मालेगाव पॅटर्न - प्रतिमा आणि वास्तव

विवेक मराठी    11-Jul-2020
Total Views |

"या भागात कोणत्याही प्रकारचं सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलेलं नाही. मी मास्क लावून घराबाहेर पडतो, तर मला बरेच लोक हसतात. अल्लाहच्या मनात येईल तेव्हा मृत्यू होईल, तोपर्यंत आपलं कुणी काहीही वाकडं करू शकत नाही, हिंदू लोक मृत्यूला जास्त घाबरतात, आपण मुसलमान आहोत आपण का घाबरायचं, अशा प्रकारच्या समजुती येथील लोकांमध्ये आहेत..” मालेगावातील डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते इफ्तिकार अहमद सांगत होते. विषय होता गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला मालेगाव पॅटर्नआणि त्याला जोडून कोरोनाशी संबंधित आणि इतर सामाजिकराजकीय विषय.


Malegaon Pattern - Image

“मध्य किंवा पूर्व मालेगावात गरीब आणि अशिक्षित लोकसंख्या अधिकांश प्रमाणात आहे, जी मुस्लीमबहुल आहे. या भागात कोणत्याही प्रकारचं सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलेलं नाही. मी मास्क लावून घराबाहेर पडतो, तर मला बरेच लोक हसतात. या अशा वर्तणुकीत लोकांवरील धार्मिक पगड्याचा वाटा खूप मोठा आहे. अल्लाहच्या मनात येईल तेव्हा मृत्यू होईल, तोपर्यंत आपलं कुणी काहीही वाकडं करू शकत नाही, हिंदू लोक मृत्यूला जास्त घाबरतात, आपण मुसलमान आहोत आपण का घाबरायचं, अशा प्रकारच्या समजुती येथील लोकांमध्ये आहेत. यामुळे येणाऱ्या काळात आम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत..” मालेगावातील डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते असलेले इफ्तिकार अहमद सांगत होते. विषय होता गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला ‘मालेगाव पॅटर्न’ आणि त्याला जोडून कोरोनाशी संबंधित आणि इतर सामाजिक–राजकीय विषय. कोरोना राज्यात आणि देशात संथगतीने पसरत असताना मालेगावमध्ये मात्र तो एकाच महिन्यात झपाट्याने पसरला होता आणि या व याच्याशी संबंधित इतर अनेक कारणांमुळे मालेगाव पुन्हा एकदा नकारात्मकदृष्ट्या चर्चेत आलं होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र ‘मालेगाव पॅटर्न’चा बोलबाला झालेला असून यामध्ये प्रशासनाचे प्रयत्न, नियोजन, समाजाची वाढलेली ‘इम्युनिटी’, मालेगावचा गाजत असलेला ‘युनानी काढा’ इ. गोष्टींचा समावेश होतो. यामुळे यातील वास्तव काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न सा. ‘विवेक’ने केला आणि याअंतर्गत मालेगावमधील वा मालेगावशी संबंधित विविध क्षेत्रांतील, स्तरांतील व्यक्तींशी चर्चा झाली. पैकी, हे डॉ. इफ्तिकार अहमद यांच्या मते ‘मालेगाव पॅटर्न’ नावाची काहीच गोष्ट अस्तित्वात नाही.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik

‘विवेक’शी बोलताना ते म्हणाले, “या ‘पॅटर्न’ची आज प्रसिद्धी झाली आहे, लोक इथे येऊन फोटो वगैरे काढत आहेत. परंतु इथे पॅटर्न वगैरे काही नसून केवळ गोंधळ आहे. या मालेगाव पॅटर्नच्या नावाखाली इथे प्रत्येक डॉक्टर वेगवेगळी माहिती सांगतोय, वेगवेगळी औषधं देतोय आणि याची चुकीच्या पद्धतीने प्रसिद्धी करण्यात येत आहे. या शहरात बहुसंख्य वस्ती पॉवरलूम उद्योगातील कामगारांची आहे आणि त्यांच्यामध्ये गरिबी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या भागात आरोग्याची काळजी घेणं, स्वच्छता राखणं, डिस्टन्सिंग पाळणं वगैरे गोष्टी अजिबात नाहीत.” ते पुढे म्हणाले, “बरेच डॉक्टर्स प्रतिनियुक्तीवर इथे आले आहेत, मात्र पहिले काही दिवस क्वारंटाइन न होता लगेचच सेवेत रुजू होत आहेत. माझ्या परिचयातील एक डॉक्टर भिवंडीहून आले होते. ते रुग्णांना ऊठसूठ सलाइन लावत होते, अँटिबायोटिक्सचे डोस देत होते. थोडक्यात, जो-तो आपापल्या मनमानी पद्धतीने काम करत आहे.” या डॉ. इफ्तिकार यांच्याप्रमाणेच मालेगावमध्ये मुस्लिमांमध्ये काम करणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्याने, मुस्लीम धार्मिक नेतृत्व या सगळ्यात अत्यंत बेजबाबदारपणे वागत असून लॉकडाउन असताना आणि आजही मालेगावात बेसुमार प्रमाणात मशिदी खुल्या आहेत, मोठ्या संख्येने नमाजपठण होत असल्याचं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं. तीन-चार मशिदी पोलीस स्थानकाच्या जवळ आहेत, तेवढ्या बंद राहतात, बाकी सर्व खुल्या आहेत, असंही ते म्हणाले. लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्याशी चर्चा केली असता संमिश्र प्रतिक्रिया व मतं पाहायला मिळाली.
 

आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन या सर्वांमधील समन्वय आणि सुसूत्रतेने केलेल्या प्रयत्नांतून हा आजचा मालेगाव पॅटर्न निर्माण झाला आहे. रुग्ण आढळल्यानंतर त्याचं ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’, लोकांनी काळजी घेणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं, इम्युनिटी बूस्टर्स घेणं, महापालिकेच्या आरोग्य विभागाची सर्वेक्षणं, प्रशासन व पोलीस यंत्रणेचे परिश्रम आदी गोष्टींचा परिणाम सकारात्मक दिसून आला.

- डॉ. शुभांगी केदारे, वर्ग १ वैद्यकीय अधिकारी, सामान्य रुग्णालय, मालेगाव.
 


मी मास्क लावून घराबाहेर पडतो, तर मला बरेच लोक हसतात. या अशा वर्तणुकीत लोकांवरील धार्मिक पगड्याचा वाटा खूप मोठा आहे. अल्लाहच्या मनात येईल तेव्हा मृत्यू होईल, तोपर्यंत आपलं कुणी काहीही वाकडं करू शकत नाही, हिंदू लोक मृत्यूला जास्त घाबरतात, आपण मुसलमान आहोत आपण का घाबरायचं, अशा प्रकारच्या समजुती येथील लोकांमध्ये आहेत.
- डॉ. इफ्तिकार अहमद, डॉक्टर व सामाजिक कार्यकर्ते
 
 
आज मालेगावची लोकसंख्या जवळपास १२ लाख इतकी असून त्यापैकी मुस्लीम लोकसंख्या ७५ टक्क्यांच्या आसपास, तर हिंदू लोकसंख्या २० टक्क्यांच्या आसपास आहे. मालेगावमधून गेल्या १० टर्म्सपासून सातत्याने मुस्लीम आमदार निवडून आले असून २०१९मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन अर्थात एमआयएम या मुस्लीम कट्टरवादी पक्षाचे मुफ्ती मोहम्मद इस्माइल खालिक निवडून आले आहेत. महापालिकेत काँग्रेस आणि शिवसेना यांच्या आघाडीची सत्ता असून काँग्रेसच्या ताहेरा शेख या महापौर व शिवसेनेचे निलेश आहेर उपमहापौर आहेत. शिवाय, २०१७च्या महापालिका निवडणुकीत एकूण ८४पैकी ५९ मुस्लीम नगरसेवक निवडून आले होते. मालेगाव हे गेल्या जवळपास शंभरेक वर्षांपासून वस्त्रोद्योगाचं केंद्र आहे. पूर्व मालेगाव किंवा मध्य मालेगाव हा शहराचा मुख्य व जुना भाग मुस्लीमबहुल, तर पश्चिमेचा तुलनेने नवा भाग बऱ्यापैकी हिंदू लोकसंख्या असलेला. मालेगावातून वाहणारी मौसम नदी ही या पूर्व-पश्चिमेची विभागणी करते. आजही मोठ्या प्रमाणावर मुस्लीम समाज पॉवरलूम व्यवसायात असून त्यामुळे मुस्लीमबहुल भागातील अनेकांना श्वसनसंस्थेचे आजार असतात. याशिवाय, अत्यंत दाटीवाटीची वस्ती, घनदाट लोकसंख्या, अस्वच्छता व अनारोग्य ही या भागाची काही प्रमुख वैशिष्ट्यं. येथील समाजही मोठ्या प्रमाणात अशिक्षित, निम्न आर्थिक स्तरातील आणि प्रचंड प्रमाणात धार्मिक पगडा असलेला.


