निसर्ग चक्रीवादळ - आपत्ती की शिक्षण!

विवेक मराठी    07-Jun-2020
Total Views |
@डॉ. नागेश टेकाळे
निसर्ग चक्रीवादळ आले, कोकण किनारपट्टीला तडाखा देऊन मुंबईला हलकासा स्पर्श करून पुढे निघून गेले. आपण निसर्गाची एवढी हानी करूनही तो क्षमाशील राहिला, एवढेच नव्हे, तर नेहमीच हुरहुर लावणाऱ्या मान्सून राजालासुद्धा केरळमध्ये अगदी वेळेवर घेऊन आला.
याच आनंदात पहिल्या पावसाची सुगंधी फुले वेचत असताना आपण 'निसर्ग'ने दिलेल्या धड्याचेही वाचन करावयास हवे. 

Cyclone Nisarga _1 & 
मराठीमधील म्हणी जेव्हा सत्यतेचा अनुभव देतात, तेव्हा आपला त्यावर पूर्ण विश्वास बसतो, त्याचबरोबर यापासून काही धडा शिकून भविष्यामध्ये सावध राहून उपाययोजना करावी हीसुद्धा अपेक्षा असते. २ मे रोजी अरबी समुद्राच्या नैऋत्य भागात तयार झालेले निसर्ग चक्रीवादळ वेगाने घोंगावत कोकण किनारपट्टीवरील रायगड जिल्ह्यास धडकले आणि मुंबईला निसटता स्पर्श करून पुढे सौम्य झाले. १२० कि.मी. वेगाने आलेले हे चक्रीवादळ घनदाट लोकसंख्येच्या मुंबईला धडकले असते तर? या विचाराने थरकाप होतो. 'जिवावर बेतलेले शेपटीवर निभावले' या म्हणीचा येथे तंतोतंत अनुभव येतो. 'अनुभव हाच गुरू' असे आपण म्हणतो, पण अनुभवावरून खरेच आपण काही शिक्षण घेतो का? आपत्ती ही नुकसान करतच असते, पण तिचे मोजमाप सुरू असताना त्यास निगडित शिक्षण प्रणाली विकसित करून होणारे नुकसान नगण्य करणे हे आपण शिकणे गरजेचे आहे. जपान हे भूकंपप्रवण राष्ट्र आहे. या राष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती भूकंप आपत्तीला तोंड देण्यामध्ये प्रवीण आहे, म्हणूनच वारंवार भूकंपाचे लहान-मोठे धक्के बसूनही हे राष्ट्र तेवढ्याच ताकदीने शिस्तबद्ध आणि आठ विकसित राष्ट्रांच्या यादीत अग्रक्रमावर आहे.
३१ मे रोजी अरबी समुद्रात निर्माण झालेले हे चक्रीवादळ दोन दिवस वेगाने प्रवास करत कोकण किनारपट्टीला तडाखा देत जमिनीवर उतरले आणि मुंबईला हलकासा धक्का देत सौम्य होऊन पुढे निघून गेले. त्यामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होऊन मुसळधार पाऊस सुरू झाला. चक्रीवादळासंबंधी सर्वच गोष्टी वाईट असल्या, तरी आपल्या कृषिप्रधान देशासाठी आनंदाची बातमी म्हणजे चक्रीवादळ आणि मोसमी वारे दोघांची अरबी समुद्रात एकाच वेळी निर्मिती झाली. थोडक्यात, या चक्रीवादळामुळेच मोसमी वाऱ्याला गती मिळाली आणि बरोबर १ जूनलाच केरळमध्ये वरुणराजाचे आगमन झाले. हा एक विलक्षण योगायोगच ठरला.
चक्रीवादळांचा प्रवास

