राष्ट्रीय आरोग्याची नौका व तिची डोलकाठी : डॉ. हर्षवर्धन आणि नूतन

विवेक मराठी    09-Jun-2020
Total Views |
आजच्या कोरोनाच्या संकटामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या साथीला केंद्रीय आरोग्य मंत्री डाॅ. हर्षवर्धन आहेत. या संकटावर आपण नक्कीच मात करू, समर्थ राष्ट्र म्हणून जगापुढे ताठ मानेने उभे राहू याबद्दल त्यांना खात्री आहे. त्यांच्या पाठीशी नूतनजी शिडाच्या नौकेच्या डोलकाठीप्रमाणे तोल आणि सुकाणू सांभाळत उभ्या आहेत. नूतनजीसारख्या अगणित सख्या अशा उभ्या आहेत, म्हणूनच डॉक्टरसाहेब आणि त्यांच्यासारख्या स्वयंसेवक वृत्तीच्या कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाच्या नौका, न भरकटता योग्य दिशेने कूच करत आहेत.


harshvardhan_1  

दिल्लीतल्या कोणत्याही संध्याकाळी सहाच्या सुमारास लोधी बगिच्यात फेरी मारली, तर अनेक महिलांप्रमाणेच एक साधी मध्यमवर्गीय भासेल अशी महिला - सुमारे सव्वापाच फूट उंच, आडवा बांधा, गोल हसरा चेहरा, कपाळावरून मागे गेलेले छोटे केस मागे बांधलेले आणि बहुधा हलक्या रंगाची सलवार-कमीज-ओढणी अशा वेषात चालताना दिसेल. ओळखीचे दिसले तर किंचित स्मितहास्य, कुणी संवाद साधला तर सौम्य नि मोजकेच बोलणे. ही असेल माझी सखी नूतन. नूतन हर्षवर्धन.

केंद्रीय आरोग्य मंत्री आणि आता WHO – Executive Board या जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन यांची पत्नी.

डॉ. हर्षवर्धन यांची कारकिर्द फार उज्ज्वल आणि उल्लेखनीय आहे. जगभरात ‘सार्वजनिक आरोग्य सेवेचे खंदे कार्यवाहक’ म्हणून त्यांच्या नावाला मान आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे कौतुक झाले आहे, ते 'Polio Man of India' - 'भारताचा पोलिओ पुरुष' म्हणून. १९९४ साली जेव्हा ते दिल्लीचे आरोग्य मंत्री होते, तेव्हा दिल्लीत पोलिओबाधितांचे प्रमाण १०% होते. लहानपणी लसीचे दोन थेंब पाजल्यास बाळ आयुष्यभर सुरक्षित राहू शकते, याची खात्री झाल्यावर त्यांनी दिल्लीत एक उपक्रम राबवला. पोलिओचे निर्मूलन करण्यासाठी गांधी जयंतीच्या दिवशी - एकाच दिवशी तीन वर्षांखालील १२ लाख मुलांचे लसीकरण केले. त्यांच्या या उपक्रमात ४०० संस्था पोलिओ सेना म्हणून सामील झाल्या होत्या. इतकेच करून ते थांबले नाहीत, तर पूर्ण देशभर या उपक्रमाचा प्रचार होण्यासाठी पाठपुरावा केला. १९९५ साली भारतभरातील ८८ लाख बाळांच्या लसीकरणाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम यशस्वीरीत्या राबवला गेला आणि २८ मार्च २०१४ला जागतिक आरोग्य संघटनेने भारताला पोलिओमुक्त म्हणून घोषित केले. 'कहानी दो बूँद की' या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी मा. अटलबिहारी वाजपेयीजींनी त्यांना 'डॉ. हर्षवर्धन'वजी ‘डॉ. स्वास्थ्य वर्धन’ असा किताब दिला. त्या उपाधीला साजेसे डॉक्टरसाहेबांनी आपले पूर्ण जीवन भारताच्या सार्वजनिक आरोग्याप्रती समर्पित केले.