Malegaon Pattern - Image

हे सर्व सांगण्याचं कारण इतकंच की मालेगावचा एकूण सामाजिक–राजकीय–सांस्कृतिक–आर्थिक पोत वाचकांच्या थोडक्यात लक्षात यावा. आता वळू कोरोनाकडे. गुरुवार, दि. ९ जुलैच्या आकडेवारीनुसार मालेगावात एकूण कोरोनाबाधितांची संख्या १११८ इतकी होती व गुरुवारी एका दिवसात १३ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. तसंच, आतापर्यंत कोरोनामुळे ७९ मृत्यूंची नोंद झाली असून गुरुवारी ३ मृत्यू झाले. दि. ८ एप्रिल रोजी मालेगावमध्ये पहिल्या रुग्णांची (एकाच वेळी पाच) नोंद झाली. लगेचच दुसऱ्या दिवशी आणखी पाच जण पॉझिटिव्ह सापडले. यानंतर हा आकडा वाढत गेला आणि एप्रिल अखेरपर्यंत संपूर्ण नाशिक जिल्ह्यात २७६ रुग्ण आणि पैकी २५३ एकट्या मालेगाव शहरात, अशी परिस्थिती निर्माण झाली. यामुळे मालेगाव हा संपूर्ण राज्याच्या, सरकारच्या व प्रशासनाच्या दृष्टीने मोठाच चिंतेचा विषय बनला. यामागे जसा हा वाढता आकडा कारणीभूत होता, तसंच इतरही अनेक कारणं होती, जी तितकीच गंभीर होती. यामध्ये मुस्लीम समाजातील नागरिकांनी रुग्णालयांत गोंधळ घालणं, ऑक्सिजन सिलेंडर महिला डॉक्टरवर फेकून मारणं (सुदैवाने त्या यातून बचावल्या), पोलीस गावांमध्ये फिरत असताना त्यांच्या दुचाकी–चारचाकी वाहनांवर थुंकणं, रुग्णवाहिकेच्या चालकाला मारहाण करून त्याच्या अंगावर थुंकणं अशा अनेक गोष्टींची मोठी यादी होती. धार्मिक कारण पुढे करत स्वॅब न देणं, पथ्यं न पाळणं, मास्क वगैरे काहीही परिधान न करता सोशल डिस्टन्सिंगदेखील न पाळणं याही आणखी काही गोष्टी. इतकंच नव्हे, तर एमआयएम पक्षाचे स्थानिक आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माइल यांनी शहरातील सामान्य रुग्णालयात जाऊन डॉक्टरशी हुज्जत घातल्याचाही प्रकार घडला. अर्थात, मुफ्ती यांनी या वृत्तांचा इन्कार करत ही घटनादेखील कोरोनाच्या पूर्वीची असल्याचा दावा केला. मात्र, या सगळ्यामुळे मालेगावची प्रतिमा इतकी मलीन झाली की आधीच स्थानिक आरोग्य यंत्रणा अपुऱ्या साधन–सुविधांनिशी धडपड करत असताना मालेगावमधून अन्य शहरांत दाखल केल्या जाणाऱ्या रुग्णांना लाल सिग्नल मिळू लागला. यालाही धार्मिक रंग देऊन ‘मुस्लीम समाजातील रुग्णांना इतर शहरातील रुग्णालयांत जाणीवपूर्वक घेतलं जात नाही’ अशी ओरड झाली. शिवाय, परिस्थिती नियंत्रणात राहत नसल्याने मालेगावात अतिरिक्त पोलीस कुमक मागवावी लागली, ज्यात जवळपास हजारेक पोलिसांचा व एसआरपीएफच्या जवानांचा समावेश होता. यातील सुमारे २२० जवान कोरोनाबाधित झाले होते. या सगळ्या घटनांमुळे ‘या तुकड्या मुस्लीम वस्तीच्या बाहेरच, जिथे मुस्लीम वस्ती संपते आणि हिंदू वस्ती सुरू होते अशा सीमेवर थांबत असत, ते आत वस्तीत जात नव्हते’ असाही आरोप केला जातो.


