पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम

विवेक मराठी    28-Jun-2020
Total Views |


pandharpur ashadhi ekadas

पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम।
पांडुरंग दीनबंधु जयाचे ते नाम।
आंधळ्या जीवीचे तो जाणतो धर्म।
म्हणोनि आलो गा देई माझे मज वर्म।।
असोनि हात पाय डोळे जाहलो मी आंधळा।
मुखी नाम तुझे लागला वाचेसी चाळा।।
देउनि दान माते नाम सांगे ये काळी।
विठोबाचे दान आले ऐसी देईन आरोळी।।
दान पावले संतसंगे भक्तिचे।
एका जनार्दनी अखंड नाम वाचे।।
- संत एकनाथ

संत एकनाथांचा हा भारूड या प्रकारातला अभंग आहे. भारूड ही लोकसाहित्यातील संकल्पनांवर आधारित रचना असते. हा अभंग ‘आंधळा’ या भारुडातील उपप्रकारातला आहे.

या अभंगात संत एकनाथ म्हणतात, ‘पंढरपूर नगरीचा सार्वभौम राजा म्हणजे पांडुरंग. तो दीनदयाळ - दीनांचा उद्धारकर्ता आहे. गोरगरिबांचा बंधू आहे. आंधळ्या जिवाच्या वेदना, दु:ख तो जाणतो. या दु:खाच्या कळा, त्याचे वर्म याचीही त्याला चांगली जाणीव आहे. म्हणूनच हे विठ्ठला, मी आंधळा तुझ्या पायी नतमस्तक झालो आहे. तू मला माझे वर्म उलगडून द्यावे अशी माझी विनवणी आहे. हात, पाय, डोळे असूनही मी आंधळा आहे. माझ्या मुखी तुझेच नाम असून वाणीला तुझ्या नामाचा छंद लागला आहे. तू मला कृपेचे दान द्यावे आणि तुझ्या नामाचे अंतरंग उलगडून सांगावे. तुझे हे दान आले की मी जोराने हाळी देईन. हे भक्तीचे दान पावले आणि मी पावन झालो. माझ्या मुखी असलेल्या तुझ्या अखंड नामाने मी कृतकृत्य झालो.’

माणूस संसाराच्या चक्रात अडकला की मोह, माया, लोभ या विकारांच्या आहारी जातो. व्यवहारात मी, माझे, मला अशी मीपणाची बाराखडी सुरू झाली की माणसाची नैतिक घसरण सुरू होते. हात, पाय, डोळे हे सारे असूनही अहंकाराच्या भ्रामक पडद्यामुळे माणसाला काही दिसत नाही. डोळे आहेत पण दृष्टी नाही वा नजर नाही अशी अवस्था होते.

हे आंधळेपण कशामुळे येते? स्वार्थी, आत्मकेंद्री प्रवृत्तीमुळे आणि संकुचित विचारांमुळे. संतांच्या बुद्धीला डोळे असतात, म्हणून त्यांचे विचार अवघ्या विश्वाला कवेत घेतात. मात्र व्यवहारातील लोकांच्या उघड्या डोळ्यांमागे बुद्धीचा वा विवेकाचा अभाव असल्यामुळे त्यांना डोळे असूनही दिसत नाही. स्वार्थमूलक विचारांनी त्यांच्या विवेकाची पाळेमुळे लुप्त झालेली असतात. ‘डोळे असून आंधळे' अशी त्यांची अवस्था असते. या बाबतीत संत आणि सार्वसामान्य संसारीजन यांची तुलना करावयाची झाल्यास संत हे स्वार्थाबाबत आंधळे तर परोपकाराबाबत डोळस असतात, सजग असतात, याउलट सामान्य माणूस परोपकाराबाबत आंधळा पण आपल्या स्वार्थाबाबत मात्र डोळस असतो. संतांचे आंधळेपणही डोळस असते, तर आत्मकेंद्री संसारी जनांचे डोळसपणही आंधळे असते.

विठ्ठलाच्या भक्तिप्रेमाचे दान लाभले की आंधळेपणाचे आवरण हळूहळू दूर होते. भक्तीचे दान पावले की आयुष्यातील सुखाचे दार उघडते. शब्दांपलीकडच्या अद्भुत आनंदाची अनुभूती येते.

संत एकनाथांनी ‘आंधळा’ या शब्दावर मार्मिक भाष्य केले आहे. ज्याला अध्यात्माचे मर्म उमगले तो डोळस, मात्र सारे काही पाहूनही ज्याला त्याचा अर्थ उमगत नाही तो डोळे असूनही आंधळा, असे भाष्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या व्याख्येप्रमाणे आपण डोळस आहोत की आंधळे, हे आत्मपरीक्षण करून ज्याने त्याने ठरवायचे आहे.