कोरोना आणि कोकोनट

विवेक मराठी    13-Jul-2020
Total Views |
@विनय सामंत

भारतातील एका वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधन लेखात नारळाचे तेल हे कोरोनाला रोखण्यात उपयुक्त ठरेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानिमित्ताने नारळाच्या तेलाच्या विशेषतः व्हर्जिन कोकोनट आॅईलच्या औषधी गुणांकडे लक्ष वेधणारा अभ्यासपूर्ण लेख.


corona_1  H x W
 
लेख वाचण्यापूर्वी मी वाचकांना सांगू इच्छितो की मी कुठल्याही क्षेत्रात डॉक्टर नाही. मी वैद्यकीय क्षेत्राशी निगडित कुठलेही प्रशिक्षण घेतलेले नाही. अर्थात मी कुठल्याही पॅथीचे किंवा औषध/काढा इ. कशाचे समर्थन किवां खंडन करायला हे लिहीत नाहीये. मी २० वर्षे सॉफ्टवेअर क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ असून भारतीय/प्रादेशिक भाषेतील वेबसाइट्स, अॅप, सर्च इंजीन ही माझी कार्यक्षेत्रे आहेत. महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वेबसाइटचा मी अधिकृत डेव्हलपर आहे. नारळ ह्या क्षेत्रात काम करता यावे, म्हणून मी ८ वर्षांपूर्वी कोकणात आलो आणि अभ्यास करता करता नारळाशी निगडित अनेक विषयांची ओळख झाली. ह्या लेखात मी मांडत असलेले सारे विचार व अनुभव माझे स्वत:चे आहेत. त्याविषयी कोणाचेही दुमत असू शकते.

कोरोना - कोविड-१९विरुद्धच्या लढ्यात नारळ व नारळाची उत्पादने खूप निर्णायक भूमिका बजावणार, ह्यात शंका नाही. 'ओल्या नारळाचे तेल' हे केवळ एक तेल नसून औषध आहे आणि विविध आजारांवर चमत्कारिक परिणाम सिद्ध झाले आहेत. पण हा 'चमत्कार' शब्द विज्ञानाला आणि एक विज्ञाननिष्ठ अभ्यासक म्हणून मलादेखील मान्य नाही. म्हणून हे का होते, ते वैज्ञानिक दृष्टीकोनातून मांडणे आवश्यक आहे.

'नारळाचे तेल' म्हटले की आपल्याला आठवते पॅराशूटची निळी बाटली. कोकणात अनेक ठिकाणी नारळाचे तेल काढण्याचे घाणे आहेत व अनेक लोक आपापल्या नारळांचे तेल काढून वापरतात, विकतात. केरळ, आंध्र यासारख्या दाक्षिणात्य राज्यांत तर खाद्यतेल म्हणून नारळाच्या तेलाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. आपल्याकडे 'नारळाचे तेल' म्हणजे सुक्या खोबऱ्याचे तेल म्हणून व विशेषत: मसाज किंवा डोक्यावर घालण्यासाठी म्हणून माहीत आहे. हे तेल व्यवहारात 'Copra Oil' म्हणून ओळखले जाते. कोप्रा म्हणजे सुकवलेले खोबरे. मी ह्या तेलाबद्दल बोलत नाहीये!

ह्याव्यतिरिक्तदेखील नारळाचे एक तेल आहे, ज्याला VCO (व्हर्जिन कोकोनट ऑइल - Virgin Coconut Oil) म्हणून ओळखतात. ओल्या खोबऱ्यातील किंवा कुठल्याही पदार्थाची अवस्था न बदलता, मूळ नैसर्गिक गुणधर्म राखून जर तेल वेगळे करता आले, तर त्याला व्हर्जिन ऑइल असे म्हणतात. खोबरे न सुकवता, त्यावर कुठलीही रासायनिक प्रक्रीया न करता जे तेल वेगळे करतात, त्याला 'व्हर्जिन कोकोनट ऑइल’ म्हणतात. हे करण्याच्यादेखील चार पद्धती आहेत. मुख्यत्वे ओल्या खोबऱ्याचा रस (ज्याला नारळाचे दूध असेही म्हणतात) काढतात. नारळाच्या रसात मोठ्या प्रमाणावर फॅट/तेल असते. हे वेगळे करण्यासाठी -

* नारळाचा रस थंड करून तसेच ठेवतात. साधारण ८ ते १२ तासात मेद (fat) घट्ट होऊन वर तरंगते व ते वेगळे करता येते. पण ह्यात मोठ्या प्रमाणात आर्द्रता असते. नारळाच्या लोण्यासारखा प्रकार! हे लोणी कमी तापमानाला गरम करून त्यातील तेल वितळवून वेगळे करतात.