मुस्लीम धर्मगुरू, मौलाना इ. मंडळी मुस्लीम समाजाची दिशाभूल करत आहेत. मुस्लीम समाजातील लोक स्वॅब द्यायला पुढे येत नाहीत. स्क्रीनिंगला, टेस्टिंगला पश्चिम भागातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. परंतु पूर्व भागात अजूनही अपेक्षित प्रतिसाद नाही. त्याऐवजी मुस्लीम समाजातील लोक अमुक काढा घे, होमिओपॅथीच्या गोळ्या घे यावर अधिक भर देत आहेत. तरीदेखील मालेगावमधील परिस्थिती पूर्वीपेक्षा बरीच सुधारली आहे, आधी मालेगावच्या रुग्णांना अन्य कोणत्याही शहरात घेत नव्हते. आता मालेगावात बाहेरून रुग्ण उपचारांसाठी येत आहेत.
- निलेश आहेर, उपमहापौर, मालेगाव (शिवसेना).
 

सीएए–एनआरसीचा विषय मागे पडण्यासाठी मोदींनी कोरोनाचा विषय पुढे आणला आहे’ अशा प्रकारचा प्रचार मुस्लीम नेत्यांकडून समाजात करण्यात आला. याचा शहराला आणि प्रशासनाला खूप त्रास झाला. एक-दीड महिना हीच परिस्थिती राहिली. एप्रिल-मेच्या काळात जवळपास दीड ते दोन हजारांच्या आसपास मृत्यू झाले असावेत, असा आमचा अंदाज आहे. स्वॅब न दिल्यामुळे यातील बरेच मृत्यू अन्य कारणांमुळे दाखवण्यात आले असावेत.
- सुनील गायकवाड, गटनेते, भाजपा 
 

दरम्यान, जसजसे राज्यातील इतर भागात कोरोना रुग्ण वाढू लागले, तसं मालेगाव चर्चेतून मागे पडू लागलं. आणि आता पुन्हा मालेगाव चर्चेत आलं, मात्र ते कोरोना नियंत्रणाच्या कारणासाठी. मालेगावात उपचारांसाठी रुग्ण येऊ लागले, मालेगावचे डॉक्टर्स बाहेर जाऊ लागले, मालेगावच्या ‘युनानी काढ्या’ला अचानक मागणी वाढली. या ‘मालेगाव पॅटर्न’बाबत बोलताना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, प्रशासनाने केलेले सामूहिक प्रयत्न, समन्वय–नियोजन इ.बद्दल बोलतात. प्रारंभीच्या काळातील गोंधळ सोडल्यास तसे प्रामाणिक प्रयत्न घडलेदेखील आहेत आणि शहरातील सर्वपक्षीय नेते, विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळी ही बाब मान्यदेखील करतात. उपविभागीय दंडाधिकारी विजयानंद शर्मा, तसेच मालेगाव सामान्य रुग्णालयाच्या वर्ग-१ वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी केदारे आदींनी जिल्हा व महापालिका, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन या सर्वांमधील समन्वय आणि सुसूत्रतेने केलेल्या प्रयत्नांतून हा आजचा मालेगाव पॅटर्न निर्माण झाला असल्याचं सांगितलं. "सुरुवातीला आरोग्य विभागाकडे सोयीसुविधा व अन्य सामग्री आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध नव्हती. परंतु सेवाभावी संस्था, राजकीय नेतृत्व आदींकडून मोठी मदत झाली. रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेकडून त्याचं ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ वेगाने झालं. यामुळे मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण सापडू शकले” अशी प्रतिक्रिया दिली. याशिवाय, लोकांनी काळजी घेणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं, इम्युनिटी बूस्टर्स घेणं, महापालिकेच्या आरोग्य विभागाची सर्वेक्षणं, प्रशासनाचे व पोलीस यंत्रणेचे परिश्रम आदी गोष्टींचा परिणाम सकारात्मक दिसून आल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र दुसरीकडे, “स्वॅब टेस्ट या आपल्याला लक्षणं आढळल्यास आपणहोऊन दाखल होऊन करून घेणं अपेक्षित आहे. आम्ही कुणावर जबरदस्ती करू शकत नाही. लोकांमध्ये भीती असते की आपण पॉझिटिव्ह सापडलो, तर आपल्याला चौदा दिवस क्वारंटाइन व्हावं लागेल, आपल्या कुटुंबीयांना सोडून राहावं लागेल. त्यामुळे लोक आजही स्वतःहोऊन चाचण्यांसाठी येत नाहीत” अशीही माहिती महापालिका आरोग्य विभागाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
 

