परिसर पुनर्निर्मिती व आपली भूमिका

विवेक मराठी    03-Jun-2020
Total Views |
@अमृता जोगळेकर

@ मेधावी तडवळकर

संयुक्त राष्ट्र संघाने (United Nationsने) २०२१-२०३० हे दशक ‘Ecosystem Restoration’ म्हणजेच परिसर पुनर्निर्मितीचे दशक म्हणून जाहीर केले आहे. जंगलतोड, खाण प्रकल्प, रासायनिक कारखाने, रस्ता रुंदीकरण, वेगाने वाढणाऱ्या आक्रमक प्रजाती (Invasive species) इत्यादी अनेक कारणांमुळे आपल्या आसपासचा परिसर घातक बदलांना सामोरा जात आहे. ह्या बदलांच्या चक्रात परिसराची समृद्धी नष्ट होत चालली आहे. ’परिसर पुनर्निर्मिती’ करून आपण हा परिसर कायमस्वरूपी नष्ट होण्यापसून वाचवू शकतो. २०११मधील Bonn challengeने प्रस्तावित केल्यानुसार सन २०३०पर्यंत ३५ कोटी हेक्टर जमिनीवर पुनर्निर्मितीचे लक्ष्य समोर ठेवण्यात आले आहे. भारतानेदेखील Bonn Challengeला अनुसरून २०२०पर्यंत १ कोटी ३० लाख हेक्टर जमिनीवर, तर २०३०पर्यंत आणखी ८० लाख हेक्टर जमिनीवर पुनर्निर्मितीचे ध्येय समोर ठेवले आहे. पण परिसर पुनर्निर्मिती म्हणजे नक्की काय? हे त्याकरिता समजून घेणे थोडे गरजेचे आहे.


Your role in campus recon

परिसर पुनर्निर्मिती (Ecosystem Restoration) म्हणजे नक्की काय?

आपल्या आसपासच्या परिसरात आपल्याबरोबर अनेक जैविक तसेच अजैविक घटक नांदत असतात. बऱ्याच वेळा जैविक घटक आणि पाणी म्हणजेच परिसर असे समजले जाते. पण प्रत्यक्षात माती, पाणी, दगड, त्यापासून बनलेली भौगोलिक परिस्थिती आणि ह्यांच्या विविध रचनेने तिथे जपलेली जैविक विविधता ह्या सगळ्याचा मिळून तयार होतो परिसर!! आणि त्यामुळेच फक्त झाडे लावून किंवा पाणी वाचवून ‘परिसर पुनर्निर्मिती’ शक्य नाही, तर सर्व जैविक वैविध्याचा आणि अजैविक घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. अगदी अलीकडच्या काळात ‘परिसर पुनर्निर्मिती’ ही एक विज्ञानशाखा म्हणून उदयास आली आहे. ह्यावर अनेक शोधनिबंध, शास्त्रीय लेख लिहायला सुरुवात झाली आहे. तसे बघायला गेले, तर परिसरामध्ये कोणत्याही कारणाने झालेल्या बदलांनंतर तिथला परिसर नैसगिकरीत्या पुनर्निर्मितीची प्रक्रिया चालू ठेवतो. शास्त्रीयरीत्या साहाय्य करून पुनर्निर्मितीच्या प्रक्रियेला चालना देण्याकरिता काय करता येईल, ह्याच्या अभ्यासाचा अंतर्भाव ‘परिसर पुनर्निर्मिती’ शाखेत केला जातो. अतोनात विध्वंस झालेल्या परिसराची पुनर्निर्मिती करताना रचना (structure) आणि क्रियाशक्ती (function) ह्या गोष्टींचा सखोल विचार आवश्यक आहे. ह्याचमुळे ह्या विज्ञानशाखेचा विस्तार खूप मोठा आहे. नुसत्या जमिनीचाच नाही, तर जलसृष्टीचादेखील ह्यात समावेश होतो.

परिसर पुनर्निर्मितीची गरज कशी ओळखाल?