* नारळाचा रस थंड करण्याऐवजी तो सडू देतात. नारळाचा रस खूप बाष्पनशील (volatile) असतो. पटकन सडायला लागतो. कल्चर घालूनही काही वेळा हे करता येते. ह्या प्रक्रियेतदेखील नारळाचे मेद (fat) नैसर्गिकरीत्या वेगळे होऊन तरंगतात व वेगळे करता येतात. पण ह्या तेलाला भयंकर घाणेरडा वास येतो.

* वरील प्रक्रियेत आपल्या लक्षात आले असेल की नारळाच्या दुधातील मेदाचे पाण्याबरोबर असलेले बांध तोडणे हा मुख्य विषय आहे. पण सडवून किंवा गरम करून हे केले, तर ह्या तेलाचे गुणधर्म बदलतात व ते खऱ्या अर्थाने 'व्हर्जिन' राहत नाही. म्हणून नारळ संशोधन केंद्र व युनिव्हर्सिटीने ह्याची एक state of the art, industry grade पद्धत शोधली आहे. नारळाचे हे दूध १०००० ते १२००० RPMच्या वेगात अपकेंद्री (centrifugal) पंपात जोरात गोल फिरवतात. ह्या अपकेंद्री बलाच्या (centrufugal forceच्या) प्रभावाने मेद व पाणी वेगळे होते व तेल वेगळे बाहेर पडते. मुख्य म्हणजे नारळाच्या खोबऱ्यात/दुधात असलेले सारे गुणधर्म जसेच्या तसे आपल्याला तेलात मिळतात. ही सर्वात चांगली प्रक्रिया असून जगभरात निर्यात होणारे व्हर्जिन कोकोनट ऑइल केवळ ह्याच प्रक्रियेने बनवले जाते.

आता खरा प्रश्न आहे की नारळाच्या दुधात किंवा खोबऱ्यात असे काय आहे, जे व्हर्जिन कोकोनट ऑइलमध्ये जसेच्या तसे येते आणि त्यामुळे काय होते! योग्य पद्धतीने व्हर्जिन कोकोनट ऑइल काढल्यास त्यात 'लॉरिक अॅसिड' नावाची प्रथिन साखळी आढळते. हे MCT (medium-chain triglyceride) आहे. सर्वच तेलांमध्ये थोड्याफार प्रमाणात MCT/LCT असतात. त्याचे अर्थ व खूप सारी माहिती तुम्हाला इंटरनेटवर मिळेलच. 'लॉरिक अॅसिड'चे महत्त्व म्हणजे हा घटक केवळ मातेच्या स्तन्य दुधात आढळतो व हा मुख्यत्वे लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती आणि अस्थिमज्जांची घडण करण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतो. व्हर्जिन कोकोनट ऑइलमध्ये लॉरिक अॅसिड ५०%पर्यंत आढळते व दुसऱ्या कुठल्याही तेलात किंवा नैसर्गिक घटकात लॉरिक अॅसिड आढळत नाही.


corona_1  H x W

लॉरिक अॅसिडमध्ये 'मोनोलॉरीन' नावाचा एक घटक आहे, जो रोगप्रतिकारशक्ती वाढवणे व जिवाणू-विषाणूंचा प्रतिकार करणे अशा दोन स्तरांवर काम करतो. ह्या गोष्टीचा आधार घेऊन अनेक अमेरिकन व युरोपीय निसर्गोपचारतज्ज्ञ डॉक्टरांनी अल्झायमर व पार्किन्सन रुग्णांवर अनेक प्रयोग केले व सप्रमाण सिद्ध केले की अशा प्रकारच्या असाध्य आजारांवर व्हर्जिन कोकोनट ऑइल अत्यंत उपयुक्त आहे. ह्याच्या अनेक क्लिनिकल ट्रायल्स उपलब्ध आहेत. अनेक अधिकृत वैज्ञानिक संस्थांचे संदर्भ इंटरनेटवरही उपलब्ध आहेत.