आयुष मंत्रालयाने जो काढा सांगितला आहे, तेच सर्व घटक या मालेगावच्या युनानी काढ्यात आहेत. उदा. दालचिनी, लवंग, काळीमिरी, सुंठ वगैरे. मालेगावमध्ये मन्सुरा या युनानी वैद्यकशास्त्राशी संबंधित वैद्यकीय शिक्षणसंस्थेने “या काढयाने रोगप्रतिकारशक्ती वाढते व कोरोनासारखा कोणताही आजार होत नाही” अशा प्रकारचा प्रचार चालवला आहे. सरकारी पातळीपासून सर्वांनी हा ‘मालेगावचा काढा’ म्हणून उचलून धरला आहे आणि त्यातून त्याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळते आहे. यापलीकडे ‘मालेगाव पॅटर्न’मध्ये फारसं काही तथ्य नाही.

- सुरेश निकम, भाजपा मालेगाव जिल्हाध्यक्ष
 

Malegaon Pattern - Image  

थोडक्यात, बिगर राजकीय / प्रशासकीय व्यक्ती आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया विसंगत वाटतात. मूळ मुस्लीम प्रश्नावर प्रशासन ठाम भूमिका घेत नाही, कारण सरकारचा दबाव आणि त्यामुळे चांगले प्रयत्न करूनही प्रशासनाला अपेक्षित निकाल मिळत नाहीत, असं बाकीचे लोक सांगतात. थोडक्यात, पुन्हा विषय एकाच मुद्द्यावर येऊन घुटमळतो आणि तो मुद्दा केवळ कोरोनाशी किंवा आरोग्य व्यवस्थेशी संबंधित नसून धार्मिक, राजकीय आणि मुख्य म्हणजे आपल्या एकूणच नागरी व्यवस्थेशी संबंधित असल्याने त्याबाबत फारसं कुणी स्पष्टपणे बोलायला तयार होत नाही. उपमहापौर निलेश आहेर या सर्व विषयाबाबत बोलताना म्हणाले की, “मालेगाव पूर्व वा मध्य भागातील मुस्लीम वस्तीत अजूनही सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलेलं नाही, मास्क लावले जाताना दिसत नाहीत. धार्मिक अंधश्रद्धाही यामागे मोठ्या प्रमाणावर आहेत. मुस्लीम धर्मगुरू, मौलाना इ. मंडळी मुस्लीम समाजाची दिशाभूल करत आहेत. मुस्लीम समाजातील लोक स्वॅब द्यायला पुढे येत नाहीत. स्क्रीनिंगला, टेस्टिंगला पश्चिम भागातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. परंतु पूर्व भागात अजूनही अपेक्षित प्रतिसाद नाही. त्याऐवजी मुस्लीम समाजातील लोक अमुक काढा घे, होमिओपॅथीच्या गोळ्या घे यावर अधिक भर देत आहेत.” दुसरीकडे, मालेगावमधील परिस्थिती पूर्वीपेक्षा बरीच सुधारली आहे, आधी मालेगावच्या रुग्णांना अन्य कोणत्याही शहरात घेत नव्हते, आता मालेगावात बाहेरून रुग्ण उपचारांसाठी येत आहेत. मुस्लीम समाजामध्ये जागृती वाढवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी बरेच प्रयत्न केल्यामुळे पूर्वीपेक्षा परिस्थिती चांगली असल्याचा दावा आहेर यांनी केला.
 

मालेगावच्या मुस्लीम भागात आजदेखील कोणत्याही प्रकारचं सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाताना दिसत नाही. ना मास्कसारख्या गोष्टी वापरणं, ना अंतर राखणं, ना इतर गोष्टी. तरीदेखील मालेगावच्या मुस्लीम भागातून आज कोरोनाचे मृत्यू कमी दिसत आहेत आणि हिंदू वस्तीच्या भागातून वाढत असल्याचं चित्र आहे. हे कसं, याचंच सर्वांना कुतूहल वाटत आहे.
- बन्सीभाऊ कांकरिया, सामाजिक कार्यकर्ते, उर्दू भाषेचे अभ्यासक 
 
 

लोकांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे भीतीचं वातावरण होतं, ती भीती आम्ही संपवली. सुरुवातीपासून येथे प्रशासनाने काहीही नियोजन केलं नव्हतं. मुस्लीम धार्मिक नेतृत्व मुस्लीम समाजाला भडकवत आहे वा दिशाभूल करत आहे, ही गोष्ट खरी नाही. मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं यासाठी आम्ही सुरुवातीपासून लोकांमध्ये आवाहन केलं आहे.
 
