चला पंढरीसी जाऊ

विवेक मराठी    27-Jun-2020
Total Views |
@देविदास पोटे 


चला पंढरीसी जाऊ। रखुमादेवीवर पाहू।।
हाती टाळी मुखी हरी। गात जाऊ महाद्वारी।।
स्नान करु भिवरेशी। पुंडलिका पायापाशी।।
डोळे भरून पाहू देवा। देणे विसरू देहभावा।।
ऐसा निश्चय करुनी। म्हणे नामयाची जनी।।
- संत जनाबाई

Chala Pandharisi Jau _1&n 

जनाबाई ही वारकरी पंथातील महत्त्वाची संत. संत नामदेवांच्या घरी घरकाम करणारी ती एक मोलकरीण. मात्र तिचे व्यक्तिमत्त्व असामान्य होते. तिच्याबद्दल सर्व संतांना आपुलकीची भावना होती. तिचे आयुष्य इतरांपेक्षा वेगळे होते. चारचौघींपेक्षा ती कितीतरी वेगळी होती. तिचे नामदेवांच्या कुटुंबातील स्थान, धार्मिक स्तर सारे काही वेगळे होते.

या अभंगात संत जनाबाई म्हणते, ‘चला, आपण पंढरपूरला जाऊ आणि रखुमादेवीवर असलेल्या विठ्ठलाला डोळाभर पाहू. हाताने टाळी आणि मुखाने हरिनामाचा गजर करीत आपण महाद्वारी जाऊ. भीमा नदीत पुंडलिकाच्या पायापाशी स्नान करून मग देवाचे डोळाभर दर्शन घेऊ. शरीराचा भाव विसरून आणि मनाशी ठाम निश्चय करून पूर्णपणे विठ्ठलमय होऊ.’

संत जनाबाईने आरंभी संत नामदेवांच्या मार्गदर्शनासाठी आपला अध्यात्माचा प्रवास सुरू केला. मात्र त्यानंतर तिने आपली स्वत:ची वाट स्वतंत्रपणे शोधली. तिची अभंगवाणी संतांच्या मांदियाळीत मान्यता पावली. तिच्या कवितेने एक नवे परिमाण निर्माण केले. एक आगळावेगळा लौकिक तिच्या वाट्याला आला. तिने आध्यात्मिक अनुबंधाबरोबर सामाजिक आशयही आपल्या अभंगवाणीतून मांडला. ही अभंगवाणी लोकांना आपली वाटली. तिची कविता लोकांच्या हृदयात रुजली. शतकानुशतके लोकपरंपरेने समर्थपणे टिकून राहिली.

पंढरपूरची वारी हे वारकर्‍यांचे आनंदाचे निधान. पंढरपूरच्या दिशेने केलेली वारीची वाटचाल म्हणजे चैतन्याची आनंदयात्रा. वारीबरोबर चालत जाऊन पंढरपूरच्या सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेण्याची मनीषा जनाबाईने व्यक्त केली आहे.

संत जनाबाईने विठ्ठलभक्तीची आस अनेक ठिकाणी व्यक्त केली आहे. आपल्या दुसर्‍या एका अभंगात ती म्हणते,
देवा देई गर्भवास।
तरीच पुरेल माझी आस।।
परि देखे हे पंढरी।
सेवा नामयाचे द्वारी।।
आपल्या दुसर्‍या एका अभंगात ती म्हणते,
दळिता कांठिता तुज गाईन अनंता।
न विसंबे क्षणभरी तुझे नाम गा मुरारी।।

विठ्ठलदर्शनाची आर्त ओढ या अभंगाद्वारा व्यक्त झाली आहे.