आपला परिसर नष्ट होण्याच्या मार्गावर आहे ह्याची अनेक परिमाणे आपण परिसरानुसार वापरू शकतो. आपण जंगलाच्या जवळ असणाऱ्या गावाचे उदाहरण घेऊ या. पूर्वी ज्या प्रमाणात आणि योग्यतेचा मध गावकऱ्यांना मिळायचा, तो मिळणे कमी झाले आहे, लाकूडफाटा आणायला गावापासून दूर जावे लागत आहे, शेतीवर कीड पडण्याचे प्रमाण वाढले आहे, जंगलातून येणारे ओढे लवकर आटत आहेत अशा अनेक परिमाणांच्या मदतीने आपल्याला कळू शकते की आपला परिसर बदलत चालला आहे. अशा बदलांचे कारण स्थानिकदेखील असू शकते. त्याचे प्रमाण कमी-अधिक असू शकते. खाणकाम, अतोनात जंगलतोड अशी काही थेट कारणे असू शकतात परिसर पुनर्निर्मितीची!! परिसर विध्वंसाच्या प्रमाणावर परिसर पुनर्निर्मितीचा कालावधी अवलंबून असतो. जितका विध्वंस जास्त, तितका पुनर्निर्मितीचा कालावधी अधिक!! तसेच प्रत्येक भौगोलिक प्रदेशात ही परिमाणे वेगळी असू शकतात. योग्य वेळेस परिमाण जाणून घेऊन ह्या बदलांचा अभ्यास झाला नाही, तर अशा परिसर बदलांमुळे अन्न कमतरता, पाण्याचे प्रदूषण, हवेमधील दूषित वायू आणि परिणामी लोकांच्या उपजीविकेवर घातक परिणाम होतात. आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे - ‘तहान लागली की विहीर खणणे’. अगदी ह्यालाच अनुसरून आपण होणाऱ्या परिसर बदलाचा अभ्यास करत नाही आणि मग दुष्परिणाम दिसायला लागले की प्रशासनाच्या नावाने आरडाओरडा सुरू!! पण ह्या परिसराची पुनर्निर्मिती कशी करता येईल? ह्याचा मात्र कधीच विचार होत नाही.

२०१९च्या वन अहवालानुसार भारताचा २१.६७% भूभाग वन आच्छादित आहे. परंतु अत्यंत ढिसाळ पद्धतीच्या नियोजनांनी राबविण्यात येणारे खाण प्रकल्प, रासायनिक कारखाने ह्यामुळे हाच वनप्रदेश धोक्यात आला आहे. केवळ जंगले कापली गेली म्हणजे परिसर धोक्यात आला असे नाही, तर ह्याचबरोबर खाणकामासारख्या प्रकल्पामुळे होणारे भूभाग बदल, रासायनिक कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया न केल्याने होणारे पाण्याचे प्रदूषण ह्यामुळेदेखील परिसरातील जैविक आणि अजैविक घटक संकटात येतात. अशा ह्या घातक परिणाम झालेल्या आणि नैसर्गिक अवनती झालेल्या परिसराच्या पुनर्निर्मितीकरिता भारतामध्येसुद्धा राष्ट्रीय पातळीवर काही प्रयत्न चालू असतात. १९९२ साली स्थापन केलेल्या केंद्र सरकारच्या The National Afforestation and Eco-Development Board (NAEB)ची वनीकरण, परिसर पुनर्निर्मिती इत्यादी प्रमुख उद्दिष्टे आहेत. National Action Plan on Climate Changeच्या अंतर्गत जे Green India Mission राबविले जाते, त्यामध्ये दर्जा खालावलेल्या परिसराची पुनर्निर्मिती, जमिनीचा समुचित वापर अशी उद्दिष्टे समोर ठेवली आहेत.