- मुफ्ती मोहम्मद इस्माइल खालिक, आमदार – मालेगाव (एमआयएम)


हॉस्पिटलमध्ये गोंधळ प्रकरणामुळे आधीपासूनच वादात सापडलेले एमआयएम आमदार मुफ्ती इस्माइल यांनी मात्र आम्ही इथे लॉकडाउन वगैरे बाजूला ठेवून लोकांची सेवा केल्याचं ‘विवेक’शी बोलताना सांगितलं. “जेव्हा कोरोनाने लोकांचे मृत्यू झाले तेव्हा त्यांचे शरीर दफानासाठी तीन लेयर्समध्ये बांधून आठ फूट खोल कबर खोदून दफन करण्याच्या आणि अंत्यविधीसाठी वीस लोकांहून अधिक असू नयेत अशा सूचना होत्या. मात्र मालेगावमध्ये आम्ही मृत व्यक्तींचं शव आणून, त्यांचं पॅकिंग उघडून नेहमीच्या धार्मिक पद्धतीने त्यावर अंत्यसंस्कार केले व दफन केलं. लोकांमधील भीती दूर करण्यासाठी आम्ही असं केलं. कारण लोक कोरोनामुळे नव्हे, तर त्याच्या भीती आणि दहशतीमुळे मरत होते.” असंही मुफ्ती यांनी सांगितलं. दुसरीकडे, मुस्लीम समुदायाकडून सोशल डिस्टन्सिंग न पाळलं जाणं, कायदा हाती घेणं इ.बाबत विचारलं असता त्यांनी प्रशासनाकडे बोट दाखवत प्रशासनाने सुरुवातीपासून काहीच नियोजन केलं नसल्याने असं घडल्याचं सांगितलं, तर महापालिकेतील भाजपा गटनेते सुनील गायकवाड यांनी सांगितलं की, “मोदींनी सीएए–एनआरसीचा विषय मागे पडण्यासाठी कोरोनाचा विषय पुढे आणला आहे, अशा प्रकारचा प्रचार मुस्लीम नेत्यांकडून समाजात करण्यात आला. याचा शहराला आणि प्रशासनाला खूप त्रास झाला. एक-दीड महिना हीच परिस्थिती राहिली.” पुढे बोलताना, एप्रिल-मेच्या काळात जवळपास दीड ते दोन हजारांच्या आसपास मृत्यू झाले असावेत, असा आमचा अंदाज आहे. स्वॅब न दिल्यामुळे यातील बरेच मृत्यू अन्य कारणांमुळे दाखवण्यात आले असावेत, अशीही शंका त्यांनी व्यक्त केली. “धार्मिक कारणांमुळे स्वॅब न दिल्याने चाचणी होत नव्हती, त्यामुळे अपेक्षित रुग्णसंख्या दिसत नव्हती, त्यामुळे राज्यातील इतर शहरांत आकड्यांत वाढ, मात्र मालेगावात घट असं चित्र दिसत होतं.” असाही मुद्दा गायकवाड यांनी जोडला. त्यामुळे ही सर्व परिस्थिती पाहता, वरवर चित्र आनंददायक दिसत असलं, तरी प्रत्यक्ष परिस्थिती आणि चित्र यांमध्ये बरीच तफावत असल्याचं स्पष्ट होतं.

आज देश नव्या उर्जेने या कोरोनाच्या संकटाचा सामना करू पाहतोय, आणि इथे अद्यापही प्राथमिक समस्यांशीच लढा संपलेला नाही. प्रत्यक्ष लोकांशी बोलताना लक्षात येतं की 'कळतंय पण वळत नाही'. पुन्हा पुन्हा आपण त्याच त्या प्रश्नांपाशी घुटमळत राहतो. या प्रश्नांवर उकल शोधायचा प्रयत्न केल्यास किंवा त्याकडे लक्ष वेधल्यास मात्र तुमच्यावरच सांप्रदायिकतेचा, जातीयवादाचा शिक्का मारला जातो. या फॅशनमुळे आधीच देशाचं आणि देशातील मालेगावसारख्या शहरांचं, तेथील समाजाचं बरंच नुकसान झालं आहे. किमान आतातरी मूळ मुद्द्याच्या अवतीभवती न घुटमळता त्याच्याशी थेट भिडण्याची तयारी आपल्याला करावीच लागेल, हेच या सर्व परिस्थितीतून पुन्हा एकदा स्पष्ट होतं.