डॉ. हर्षवर्धन हे स्व. ओमप्रकाश गोयल आणि श्रीमती स्नेहलता देवी यांचे दुसरे अपत्य. सुप्रसिद्ध दर्यागंजच्या अँग्लो संस्कृत व्हिक्टोरिया ज्युबिली स्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले, तर MBBS आणि त्यानंतर त्यांनी १९८३ साली कानपूर येथील GSVM मेडिकल महाविद्यालयातून MD-ENT ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर ते दिल्ली येथे स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय करू लागले. सेवाभाव त्यांच्या रक्तातच होता, त्याची प्रचिती आल्यावर रुग्ण त्यांना आपलेपणाने ‘डॉक्टर साब’ म्हणू लागले.

रितीनुसार, घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींनी ठरवल्याप्रमाणे दिल्लीच्याच नूतन गुप्ता यांच्याशी त्यांचे लग्न झाले. नूतन पारंपरिक विचारांचा पगडा असलेल्या घरात जन्मली. तिचे वडील बचन सिंग गुप्ता हे शिक्षक होते. शाळेतून उपमुख्याध्यापक म्हणून ते निवृत्त झाले. आई रामकुमारीजी गृहिणी होत्या. स्वभाव शांत आणि सोज्ज्वळ. नूतनजींचे शिक्षण सरकारी मुलींच्या शाळेत झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण गार्गी महाविद्यालयातून झाले. त्यांनी B.A., B.Ed केले होते. नंतर लग्न जमले. २६ फेब्रुवारी १९८२ला त्यांचे लग्न झाले, तेव्हा डॉक्टरसाहेब आपले MD पूर्ण करत होते. त्या काळातील अग्रवाल समाजात सुनांना नोकरी करावी लागणे थोडे कमीपणाचे मानले जाई. त्यामुळे नूतनजींची इच्छा असूनही त्यांनी नोकरी केली नाही. मात्र पतीच्या पाठिंब्याने, त्यांनी Hospital Administrationचा अभ्यासक्रम पूर्ण केला.

डॉक्टरसाहेब लहानपणापासूनच रा.स्व. संघाचे स्वयंसेवक होते. मोठेपणी त्यांचे हे संबंध अधिकच दृढ झाले. नूतनजींना संघाचा इतका परिचय नव्हता, पण संघसंस्कारित एकत्र कुटुंबपद्धतीत त्या दुधात साखर विरघळावी अशा मिसळून गेल्या. या दांपत्याला तीन मुले झाली - मयंक, सचिन आणि इनाक्षी. सर्व काही सुरळीत चालू असताना १९९३ साली जीवनाने एक वेगळेच वळण घेतले. डॉक्टरसाहेब आणि नूतनजी त्यांच्या स्नेही-स्वजनांच्या पाठिंब्याने स्वतःचे स्वतंत्र क्लिनिक सुरू करण्याच्या प्रयत्नात होते. सगळी तयारी झाली आणि आदल्या दिवशी डॉक्टरसाहेबांनी घोषित केले की मला संघ परिवाराच्या अधिकाऱ्यांनी आपण राहतो त्या कृष्णानगर विभागातून भाजपातर्फे दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवण्याचा आदेश दिला आहे.


harshvardhan_1  

नूतनजी या विषयावर फारसे बोलत नाहीत. त्या इतकेच म्हणाल्या, "ज्या दिवशी दवाखान्याचे उद्घाटन होते ते रद्द केले आणि तिथेच कृष्णनगर भाजपा विधानसभेचे कार्यालय म्हणून काम सुरू झाले." त्यानंतर डॉक्टरसाहेब दिल्ली विधानसभेत निवडून आले. दिल्लीचे आरोग्य मंत्री झाले. त्यांच्या सेवा कार्याची क्षितिजे विस्तारत गेली. उत्तरोत्तर कीर्ती बहरत गेली. सातत्याने ते १९९८, २००३, २००८ आणि २०१३ साली दिल्ली विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर २०१४ आणि २०१९ साली ते चांदणी चौक लोकसभा क्षेत्रातून कपिल सिब्बल यांना हरवून खासदार झाले. राजकारणात असूनही त्यांनी आपला वैद्यकीय पेशा मात्र सोडला नाही. ते आणि त्यांचा दवाखाना रुग्णांसाठी नेहेमीच चालू राहिला. इतकेच नव्हे, तर ते विधानसभेत आणि लोकसभेतसुद्धा तेथील कर्मचाऱ्यांना जेवणाच्या सुट्टीत आवश्यकतेनुसार नाक-कान-घसा या संबंधात सल्ला देत असतात. आपण सर्वप्रथम डॉक्टर आहोत ही त्यांची त्यामागची भावना आहे.

