यमगरवाडीची आयकॉन

विवेक मराठी    29-Jun-2020
Total Views |
यमगरवाडी म्हणजे एक कुटुंबच. अनाथपणाचे बोचके डोक्यावर घेऊन रेखा आपल्या भावंडांसह प्रकल्पावर आली, तेव्हा शिक्षकापासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सार्‍यांनीच तिला आपले मानले. कोणी आई झाले, कुणी मावशी, कोणी काकू, काका, तात्या, बापू. प्रकल्पातील प्रत्येक जण मागच्या काही दिवसांपासून रात्रंदिवस लग्नाच्या तयारीत गुंतला होता आणि सर्वांनाच दिनांक २८ जूनला भटकेश्वराच्या साक्षीने रेखा व बालाजी यांच्या समरसता विवाहाचा साक्षीदार होण्याचे भाग्य मिळाले.

Yamagarwadi _1  

"अरे उमाकांत, रेखा आणि बालाजीचे लग्न जमले आहे. तयारी करावी लागेल." राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्व क्षेत्रीय प्रचारक विजयराव पुराणिक यांचा फोनवर निरोप आला आणि रेखाच्या आयुष्याचा पट डोळ्यासमोर उभा राहिला. गेले आठ दिवस झाले ही कहाणी कागदावर आणावी म्हणत होतो, पण प्रत्येक वेळी डोळे डबडबून रडू यायचे, मन सारखे कासावीस झाल्यासारखे वाटत होते. रेखाचा चेहरा डोळ्यासमोरून हलतच नव्हता.
कोण आहे ही रेखा? असे का व्हावे? ते लिहिताना डोळ्यांच्या कडा वारंवार ओल्या का होत आहेत? तिचा भूतकाळ शब्दरूपात मांडण्याची हिम्मत माझ्याकडून काय, तिला ओळखणाऱ्या कोणाकडूनही होणार नाही...
तरीही प्रयत्न करतो.

रेखा ‘पारधी’ समाजाची, ज्यांच्या माथ्यावर इंग्रजांनी ‘तुम्ही गुन्हेगार आहात’ असा शिक्का मारला होता. त्याच पारधी समाजाच्या माथ्यावरचा गुन्हेगारीचा शिक्का कायद्याने पुसला गेला असला, तरी इतर समाज आजही त्यांच्याकडे संशयाने पाहतो. इंग्रज १९४७लाच भारत सोडून गेले, पण त्यांनी आखून दिलेल्या नियमाप्रमाणे पोलीस प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमात पारध्यांकडे ‘गुन्हेगाराच्याच नजरेने बघा’ असे आजही शिकवले जाते. आम्ही कार्यकर्त्यांनी अशी असंख्य उदाहरणे पाहिली आहेत की आजही कोठेही चोरी झाली, दरोडा पडला की पहिली धाड पारध्यांच्याच पालावर पडते.

स्वतःला कायम असुरक्षित समजणाऱ्या या पारधी समाजात जन्मलेली रेखा सहा वर्षांची असतानाच पोरकी झाली होती. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात अंबाडी तांडा या गावात आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या रेखाच्या पायाखालची जमीनच सरकली होती. नातेवाईक असून नसल्यासारखे होते. ती एकटी नव्हती, तर तिच्याबरोबर लहान असलेली बहीण शीतल, दोन वर्षाचा भाऊ अर्जुन आणि अवघ्या दोन महिन्यांचा आणखी एक भाऊ रामचंद्र होता.

ह्या अनाथ लेकरांचा आम्ही सांभाळ करू, असे म्हणून ख्रिस्ती पाद्र्यांनी त्यांना ताब्यात घेतले. पण मूळ उद्देश होता धर्मांतराचा. त्यासाठी छळाबळाचा उपयोगही झाला. किनवट भागात संघाच्या धर्मजागरण विभागाचे काम करणारे प्रमुख कार्यकर्ते गोवर्धन मुंडे यांना ही बातमी कळली. यमगरवाडी प्रकल्पात भटके-विमुक्त समाजातील मुलांसमवेत ही मुले राहतील, असा विचार करून त्यांनी चर्च-मिशनऱ्यांच्या तावडीतून त्यांची सुटका केली. भटके-विमुक्त विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्याच वेळी तातडीने यमगरवाडी प्रकल्पातून रमेश पवार किनवटला गेले आणि २००५च्या जूनमध्ये ते या चार लेकरांना प्रकल्पात घेऊन आले.

