कोरोनाची महामारी आणि शब्दांची हाणामारी!

विवेक मराठी    09-Jun-2020
Total Views |
 ***देविदास देशपांडे***
आज कोरोना राज्यात थैमान घालत असताना उद्धव हे मुख्यमंत्री आहेत आणि जवळपास दररोज फेसबुकवर येऊन हेच भाषण करतात. त्या वेळी फडणवीसांनी खिल्ली उडवलेले शब्दच वापरून आता सोशल मीडियाचे पडदे भरून जात आहेत. उथळ पाण्याला खळखळाट फार या न्यायाने शब्दांशिवाय दुसरे काहीच नसले की हे असे होते. कोरोना हरणार, नव्हे नक्कीच हरणार म्हणणे खूप सोपे आहे. पण त्याला हरवायला फक्त शब्दांनी मारामारी करून कसे भागणार?


cm_1  H x W: 0

महाराष्ट्रासारखे दुर्दैवी राज्य आज क्वचितच अन्य कोणते असेल. आधीच दुष्काळ, त्यात तेरावा अशी सध्या या राज्याची गत झाली आहे. दुष्काळ, अतिवृष्टी अशा खरोखरच्या नैसर्गिक संकटांशी सामना करत असतानाच त्यात कोरोना विषाणूच्या संकटाची भर पडली. चीनच्या करणीने निर्माण झालेल्या या आपत्तीशी सामना करायला तेवढेच सक्षम शासन असते तर निभावले असते. परंतु तेही नाही. तिथे चार महिने आधीच पंचाईत झालेली. सत्ताकांक्षेच्या खेळात एका खेळाडूने दुसऱ्या खेळाडूच्या पायाखालचे जाजम हिसकावलेले, दुसऱ्याला मागे ढकलून त्याचे स्थान पटकावलेले आणि त्या दुसऱ्याची भूमिका निभावताना मात्र या खेळाडूच्या नाकी नाऊ आलेले, अशी ही परिस्थिती आहे.

देवेंद्र फडणवीस यांना खो देऊन उद्धव ठाकरे त्यांच्या मुख्यमंत्रिपदावर आरूढ झाले खरे, परंतु ते पद त्यांना लाभताना दिसत नाही. पहिले दोन महिने तर त्यांच्या सत्तेतील भागीदारांचे रुसवे-फुगवे काढण्यात गेले. त्यानंतर आता कुठे खुर्चीवर मांड टाकली, असे वाटत असतानाच कोरोनाचे कराल संकट उभे राहिले. ठाकरे यांच्याकडे प्रशासनाचा अनुभव आणि कारभाराची धमक असती, तर या संकटातून राज्य तरलेही असते. पण त्या बाबतीत पाटी कोरी असलेल्या ठाकरे यांनी केवळ शब्दांच्या चमत्कृती करून वेळ मारून न्यायची शक्कल लढवली. ठाकरे घराणे तसेही शब्दांशी खेळणारे म्हणूनच प्रसिद्ध आहे. उद्धव यांचे वडील बाळासाहेब ठाकरे आणि चुलत बंधू राज ठाकरे यांच्या कोट्या-फटकाऱ्यांनी महाराष्ट्राचे काही कमी मनोरंजन झालेले नाही. परंतु शब्दांच्या कसरतीची ही हौस वेगळी आणि निर्णय घेण्याचा हौसला वेगळा.

नेमके येथेच उद्धवजींचे गाडे अडले आणि त्यातून सुरू झाली शब्दांची खणाखणी. कोरोनाच्या फैलावानंतर महाराष्ट्रात जे चित्र बघायला मिळाले, ते अत्यंत भयानक आहे. लॉकडाउनच्या आदेशाची कडक अंमलबजावणी न झाल्याने राज्यातील रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत गेला. आजही तो वाढत आहे. ठाकरे हे फेसबुकवर येऊन लोकांना संबोधित करत होते, त्याचे सुरुवातीला कौतुक झाले. परंतु ते केवळ बोलतच आहेत, जमिनीवर प्रत्यक्षात काहीही घडत नाहीये, हे लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांची खिल्ली उडवली जाऊ लागली. सुप्त संताप पसरू लागला. ठाकरे फेसबुकवर येऊन एकामागोमाग उपाययोजना जाहीर करत होते, मात्र त्यांचे मंत्री वेगळेच काही सांगत होते. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नव्हता. त्याचे परिणाम सामान्य जनतेला भोगावे लागले.

आधी राज्य सरकारला मदत करण्याची भूमिका घेतलेल्या भारतीय जनता पक्षाला आणखी काही काळ थांबणे अशक्य झाले. दोन महिन्यांहून अधिक काळ ‘सरकार’ नावाची गोष्टच अस्तित्वात असल्याचे दिसत नव्हते. एकीकडे रुग्णांचा आकडा वाढत होता, दुसरीकडे वाधवान आणि करमुसे मारहाणीसारखी प्रकरणे घडत होती. त्याहूनही वाईट म्हणजे राज्य सरकारने (यात स्वतः उद्धव, त्यांचे मंत्री, त्यांचे 'संजय' आणि त्यांचे मुखपत्र या सर्वांचा समावेश होतो) सगळा दोष केंद्र सरकारवर टाकायचा प्रयत्न केला.


