पंढरीची वारी आहे माझे घरी

विवेक मराठी    30-Jun-2020
Total Views |
@देविदास पोटे

pandharpur ashadhi ekadas
पंढरीची वारी आहे माझे घरी।
आणिक न करी तीर्थव्रत।।
व्रत एकादशी करीन उपवासी।
गाईन अहर्निशी मुखी नाम।।
नाम विठोबाचे घेईन मी वाचे।
बीज कण्यांतीचे तुका म्हणे।।
- संत तुकाराम

पंढरपूर म्हणजे अवघ्या तीर्थांचे माहेर. पंढरपूरची वारी केली की इतर कुठलीही तीर्थयात्रा करण्याची आवश्यकता राहत नाही.

या अभंगात संत तुकाराम अतिशय गौरवाने सांगतात, ‘माझ्या घराण्यात पंढरपूरच्या वारीची परंपरा अखंड सुरू आहे. त्यामुळे इतर कुठलेही तीर्थाचे व्रत मी करीत नाही. पंढरीची वारी करताना एकादशीच्या उपवासाचे व्रत मात्र मी अगत्याने पाळतो. वारीची वाटचाल करताना आणि पंढरपूरच्या भूमीत गेल्यावर मुखी अहर्निश विठुरायाचा नामघोष सुरू असतो. विठुरायाचे नाम कल्पांतीचे बीज आहे, अवघ्या अस्तित्वाचे कारण आहे.’

आषाढी-कार्तिकी वारी म्हणजे वारकर्‍यांची माहेराच्या वाटेवरची वाटचाल. आनंदाची यात्रा. माहेराला जाताना सासरहून निघालेली लेक जशी आईला भेटायला आतुर असते, तशीच भावावस्था वारकर्‍यांची असते. ‘विठ्ठल माझी माय विठ्ठल माझा बाप’ असे म्हणत वारकर्‍यांची मांदियाळी पंढरपूरच्या दिशेने अखंडपणे वाटचाल करीत असते. नाचत, गात, टाळ-मृदंगाचा ध्वनी आसमंतात निनादत, रिंगण, फुगडी, भारुडे आदी विविध आविष्कार करीत भक्तीचा हा प्रवाह वाहत राहतो. या वाटेवर ज्ञानेश्वर-नामदेव गेले. एकनाथ-तुकाराम गेले. चोखामेळा, गोरोबा, सेना, शेख महंमद, निळोबाराय यांची पावले याच मातीत पडली.

वारी हे मराठी सांस्कृतिक परंपरेचे वैभव आहे. असा अनुपम सोहळा जगाच्या पाठीवर कुठेही दिसत नाही. ‘वारी’ हा भक्तीचा सोहळा आहे. आनंदाचा मेळा आहे. यात दोन प्रकारची वाटचाल आहे - एक पंढरपूरच्या दिशेने मुक्काम दरमुक्काम करीत चाललेली पावलांची वाटचाल, तर दुसरी वाटचाल अंतरंगीची आहे. अहंकार आणि लोभ, मोह, क्रोध यांच्या पाशाचे एकेक पदर वा बंध उलगडीत पुढे जाणे आणि तितक्या प्रमाणात अहंकारमुक्त वा लोभमुक्त होत जाणे ही आत चाललेली दुसरी वाटचाल. एकीकडे भक्तीचा रंग, तर दुसरीकडे आतल्या रिपूंच्या विळख्यातून मुक्त होण्याचा मुक्तीचा रंग ही बाहेरची आणि आतली वारी आपल्याला दर पावलागणिक श्रीमंत करीत राहते. आपण बदलत राहतो. कळत वा नकळत.
पंढरपूरची वारी हाच नेम आणि पंढरपूर हेच तीर्थधाम आहे; कल्पांतीचे बीज म्हटले, त्याला विश्वाचे कारण आहे हे तत्त्व तुकोबारायांनी या अभंगाद्वारे ठामपणाने सांगितले आहे.