पृथ्वीचा ७१ टक्के पृष्ठभाग सात समुद्रांनी व्यापलेला आहे आणि या समुद्राच्या पृष्ठभागावर प्रतिदिनी अशी शेकडो चक्रीवादळे तयार होत असतात आणि प्रवासात सौम्य होऊन नष्ट होतात. चक्रीवादळ जेव्हा समुद्रकिनाऱ्याजवळून वेगाने मार्गक्रमण करत असते, तेव्हा मात्र जास्त हानिकारक असते, कारण त्यामुळे नैसर्गिक आणि मानवी साधनसंपत्तीची अपरिमित हानी होते. वादळवाऱ्याशी आपण नेहमीच परिचित असतो आणि मान्सूनमध्ये त्यांना एकत्रित अनुभवण्यासही मिळते, याचाच पुढचा टप्पा म्हणजे चक्रीवादळ. प्रचंड मोठे वादळ जेव्हा स्वतःभोवती वेगाने फिरून वाऱ्याच्या गतीने वेगाने प्रवास करू लागते, तेव्हा त्यास चक्राकार म्हणजेच 'चक्रीवादळ' असे म्हणतात.

cyclone attack in konkan_ 
समुद्राच्या पृष्ठभागावर एखाद्या विशिष्ट ठिकाणी कमी झालेला हवेचा दाब भरून काढण्यासाठी चोहोबाजूंनी वारे वाहू लागतात. या वाऱ्यामध्ये बाष्प असते आणि ते थंड होऊ लागले की पाऊस पडू लागतो. वाऱ्यामधील बाष्प किती वेगाने थंड होते, यावर वादळाची निर्मिती अवलंबून असते. भारतीय उपखंडात पावसाळ्याच्या पुढे-मागे ही स्थिती असते, म्हणून मे, जून, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांमध्ये अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरामध्ये अशी चक्रीवादळे तयार होतात. चक्रीवादळाला हजारो वर्षांचा इतिहास आहे आणि त्याची निर्मिती ही निसर्गाचीच एक प्रक्रिया आहे. पूर्वी त्यांची संख्या किनाऱ्यालगत कमी असे. मात्र मानवनिर्मित विकासप्रक्रियेचा वेग गेली ५-६ दशके वेगाने वाढू लागल्यामुळे चक्रीवादळाची संख्यासुद्धा वाढू लागली आहे. यामागच्या वैज्ञानिक कारणांचा शोध घेण्याचे कार्य जगामधील अग्रगण्य विद्यापीठांत सुरू आहे. यामध्ये अमेरिकन विद्यापीठे आघाडीवर आहेत, कारण हाच देश आज सर्वात जास्त चक्रीवादळांच्या आणि पावसाच्या तडाख्यात सापडलेला आहे.
हवामान बदलाचे सर्व गणित फक्त दोन मुख्य सूत्रांवर आधारलेले आहे, ते म्हणजे वातावरणात सातत्याने वाढत असलेले कर्ब वायूचे प्रमाण आणि समुद्राच्या पृष्ठीय पाण्याचे त्याच वेगाने वाढत असलेले तापमान. हवेत असलेला ३०० पीपीएम कर्ब वायू पृथ्वीचे वातावरण ऊबदार ठेवतो, म्हणूनच जीवविविधता आनंदाने राहत असते. जेव्हा विकासकार्यामधून जैविक इंधन ज्वलनामधून बाहेर पडणारा कर्ब वायू वातावरणामध्ये साठू लागतो, तेव्हा वातावरण ऊबदार होण्यापेक्षा जास्त गरम होऊ लागते. सध्या वातावरणामध्ये ४५० पीपीएम एवढा कर्ब वायू आहे, यावरून वाढत्या उष्णतेची आपणास कल्पना येऊ शकते. हीच उष्णता समुद्राचा पृष्ठभाग गरम करत असते. यामुळे पाण्याची वाफ होऊन ढगनिर्मिती होते. जेव्हा समुद्राच्या पृष्ठभागावर विशिष्ट ठिकाणी पाण्याचे तापमान २६.५° सें.पर्यंत पोहोचते व ५० मीटर खोलीपर्यंत त्याचा प्रभाव दाखवते, अशा ठिकाणी चक्रीवादळाचे प्रमाण जास्त असते. चक्रीवादळ कोणत्या समुद्रामध्ये तयार झाले, त्यानुसार त्याला नाव दिले जाते. अटलांटिक, मध्य व ईशान्य प्रशांत महासागरामध्ये निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना 'हरिकेन' म्हणतात, प्रशांत महासागराच्या वायव्येला तयार होणाऱ्या वादळास 'टायफून', तर अरबी समुद्रात व बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या वादळांना 'उष्ण कटिबंधीय' वादळे असे म्हणतात. निसर्ग चक्रीवादळ या प्रकारात येते.