इथवरच्या वाटचालीत नूतनजी भरभक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभ्या आहेत. नूतनजींनी घर, नातेवाईक, सामाजिक आणि व्यावहारिक बाबी समर्थपणे सांभाळल्या, त्यामुळेच डॉक्टरसाहेब निश्चिंत मनाने सामाजिक आणि राजकीय कामात अहोरात्र लक्ष घालू शकले. ते पत्नीच्या या सहकार्याचा आवर्जून उल्लेख करतात. नूतनजींचा स्वभाव अत्यंत प्रेमळ आणि संवेदनशील आहे. घरात काम करणारे नोकर, त्यांची मुले, त्यांची दुखणीखुपणी याकडे त्यांचे लक्ष असते. त्यांच्या वागणुकीत, स्वभावात मोठेपणाचा बडेजाव नाही. संवेदनशील मन आणि निरपेक्ष भाव यांचे मिश्रण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे. कुणाचेही प्रेमाचे संबंध, मदत, सहकार्य त्या विसरत नाहीत. संबंध जपतात. संस्कार रुजवतात. त्यांनी त्यांच्या मुलांनासुद्धा हीच शिकवण दिली आहे. डॉक्टरसाहेब आपले आडनाव लावत नाहीत. त्यांना तो जातिवाचक दंडक वाटतो. त्यांचा मोठा मुलगा प्रसिद्ध डॉक्टर आणि MBA आहे. तोही आपले नाव 'डॉ. मयंक भारत' असे लावतो. तो दिल्लीत काम करतो. धाकटा सचिन अर्थशास्त्रज्ञ आणि गुंतवणूकतज्ज्ञ आहे आणि मुलगी इनाक्षी सेवाभावी वृत्तीची वाणिज्य विषयातील द्विपदवीधर आणि MBA असून शिक्षकी पेशात कार्यरत आहे. लहान मुलांविषयी प्रेम आणि वात्सल्य ही गुणवैशिष्ट्ये तिच्यात आपल्या आईकडून आली आहेत. तिघांपैकी कुणीही आपल्या वडिलांच्या नावाचा, मंत्रिपदाचा फायदा घेत नाहीत. त्यांनी मिळवलेल्या कीर्तीचा आणि प्रतिभेचा आदर करतात. आता त्यांना जागतिक स्तरावर जी जबाबदारी मिळाली आहे, त्यामुळे नूतनजींना आपल्या पतीचा सार्थ अभिमान वाटतो.

आजच्या कोरोनाच्या संकटामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या साथीला डॉक्टरसाहेब आहेत. चार वेगवेगळ्या लसींची clinical test करण्याची घोषणा त्यांनी नुकतीच केली. संपूर्ण देशभर रुग्णालये आणि कोरोन प्रतिबंधासाठी घ्यायची काळजी यांचा आढावा घेण्यासाठी त्यांचा दौरा चालूच आहे. या संकटावर आपण नक्कीच मात करू, समर्थ राष्ट्र म्हणून जगापुढे ताठ मानेने उभे राहू याबद्दल त्यांना खात्री आहे. त्यांच्या पाठीशी नूतनजी शिडाच्या नौकेच्या डोलकाठीप्रमाणे तोल आणि सुकाणू सांभाळत उभ्या आहेत. नूतनजीसारख्या अगणित सख्या अशा उभ्या आहेत, म्हणूनच डॉक्टरसाहेब आणि त्यांच्यासारख्या स्वयंसेवक वृत्तीच्या कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाच्या नौका, न भरकटता योग्य दिशेने कूच करत आहेत. समर्थ नि निरोगी भारतासाठी!
मेधा किरीट