जोहार

विवेक मराठी    29-Jun-2020
Total Views |


pandharpur ashadhi ekadas

जुन्या काळाच्या समाजव्यवस्थेत महार समाजाला योग्य स्थान होते. त्यांचे कार्यही महत्त्वाचे असे. दामाजीपंत यांच्या रकमेचा भरणा करण्यासाठी भगवान पांडुरंगाने महाराचेच रूप घेतले होते. महार समाजाला गावच्या महारकीचे वतन असे. या ठिकाणी सांगितलेला ‘
जोहार म्हणजे गावच्या महाराने पाटलाला घातलेला दंडवत होय. असे जोहार घालणारे अडतीस अभंग संत एकनाथ महाराजांनी लिहिले आहेत.

गावच्या चावडीवर हजेरी लावणे, गावातल्या आणि परगावच्याही लोकांना पाटलाचे निरोप पोहोचविणे आणि पडेल ते काम करणे, अशा जबाबदाऱ्या महाराला पार पाडाव्या लागत. या रचनेत लोकगायक महार म्हणतो, " मायबाप, मी विठू पाटलाचा महार आहे म्हणजे भगवान श्रीविठ्ठल हाच माझा पाटील अर्थात मालक आहे. मी केवळ त्याच्या हुकुमाचा ताबेदार आहे. मला सांगितलेल्या कामाचा हिशोब मी देतो आहे, मी त्याचा ताबेदार म्हणजे सेवक असल्यामुळे माझे ते कर्तव्यच आहे.’’

जोहार मायबाप जोहार । मी विठू पाटलाचा महार ।

हिशोब देतो तावेदार । लंकेचा कारभार की जी मायबाप ॥

या गावचा कारभार कसा चालतो ते महाराला माहीत आहे. त्याची मोठी अपेक्षा नाही. मालक देईल त्या अर्ध्या भाकरीत काम करण्याची त्याची तयारी आहे. महाराज तुम्ही याल ती अर्धा भाकर मी मागून घेऊन खातो. त्याच्या बदल्यात हा रात्रभर जागरण करतो आणि गावची राख करतो. तो पाटलाच्या शेतातला नांगर, शेटजींच्या दुकानातला तराजू आणि गावातल्या आयाबायांची चोळी-बांगडी यांचा रक्षणकर्ता आहे.

पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतापासून मानवाचे शरीर बनलेले आहे. हे सुद्धा आपले गावच आहे आणि या गावचा राखणदार भगवंत आहे. एका अर्थाने भक्त आणि भगवंत यांचे काम एकाच स्वरूपाचे आहे. कारण आपला आत्मा हा आपल्या शरीरात होण्या घडामोडी निरखीत असतो.

आवाजीकडून येतोअर्धी भाकर मागून खातों ।

सारी रात्र गोवरापाशी जागलों । फरमासी करतों की जी मायबाप ॥ २ ॥

पाटलाचा नांगर शेटयाची तागडी । आईबाईची बांगडी ।

आंत माझी पांचांची डामाडी । करितों की जी मायबाप ॥

या गावचा कुलकर्णी तरबेज हवाच. त्याने चावडीवर होणाऱ्या जमाखर्चाचा हिशोब चोख ठेवला पाहिजे. प्रत्येकाला त्याच्या कामाप्रमाणे योग्य तो मोबदला त्याने दिला पाहिजे.

येथे कुळकर्णी स्वाधीन करा । गांवचा हिशोब पाहिजे बरा ।

धन्याची रजा तलबेप्रमाणे मुशारा । ये चित्तांत की जी मायबाप ॥४ ॥

ब्रह्मानंदी केला जोहार । एका जनार्दन बाजीचें उत्तर ।

माप केले खरोखर । काय बोलिजे की जी मायबाप ॥

असे सांगून आपला महार म्हणतो, ‘‘माझे काम करताना मी त्यात दंग होऊन गेलो आहे. ब्रह्मानंदाचा हा जोहार मी तुम्हाला घातला आहे."

नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः।

शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येदकर्मणः॥ ३-८ ॥

या गीता श्लोकावर भाष्य करताना माउली ज्ञानोबारायही म्हणतात -
म्हणशी नैष्कर्म्य होआवें । तरी एथ तें न संभवे ।

आणि निषिद्ध केवीं राहाटावें । विचारी पां ॥ ७७ ॥

म्हणोनि जें जें उचित । आणि अवसरेंकरून प्राप्त ।
तें कर्म हेतुरहित । आचर तूं ॥ ७८ ॥

पार्था आणिकही एक । नेणसी तूं हे कवतिक ।
जें ऐसें कर्म मोचक । आपैसें असे ॥ ७९ ॥

देखें अनुक्रमाधारें । स्वधर्मु जो आचरे ।
तो मोक्षु तेणें व्यापारें । निश्चित पावे ॥ ८०

या जोहरच्या माध्यमातून संत एकनाथ संदेश देतात की, ‘‘कर्म न करण्याने शरीरव्यवहारही चालणार नाहीत. तू आपले कर्तव्यकर्म कर. कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे हेच श्रेष्ठ आहे.’’