कणेरी सिद्धगिरी मठाचे सेवा कार्य

विवेक मराठी    01-Jul-2020
Total Views |
जगभर कोरोनाचे संकट रौद्ररूप धारण करीत असताना मानवधर्माच्या नात्याने अनेकजण आपापल्या परीने सेवाकार्ये करीत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरातील धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय करण्यात आला. परंतु अशी काही धर्मस्थळे दर्शनासाठी बंद असली तरी सेवाकार्यांचे त्यांचे व्रत निरंतर चालू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी येथील श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाने कोरोना संकटकाळात मदतीचा हात देता देताच चक्रीवादळासारख्या अस्मानी संकटात ज्यांचे नुकसान झाले त्यांनाही दिलासा देण्याचे काम केले.



Kaneri Math_1  

जगभर कोरोनाचे तांडव सुरूच असताना दिवसेंदिवस त्याचे रौद्र रूप वाढत चालले आहे. अशा अस्मानी संकटात कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी येथील श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाने हजारो लोकांना जेवण, अन्न-धान्य अशी मदत देत दिलासा दिला आहे.

कोणत्याही आपत्तीच्या काळात आपद्ग्रस्तांंच्या हाकेला प्रतिसाद देणारा मठ म्हणून या मठाची ख्याती आहे. नेपाळ असो, केरळ असो, कोल्हापूर-सांगलीचा गतवर्षीचा महापूर असो, काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या कुशल मार्गदर्शनाखाली शेकडो स्वयंसेवकांची फळी या मदतकार्यात तत्काळ उतरलेली आहे. धर्म, शिक्षण, कृषी या क्षेत्रांबरोबरच आरोग्य क्षेत्रातही मठाने मोेठे काम उभारले आहे. सिद्धगिरी कारागीर महाकुंभ, ग्रामसंस्कृती उत्सव, महाशिवरात्री यासारखे भव्य उपक्रम मठाच्या पुढाकाराने झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, बाबा रामदेव यांच्यासारख्या अनेकांनी या मठाच्या कामाचे वेळोवेळी कौतुक केले आहे. अनेक केंद्रीय मंत्र्यांनी मठाला प्रत्यक्ष भेट दिली आहे.

कोरोना विषाणूमुळे आधीच हैराण असलेल्या महाराष्ट्राच्या संकटात निसर्ग या चक्रीवादळाने अधिक भर टाकली. कोरोनामुळे तर हाताला रोजगार नाही, पोटाला पुरेसे अन्न नाही अशा अवस्थेत जगणाऱ्या अनेक लोकांची परिस्थिती अचानक आलेल्या निसर्ग वादळामुळे अधिकच बिकट केली. नेहमीचा आधार म्हणून असणारा निवारा उडून गेल्याने, लोकांच्या डोक्यावरील छत्रच हरविल्यामुळे अनेक जण हवालदिल झाले होते. प्रामुख्याने रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतील अनेक गावांची स्थिती अतिशय वाईट झाली. हे पाहून व्यथित झालेल्या स्वामींनी या कोरोनाच्या संकटातही मठाचे कोठार त्यांच्यासाठी रिते केले. इतकेच नाही, तर या निसर्ग वादळाच्या संकटात लोकांचे अश्रू पुसण्यासाठीही काडसिद्धेश्वर स्वामी स्वत: त्वरित धावले. याशिवाय महाराजांनी मानसिक स्थैर्य आणि आयुर्वेद यावर भर देणारी अनेक प्रवचने देऊन कोरोना काळात भाविकांचे मनोधैर्य टिकविण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

आपत्कालीन विभाग

सिद्धगिरी मठाकडून आपत्कालीन विभाग कार्यरत आहे. यामध्ये सुमारे दीडशेहून अधिक स्वयंसेवक सदैव सज्ज असतात. नेपाळ, केरळ, कोल्हापूर येथील आपत्तीनंतर आता कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या स्थितीमध्ये आणि निसर्ग चक्रीवादळग्रस्तांच्या मदतीसाठी हा आपत्कालीन विभाग मदतीला धावला आहे. वादळग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी गवंडी, लोहार, सुतार, प्लंबर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन यांचा समावेश असलेल्या सुमारे १५० लोकांची आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली. त्यांच्याबरोबर सिमेंट, पत्रे, संसारोपयोगी साहित्य, कौले अशा साहित्यांचे अनेक ट्रक भरून सामान घेऊन दस्तूरखुद्द स्वामी लोकांचे अश्रू पुसण्यासाठी तळकोकणात उतरले.

कोकणातील पाजपंढरी, खरसई, खेड, दापोली, चिपळूणसह रायगड जिल्ह्यातील काही भागांत हे मदतकार्य अजूनही सुरू आहे. केवळ स्वामींच्या मार्गदर्शनाखाली मठाच्या वतीने घरांच्या छताची मापे घेऊन छत उभारण्याचे काम पहिल्या काही तासांतच सुरू झाले. ग्रामस्थांकडून स्वामींच्या या अचूक नियोजनाचे कौतुकही झाले. पुनर्वसनासाठी 'सिद्धगिरी निसर्ग वादळ मदतकक्ष' स्थापन करण्यात आला. सर्वच आपद्ग्रस्तांना लाभ मिळावा म्हणून समाजातील दानशूर दात्यांनी पुढे यावे, असे आवाहन मठाच्या वतीने करण्यात आले होते, त्यालाही भरभरून प्रतिसाद मिळाला. घरबांधणीसाठी, दुरुस्तीसाठी विटा, सिमेंट, पत्रे, वाळू. लोखंडी सळई, बांधकाम साहित्य, दरवाजे, खिडक्या, इलेक्ट्रिकल साहित्य, संडास-बाथरूमसाठी लागणारे प्लंबिंग साहित्य, कौले, मेणबत्ती, काडेपेटी, शैक्षणिक साहित्य - वह्या, कंपास, पेन, स्कूल बॅग अशा एक ना अनेक स्वरूपांत आणि अर्थातच आर्थिक स्वरूपात अनेकांनी मदत दिली.

भिक्षू, भटके, हातावर ज्यांचे पोट आहे अशा अनेक जणांना मठाकडून मदत पोहोचविली गेली. गरीब आणि निराधार व्यक्तींना मोफत घरे बांधून देण्याची जबाबदारी मठाने घेतली आहे. दुर्गम भागात पाणवठ्याकडे जाणारे, गावात जाणारे रस्ते, गटारी यावर पडलेली अजस्र झाडे कटरच्या साहाय्याने कापून ते मोकळे केले आहेत. आजही हा मदतीचा ओघ सुरूच आहे. कोरोनाचा फटका बसलेल्यांना मदत करणाऱ्या कोल्हापूर पोलीस दलाला दररोज मठाच्या वतीने जेवण पुरविण्यात येत आहे. याशिवाय मुंबईतही गेले तीन महिने सातत्याने गरीब कुटुंबांपर्यंत मदत पोहोचविण्यात येत आहे. तांदूळ, रवा, मीठ, डाळ, साखर, तेल यापासून अगदी काडेपेटीपर्यंतचे किट या लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम अद्यापही सुरू आहे.


Kaneri Math_1  

कोरोनानंतरचे खेडे

कोरोनामुळे अनेक जण आपल्या मूळ गावी, म्हणजे खेडेगावी परतले आहेत. ही स्थिती कायमची टिकावी यासाठी मठाचे प्रयत्न सुरू आहेत. शहरीकरणाचा तोटा समजून घेऊन अनेक जणांना आपापल्या खेड्यातच उद्योग उभारून त्यांना स्वयंपूर्ण बनण्यासाठी दोनशे स्वयंपूर्ण खेडी उभारण्यात येणार आहेत. शहरातून आलेली माणसे परत जाऊ नयेत यासाठी हा प्रयत्न आहे. या दोनशे गावांतच उत्पादनांची निर्मिती केली जाणार असून त्यांची विक्रीही या दोनशे गावांतच केली जाणार आहे. हा एक प्रयोग आहे. यातील जादा उत्पादने शहरात विकली जातील आणि शहरातील नवनवे तंत्रज्ञान या खेड्यात आणले जाईल, असा हा प्रयोग आहे. विद्याचेतना प्रकल्पाअंतर्गत सध्या दोनशे गावांत सुरू असलेल्या शाळेतील मठाचे शिक्षकच या नव्या प्रकल्पासाठी सज्ज आहेत.

सिद्धगिरी मठ, कणेरी

कणेरी हे कोल्हापूरपासून १२ किलोमीटर अंतरावरचे एक गाव आहे. या गावात हा सिद्धगिरी मठ आहे. या मठाला सुमारे चौदाशे वर्षांची परंपरा आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह चार राज्यांच्या सीमावर्ती भागात रेवणसिद्ध, अमोघसिद्ध, मूरसिद्ध, करीसिद्ध, हालसिद्ध, वेताळसिद्ध यासारखे अनेक सिद्ध होउन गेले आहेत. त्यांच्या नावांचे संप्रदायही निर्माण झालेले आहेत. यापैकीच काडसिद्ध हे सिद्धपुरुष आहेत. या संप्रदायाचे मूळ स्थान म्हणजेच कणेरी मठ. बालब्रह्मचारी उत्तराधिकारी या मठाचा अधिपती म्हणून निवडला जातो. सातव्या शतकापासूनची ही परंपरा आहे. त्यानुसार सध्याचे अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज हे ४९वे मठाधिपती आहेत. देशभरात मुंबई, पुणे, रत्नागिरी, गोवा, उत्तर कर्नाटकातील काही गावांसह ३५०हून अधिक ठिकाणी काडसिद्धेश्वरांची मठ-मंदिरे आहेत. संन्यासी परंपरा असणाऱ्या या मठाच्या अनुयायांचा मोठा वर्ग आहे. राजे-महाराजांच्या काळात मठांना अनेक एकरात जमीन मिळालेली होती, मात्र इंदिरा गांधी पंतप्रधान असताना मठाच्या जमिनी सरकारजमा झाल्या. परंतु १९५२मध्ये मठाचा ट्रस्ट झाल्याने कणेरीचा मठ आजही कार्यरत आहे. तीनशे एकरात पसरलेल्या या मठाचा मूळ उद्देश धर्मप्रसाराचा आहे. पहाटे पाच वाजता, सकाळी अकरा वाजता, दुपारी दोन वाजता आणि चतुष्काल पूजा संपन्न होत असते. याशिवाम मंदिरात नित्य भजन, रुद्राभिषेक आणि अन्नछत्र सुरू असते. दासबोध प्रमाणग्रंथ आणि त्रिकाळ भजन हे या संप्रदायाचे वैशिष्ट्य आहे.

लिंगायत संप्रदायाच्या बळावर येथे नैसर्गिक सौंदर्य असलेल्या कणेरीच्या घनदाट अरण्यात एका शिवपिंडीची स्थापना करण्यात आली. मूळचे हे मंदिर हेमाडपंती आहे. त्याच्या आत कोरीव बाजूच्या बाहेरील दोन मंडप आहेत. ह्या मंदिराची बांधणी मोठ्या व कोरीव दगडात केली आहे. ५०० वर्षांपूर्वी लिंगायत धर्माकार काडसिद्धेश्वर यांनी ह्या मंदिराची बांधणी केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी या मंदिराला भेट दिली व मदत केली. मुस्लीम धर्माच्या मुख्य मिरासाहेब या शिवभक्त होत्या. त्यांनी मिरज येथील टेकडीवर अशा प्रकारच्या मंदिराची स्थापना केली. शिवरात्रीला महाराष्ट्रातून व कर्नाटकातून येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मठाकडून धर्म, आरोग्य, शिक्षण, उद्योग आणि शेती या पंचसूत्रीवर विविध उपक्रम राबविले जातात. यात गोशाळा, आनंदाश्रम, गुरुकुल यासारखे महत्त्वांकाक्षी प्रकल्प सुरू आहेत.

सिद्धगिरी वस्तुसंग्रहालय

काडसिद्धेश्वराच्या या मठाशेजारीच सिद्धगिरी वस्तुसंग्रहालय आहे. शहरीकरणामध्ये लुप्त होऊ पाहत असलेल्या ग्रामीण जीवनशैलीचे मूर्तिमंत नमुने येथे उभे केलेले आहेत. या वस्तुसंग्रहालयाच्या सुरुवातीला बारा राशींची बारा शिल्पे आहेत. त्यानंतर एका गुहेसदृश भागातून आत जाताच प्राचीन भारतातील ऋषिमुनींचे कोरीव पुतळे बनविले आहेत. ऋषींची नावे, त्यांची विद्या आणि त्यांचे योगदान याची सामान्य माणसाला ठाऊक नसलेली माहिती तेथे लिहिली आहे. या गुहेतून बाहेर पडल्यावर दोन्ही बाजूना हिरवीगार शेते आणि त्यांत काम करणाऱ्या माणसांच्या प्रतिकृती दिसतात. धान्याची पेरणी करण्यापासून ते धान्य घरात येईपर्यंतच्या सर्व प्रक्रिया या प्रतिकृतींमधून दाखविल्या आहेत. याचबरोबर शेतामध्ये बैल, गाय, म्हशी या जनावरांचा असणारा वावर, लगोरी, सूरपारंब्या, लंगडी यांचे प्रत्यक्ष दर्शन या प्रतिकृतींमध्ये जिवंत वाटावे इतक्या बारकाईने टिपले गेले आहे.

बारा बलुतेदार ही समाजव्यवस्था खेड्यांमधून आज लुप्त होत चालली आहे. बलुतेदारी म्हणजे काय आणि त्यावर चालणारा उदरनिर्वाह याची ओळख करून देणारी शिल्पे येथे पाहावयास मिळतात. कोष्टी, कुंभार, चांभार, न्हावी, लोहार, शिंपी, सोनार यांसह पिंगळा, वासुदेव यांचीही शिल्पे त्या त्या जीवनशैलीचे दर्शन घडवितात. ग्रामीण भागांत असलेल्या घरांचे विविध नमुने येथे पाहावयास मिळतात. वतनदाराचा वाडा, पाटलाचा वाडा, शिंप्याचे घर यांच्या हुबेहूब त्रिमिती प्रतिमा येथे ठेवल्या आहेत.

गुरुकुल पद्धत

सध्याच्या जगातील कुठलीही नोकरी न मिळणारी पण शंभर टक्के स्वयंपूर्ण बनविणारी शाळा अर्थात अनोखे गुरुकुल विद्यालय कणेरी मठावर सुरू होऊन तीन वर्षे झाली आहेत. चौदा विद्या, चार वेद, सहा शास्त्रे आणि ६४ प्रकारच्या कला शिकविणाऱ्या देशातील या एकमेव अनोख्या विद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा येथून व परदेशातूनही अर्ज येतात. ७ ते १० वयोगटातील शंभर जणांना नि:शुल्क आणि निवासी प्रवेश देऊन त्यांना देशातील १५० आधुनिक व पारंपरिक प्रकारचे शिक्षण येथे देण्यात येते. या विद्यालयातून १२ वषार्नंतर स्वयंपूर्ण होऊन बाहेर पडणाऱ्यांसाठी एकाच विषयात पीएच.डी. करण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठही स्थापले जाणार आहे. याचा अभ्यासक्रम बनविण्यात आला असून देशभरातील १५० तज्ज्ञ शिक्षक या शंभर विद्यार्थ्यांना शिक्षण देणार आहेत. पहाटे साडेचार वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत या गुरुकुल विद्यालयाची कामकाजाची वेळ आहे. येथे प्रवेश देण्यात आलली मुले पूर्णत: सेंद्रिय पद्धतीच्या कास्यांच्या धातूच्या भांड्यातून जेवण घेतात. जेवण बनविण्यासाठी व पाणी पिण्यासाठी पितळेची आणि मातीची भांडी वापरली जातात. पाल्याच्या आईवडिलांनी एक दिवस मुलासमवेत गुरुकुलात निवास करण्याची अट आहे. त्यांचे पाद्यपूजन केले जाते आणि त्यांना रोज वंदन करणे, त्यांच्या आज्ञांचे पालन करणे यावर भर असतो. याशिवाय पालकांवरही कांही बंधने घातलेली आहेत - मुलांसमोर भांडण न करणे, अभ्यासादरम्यान टीव्ही/मोबाइलचा वापर न करणे, तसेच डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देणे हा त्यांच्या प्रतिज्ञेचा भाग आहे. गुरुदक्षिणा देण्याची परंपरा हे विद्यार्थी पाळतात.

विद्याचेतना प्रकल्प - स्वयंपूर्ण आणि स्वयंसिद्ध

मठाच्या विद्याचेतना प्रकल्पाअंतर्गत या विद्यालयातून बाहेर पडणारा प्रत्येक जण स्वयंपूर्ण, स्वयंसिद्ध बनणार असून उपजीविकेसाठी कुणापुढेही हात पसरणार नाही. गोपालक, एक हजार वर्ष टिकणारे घर बनविणारा इंजीनिअर, प्रक्रिया उद्योजक, व्यायसायिक, शिल्पकार, संगीतकार, पाकशास्त्र, ज्योतिषशास्त्र (खगोलशास्त्र), हवामानशास्त्र, हॉर्स व बुल रायडिंग, इतिहास, पाठांतर (आयुर्वेदाचे श्लोक), शिल्पवेद, धनुर्वेद, गंधर्ववेद, युद्धकला, मॅनेजमेंट, नॅचरल सायन्स, वैदिक गणित, ब्युटीपार्लर अशा असंख्य कौशल्यांत ते पारंगत होतात. अन्य दहा जणांना नोकऱ्या देऊ शकेल एवढी त्याच्यात क्षमता येईल, असा मठाच्या प्रशासनाला विश्वास आहे. हे सर्व शिकविताना संस्कृत, मातृभाषा, आश्रमभाषा, राष्ट्रभाषा आणि शेवटी इंग्लिश भाषेला महत्त्व दिले जाते. तसेच संगणकाचेही अत्याधुनिक शिक्षण दिले जाते. या वर्षी तीनशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, पुढील वर्षी आणखी १०० विद्यार्थी प्रवेश घेतील.

संघाच्या माध्यमातून ईशान्येतील शंभर मुले मठात

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून कणेरीच्या या मठात ईशान्येतून आलेल्या शंभर विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. तिसरी-चौथीपासून अकरावी-बारावीपर्यंतचे हे विद्यार्थी आहेत. मठाच्या परिसरातील दहा शाळांमध्ये शारिरिक शिक्षण देणारे शिक्षक हे मठाचे आहेत. जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावणारे ४०पैकी २५ खेळाडू मठाच्या माध्यमातून चमकतात, हे अभिमानास्पद आहे. याशिवाय सरकारी ३३५ शाळा मठाकडून दत्तक घेतल्या आहेत.