वादळाचा वेग साधारण ४५ कि.मी. प्रतितास असेल, तर तेथे हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होतो. मात्र जेव्हा वादळाचा वेग ६३ कि.मी. किंवा जास्त असतो, तेव्हा त्यास चक्रीवादळ म्हणतात. १२० कि.मी. वेगाचे चक्रीवादळ अतिशय संहारक असते. 'निसर्ग' चक्रीवादळाचा वेग ११० ते १२० कि.मी.पर्यंत पोहोचला होता, म्हणूनच जास्त संहार होण्याची शक्यता होती. चक्रीवादळाची संहारक शक्ती फक्त वेगावरच अवलंबून नसते. त्याचा आकार, क्षमता, पुढे सरकण्याचा वेग, वारे वाहत असल्याचा काळ, दिशेमध्ये होणार बदल , पडणारा मुसळधार पाऊस आणि त्याच्या तडाख्यात सापडलेली लोकवस्ती यावरसुद्धा ती अवलंबून असते.
 
असे मिळते चक्रीवादळांना नाव

विशिष्ट भागात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाचा धोका ज्या देशांना बसण्याची शक्यता असते, ते देश एकत्र येऊन चक्रीवादळांना विशिष्ट नाव देण्याची प्रक्रिया सुरू करतात. या नावांच्या यादीमध्ये फुले, नद्या, विशिष्ट शब्द, प्राणी इ.चा समावेश असतो. भारतीय उपखंडामधील भारत, बांगला देश, पाक, मालदीव, ओमान, श्रीलंका, म्यानमार आणि थायलंड या राष्ट्रांनी चक्रीवादळांना विशिष्ट नाव देण्याची एक यादीच तयार केली आहे. प्रत्येक राष्ट्र आठ नावे सुचवू शकतो. 'निसर्ग' हे नाव बांगला देशाने सुचविले आहे. विशिष्ट नावामुळे चक्रीवादळाचा सविस्तर अभ्यास, झालेली हानी, यांची नोंद तयार होऊन त्याची देवाणघेवाण होते.
चक्रीवादळ निर्मितीवर प्रत्येक देशाच्या हवामान केंद्राचे लक्ष असते आणि यामध्ये उपग्रहाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा अतिशय मोलाच्या ठरतात. भारतीय हवामान खाते भारतीय उपखंडामधील चक्रीवादळाचा उगम, प्रवास, वेग यांचा अद्ययावत पद्धतीने अभ्यास करत गटामधील इतर राष्ट्रांना सतत पाठवत असते. त्यामुळे प्रत्येक राष्ट्र सावध पवित्रा घेऊन राष्ट्रीय साधनसंपत्तीचे संरक्षण करत असते. चक्रीवादळ अभ्यासामध्ये आपल्या हवामान खात्याची प्रणाली अतिशय अद्ययावत आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.


