फावीपिरावीर - कोरोनावर महत्त्वाचा नवा उपाय?

विवेक मराठी    28-Jun-2020
Total Views |
@डॉ. मिलिंद पदकी
'सेल रिसर्च' या नियतकालिकाने चिनी वैज्ञानिकांनी लिहिलेले एक पत्र प्रसिद्ध केले, ज्यात त्यांनी फावीपिरावीरसह इतर अनेक औषधांच्या कोविड-१९मध्ये मानवी चाचण्या करण्याची विनंती जगाच्या विज्ञान-क्षेत्राला केली होती. केवळ चार ते दहा दिवसांत कोरोना विषाणू शरीरातून नामशेष करू शकणाऱ्या या औषधावर अनेक देशांनी आपल्या अशा केंद्रित केल्या आहेत.


corona_1  H x W

या वर्षीच्या जानेवारीत, आफ्रिकेतील काँगो या देशात इबोलाच्या उपचारांवर चर्चा करण्यासाठी आलेल्या डॉ. कासझिन्स्की आणि डॉ. यामाडा यांच्या लक्षात आले की, आपण इबोलासाठी पुरस्कृत करत असलेले 'फावीपिरावीर' हे औषध, नुकत्याच बातम्यामध्ये येऊ लागलेल्या कोरोना विषाणूवरही उपयोगी पडू शकेल.

जपानच्या टोयामा या कंपनीने इन्फ्लुएन्झासाठी ('फ्लू'साठी) फावीपिरावीर विकसित केले होते आणि 'अव्हीगान' या ब्रँड नावाखाली बाजारात आणले होते. जपानी सरकारने त्याचे वीस लाख पूर्ण कोर्सेस फ्लूसाठी विकत घेऊन ठेवले होते. तसेच अमेरिकेने याचे ६००० कोर्सेस फ्लूविरुद्ध, तर यू.ए.इ.ने ५०,००० कोर्सेस तिथल्या 'मर्स' या कोरोना विषाणूविरुद्ध घेऊन ठेवले होते. चीनमध्ये याचे पेटंट संपले असून, त्यांनी याच्या जेनेरिक उत्पादनाचा प्रचंड साठा केला आहे. अमेरिकेचे ट्रम्प प्रशासन अमेरिकेच्या एफ.डी.ए.ला हे कोविडसाठी मंजूर करा असा आग्रह करीत आहे. ४ फेब्रुवारीला 'सेल रिसर्च' या नियतकालिकाने चिनी वैज्ञानिकांनी लिहिलेले एक पत्र प्रसिद्ध केले, ज्यात त्यांनी फावीपिरावीरसह इतर अनेक औषधांच्या कोविड-१९मध्ये मानवी चाचण्या करण्याची विनंती जगाच्या विज्ञान-क्षेत्राला केली होती.

तसेच डॉ. कासझिन्स्की आणि डॉ यामाडा या दोन डॉक्टरांच्या हेही लक्षात आले, की फावीपिरावीर जर इन्फ्लुएंझा ए आणि बी या आर.एन.ए. विषाणूंविरुद्ध काम करत असेल, तर ते इतरही आर.एन.ए. विषाणूंविरुद्ध उपयुक्त ठरण्याची खूप शक्यता आहे. या विषाणूंमध्ये 'आर.एन.ए. डिपेन्डन्ट आर.एन.ए. पॉलिमरेज' (RdRp) नावाचे विकर (एन्झाइम) असते, जे या औषधाने बंद पडते व विषाणूचे पुरुत्पादन थांबते. २०१८ सालीच काही बेल्जियन वैज्ञानिकांनी हे औषध दुर्लक्षित आणि नव्याने येऊ घातलेल्या विषाणूंविरुद्ध विकसित केले जावे, असा निबंध लिहिला होता.

