पेरले जे होते कधी...

विवेक मराठी    26-Jun-2020
Total Views |
मराठा आरक्षण आंदोलन, शेतकरी संप या आणि इतर आंदोलनांच्या काळात महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर, त्यांच्या कुटुंबीयांवर कोणत्या शब्दात टीका केली गेली? आणि टीका करणारे कोणाचे साथीदार होते? हे उभ्या महाराष्ट्राला माहीत होते. त्या आंदोलनाच्या काळात शरद पवारांनी सोईस्कर मौन पाळले होतेच. पण आपल्या सहकारी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना लकवा झाला आहे, विधानसभा निवडणुकीत विचित्र हातवारे करत आमचे विरोधी तृतीयपंथीय आहेत असा संकेत देणे ही शरद पवारांची राजकीय अभिव्यक्ती महाराष्ट्र विसरलेला नाही. आपण जे पेरतो तेच उगवत राहते, हा निसर्गनियम आहे. शरद पवारांना गोपीचंद पडलकर यांनी केलेल्या टीकेनंतर याचा अनुभव आला असेल.
papwar_1  H x W

 
विधान परिषदेत नव्याने निवडून गेलेले भाजपाचे आमदार गोपीचंद पडलकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली, या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत. भाजपाचे नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त करून गोपीचंद पडलकर यांना योग्य भाषेत व्यक्त होण्याची सूचना केली आहे. राजकारणात शुचिता पाळली गेली पाहिजे. नव्याने सभागृहात दाखल झालेल्या सदस्यांनी तर याबाबत विशेष अभ्यास केला पाहिजे, असे आमचे मत आहे. आ. गोपीचंद पडलकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर दुसऱ्या बाजूने प्रतीटीका होणे स्वाभाविक होते. त्याप्रमाणे सोशल मीडिया, दूरदर्शन वाहिन्या आणि वृत्तपत्रे यांनी या विषयावर वेगवेगळ्या स्वरूपात भाष्य केले. शरद पवारांच्या पक्षातील नेते, कार्यकर्ते, पवारांच्या पुरोगामी राजकारणावर प्रेम करणारे पत्रकार यांनी रणकंदनात भाग घेऊन 'हम भी कुछ कम नहीं' यांचा प्रत्यय आणून दिला. दोन दिवस हाच गदारोळ चालू होता.

सध्या महाराष्ट्रात पेरणीचे दिवस सुरू आहेत. पेरणी करताना पाभारीवर उभे राहून म्हटली जाणारी भलरी ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असते. आजा जे गीत म्हणतो, तेच नातू अभिमानाने गात असतो. हे कृषिसंस्कृतीतील हस्तांतरण शरद पवारांना चांगलेच ज्ञात आहे, कारण महाराष्ट्रातील शेती आणि शेतकरी यांच्याविषयी शरद पवार यांच्याइतके दुसऱ्या कुणालाही कळत नाही, असा महाराष्ट्रातील जनतेचा ठाम समज आहे. शरद पवार यांना शेतीपेक्षा राजकारण जास्त कळते. गेली साठ वर्षे ते सक्रिय राजकारणात आहेत. अनेक राजकीय चढउतार त्यांनी अनुभवले आहेत. अशा शरद पवारांना आमचा सवाल आहे, राजकारणात अशा अभद्र आणि आक्षेपार्ह टीकेची पेरणी कुणी केली? गोपीचंद पडलकर मागच्या दोन-तीन वर्षांत राजकारणात वावरू लागले आहेत, त्यांच्या मनावर या आक्षेपार्ह टीकेची पेरणी कोणामुळे झाली? आज शरद पवार यांच्यावर टीका झाली म्हणून हा गलबला झाला, पण याआधी अशा आक्षेपार्ह टीकेच्या तोफा कोणाच्या छावणीतून डागल्या जात होत्या? महाराष्ट्रातील राजकारणातील भीष्माचार्य म्हणून शरद पवारांना या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील. हीच योग्य वेळ आहे, शरद पवारांना भूतकाळाविषयी चिंतन करून भूतकाळातील चुका ज्यांच्या पदरात घालण्याची. शरद पवारांनी या विषयावर आपले मत मांडले आणि गोपीचंद पडलकर यांची चूक दाखवून देताना अशाच आक्षेपार्ह भाषेचा वापर करणाऱ्या पूर्वसुरींनाही समज दिली, तरच महाराष्ट्रातील राजकारण सभ्यतेची पातळी ओलांडून नैतिकता हरवून बसणार नाही. आक्षेपार्ह टीकेचा अभ्यास करण्यासाठी खूप मागे जाण्यासाठी गरज नाही. मागच्या पाच-सहा वर्षांत शरद पवारांचे सहकारी कोणत्या शब्दात व्यक्त झाले? राजकीय क्षेत्रात टीकाटिप्पणी होणारच. ती टाळता येत नाही. पण २०१४नंतर जी पातळी घसरली आहे, त्याबाबत शरद पवारांनी कधीही संबंधित वाचाळवीरांना आवर घातल्याची घटना नाही. उलट खुद्द शरद पवार यांच्या उपस्थितीत आक्षेपार्ह शब्दाची उधळण होत असताना त्यांनी सूचक मौन पाळून अशा टीकेला प्रोत्साहनच दिले आहे. या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडलकर यांनी चुकीचे शब्द वापरताच देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली समज खूप महत्त्वाची आणि नैतिकता जपणारी ठरते.

मराठा आरक्षण आंदोलन, शेतकरी संप या आणि इतर आंदोलनांच्या काळात महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर, त्यांच्या कुटुंबीयांवर कोणत्या शब्दात टीका केली गेली? आणि टीका करणारे कोणाचे साथीदार होते? हे उभ्या महाराष्ट्राला माहीत होते. त्या आंदोलनाच्या काळात शरद पवारांनी सोईस्कर मौन पाळले होतेच. पण आपल्या सहकारी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना लकवा झाला आहे, विधानसभा निवडणुकीत विचित्र हातवारे करत आमचे विरोधी तृतीयपंथीय आहेत असा संकेत देणे ही शरद पवारांची राजकीय अभिव्यक्ती महाराष्ट्र विसरलेला नाही. आपण जे पेरतो तेच उगवत राहते, हा निसर्गनियम आहे. शरद पवारांना गोपीचंद पडलकर यांनी केलेल्या टीकेनंतर याचा अनुभव आला असेल. गोपीचंद पडलकर यांनी केलेल्या टीकेचा घाव जिव्हारी लागून पवारांचे सर्व क्षेत्रांतील समर्थक मैदानात उतरले. पण सर्वसामान्य माणसाला या टीकाटिप्पणीबाबत काय वाटते? या विषयावर जनतेच्या भावना काय आहेत? याचा त्यांनी विचार केला आहे का? की केवळ शरद पवारांना खूश करण्यासाठी सर्व जण मैदानात उतरले आहेत? गोपीचंद पडलकर हे सर्वसामान्य माणसाच्या मनातील भावनेचे वाहक आहेत असे जेव्हा माध्यमातून बोलले जाते, तेव्हा शरद पवारांसह सर्वच राजकीय पक्षांनी, राजकीय नेत्यांनी विचार करणे आवश्यक होते. कारण राजकारण हे सभ्य माणसाचे क्षेत्र नाही, हे सर्वसामान्य माणसाला कळले आहेच, आता नैतिकताहीन क्षेत्र म्हणून ते सामान्य माणसाला परिचित होते आहे. तेव्हा वेळीच सावध व्हा, कारण जे पेराल तेच उगवत असते.