cyclone attack in konkan_

'निसर्ग'मुळे झालेली हानी

चक्रीवादळ थांबवणे केवळ अशक्य आहे, मात्र त्यामुळे होणारी हानी कमी करता येऊ शकते. चक्रीवादळामध्ये वृक्षसंपदेची सर्वात जास्त हानी होते. 'निसर्ग'च्या प्रहारामुळे कोकणामधील लाखाच्या वर झाडे मुळासह उपटली गेली. वादळाच्या वेगामुळे जुन्या घरदारांचे प्रचंड नुकसान होते आणि यामध्ये अनेक वेळा मानवी मृत्यूसुद्धा होतात. पशुधनाचेही नुकसान होते.
समुद्रकिनाऱ्यालगत वेगाने जाणाऱ्या चक्रीवादळामुळे मासेमारी व्यवसायाचे सर्वात जास्त नुकसान होत असते. त्यांच्या बोटी समुद्रात अडकलेल्या असतील तर मनुष्यहानीसुद्धा संभवते. आपल्या कोळी बांधवांना ३१ मेपूर्वीच संभाव्य 'निसर्ग' चक्रीवादळाचा इशारा मिळाला असल्यामुळे या क्षेत्राचे फारसे नुकसान झाले नाही, मात्र 'निसर्ग'मुळे वृक्ष, घरे याचबरोबर शेतजमिनीचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. त्याचबरोबर विजेचे खांब उखडले जाणे, वीजवाहक तारा तुटणे यामधून वीज मंडळाचेही अतोनात नुकसान झाले. 'निसर्ग'मुळे मानवी मृत्यू नगण्य झाले, पण मानवी संपत्तीची बरीच हानी झाली. याचे मोजमाप सुरू होईल, संबंधितांना नुकसानभरपाईसुद्धा मिळेल, पण हे टाळण्यासाठी आपणास काही प्रतिबंधक योजना आखता येतील का? ज्या अस्तित्वात आहेत त्यांना बळकटी देता येइल का? याचा विचार करावयास हवा आणि भविष्यासाठी त्याकरता तरतूद कशी करता येऊ शकेल यावरही सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे.
'निसर्ग' चक्रीवादळ मुंबई शहरास स्पर्श करून जाण्याचा प्रसंग १८९१नंतर प्रथमच घडला आहे. शंभर वर्षांपूर्वी आलेले चक्रीवादळ संपूर्णपणे नैसर्गिक होते. पण सध्या मानवी वस्तीकडे धाव घेत असलेली चक्रीवादळे ही आपलीच निर्मिती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. येणारी वर्षे चक्रीवादळांचीच असतील, हे शास्त्रज्ञाचे म्हणणे चुकीचे वाटत नाही, म्हणूनच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन, राज्य आणि स्थानिक स्तरावरसुद्धा तेवढेच बळकट असणे गरजेचे आहे. भारताला ७,५१७ कि.मी.चा समुद्रकिनारा लाभला आहे. या भागास भविष्यातही तडाखा बसू शकतो, म्हणूनच राष्ट्रीय स्तरावर यासाठी स्वतंत्र कोषनिर्मिती हवी.

संरक्षणात्मक काळजी

समुद्रकिनाऱ्यालगत प्रवासी मार्गनिर्मिती विकासप्रक्रियेसाठी आवश्यक असली, तरी किनाऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच समुद्रावर आक्रमक होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी समुद्रकिनाऱ्यालगत मोठ्या प्रमाणावर सुरू, समुद्रफळ, उंडी यासारख्या वृक्षांची लागवड करणे गरजेचे आहे. पूर्ण वाढ झालेले वृक्ष अनेक वेळा वादळाचा वेग थोपवून मानवी वस्तीचे आणि त्यांच्या शेतजमिनीचे रक्षण करत असतात. चक्रीवादळ नेहमीच मोठ्या प्रमाणावर पाऊस घेऊन येत असते आणि सोसाट्याचा वारासुद्धा, म्हणूनच शेतीचे रक्षण करण्यासाठी शेतबांधांना वृक्ष-श्रीमंती देणे गरजेचे आहे.
 