नारळाचे मुख्य उत्पादन आशिया खंडात होते व १८ देश नारळ पिकवतात. Asia Pacific Coconut Community (APCC) नावाची संस्था ह्या १८ नारळ उत्पादक देशांच्या नारळाबाबतच्या कामाची शिखर संस्था आहे. प्रत्येक देशात नारळाचा केंद्रीय बोर्ड आहे व ह्या बोर्डाचे अध्यक्ष (IAS Officer) APCCचे पदसिद्ध सदस्य असतात. नारळाच्या उत्पादनांचा दर्जा, त्याचे निर्यातीचे निकष ह्या विषयात APCC पथदर्शक काम करते. शिवाय नारळाची विविध उत्पादने, त्यांचे सामान्य व औषधी उपयोग, त्याच्या वैद्यकीय चाचण्या (ट्रायल्स) अशा विषयात सातत्याने काम करते, सुविधा निर्माण करते व जागतिक पातळीवर ह्याच्या उपयुक्ततेची शिफारस करते. अमेरिकन मेडिकल काउन्सिलने नारळाच्या तेलावर जेव्हा आक्षेप घेतले, तेव्हा APCCने त्याविरुद्ध शास्त्रोक्त लढा दिला व नारळ तेलाविरुद्धचे अनेक नाठाळ आक्षेप सप्रमाण फेटाळून लावले.


APCC सातत्याने व्हर्जिन कोकोनट ऑइलच्या वैद्यकीय चाचण्या घेत असते व त्याचे अनुमान ऑनलाइन उपलब्ध करते. APCCची वेबसाइट https://www.apccsec.org/ असून तिथे आरोग्य विभागामध्ये असे विषय पाहता येतात. तिथे असलेली कोविड-१९बाबतची लिंक आपल्या वैद्यकीय तज्ज्ञांनी पाहणे खूप आवश्यक आहे. हा अहवाल एक मेडिकल डॉक्युमेंट असून कोरोनाबाधित रुग्णांवर घेण्यात येणारी ट्रायल कशी व का असावी, अशा स्वरूपाचा असून त्यात मोनोलॉरीनचे गुणधर्म व ते कोरोनाविरोधात कसे उपयुक्त ठरतील ह्यावर शास्त्रीय दृष्टीकोन मांडला आहे.

अहवालाचा सारांश - मोनोलॉरीन आणि सोडियम लॉरील सल्फेट हे लॉरिक अॅसिडपासून बनणारे पदार्थ, अनेक वर्षांपासून विषाणूंविरुद्ध लढण्याचे प्रभावी अस्त्र म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक प्रकारच्या औषधांमध्ये ह्याचा समावेश असतोच. मोनोलॉरीन आधारित उपचार पद्धती तीन प्रकारे ह्या विषाणूविरोधात लढा द्यायला उपयुक्त असेल -
१. विषाणूचे बाह्य कवच भेदून त्याला निष्प्रभ बनवणे
२. विषाणूचे पुनरुत्पादन लांबवणे, जेणेकरून त्याचा प्रभाव मर्यादित राहील
३. विषाणूला आपल्या शरीरातील पेशींबरोबर युती करण्यापासून मज्जाव करणे


इडोनेशिया, फिलिपाइन्स, थायलंड यासारख्या देशांत अशा प्रकारचे प्रयोग आणि ट्रायल्स सुरू असून इडोनेशियाच्या अध्यक्षांनी व्हर्जिन कोकोनट ऑइल हे कोरोनाविरुद्धचे मुख्य विषाणुप्रतिबंधक म्हणून राष्ट्रीय पातळीवर लॉँच केले आहे. ही बातमी पाहा - https://coconutcommunity.org/news/detail/19