Your role in campus recon 

संयुक्त राष्ट्राकडून राबविण्यात येणारे परिसर पुनर्निर्मितीचे दशक असो किंवा राष्ट्रीय तसेच अनेक प्रशासकीय पातळीवर वनीकरण, परिसर संरक्षण, पुनर्निर्मिती यासारखे प्रकल्प असो, ह्यामध्ये जर तिथल्या स्थानिक समाजाचा सक्रिय सहभाग नसेल, तर अशा योजना प्रत्यक्षात येणे अवघड होते. नुसता सक्रिय सहभाग नाही, तर प्रत्येक स्थानिक लोकसमूहाने पुढाकाराने काही उपाययोजना केल्या, तर जास्त उपयोगी ठरू शकते. कारण तिथले पारंपरिक ज्ञान आणि अनुभव ह्याशिवाय एखाद्या परिसराची पुनर्निर्मिती शक्य नाही. आता आपण अशा ‘परिसर पुनर्निर्मिती’मध्ये कसा सहभाग घेऊ शकतो, ते बघू या.

‘परिसर पुनर्निर्मिती’ - स्थानिक ज्ञान, स्थानिक सहभाग आणि स्थानिक उपाययोजना

परिसर पुनर्निर्मितीमध्ये स्थानिक लोकांचा सहभाग असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम पुनर्निर्मितीची उद्दिष्टे ठरविणे हा नियोजनाचा पहिला टप्पा आहे. उद्दिष्टे ठरविताना जर स्थानिक लोकांचे ज्ञान, पुनर्निर्मित परिसराचा अपेक्षित वापर ह्याचा विचार करण्यात आला, तर पुनर्निर्मिती प्रक्रियेला अपेक्षित दिशा व चालना मिळेल. एखाद्या परिसराची पुनर्निर्मिती करायची असेल, तर तिथे पूर्वी कसा परिसर होता, तिथला भूभाग कसा होता, पाण्याचे प्रवाह कसे होते, जंगलामध्ये कोणत्या वनस्पती, प्राणी, पक्षी होते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. गेले काही वर्षे तिथला परिसर बदल बघत असणारे स्थानिक लोक ही माहिती देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. तिथला ज्येष्ठ वर्ग, त्यांचे उत्सवातील रितीरिवाज, पारंपरिक ज्ञान, वैदूसारखे स्थानिक आरोग्यरक्षक ह्यांच्याकडून परिसराची माहिती मिळू शकते. स्थानिक लोकांच्या उपजीविकेच्या निर्मितीचीदेखील नियोजनात सोय करणे हिताचे ठरते. केवळ उपलब्ध जुने शास्त्रीय ग्रंथ, माहितीपुस्तके आणि शासकीय पुरातन दस्तावेज ह्यांना प्रमाण मानून परिसर पुनर्निर्मिती अवघड होऊ शकते. उद्दिष्टे निर्मितीपासून पुनर्निर्मिती होत असताना तिथल्या प्रत्यक्ष जमिनीवरील बदलांवर देखरेख ठेवणे आवश्यक आहे. स्थानिक लोकांच्या सहकार्याने हे शक्य होऊ शकते. स्थानिक लोकांच्या सहभागाशिवाय परिसर पुनर्निर्मितीची शाश्वतता फोल ठरू शकते.