Cyclone Nisarga _1 &
 
चक्रीवादळाच्या अभ्यासामध्ये कोळी समाज पारंगत असला, तरी समुद्रकिनाऱ्यालगत राहणारे लोक अनेक वेळा अज्ञानी असतात. यांना संभाव्य चक्रीवादळाबद्दल पूर्वसूचना मिळण्याआधीच सुरक्षित करणे जरुरीचे आहे. हा लोकशिक्षणाचा कालखंड मार्चमध्ये असावा, जेणेकरून मान्सूनपूर्व आणि मान्सून उत्तरार्धात त्यांना सावधगिरी बाळगता येईल. २०१६मध्ये चेन्नईमध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे शहरामधील लाखो वृक्ष उन्मळून पडले. 'निसर्ग' चक्रीवादळामुळेसुद्धा लाखो वृक्ष उन्मळून पडले. या वृक्षांचा अभ्यास करणे, त्यात विदेशी किती, त्यांच्या वाढीमध्ये काय अडथळे आले होते याचा अंतर्भाव करून या वृक्षांची जागा स्थानिक वृक्षांना देऊन पर्यावरण सुदृढ करण्याचा प्रयत्न जिल्हा स्तरावर करणे आवश्यक आहे. काँक्रीटमध्ये बंदिस्त असलेले हजारो वृक्ष 'निसर्ग'ने स्वतंत्र करून मुळासह जमिनीवर फेकल्याचे चित्र रायगड जिल्ह्यात आढळले आहे. वृक्षांना असे बंदिस्त करू नका हा नवीन धडा 'निसर्ग' चक्रीवादळाने आपणास दिला आहे, तो विसरण्यापेक्षा त्याची नियमित उजळणी करणे आवश्यक आहे.
'निसर्ग'चा संभाव्य धोका ओळखून मुंबईमध्ये चक्रीवादळाच्या प्रभावाखाली आलेल्या लोकांचे स्थलांतर झाले ते येथील अद्ययावत यंत्रणेमुळे. लहान शहरांनाही एवढी अद्ययावत व्यवस्था त्वरित मिळणे गरजेचे आहे. चक्रीवादळे आणि मानवी स्थलांतर यांचा यापुढे जवळचा संबंध येणार आहे आणि भविष्यामधील हे मोठे संकट असणार आहे. सप्टेंबर २०१७मध्ये अमेरिकेमधील फ्लोरिडा समुद्रकिनाऱ्यावर मारिया वादळ धडकले. त्यानंतरही दोन वादळे आली. हे संभाव्य संकट यापुढे वारंवार येणार असे हवामान खात्याने जाहीर केले आणि किनाऱ्यालगतच्या लहान-मोठ्या गावांमधील तब्बल दोन लाख ऐंशी हजार लोकवस्ती फ्लोरिडा शहरात कायमची स्थलांतरित झाली आणि त्यांना 'वातावरण स्थलांतरित' हे गोंडस नाव बहाल करण्यात आले आहे. 'निसर्ग'मुळे आपल्याकडेही थोडे स्थलांतर झाले, पण ते तात्पुरते आहे. पण भविष्यात अशा प्रकारची चक्रीवादळे येणार अशी नोंद घेतली, तर आपणाससुद्धा या गोंडस नावाचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.
निसर्ग चक्रीवादळ आले, कोकण किनारपट्टीला तडाखा देऊन मुंबईला हलकासा स्पर्श करून पुढे निघून गेले. आपण निसर्गाची एवढी हानी करूनही तो क्षमाशील राहिला, एवढेच नव्हे, तर नेहमीच हुरहुर लावणाऱ्या मान्सून राजालासुद्धा केरळमध्ये अगदी वेळेवर घेऊन आला. भीतीमधून निर्माण झालेली ही आनंदाची उधळण होती. याच आनंदात पहिल्या पावसाची सुगंधी फुले वेचत असताना आपण 'निसर्ग'ने दिलेल्या धड्याचेही वाचन करावयास हवे. शंभर वर्षांनंतर आले, आता पुढचे बघू असा समज करून घेऊ नये, कारण हवामान बदल आणि चक्रीवादळ हे दोघे यापुढे घनिष्ठ मित्र असणार आहेत याचा विसर पडता कामा नये, एवढेच या लेखाचे फलित समजावे.
- डॉ. नागेश टेकाळे