आशियातील हे छोटे देश तांत्रिकदृष्ट्या भारतापेक्षा थोडे मागे असल्याने ह्यांच्या प्रयोगांना मर्यादा आहे. ते हे संशोधन व त्याचे दस्तऐवज ऑनलाइन देतात, ते तंत्रज्ञानदेखील अपुरे आहे. भारतासारख्या वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गज देशाने ह्या विषयात लक्ष घातल्यास कोरोना चाचणीसाठी लॅबपासून रुग्ण उपलब्ध करणे सहज शक्य आहे. APCCबरोबर काम करणारे अनेक शास्त्रज्ञ, डॉक्टर भारतात आहेत. केरळला CPCRI ही संस्था अनेक चांगल्या शास्त्रज्ञांना घेऊन नारळ उत्पादनांवर काम करते. तिथे मला माहीत असलेले डॉ. हेब्बार हे नीरा विषयातील तज्ज्ञ असून तेदेखील ह्या प्रकारच्या विषयात मौलिक योगदान देऊ शकतील. भारत सरकारने अशा प्रकारची टीम बनवल्यास ह्याबद्दल विविध प्रकारची माहिती ह्या सर्व संस्था/लोकांकडून मिळवणे, त्यावर प्रक्रिया करणे आणि त्यावर आधारित निर्णय घेणे खूपच सोपे आहे. शिवाय हे 'निसर्गोपचार आधारित' असल्याने, कृत्रिम नसल्याने ह्याचे दुष्परिणाम नाहीत किंवा मर्यादित आहेत. त्यामुळे क्लिनिकल ट्रायल्स घेणे तितके किचकट ठरणार नाही.

मी असे म्हणत नाही की व्हर्जिन कोकोनट ऑइल कोरोनाविरुद्धचे औषध म्हणून १००% सिद्ध होइल. पण समजा, असे झाले की कोरोना प्राथमिक अवस्थेत असताना जर व्हर्जिन कोकोनट ऑइल वापरून १००% बरा होत असेल, दुसऱ्या टप्प्यात असताना ८०% लोकांवर परिणामकारक असेल, तिसऱ्या टप्प्यात ६०% लोकांवर असेल.. तर किमान कोरोनाविरुद्धच्या निर्णायक लढ्याला सुरुवात तर होईल!

महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्हर्जिन कोकोनट ऑइल हे नारळापासूनच बनते. कृत्रिम नाही. जर व्हर्जिन कोकोनट ऑइलची उपयुक्तता सिद्ध झाली, तर नारळाचे प्रचंड उत्पन्न असलेल्या भारतासारख्या देशात नारळ बागायतदाराला फार चांगले दिवस येतील. शिवाय हे 'इंडस्ट्री ग्रेड मेडिकल औषध' असल्याने, एक व्हर्जिन कोकोनट ऑइल इंडस्ट्रीमधील मशीन बनवणाऱ्यांपासून ते वाहतूकदार, निर्यातदारांपर्यंत अनेकांना व्यवसायाच्या व रोजगाराच्या संधी उपलब्ध करेल व अशा प्रकारची नैसर्गिक औषधांची बाजारपेठ म्हणून भारताचे पुन्हा जगभर नाव होईल, ज्याचा फायदा शेतकरी/उत्पादकापर्यंत पोहोचेल.

माझ्या इतक्या वर्षांच्या अभ्यासातून वाटते की, जर कोरोनावर इलाज माहीतच नाही आणि नक्की कसा शोधायचा, कुठून शोधायचा हेदेखील माहीत नाही, तर खरेच कठीण होते. पण जर दिशा माहीत आहे, शास्त्रीय आणि विश्वासार्ह आहे, काही प्रमाणात अनुभवलेली आहे, तर असा प्रयोग करून पाहायला काही हरकत नाही. आपण काढे घेऊन आणि आर्सेनिक अल्बमसारखे प्रयोग करून फक्त 'रोगप्रतिकारशक्ती' ह्या एकाच गोष्टीवर काम करतोय. व्हर्जिन कोकोनट ऑइल आपल्याला प्रत्यक्ष कोरोनाविरुद्धचे शस्त्र हातात देईल असे दिसतेय. असे नको व्हायला की इंडोनेशियाने किंवा थायलंडने हा शोध लावला आणि अमेरिकेने घेतला आणि अमेरिकेतून पॅक होऊन आलेले मोनोलॉरीन आधारित औषध आपण इकडे ४०००-५००० रुपयांना विकत घेतोय..!

शासन, प्रशासन, या क्षेत्रातील तज्ज्ञ, संशोधक सगळ्यांपर्यंत हा विषय पोहोचला पाहिजे. तरच त्याला योग्य दिशा मिळून कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपल्याला आणखी एक पाऊल पुढे टाकता येईल.

विनय सामंत

९३२५२६२६९२, ९८२०२६२६९२ 

mail@vinaysamant.com