स्वयंचलित कापणी यंत्र (रिजर)

विवेक मराठी    10-Jul-2020
Total Views |


 Automatic Harvester_1&nb

भात हे महाराष्ट्रात कोकण-विदर्भासह कोल्हापूर, पुणे, नाशिक विभागात बहुतांश तसेच नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांचे प्रमुख पीक आहे. सिंचनाची सोय असलेल्या बागायती भागात रबी हंगामात गव्हाची लागवड केली जाते. सुधारित वाणांमुळे या पिकांच्या उत्पादनात वाढ करणे शक्य झाले. हवामानातील अनिश्चितता, कीड, रोग व इतर कारणांमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी या पिकांची काढणी वेळीच करणे आवश्यक असते.

पारंपरिक पद्धतीनुसार मजुरांद्वारे विळ्याने या पिकांची कापणी केली जाते. गहू तसेच भात पिकासाठी लागणाऱ्या एकूण मनुष्यबळापैकी जवळपास ७०% मनुष्यबळ कापणी व मळणी कामासाठी खर्ची पडते. परिसरातील शेतक-यांच्या पिकांची पक्वता एकाच कालावधीत येत असल्याने मजुरांचा तुटवडा भासतो. वाढीव मजुरीचा पैसा देऊनही काम वेळेवर पूर्ण होण्याची खात्री नसते.

पीक कापणी व काढणी स्तरावर योग्य यांत्रिकीकरणाची जोड मिळाल्यास खर्चही कमी होतो. यंत्राच्या वापरामुळे कामातील कष्ट कमी होतात, कामाची गुणवत्ता सुधारते, शिवाय कापणी वेळेत करणे शक्य होते. यासाठी स्वयंचलित कापणी यंत्र (रिजर) अशा शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरते.

हे यंत्र तीन / पाच अश्वशक्तीच्या पेट्रोल इंजिनाद्वारे कापणीचे काम करते. या यंत्राच्या पुढील भागात कापणी यंत्र व मागील भागात इंजीनची जोडणी असते. यंत्राच्या पुढे असलेल्या १ मीटर लांबीच्या कटर बारने पिकाची कापणी केली जाते.

या यंत्राने कापणी करताना पीक पट्ट्यापट्ट्याने व जमिनीलगत कापले जाते. स्टार व्हीलच्या व फिरत्या पट्ट्यांच्या मदतीने कापलेल्या पिकाची एका रांगेत उजव्या बाजूने मांडणीही करत जाते. यामुळे या पिकांच्या पेंढ्या बांधणेही सोईचे आहे.

हे यंत्र आकाराने लहान, वजनास हलकेअसल्याने, तसेच याला दोन रुंद रबरी चाके असल्याने लहान आकाराच्या, चढउताराच्या व ओल्या जमिनीतही काम करू शकते. चालकाच्या कौशल्यानुसार एका दिवसात पाच ते सहा एकर पिकाची कापणी पूर्ण करता येते. या यंत्राने पीक कापणीसाठी एकरी एक लीटर पेट्रोल लागते.

अशी स्वयंचलित कापणी यंत्रे वैयक्तिक / शेतकरी गट पातळीवर भाडेतत्त्वावर उपलब्ध झाल्यास परिसरातील पीक कापणीची कामे वेगाने उरकणे शक्य होईल.


@आरती देशमुख

@जयंत उत्तरवार

डॉ. हेडगेवार सेवा समिती
कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार