एन्काउंटर कुणाचे?

विवेक मराठी    10-Jul-2020
Total Views |
योगी सरकारला धारेवर धरणारा मीडिया, दुबे पकडला गेल्यावर (की शरण आल्यावर?) उत्तर प्रदेश सरकारच्या हेतूबाबतच संशयाची स्थिती निर्माण करतो.. आणि दुसऱ्या दिवशी विशेष कृती दलाच्या पोलिसांच्या ताफ्याबरोबर कानपूर इथे नेले जात असताना, या क्रूरकर्मा दुबेचे एन्काउंटर होते (विशेष कृती दलाने जारी केलेल्या पत्रकानुसार, पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना झालेल्या गोळीबारात दुबेचा मृत्यू झाला.), तेव्हा हाच मीडिया त्यावरूनही राज्य सरकारवर, त्यातही योगी आदित्यनाथांच्या कार्यशैलीवर टीका करण्यासाठी पुढे सरसावतो.

up_1  H x W: 0

इलेक्ट्रॉनिक वृत्तवाहिन्यांच्या समाजमनावरील प्रभावामुळे ब्रेकिंग न्यूजला प्राणवायूइतके महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याअभावी समाजव्यवहार ठप्प होतील अशा भ्रमात असलेल्या वृत्तवाहिन्या ब्रेकिंग न्यूजचा रतीब घालत असतात. त्यातही सेक्सशी आणि क्राइमशी संबंधित विषय म्हणजे ब्रेकिंग न्यूजवाल्यांचे चराऊ कुरण आणि ती क्राइम स्टोरी स्थानिक राजकारण-पोलीस-प्रशासन याच्याशी जोडलेली असेल, तर मग ब्रेकिंग न्यूजची मोठी लॉटरीच. मग त्या विषयाची मन मानेल तशी किंवा आपल्याला हवा तो अजेंडा सेट करण्यासाठी, उलटसुलट मांडणी करत, त्याचे भडक सादरीकरण करत समाजमनात त्या विषयाची तीव्रता कृत्रिमरीत्या वाढवण्यात ही माध्यमे तरबेज आहेत. आणि जिथे जिथे भाजपाचे शासन असेल तिथल्या सरकारला आंधळा विरोध हा तर (अगदी मोजके अपवाद वगळता) बहुतेकांचा एककलमी कार्यक्रम आहे.

उत्तर प्रदेशातील गुंड विकास दुबे याच्याशी संबंधित बातम्या गेले काही दिवस वृत्तवाहिन्यांनी ज्या पद्धतीने चालवल्या आहेत, त्याचा संदर्भ वरच्या विवेचनाला आहे. पकडण्यासाठी आलेल्या ८ पोलिसांची हत्या करून, राज्याची सीमा ओलांडून पळून गेलेला हा नामचीन गुंड. त्याच्या पसार होण्यावरून रण माजवणारा, योगी सरकारला धारेवर धरणारा मीडिया, दुबे पकडला गेल्यावर (की शरण आल्यावर?) उत्तर प्रदेश सरकारच्या हेतूबाबतच संशयाची स्थिती निर्माण करतो.. आणि दुसऱ्या दिवशी विशेष कृती दलाच्या पोलिसांच्या ताफ्याबरोबर कानपूर इथे नेले जात असताना, या क्रूरकर्मा दुबेचे एन्काउंटर होते (विशेष कृती दलाने जारी केलेल्या पत्रकानुसार, पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना झालेल्या गोळीबारात दुबेचा मृत्यू झाला.), तेव्हा हाच मीडिया त्यावरूनही राज्य सरकारवर, त्यातही योगी आदित्यनाथांच्या कार्यशैलीवर टीका करण्यासाठी पुढे सरसावतो.

बिहार, उत्तर प्रदेश ही तिथल्या राज्य सरकारांच्या कर्तृत्वापेक्षा बाहुबलींच्या वर्चस्वामुळेच आतापर्यंत कुप्रसिद्ध असलेली राज्ये. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने आणि बसपाने आपल्या कार्यकाळात या बाहुबलींना मोकळे रान दिले. या गुन्हेगारांची समाजावर असलेली दहशत आणि त्यातून निर्माण झालेल्या अनेक समस्या हीच उत्तर प्रदेशची आतापर्यंतची ओळख. त्या वेळच्या राज्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे या बाहुबलींची पैदास फोफावली. देशातले हे सर्वात मोठे राज्य गुन्हेगारीच्या सर्वदूर पसरलेल्या साम्राज्यामुळे कायम मागासपणाचा शिक्का माथी मिरवत राहिले. हा कलंक पुसून टाकण्याचा निश्चय करत गुन्हेगारीचा आणि गुन्हेगारांचा बीमोड करण्यासाठी, सत्तेवर येताच योगी आदित्यनाथांनी झपाट्याने पावले उचलली. कार्यकाळाच्या पहिल्या सव्वा वर्षात केलेल्या तीन हजार एन्काउंटर्समध्ये उत्तर प्रदेशातल्या ७०पेक्षा जास्त गुन्हेगारांना ठार मारण्यात आले. गुंडगिरी मोडून काढत, गुंडांवर वचक निर्माण करत आणि सामान्य जनतेला आश्वस्त करत, विरोधकांनी वेळोवेळी निर्माण केलेल्या अडथळ्यांना मोठ्या हिमतीने पार करत योगींचा कारभार चालू होता. कोविड-१९ने तर या राज्यासमोर आणखी एक नवे संकट निर्माण केले, ते म्हणजे रोजीरोटीसाठी अन्य राज्यात गेलेल्या स्थानिकांचे आपल्या मूळ गावी परतणे. ते कोरोनाबाधित असण्याच्या शक्यतेतून अनेक समस्या निर्माण होणार होत्या आणि त्यांना राज्यात रोजगार उपलब्ध करून देणे हेदेखील आव्हान होते. या अतिशय आव्हानात्मक परिस्थितीवर स्वार होत, संकटाचे संधीत रूपांतर करण्याचे कसब योगींनी दाखवून दिले आणि विरोधी माध्यमांना अधिकच चेव चढला.

योगींचे एकीकडे राज्यातल्या गोरगरीब जनतेला मूलभूत गरजांच्या पूर्तीबाबत आश्वस्त करणेही चालू होते, नियोजनबद्ध कामातून ते एकेक पाऊल पुढे टाकत होते आणि त्याच वेळी राज्यकर्त्यांवर असलेली गुन्हेगारांची हुकमत मोडून काढणेही चालू होते. उत्तर प्रदेशात केवळ राजकारणाचे गुन्हेगारीकरण झालेले नाही, तर तिथल्या पोलीस दलालाही ही कीड लागलेली आहे. या सर्वांच्या अभद्र संगनमतातून राज्याची पीछेहाट, जनतेचे शोषण खुलेआम चालू होते. या सगळ्याला योगींच्या धडक कृतीकार्यक्रमांमुळे कुलूप लागले. इतक्या गुंडांना यमसदनी धाडले असले, तरी ही कीड खूप खोलवर पोहोचलेली आहे आणि त्यातले काही म्होरके समाजात उजळ माथ्याने वावरत आहेत, याची योगींना कल्पना होती. ८ पोलिसांची निर्घृण हत्या करणाऱ्या विकास दुबेवर त्या आधीच्या ६० गंभीर गुन्ह्यांचा आरोप आहे. असा क्रूरकर्मा योगींच्या हिटलिस्टवर असणे साहजिक होते. मात्र त्याला पकडायला गेलेल्या पोलिसांचीच हत्या करत त्याने राज्याबाहेर पलायन केले. हे म्हणजे योगींसारख्या निडर राज्यकर्त्याला ललकारणे होते. त्याचा शोध घेण्याची मोहीम चालू ठेवत त्याच्याभोवतीचे सर्व फास आवळायला योगींनी सुरुवात केली. त्याच्या मालमत्तेवरून नांगर फिरवला आणि हस्तकांनाही ताब्यात घेतले. कोणाकोणाच्या मदतीने उज्जैनमधल्या महांकाल मंदिरापर्यंत पोहोचलेल्या दुबेला, शरण गेलो तर जीव वाचेल असे वाटल्याने दुबेने स्वतःला अटक करवून घेतली. (?!)

सरतेशेवटी, समाजस्वास्थ्याला कीड लावणाऱ्या आणि राज्य सरकारला गुंगारे देत, नामोहरम करत निसटणाऱ्या या गुन्हेगाराचे एन्काउंटर झाले.हे काही नव्याने घडत नाहीये. महाराष्ट्रातही, युतीच्या शासनकाळात तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी, डोईजड झालेल्या गुन्हेगारी टोळ्यांना नष्ट करण्याचे आदेश पोलीस खात्याला दिले होते. त्यातूनच अरुण गवळी, छोटा राजन आणि दाऊद इब्राहिम यांच्या कारवायांना चाप बसला. तात्पर्य - एन्काउंटर हा गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचा, गुन्हेगारांमध्ये दहशत बसवण्याचा शेवटचा आणि परिणामकारक उपाय असतो. विकास दुबेच्या एन्काउंटरमागेही हाच विचार असेल.
अशा वेळी प्रश्नाचे गांभीर्य समजण्याची संवेदनशीलता गमावलेले, मानवाधिकाराच्या गोंडस विशेषणाखाली एका गुन्हेगाराच्या बाजूने उभे राहणारे खरे तर समाजातल्या हजारो निरपराध नागरिकांचे गुन्हेगार असतात. राजकीय आश्रयामुळे आणि पोलीस दलातल्या काहींच्या वरदहस्तामुळे गुन्हेगारी फोफावत असेल, तर मदत करणाऱ्यांचा बीमोड करतानाच मूळ गुन्हेगारालाही नेस्तनाबूत करावे लागते. ज्याचे अर्ध्याहून अधिक आयुष्य लोकांचा बळी घेण्यात, दहशत पसरवण्यात गेले, त्याच्या मानवाधिकाराची चर्चा करणे म्हणजे या संकल्पनेचीच कुचेष्टा नाही का?

विकास दुबे ही व्यक्ती नाही तर दुष्प्रवृत्तीचे प्रतीक आहे. एन्काउंटर झाले असेल तर त्या प्रवृत्तीचे झाले आहे.