हे विठ्ठला...

विवेक मराठी    01-Jul-2020
Total Views |
@देविदास पोटे 
 
pandharpur ashadhi ekadas

हे विठ्ठला, तू महाराष्ट्राचे आद्य दैवत. मराठी मनाचा लाडका देव. आज आषाढी एकादशी. भक्तीचा महाउत्सव. भक्तहृदयांची चैतन्यमय दिवाळी. भक्त तुझे आणि तू भक्तांचा. भक्तांचा तारणहार, पतितपावन अशी तुझी ख्याती. लाखो वारकर्‍यांची, तुझ्या प्रिय भक्तांची मांदियाळी दर वर्षी तुला भेटण्यासाठी तुझ्या भक्तीनगरीत येते. पावसाचे आगमन झाले की वारकर्‍याला वारीचे वेध लागतात. त्याची पावले आपोआप वारीच्या वाटेकडे वळतात. नामघोष करीत, भजन गात माणसांचा हा महाप्रवाह ऊनपावसाची तमा न बाळगता एकेक भक्तिमय पाऊल टाकीत दृढ निश्चयाने आपल्या गंतव्याकडे वाटचाल करतो. टाळ-मृदंगाचा नाद, वीणेचा झणकार आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’ असा नामगजर यांनी वातावरण दुमदुमून जाते. दिंड्यापताकांच्या दाटीने आकाशाच्या पोकळीत जणु भगव्या रंगाचा अनावर प्रवाह वाहत राहतो. वारी म्हणजे काय? वारी म्हणजे भक्तिरंगाची आनंदयात्रा. वारी म्हणजे क्षणाक्षणाला येणारी विठ्ठलाची अनुभूती. वारी म्हणजे वारकरी भक्तांच्या चरणरजाने धन्य झालेल्या मातीचा हुंकार. वारी म्हणजे उत्कट आत्मरंगाचा कैवल्यमय आविष्कार.

हे विठुराया,
वारीबरोबर दोन-तीन आठवडे वाटचाल करून तुला भेटायला येणारा वारकरी कुठल्या आंतरिक ओढीने वाटचाल करतो? इतका मोठा जनप्रवाह अतिशय काटेकोर शिस्तीत आपल्या लाडक्या आधिदैवताला भेटायला जातो, हे जगामधले एकमेव उदाहरण असावे. वारीतील रिंगण म्हणजे अध्यात्मातला खेळ. गोलाकार रिंगण म्हणजे संसाराचे गोल गोल चक्र वा जन्ममरणाचे चक्र. त्यावर अश्वाप्रमाणे घोडदौड करून आपले इच्छित परमध्येय साध्य करावे, हा संदेश जणू त्यातून प्रतीत होतो. टाळाचा ध्वनी म्हणजे आपल्या आयुष्यातील कर्तव्यकर्मात टाळाटाळ न करणे. मृदंगाचा नाद म्हणजे दु:खद, काटेरी वाटचालीत मनावर होणारा सुखाचा, आनंदाचा शिडकावा.

हे विठूमाउली,
तू आपल्या भक्तवात्सल्याबद्दल प्रसिद्ध आहेस. तू सार्‍यांची माउली आहेस. तू लेकुरवाळा आहेस. भक्तांना आपल्या आवतीभोवती, अंगाखांद्यावर वागवतोस. जनाईचे दळण दळतोस. गोरा कुंभाराची मडकी घडवतोस. सावता माळ्याचा भाजीपाला फुलवतोस, तुकोबांच्या पाण्यात बुडालेल्या अभंगांच्या वह्या तारतोस, नामदेवांच्या कीर्तनात धुंद होऊन नाचतोस. आपल्या भक्तांना, लाडक्या लेकरांना तू भक्तीचा प्रेमपान्हा पाजतोस. तू कृपाळू, कनवाळू आहेस. सुखाचे आगर आहेस. दयेचा सागर आहेस.

हे पंढरीराया,
तू भक्तांची परीक्षा घेतोस आणि मग त्यांच्यावर कृपेची बरसात करतोस, अशी तुझी ख्याती आहे. परी परीक्षेची ही घडी फार लांबली आहे, असे वाटते. आजच्या वर्तमानात धनसंपत्ती, सत्ता, अधिकार यांच्या बळावर समाजघटकातील ‘आहे रे’ गटातला वर्ग ‘नाही रे’ गटातील वर्गावर सर्व परींनी कुरघोडी करतो आहे. आज देशातील ९९ टक्के संपत्ती एक टक्का लोकांच्या हातात आहे आणि ९९ टक्के लोकांच्या हाती उरलेली एक टक्का. तुझ्या राज्यात समतेची ध्वजा रोवलेली आहे. असे असताना ही भयानक विषमता तू कशी सहन करतोस? आज सारे काही धनिकांच्या मर्जीने आणि त्यांच्या सोयीने चालले आहे असे जाणवते आहे. गरीब अधिक गरीब होत आहे आणि श्रीमंत, अधिक श्रीमंत. हे काय चालले आहे? लोककल्याणकारक राज्यात ही विसंगती तू कशी साहतोस? तू सर्वज्ञानी, सर्वसाक्षी आहेस. तुझ्या मनात आहे तरी काय? धर्माच्या नावाने अधर्म आणि सेवेच्या नावाने अघोरी कृत्ये होताहेत. गरीब, सर्वसामान्य माणूस अधिकाधिक भरडला जातो आहे.

हे दयाधना,
तूच तुझ्या गोरगरीब भक्तांना वाचव. त्यांच्या कलाहीन, शक्तिहीन आणि हीनदीन आयुष्यात आनंदाचे, आशेचे किरण उजळू दे. त्यांच्या जगण्याला सुखाचा नि समाधानाचा स्पर्श होऊ दे. तू या भूमीवर पुन्हा अवतीर्ण हो अथवा नाठाळांच्या माथी काठी हाणण्यासाठी तुझ्या प्रिय भक्तांना - म्हणजे तुकोबारायांना पाठव.

हे पांडुरंगा, तू करुणेचा सागर आहेस. कनवाळूपणाचा अर्क आहेस, तू सार्‍यांचे सार आहे. तू आई वा माउली आहेस. मग दु:खात होरपळणार्‍या तुझ्या लेकरांना तुझ्याशिवाय कुणाचा आधार आहे?

संत तुकारामांनी ‘बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल असे म्हटले. आम्ही तुझा धावा केला. तुझे सावळे रूप अंतरंगात साठवले. आमच्या हृदयाची हाक तुला ऐकू आली की नाही? डोळ्यात प्राण एकवटून तुझ्या प्रतिसादाची प्रतीक्षा करीत आहोत.

हे करुणाकरा,
आमचा भवताप हरण करण्यासाठी तू कधी येशील? आमच्या मुखात, तनामनात एकाच शब्दाचे, एकाच नादाचे तरंग उमटताहेत,
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल..