जागल्या

विवेक मराठी    01-Jul-2020
Total Views |

 
pandharpur ashadhi ekadas


रामकृष्णहरी! मंडळी, ‘वासुदेवा’ने प्रारंभ झालेल्या या लेखमालेची सांगता ‘जागल्या’ने करूया!

संत तुकाराम महाराज म्हणतात

निजल्याने गाता उभा नारायण

बैसल्या कीर्तन करता डोळे

तर मग ‘जागल्या’ने गाताचे फळ किती मोठे असेल. 'जागल्या' हा गावगाड्यातील म्हणजे जुन्या ग्रामव्यवस्थेतील एक मुख्य गावकरी आहे. आपल्या गावात घडलेल्या घटनांची त्याला पूर्ण बित्तंबातमी असते. जेव्हा रात्री सगळे गावकरी झोपलेले असतात, तेव्हा चोऱ्यामाया होऊ नयेत, म्हणून जागल्या रात्रभर संपूर्ण गावात फिरून गस्त घालतो. 'हुशार हो!' असे मोठ्याने ओरडत आणि हातातली काठी जोराने आपटत तो सगळीकडे हिंडतो आणि लोकांना सावधान करतो. येथे 'जागल्या'ची भूमिका संत एकनाथांनी सुरेख वठविली आहे. या लोककाव्याच्या माध्यमातून त्यांनी सामान्यजनांना पारमार्थिक हिताचा मार्ग दाखवला आहे.

उठा उठा माय बाप । नका येऊ देऊ झोप ।

आली हो आली यमाजीची तलब ॥

तुमचे गावात नाही पाटील बाबा ।

पाटलीण आवाचा मोठा दावा ।

घरचे घरकूल झाकून ठेवा ॥

नाथांचा हा जागल्या गावकऱ्यांना हाक मारत म्हणतो, "मायबाप हो! तुम्ही झोपेच्या आहारी जाऊ नका, डोळ्यांवरची झोप आता पटकन झटकून टाका. 'यमाजीची तलब' म्हणजे यमराजाचे बोलावणे कधी येईल ते सांगता येत नाही. आता वेळ आहे तेव्हाच तुम्ही जागे व्हा. अज्ञानाच्या अंधारात स्वतःचे भान हरपून देऊ नका. आपल्या स्वहितासाठी जागरण करा. आपले कल्याण साधून घ्या. परमात्मा म्हणजे पाटीलबाबा तुमच्या गावात नाहीत, परमेश्वराचे स्मरण तुम्हांला होत नाही. पाटलीण आवा (म्हणजेच माया) हिचा मोठा दावा आहे. पाटीलबाबा नसताना ही थोरली पाटलीण मोठा गोंधळ घालते. मायेमुळे माणसाला संभ्रम उत्पन्न होतो, प्रपंचाची आसक्ती वाटते. पण खऱ्या साधकाने हे आपले घरकूल झाकून ठेवले पाहिजे. घर-संसारात त्याने गुंतू नये.’’

माया म्हणजे भगवत्शक्ती भगवत्भजने तिची निवृत्ती

आन उपाय तेथे न चलती हरिभक्त सुखे तरती हरिमाया

मायबाप हो! तुमच्या वासनारूपी सूनबाईचे वर्तन चांगले नाही. ती नीट वागत नाही. घराचे स्वामी असलेले मनाजी पाटील यांचा मोठाच बडेजाव आहे. तुमचे मन तुमच्यावर हुकमत गाजवते आहे. वासना आणि मन यांच्यात सतत संघर्ष चालू असतो. चांगल्या मार्गाने जावे याची मनाला ओढ असते. पण शरीर त्यासाठी साथ करत नाही. ते वासनेकडे किंवा आसक्तीकडे सहज वळते.

तुमच्या सुनेची नाही वागणूक बरी ।

तिचे घरधनी मनाजी पाटील थोरी ।

त्यांच्यातील वाद साऱ्या गावांत भारी ॥

पुढे मनरूपी पाटीलबाबाची थोरवी लोकगायक सांगतो. या पाटलाच्या घरात सहा कारभारी माजले आहेत. हे सहा कारभारी म्हणजे काम, क्रोध, मद, मोह, लोभ व मत्सर हे सहा षड्विकार होत. त्यांच्यापुढे पाच पोरे रडत दारोदार हिंडत आहेत. म्हणजे आपली पाच कर्मेंद्रिये या विकारांनी गुलाम करून ठेवली आहेत. मनरूपी पाटीलबाबाने सावध राहिले पाहिजे. यमराज पुढे येऊन ठाकले तर त्यांच्या तावडीतून मग सुटका नाही. पळून जाण्यासाठी वाटच मिळणार नाही.

पाटील बाबाची ऐकावी थोरी ।

सहा कारभार करतात घरीं ।

पांच ती पोरें रडती दारोदारी ॥ ४ ॥

आता पाटील बाबा तुम्ही हुशारी धरा ।

यमाजीबाजी वो येतील घरा ।

इकडून तिकडे वो पळाया नाही थारा ॥५ ॥

एका जनार्दनीं कांही हित करा ।

आपला आपण चुकवा फेरा ।

जन्ममरणाच्या तोडा येरझारा ॥६ ॥

शेवटी जनार्दनस्वामींचे शिष्य असलेले एकनाथ जागल्या होऊन आपल्या सर्वाना हितोपदेश करीत आहेत की, मायबापांनो, आपले हित कशात आहे ते ओळखून यापुढे वागा. यमराजाचा फेरा येण्याच्या आतच मोक्ष मार्गाचे सांगती व्हा. जन्ममरणाच्या चक्रातून आपली सुटका करून घ्या."

लागोनिया पाया विनवितो तुम्हाला!

करे टाळी बोला मुखी नाम!!

पुंडलिकवरदा हरी विट्ठल! श्री ज्ञानदेव तुकाराम! पंढरीनाथ महाराज की जय!!!