठ्ठल-रखुमाई हे तर मायबापांचंच नाव! पंढरपूरला आल्यावर त्यांना खरंच हरपलेले मायबाप भेटल्यासारखं वाटलं असेल का?
सर्व सुखाचे आगरु
बापरखुमादेवीवरु ॥
बस. इतकं लिहून ज्ञानोबा थांबलेत. या पलीकडे काहीच नाही. मायबापांचे चरण दिसले. त्या विश्वपालकांनी यांना पोटाशी धरलं अन
'हारपली सत्ता मुराली वासना। सांवळा नयना दिसतसे॥'
आता सगळं मिळालं होतं. पुढे जगणं उरलं ते फक्त विहित कर्तव्य करण्यापुरतं. ते करून होताच हा बालयोगी त्या मायतातांकडे निघूनही गेला!
रूप प‍ाहता लोचनी..
संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटात आशा भोसले यांनी हे गीत अगदी ज्ञानोबारायांना साजेशा कोवळ्यालख्ख स्वरात गायलं आहे. माउलींचे शब्द, आशाताईंचा स्वर, सी. रामचंद्र यांनी दिलेली चाल.. सारंच नितांत मधुर आहे.
कानांना अमृतस्नान घडवणारं हे गोड गाणं जरूर ऐका!