कृषिविज्ञान केंद्र

धर्म व शिक्षण याबरोबरच कृषी क्षेत्रातही मठाचे मोेठे काम चालते. नैसर्गिक पद्धतीने शेती करणे, सेंद्रिय उत्पादने घेणे याविषयी शेतकऱ्यांसाठी सातत्याने देशपातळीवरील शिबिरांचे तसेच कार्यशाळांचे आयोजन मठात केले जाते. शेतकऱ्यांसाठी खास कृषिविज्ञान केंद्राची स्थापना मठाकडून झाली आहे. शेतकऱ्याने पिकविलेल्या सर्व प्रकारच्या मालाला हमीभाव देणारे सिद्धगिरी मठ हे एकमेव आहे. धान्य, फळ, भाजीपाला या शेतीमालासाठी मठाकडून बाजारपेठही तयार केली आहे. सध्या हक्काचे असे शंभर ग्राहक आहेत. चाळीस रुपयांना घेतलेला शेतीमाल ६० रुपयांना विकला जातो. सध्या दीडशे एकरात शेतीप्रयोग केले जातात. भविष्यात तो १००० एकरापर्यंत जाईल अशी आशा आहे. येत्या वर्षभरात यासाठी स्वतंत्र मोबाइल अ‍ॅप तयार करण्यात येणार आहे. कृषी नवोत्थान शिबिरासारखे शिबिर मठाच्या लौकिकात भर टाकते. राष्ट्रीय कृषिसंमेलनात अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांसह देशातील विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि विविध विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित राहिले. देशी गाईचे शेणखत आणि गांडूळ खत हे मठाचे वैशिष्ट्य राहिले आहे.

सिद्धगिरी प्रॉडक्ट

मठाकडूनही जवळपास ४०हून अधिक उत्पादनांची निर्मिती केली जाते आणि त्यासाठी मुंबई, पुणे यासारख्या अनेक शहरांत विक्री केंद्रेही काढलेली आहेत. देशी गाईचे दूध १०० रुपये लीटरने, तर ३०० रुपये किलोने तूप विकले जाते. पंचगव्य उत्पादनांवर मठाचा भर आहे. लोकांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी हा उपक्रम सुरु केला आहे. ४०गोशाळा आहेत. याशिवाय शेतकरी कुटुंबातील महिलांसाठीही विविध व्यवसाय सुरू आहेत. यामध्ये २५ प्रकारचे पापड, ८ प्रकारच्या चटण्या यांचा समावेश आहे. भविष्यात ६०० प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती केली जाणार आहे.

आरोग्य क्षेत्र

धर्म, शिक्षण, कृषी या क्षेत्रांबरोबरच आरोग्य क्षेत्रातही मठाने मोेठे काम उभारले आहे. दोनशे खाटांचे अ‍ॅलोपॅथी आणि शंभर खाटांचे होमिओपॅथीचा समावेश असलेले सिद्धगिरी धर्मादाय हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर मठाच्याच अधिपत्याखाली चालते. गेल्या दहा वर्षांपासून गरिबांना अल्प दरात उपचार देण्यासाठी या हॉस्पिटलमध्ये तरुण आणि तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत आहेत. अनेक प्रलोभने टाळून सातत्याने याच हॉस्पिटलसाठी सेवा देणाऱ्या या डॉक्टरांच्या पथकामुळे अनेक गरीब रुग्णांवर योग्य उपचार झाले आहेत. न्यूरो विभाग, हृदयरोग विभाग यासाठी माजी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नाने साडेतीन कोटी रुपयांची अद्ययावत यंत्रणा हॉस्पिटलसाठी मिळवून दिली आहे. भविष्यात पन्नास हजारात अ‍ॅन्जिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. सध्या बायपाससाठी अ‍ॅन्जिओग्राफीही मोफत केली जाते. अनेक आरोग्यविषयक शिबिरांचेही आयोजन सातत्याने घेतले जाते. 

मधुबाला आडनाईक
९०११०३००४७