ज्या प्रथिनांचे मिळून RdRp हे एन्झाइम बनले आहे, ती प्रथिने म्युटेशनमध्ये फारशी बदलत नाहीत असा कयास आहे आणि त्यामुळे अशा औषधांना विषाणूतर्फे 'प्रतिरोध' (Resistance) निर्माण होणार नाही, अशा आशेला जागा आहे. अजूनतरी या औषधाला प्रतिरोध करू शकणारी उत्परिवर्तने (जनुक-बदल) कोणत्याही विषाणूमध्ये सापडलेली नाहीत.


covid_1  H x W:
फावीपिरावीर या औषधी संयुगाची रासायनिक संरचना



चीनमध्ये फावीपिरावीरच्या चाचण्या फेब्रुवारीतच सुरू झाल्या होत्या आणि मार्चमध्ये चीनच्या आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने हे औषध ३४० पेशंटच्या एका चाचणीत उपयुक्त असल्याचे स्पष्टपणे मांडले. दुसऱ्या एका चिनी चाचणीत फावीपिरावीरने शरीरातून विषाणूला हटविण्याचा वेग वाढतो, औषधावरचे रुग्ण (३५ माणसे) ४ दिवसांत विषाणुमुक्त झाले, तर औषध न दिले गेलेले (४५ माणसे) ११ दिवसांत, असे दिसले.


फावीपिरावीर हे बनवायला सोपे आणि स्वस्त आहे, ते तोंडावाटे दिले जाऊ शकते - इंजेक्शनची गरज नसते, तसेच त्याच्या साठवणीस किंवा वाहतुकीस फ्रीज लागत नाही, या सर्व कारणांमुळे ते गरीब देशातही सहज वापरले जाऊ शकेल.

मात्र लहान आणि मोठ्या उंदरांत, सशांमध्ये आणि माकडांमध्ये फावीपिरावीरने नवजात पिल्लांचे वजन कमी असणे, पिल्लांची संख्या कमी असणे, पिल्लू जन्मतःच मृत असणे असे परिणाम आढळले आहेत. जन्मानंतर पिल्लांची वाढ मात्र नॉर्मल दिसलेली आहे. गर्भावस्थेत मातेला दिलेले औषध गर्भातही पोहोचते, तसेच मातेच्या दुधातही ते आढळते असे दिसते. त्यामुळे गर्भवती महिलांमध्ये ते वापरू नये, तसेच ट्रीटमेंट दिलेल्या महिलांनी ती संपल्यावर किमान सात दिवस (औषध शरीरातून पूर्णपणे निघून जाईपर्यंत!) गर्भधारणा टाळावी. या औषधाने रक्तातले युरिक आम्लाचे प्रमाण वाढत असल्याने ते संधिरोगात (गाउटमध्ये) टाळावे.

फावीपिरावीर डोसविषयी - ग्लेनमार्कने पहिल्या दिवशी १८०० मि.ग्रॅ. दिवसातून दोनदा आणि नंतर नऊ दिवस ८०० मि.ग्रॅ. दिवसातून दोनदा असा डोस सांगितला आहे. पण काही संशोधकांनी म्हटले आहे की हा डोस अपुरा आहे. कोरोना विषाणू मारण्यासाठी, रक्तात औषधाचे प्रमाण कमीत कमी ४० ते ८० मायक्रोग्रॅम पर मिलिलीटर इतके मिळवावे लागते, ते या डोसने (प्रत्येक माणसात) मिळेलच असे नाही. म्हणून ते पहिल्या दिवशी २४०० मि.ग्रॅ. दिवसातून दोनदा आणि त्यानंतर १६०० मि.ग्रॅ. दिवसातून दोनदा असा खूपच अधिक डोस सुचवितात.

फावीपिरावीर - बाकी काही तपशील

रक्तात प्रमाण निम्म्यावर येण्याचा काळ - २ ते ५.५ तास
रक्तात प्रथिनाला बांधले जाण्याचे प्रमाण - ५४%
मुख्यतः यकृतामध्ये मेटाबोलाइज होते आणि मूत्रातर्फे बाहेर फेकले जाते. त्यामुळे या दोन्ही इंद्रियांचे काम कमी झाले असल्यास, औषधाचे शरीरातले प्रमाण वाढत जाते, हे वापरणाऱ्या डॉक्टरांनी लक्षात घेण्याची गरज.

केवळ चार ते दहा दिवसांत कोरोना विषाणू शरीरातून नामशेष करू शकणाऱ्या या औषधावर अनेक देशांनी आपल्या अशा केंद्रित केल्या आहेत. त्या ते पुऱ्या करेल अशा शुभेच्छा!