ही चारी भावंडे गोरीगोमटी, घाऱ्या डोळ्यांची, तेजस्वी चेहऱ्याची, प्रसन्न वाटत होती अगदी खेळण्यातल्या बाहुल्यांसारखी. मात्र ज्या वयात बाहुला-बाहुलीशी खेळायचे असते, त्या वयाच्या अगदी सहाव्या वर्षापासून 'आयुष्य' या एका शब्दांशी ती खेळू लागली होती. अनेक अडचणींना तोंड देत दुःख आणि दैन्यासह यमगरवाडीत आली होती. लहान भावंडासह भोगलेल्या असंख्य यातनांच्या आठवणी तिच्यासोबत होत्या. प्रकल्पात आल्यानंतर रेखा तिच्या भावंडांना सारखे जवळ घ्यायची आणि रडत बसायची. अनेक प्रश्न तिच्या चेहऱ्यावर दिसायचे, पण महिनाभराच्या अवधीतच तिच्या लक्षात आले की यमगरवाडी हेच माझे आई-वडील आणि प्रकल्प हेच माझे सर्वस्व. तेथून सुरू झाला रेखाचा प्रवास.



Yamagarwadi _1  

कसा होता हा प्रवास?

यमगरवाडी - तुळजापूरपासून अक्कलकोट रस्त्यावर १८ किलोमीटरवर यमगरवाडी लागते. १९९३मध्ये भटके-विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या अंतर्गत हा प्रकल्प सुरू झाला. प्रकल्पासाठी प्रकल्प चालवणे ही यमगरवाडी सुरू करण्यामागची भूमिका नाही, तर व्यापक चळवळीला पूरक आणि शक्ती देणे हा प्रकल्पाचा हेतू आहे. अत्यंत दुर्लक्षित अशा भटके विमुक्त समाजबांधवांच्या मुलांना परिपूर्ण घडवून पिढी तयार करण्याचे काम येथे होते. आज या प्रकल्पात प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत ५१९ मुले शिक्षण घेत आहेत. यमगरवाडी फक्त प्रकल्प किंवा तिथे काम करणारे काम राहिले नसून ते प्राचीन वैभवसंपन्न वारसा असणाऱ्या ज्ञानसंपन्न जाती-जमातींच्या समाजाच्या विकासाचा एक मार्ग बनला आहे. प्रकल्पातील सर्वच मुले शिक्षणाचा गंध नसलेली, पण त्यांना शिक्षणाची आणि आत्मविकासाची कवाडे उघडी झाली आणि त्यांच्या आयुष्याला प्रकाशाची वाट सापडली, त्यातीलच एक रेखा.

प्रकल्पात असताना रेखानेसुद्धा अशीच प्रगती साधली, एवढेच नाही, तर तिने आपल्या भावंडानाही प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. प्रकल्पात स्वतःला समजून घेत प्रकल्पातील अन्य मुला-मुलींशी कायम भावंडभाव जपला, शिकत राहिली, एकेका पायरीवर घडत गेली; आपल्या भावंडांची आईही झाली आणि शाळेची विद्यार्थीही.

चौथीत असताना रेखाने शाळेच्या क्रीडा स्पर्धेत धावण्याच्या शर्यतीत भाग घेऊन पहिला नंबर मिळवला. मग थाळीफेक, गोळाफेक खेळू लागली. शाळेतील मुले बुद्धिबळ खेळायची, तेव्हा रेखा तो खेळ लक्षपूर्वक पाहायची. आपल्यालाही बुद्धिबळ खेळता येईल असे तिला वाटायचे आणि बुद्धिबळ पाहणारी रेखा पुण्याच्या बालेवाडी येथे राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सहा फेऱ्या जिंकून तिसरी आली, रेखा जिंकली ही बातमी पुण्याहून यमगरवाडीत आली आणि ती प्रकल्पात आल्यानंतर आम्ही सर्वांनी ढोल-लेझीम लावून तिची मिरवणूक काढली. फक्त क्रीडा विषयातच नाही, तर विज्ञान विषयातही तिने नाव कमावले. कमीत कमी पाण्याचा वापर करून पीक कसे काढावे यावर रेखाने सादर केलेल्या प्रयोगाला जिल्ह्यात खूपच चांगला प्रतिसाद मिळाला.

