॥ अगा वैकुंठीच्या राया ॥

विवेक मराठी    01-Jul-2020
Total Views |


'हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले मजलागि जाहले तैसे देवा' म्हणणारी कान्होपात्रा!
समस्त संतजन माथ्यावर काही ना काही दुःखभार घेऊनच चालत होते. पण कान्होपात्रेची व्यथा आपण कधी समजू तरी शकू का, असं वाटतं.
 
गणिकेच्या पोटी जन्माला आल्याने कुणाचं तरी प्रियपात्र होऊन राहणं हा भोग तिला अटळ होता. पण मंगळवेढ्याच्या पवित्र भूमीत तिला जन्माला घालून परमेश्वराने तिला जणू उःशापच दिला. ती वारकर्‍यांसमवेत पंढरपूरला अाली नि तिला तिचा अलौकिक प्रियतम गवसला. पण तिची वाट तर पतित म्हणवल्या गेलेल्या हीन जातीच्या भक्तांपेक्षा दुष्कर होती. कारण तिच्या देहावरचा तिचा अधिकारही मुळी समाजाला मान्य नव्हता. जर तिने बिदरच्या बादशहाची आज्ञा मानली असती, तर तिच्या पायाशी सारी सुखं आली असती. पण तिच्या मनात त्या सावळ्याच्या अलौकिक प्रेमाचा दीप उजळला होता. त्यापुढे तिला आता देहभाव, देहलावण्य, देहसज्जा काहीच नको होतं. पण तिचा हा आकांत ऐकणारं तरी कोण होतं? एका त्या पतितपावनाचाच काय तो तिला भरवसा वाटत होता. पण त्याच्याकडे जाण्याची वाट तरी सोपी कुठे होती? एक विठ्ठलाशिवाय कुणाचाही अधिकार न मानणारं तिचं मन व तिचं शरीर जेव्हा वासनेची शिकार बनायची वेळ आली, तेव्हा तिला सुटकेचा कोणताही मार्ग उरला नाही. आता देहत्याग करून त्याच्या रूपात विलीन होऊन जाणं हेच तिच्या हातात होतं. तिथवरचा प्रवास धेर्याने तिलाच करायचा होता. एकटीला. पण तेही सर्वस्वी आपल्या हातात कुठे असतं? त्याने बोलवावंच लागतं. मग त्याला हाक घालायची.

कान्होपात्रेचा अवघ्या आठ अोळींचा अभंग. संगीत संत कान्होपात्रा या नाटकाकरता मा. कृष्णराव व विनायकबुवा पटवर्धन यांनी भैरवीत बांधलेली अप्रतिम चाल. बालगंधर्वांनी गाऊन अजरामर केलेलं हे पद म्हणजे मूर्तिमंत आर्तता आहे. पूर्ण होऊन पूर्णात विलीन होण्याचा हा भाव.
अशा वेळी त्याला बाकीचं काहीच सांगावं लागत नाही.
काही मागणं, काही मनीषा उरलेलीच नाही.
फक्त त्याला हाक मारायची, त्याने ये म्हणायचं.
अगा वैकुंठीच्या राया
अगा विठ्ठल सखया
अगा नारायणा
अगा वसुदेवनंदना
अगा पुंडलीकवरदा
अगा विष्णू तू गोविंदा
अगा रखुमाईच्या कांता
कान्होपात्रा राखी आतां ॥
लौकिक जगापेक्षा मौल्यवान असं वैकुंठाचं सुख मला भोगायचंय. तुझं सख्यत्व अनुभवायचंय. नरदेह सोडून नारायणत्वात मिसळून जायचंय.

वसुदेवनंदनाला भेटायचं आहे. पुंडलीकासारखा वरप्रसाद हवा आहे. तूच सर्वपालक श्रीविष्णू आहेस. तूच गोविंद आहेस. रखुमाईकरता सारं सोडून आलास, तसं मलाही तुजकडे बोलाव!
त्याच्या सगळ्या नावांनी त्याला हाक मारून शेवटी फक्त एका अोळीत मागणं मागितलंय की बाकी काही तुला सांगायला नकोच.. माझं सत्त्व राख!
तिला समाजाने पतितेचं स्थान दिलं होतं. तिचं कर्म न पाहता, जन्माने असो वा कर्माने, पतिताला जेव्हा स्वतःला त्यातून बाहेर पडायची इच्छा होते, तेव्हा परमेश्वर हात पुढे करतोच.
कोणत्याही संकटात त्याला आर्ततेने केलेला धावा ऐकू जातोच.

समाज आपलं सत्त्व विसरायला लावायला टपला आहे. आपल्याला चिखलात अोढू पाहतो आहे. ती मूल्यं प्राणपणाने सांभाळायची आहेत ही तळमळ जागती ठेवायची अन आपणही तेवढंच करायचं - त्याला मनापासून हाक मारायची..
अगा वैकुंठीच्या राया!
॥ जय जय रामकृष्ण हरी ॥