सेना महाराजांचा वासुदेव

विवेक मराठी    27-Jun-2020
Total Views |

 
pandharpur ashadhi ekadas


वारकरी
संप्रदायात संत सेना महाराजांचे स्थान फार मोठे आहे. सेना महाराज पूजेत मग्न असताना प्रत्यक्ष भगवंताने जाऊन बादशाही हजामत केली होती. बाल्यावस्था, तारुण्यावस्था आणि प्रौढावस्था हे तीन प्रहर संपले आहेत. पण संसारात गुंतलेल्या माणसाचे डोळे उघडलेले नाहीत. दान मागायला वासुदेवाची स्वारी आलेली आहे. त्याला विन्मुख होणे योग्य नाही.

टळोनी गेले प्रहर तीन काय निजता झाकून लोचन

आलो मागावया दान नका विन्मुख होऊ जाण 1

लक्षात घ्या, हा वासुदेव वारंवार तुमच्या गावाला येणार नाही. म्हणजे हा नरदेह तुम्हाला पुन्हा पुन्हा मिळणार नाही. आता काळवेळ आहे तेव्हाच साधन केले पाहिजे.

आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीसी समसमान

मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वस्वे

मनुष्य देहाचेनि ज्ञाने सच्चीदानंद पदवी घेणे

इतुका अधिकार नारायणे कृपावलोकने पैं दीधला

नरदेहातच आपल्याला मुक्ती मिळविण्याचे साधून घेता येते. विषयसुख तर सर्वच योनीत भोगता येते. शेणामधले शेणकिडे सुद्धा रतिक्रीडा करतात. त्याचे काय महत्त्व! अशी संधी पुन्हा प्राप्त होणे नाही हे जाणून आता सावध व्हा. असे वासुदेव सांगतो आहे.

रामकृष्ण वासुदेवा जाणवितो जिवा

मज दान वासुदेवा मागुता फेरी नाही गावा गा 2

हा जीव चौऱ्यांशी लाख योनी फिरून येथे आला आहे. आता जर निराशा झाली तर जन्म व्यर्थ जाईल. तेव्हा आता धर्म करा. जे सार आहे ते जाणून घ्या. आणि संसार सुफळ करा.

आलो दुरूनी सायास द्याल दान मागायास

नका करु माझी निरास धर्म सार फळ संसारास गा 3

अहो! देव तर भावाचा भुकेला आहे.

थोर भावाचा भुकेला। हाचि दुष्काळ तयाला

भावाशिवाय देवाला आणखी काही लागत नाही. तेव्हा शुद्ध भावाने देवाला शरण जावे. असे मागणे हा वासुदेव आपल्याकडे मागतो आहे. याला अन्य काही भिक्षा नको आहे.

एक भाव देवा कारणे फारसे नलगे देणे घेणे

करा एक चित रिघा शरण हेची मागणे तुम्हा कारणे गा 4

लागोनिया पाय विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम

हेच संतांचे मागणे असते. त्यासाठी संत या मूढ जणांच्या पाया पडायलाही मागेपुढे पाहत नाही.

तुका म्हणे नाव जनासाठी उदकीं ठाव

नका पाहू काळवेळा दान देई वासुदेवा

व्हा सावध झोपेला सेना न्हावी चरणी लागला गा 5

त्यामुळे आपल्याला हा सेना न्हावी महाराजांचा वासुदेव जागे करीत आहे