स्वत:बरोबरच तिने भावंडांकडेही तितकेच काळजीने लक्ष दिले. रेखाची दुसरी बहीण शीतल पोलीस व्हायची तयारी करत आहे. ज्या पोलिसांच्या दहशतीखाली सबंध पारधी समाज जगतोय, त्याच पोलीस खात्यात जाऊन अत्याचाराला वाचा फोडायचा निर्धार शीतलने केला आहे. रेखाचा लहान भाऊ अर्जुन तर इतका हरहुन्नरी आहे की तो यमगरवाडीचा अष्टपैलू विद्यार्थी होता. विज्ञान वा गणित, नृत्य असो वा अभिनय, संगीत असो वा गायन.. अर्जुन प्रत्येक क्षेत्रात पुढेच राहायचा. त्याच्या अभिनयात खूपच नैसर्गिकता आहे. विज्ञान आणि गणित या विषयांवर त्याची चांगलीच पकड असल्याने शिकून डॉक्टर व्हायची त्याची इच्छा पूर्ण हाेत आहे. आज तो नाशिक इथल्या सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिकत आहे. रामचंद्रनेही दहावीची परीक्षा दिली आहे. मोठ्या भावंडांपेक्षाही मी शिकून नाव कमावेन अशी खूणगाठ त्याने मनाशी बांधली आहे.

आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक वडीलधाऱ्यात रेखाने स्वतःचा भाऊ-बहीण-आई-वडील शोधले. त्यामुळे आज असंख्य हितचिंतक, देणगीदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या घरातील ती घटक बनली आहे. मुंबईसारख्या महानगरात सेटल व्हायला भल्याभल्यांच्या नाकी नऊ येतत्, मात्र रेखा गेल्या चार वर्षांपासून ‘फोर्टीज’सारख्या नामवंत आंतरराष्ट्रीय रुग्णालयात ‘नर्स’ म्हणून नोकरीही करत आहे व रुग्णालयातही सर्वांची लाडकी रेखा मॅम झाली आहे.

तर काय सांगत होतो, रेखाच्या लग्नाची गोड बातमी आली आणि तिच्या आयुष्याच्या आठवणीत गुंतून गेलो. बालाजी मरडे या लातूर जिल्ह्यातील संघाच्या पूर्व प्रचारकासह तिच्या आयुष्याची दुसरी इनिंग सुरू झाली आहे. बालाजी एक ऊर्जावान कार्यकर्ता आहे. त्याचे स्वतःचे MSWचे शिक्षणही झाले आहे.

यमगरवाडी म्हणजे एक कुटुंबच. अनाथपणाचे बोचके डोक्यावर घेऊन रेखा आपल्या भावंडांसह प्रकल्पावर आली, तेव्हा शिक्षकापासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सार्‍यांनीच तिला आपले मानले. कोणी आई झाले, कुणी मावशी, कोणी काकू, काका, तात्या, बापू. प्रकल्पातील प्रत्येक जण मागच्या काही दिवसांपासून रात्रंदिवस लग्नाच्या तयारीत गुंतला होता आणि सर्वांनाच दिनांक २८ जूनला भटकेश्वराच्या साक्षीने रेखा व बालाजी यांच्या समरसता विवाहाचा साक्षीदार होण्याचे भाग्य मिळाले.

रेखाचा निरोप घेताना प्रत्येकाच्या पापण्यांच्या कडा ओल्या होत होत्या. प्रत्येक जण तिला सांगत होते, काही गरज लागली तर मला सांग. पण तिच्या डोळ्यातील बळकट आत्मविश्वास सांगत होता - काळजी करू नका, मी यमगरवाडी प्रकल्पामुळे घडले आहे. जेंव्हा फोन करेन, भेटेन तेंव्हा प्रगती, कर्तृत्वाची गोड बातमी नक्की देईन.

उमाकांत मिटकर
९४२१४८०८७४