cm_1  H x W: 0

संकटाच्या काळात राजकारण करू नये, हे पालुपद सर्वच जण वापरत असले तरी त्यानुसार वागत कोणीच नाही. त्यामुळे एकीकडे भाजपाला राजकारण न करण्याचा उपदेश करणारे सेनेचे प्रतिनिधी सोनिया गांधींनी बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत भाग घेत होते. इतकेच नव्हे, तर स्वतः उद्धव यांनी मंत्रालयात बोलावलेल्या बैठकीला फडणवीस हजर राहिले, मात्र खुद्द उद्धव यांनी गैरहजर राहून आपला ताठा दाखवून दिला. एकीकडे ही उपेक्षा आणि दुसरीकडे गैरप्रचार, या कात्रीत सापडलेल्या भाजपाने मग संघर्षाचा पवित्रा घ्यायचे ठरवले. माजी मुख्यमंत्री असलेल्या फडणवीस यांना मैदानात उतरावे लागले. त्यांनी ऑनलाइन पत्रकार परिषद घेऊन केंद्राने केलेली मदत आणि दिलेली वैद्यकीय सामग्री यांचे तपशीलच दिले. “महाराष्ट्राला केंद्राकडून आतापर्यंत ४७ लाख २० हजार हायड्रोक्सिक्लोरोक्वीनचा पुरवठा केला गेला आहे. ९.८८ लाख पीपीई किट्स, १५.५९ लाख एन-९५ मास्कचा पुरवठा केंद्राकडून करण्यात आला. एकूण ४६८ कोटींची मदत केंद्राकडून राज्याला देण्यात आली आहे. राज्यात ४१ शासकीय तर ३१ खासगी प्रयोगशाळांना मान्यता देण्यात आली आहे,” हे त्यांनी साधार सिद्ध केले. त्याचे सविस्तर वृत्त आतापर्यंत अनेक ठिकाणी प्रसिद्ध झाले आहे, त्यामुळे इथे त्याची पुनरावृत्ती नको.

फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तसेच अन्य माध्यमांतूनही सरकारला सूचना केल्या होत्या. डॅशबोर्ड बनवून कोणत्या रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध आहेत, याची माहिती जनतेला द्यावी अशा सूचनाही केल्या होत्या. अभ्यासू नेता कसा असावा, याचा वस्तुपाठच फडणवीस यांनी घालून दिला. 'लॉकडाउनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत केंद्राने महाराष्ट्राला कोणतीही मदत केली नाही,’ ही तबकडी वाजवण्यात तिघाडीचे नेत मश्गुल होते. त्यांना फडणवीस यांची ही पत्रकार परिषद म्हणजे चपराकच होती.

फडणवीस यांचा हा तपशीलवार हल्ला इतका जोरदार होता, की त्याचे उत्तर द्यायला राज्य सरकारला दीड दिवसांचा वेळ लागला. सरकारच्या वतीने परिवहन मंत्री अनिल परब, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बाजू सावरायचा प्रयत्न केला. गंमत म्हणजे फडणवीसांनी आकडेवारी जाहीर केली होती ती अर्थखात्याची. मात्र त्यांच्या आरोपांना उत्तर द्यायला अर्थमंत्रीच हजर नव्हते! किंबहुना त्यांनी तर तोंडही उघडले नाही. महाराष्ट्र विकास आघाडी नावाच्या सत्ताधारी आघाडीत तीन पक्ष आहेत. सत्तर-सत्तर वर्षे सत्ता राबवणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची फौज या सरकारच्या दिमतीला आहे. या नेत्यांच्या तब्बल दीड दिवस बैठका सुरू होत्या आणि त्यात फडणवीस यांना काय उत्तर द्यायचे, यावर खल सुरू होता. तरीही त्यांना फडणवीसांच्या कोड्यांची उत्तरे सापडत नव्हती. फक्त आपण किती चांगले आणि सरकार किती कर्तबगार याच्या बाहेर त्यांची धाव जात नव्हती. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देता-देता त्यांना नाकी नऊ आले. हात दाखवून अवलक्षण या म्हणीला साजेसे वर्तन करून त्यांची ही ‘प्रत्युत्तर परिषद’ संपली. यातून सरकारचेच हसे झाले आणि मविआ आघाडीत किती अर्थनिरक्षर माणसे भरली आहेत, याचीच चुणूक मिळाली.

खुद्द फडणवीस यांची या बाबतची टिप्पणी त्यांच्या मूळ पत्रकार परिषदेपेक्षा मार्मिक होती. “खरं बोलण्यासाठी एक माणूस पुरेसा असतो, पण थापेबाजी करायची असेल तर तीन माणसंही करू शकत नाहीत,” असं ते म्हणाले. अखेर वास्तविक आकड्यांचा मुकाबला करता येत नाही म्हटल्यावर महाराष्ट्र-गुजरात आणि मुंबई-सूरत करत मुद्द्याला बगल देण्यात आली.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस फडणवीस यांचे एक भाषण गाजले होते. त्यात त्यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्या भाषणाची खिल्ली उडवताना, त्यात कसलेही तथ्य नसल्याचे सांगताना म्हटले होते, "सिंह, मावळा, युद्ध, खंजीर, कोथळा, सापळा...बस झालं भाषण!" आज कोरोना राज्यात थैमान घालत असताना उद्धव हे मुख्यमंत्री आहेत आणि जवळपास दररोज फेसबुकवर येऊन हेच भाषण करतात. त्या वेळी फडणवीसांनी खिल्ली उडवलेले शब्दच वापरून आता सोशल मीडियाचे पडदे भरून जात आहेत. उथळ पाण्याला खळखळाट फार या न्यायाने शब्दांशिवाय दुसरे काहीच नसले की हे असे होते. कोरोना हरणार, नव्हे नक्कीच हरणार म्हणणे खूप सोपे आहे. पण त्याला हरवायला फक्त शब्दांनी मारामारी करून कसे भागणार?


देविदास देशपांडे
८७९६७५२१०७