पांगूळ

विवेक मराठी    27-Jun-2020
Total Views |

संत तुकाराम महाराजांचे हे अत्यंत लोकप्रिय पांगूळ आहे. पाहिले तर तसे ते गंमतीशीरसुद्धा आहे. महाराज म्हणतात - ‘ हे देवा! मी पांगळा झालो आहे रे! मला धड हातपायसुद्धा नाहीत... आणि ज्यावर मी बसलेलो आहे ते इतकेसैराटचालले आहे की विचारता सोय नाही!’ मंडळी, आहे की नाही गंमत? अहो, इतके सैराट चालले आहे तर मग हा पांगूळ कुठला?

pandharpur ashadhi ekadas

महाराज पुढे सांगतात - ‘हे इतके सैराटपणे चाले आहे की रस्त्यातील कोणत्याही अडथळ्यांना ते मुळीच जुमानत नाहीत. कोठे विहीर पाहत नाही, आडकाठी पाहत नाही, खुंट-दरड काहीच ते पाहत नाही... मला आईबाप नाहीत आणि कोणाचाही आधार नाही...!’

पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय

बैसलो जयावरी सैराट ते जाय

खेटीता कुंप काठी खुंट दरडी पाहे

आधार नाही मज कोणी बाप ना माय 1

आपला लोकगायकदान करा, दान कराअसे आवाहन करून पंढरपुरला जाण्याची इच्छा व्यक्त करतो... पण तो स्वतः जाऊ शकत नाही... मला तुम्ही तेथवर घेऊन जावे, अशी त्याची विनंती आहे.

दाते हो दान करा जाते पंढरपूरा

न्या मज तेथवरी रखमाचा सोयरा 2

आता पंढरपूरला जाण्याचे कारण तरी काय? अहो, तेथेच तर खरेखुरे दान मिळणार आहे... कारण

विटेवरी ज्याची पाऊले समान

तोचि एक दानशूर दाता

मनाचे संकल्प पावविल सिद्धी

जरी राहे बुद्धी याचे पायी

जगातील सर्वांत मोठा दानशूर दातापंढरपूरयेथेच समचरण असा उभा आहे. या जन्ममरणाच्या चक्रात अडकून मी खूप मोठे दुःख भोगले आहे. पण त्याचे निवारण करणारा दाता मला कोठेच भेटलेला नाही. पण संतांनी पंढरपूरची किर्ती वर्णन करून असे सांगितले आहे की, पंढरपूरला इतका विलक्षण दाता आहे की, तो पांगळ्यालाही पाय देऊ शकतो. त्यामुळे मला त्याचे दर्शन करवून द्या!

हिंडलो गव्हाणे गा शिणलो येरझारी

मिळेची दाता कोणी जन्म दुःख निवारी

किर्ती ही संतामुखी तोची दाखवा हरी

पांगुळा पाय देतो नांदे पंढरपूरी 3

अहो, या पोटासाठी मी जगात पांगळा झालो. मला जगात भीकसुद्धा मिळणे अवघड झाले आहे. कुणाच्या दारावर गेलो तर सर्वजणपुढे सर... पुढे सरअसेच म्हणतात. माझी कुणालाच करुणा येत नाही. त्यातहीआशानावाचे कुत्रे मागे लागले आहे की तेसुद्धा पिच्छा सोडत नाही...

या पोटाकारणे गा झालो पांगिला जना

सरेचि मायबाप भिक नाही खंडणा

पुढारा म्हणती एक तया नाही करुणा

श्वान हे लागे पाठी आशा बहु दारुणा 4

कोणत्या पापामुळे हे दुःख मला प्राप्त झाले आहे हेसुद्धा मला कळत नाही. माझे काय चुकलेमाकले असेल तेसुद्धा लक्षात येत नाही. जसा मोहापोटी पतंग दिव्यावर झेप घालतो आणि स्वतःच जळून मरतो अगदी तसेच माझे झाले आहे. अहो, मायबाप संत हो! आता तुम्हीच मला जीवनदान द्या!!

काय मी चुकलो गा मागे नेणवेची काही

कळेचि पापपुण्य येथे आठव नाही

मी माजी भुललो गा दीप पतंगासोयी

द्या मज जिवदान संत महानुभाव काही 5

मी तुमच्या भेटीसाठी फार दुरून आलो आहे. मला दूर लोटू नका. तुमच्या पायाचे मोठ्या भाग्याने दर्शन झाले आहे.

भाग्याचे उदय ते हे जोडी संतपाय

आता तुम्हीच माझा उद्धार करावा, असे आपला पांगूळ संतांना हात जोडून विनवितो आहे.

दुरुनी आलो मी गा दुःख दारुण

यावया येथवरी होते हेचि कारण

दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दारुण

विनवितो तुका संता दोन्ही कर जोडून 6

संत या पांगूळाची अपेक्ष नक्कीच पूर्ण करतील!

**