परिसर पुनर्निर्मितीची तयारी कशी करावी, ते आपण एखादे काल्पनिक उदाहरण घेऊन समजून घेऊ या. समजा, आपण पश्चिम घाटामधील जंगलाच्या जवळ असणाऱ्या गावात आहोत. ह्या गावाच्या जवळ असणारे जंगल राष्ट्रीय रस्त्याच्या रुंदीकरणाकरिता, तसेच कोळशासाठी काही वर्षापूर्वी कापले गेले. जंगल कापल्यामुळे प्रचंड प्रमाणात मातीची धूप होत आहे आणि १२ महिने पाणी असणारी गावातील विहीर केवळ ८ महिनेच गावाला पिण्याचे पाणी पुरवू शकत आहे. रस्ते रुंदीकरण झाल्यामुळे वाहनांची वर्दळ वाढली आहेच आणि रस्त्याच्या कडेला काही छोटे उद्योग चालू झाले आहेत, ज्यातून येणाऱ्या दूषित पाण्यावर प्रक्रिया न करता गावाजवळून वाहणाऱ्या नदीत सोडण्यात येत आहे. परिसर बदलाची अनेक कारणे ह्या आपल्या उदाहरणात आहेत. तिथल्या गावकऱ्यांनी वाढते प्रदूषण आणि दिवसेंदिवस जाणवणारी अन्न-पाणी कमतरता ह्याची तक्रार केली आहे आणि म्हणूनच तुम्ही त्यांना परिसर पुनर्निर्मितीकरिता मदत करायचे ठरविले आहे. ह्याकरिता तुम्हाला पूर्वतयारी म्हणून प्रथम गावातील अनुभवी लोकांबरोबर तपशीलवार परिसर अभ्यास करणे आवश्यक आहे. ह्याकरिता तिथले स्थानिक ज्ञान वापरणे गरजेचे आहे. तिथले पूर्वीचे पाणी प्रवाह, आढळून येणारी वनसंपदा, प्राणी-पक्षी ह्याचे प्रकार ह्याची प्राथमिक माहिती जमा झाली की शास्त्रीय दस्तऐवजामधील माहिती घेणेदेखील आवश्यक आहे. ‘पूर्वी काय होते’ हे ह्या प्राथमिक अभ्यासातून समोर आले. पण आता पुनर्निर्मिती करायची असेल, तर अशा परिसर पुनर्निर्मितीमधून लोकांना काय अपेक्षित आहे हे समजून घेणे सर्वात जास्त महत्त्वाचे, कारण अंततोगत्वा तेच संरक्षण करणार आहेत आणि समुचित वापरदेखील! आता आपल्या काल्पनिक उदाहरणात गाव हे पश्चिम घाटातील जंगलाजवळ आहे. अशा परिसराची पुनर्निर्मिती करताना पावसाळ्यात वाहणाऱ्या झऱ्यांचे प्रवाह शाबूत राहतील अशा पद्धतीने वनीकरण आणि मृद-जलसंधारणाची योजना आखली गेली पाहिजे. वनीकरण करताना मधनिर्मिती, स्थानिक लोकांची लाकूडफाटा देणाऱ्या, तिथल्या प्राण्यांना खाता येतील अशी फळे असणाऱ्या झाडांचादेखील समावेश असणे गरजेचे आहे. तसेच मातीची धूप रोखण्याकरिता योग्य झाडांची लागवड आणि गरज भासल्यास चर खणून संधारण करायला लागू शकते. त्याचप्रमाणे स्थानिक पुढाकारामार्फत तिथल्या उद्योगांना दूषित पाण्यावरील प्रक्रियेचे महत्त्व समजावून सांगणेदेखील गरजचे आहे.

Your role in campus recon

ह्या अशा पुनर्निर्मितीमध्ये आपण कोणतीही भूमिका बजावू शकता. स्थानिक जाणकार, पर्यावरण अभ्यासक, कृषितज्ज्ञ, भूगर्भ जल अभ्यासक, स्थानिक झाडांची रोपवाटिका जपणारे जाणकार, वनस्पती अभ्यासक, प्राणी अभ्यासक किंवा पुनर्निर्मितीचे आर्थिक साहाय्यक अशी कोणतीही भूमिका तुम्ही पार पडू शकता. स्थानिक ज्ञान, स्थानिक सहभाग आणि जमेल तितकी कृत्रिमता टाळून केलेल्या स्थानिक उपाययोजना ह्यातून परिसर पुनर्निर्मितीमध्ये जैविक आणि अजैविक घटकांची योग्य गुंफण साधता येईल.

परिसर पुनर्निर्मितीमध्ये सहभाग घायचा असेल, तर नुसती झाडे लावून भागणार नाही... तर ती झाडे कोणती असावीत, मृद-जलसंधारणाच्या उपाययोजना कुठे आखाव्यात, पाण्याचे नैसर्गिक प्रवाह जपणे, नैसर्गिक खडकाळ प्रदेशाला राखून ठेवणे, ह्यातून कोणती उपजीविका साधने उपलब्ध होतील अशा विविध आघाड्यांवर विचार करणे गरजेचे आहे. तरच आपण यशस्वीरीत्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर परिसर पुनर्निर्मितीमध्ये महत्त्वाचे योगदान देऊ शकतो. ‘परिसर पुनर्निर्मिती’ करतानादेखील ‘vocal about local’ होणे विसरू नका, बरे का!!!