वास्तव आणि कल्पनारम्यता याचा संगम - 'विझार्ड ऑफ ओझ'

विवेक मराठी    14-Jul-2020
Total Views |
'द वंडरफुल ऑफ विझार्ड ऑफ ओझ' या गाजलेल्या परिकथेवर आधारित १९३९ मध्ये 'विझार्ड ऑफ ओझ' हा चित्रपट म्हणजे वास्तव आणि कल्पनारम्यता याचा सुरेख संगम. या चित्रपटाच्या कथानकातून 'कार्य कितीही कठीण असो, कष्ट आणि चिकाटी यशाचे दार उघडते' हा महत्त्वाचा संदेश स्पष्ट होतो. आयुष्याला परिकथा बनवणे हे आपल्याच हातात असते, ही हमी या चित्रपटातून मिळते.

Wizard of Oz_1  

अद्भुतरम्यता हा बालसाहित्याचा कणा आहे, कारण ती मुलांच्या मनात वसलेली आहे. लहान मुलांच्या हालचालींवर मोठ्यांचे नियंत्रण असते, याची उणीव भरून काढण्यासाठी त्यांचे मन कल्पनेच्या विश्वात भरारी मारते. अशा वेळी परिकथा, प्राणिकथा वाचल्याने त्यांची वैचारिक शक्ती वाढते. जीवनातील मार्ग शोधण्याचा आत्मविश्वास येतो. या कथेतील पऱ्या त्यांच्यासारख्याच नाजूक असतात, हळव्या असतात, पण त्या स्वतंत्र असतात. दुष्ट आणि सुष्ट यांच्या संघर्षात त्या सुष्टांना मदत करतात. त्यांना वाचवतात. प्राणिकथेतील प्राणी हे माणसांसारखेच असतात. त्यांच्या भाव-भावना, इच्छा-आकांक्षा, चांगुलपणा-स्वार्थीपणा यांचे चित्रण मुलांना चांगले आणि वाईट यामधील फरक समजावते.
काळ बदलतो, वेष बदलतो, पण चांगल्याची वाइटावर मात हा परिकथेचा गाभा मात्र बदलत नाही. प्रत्यक्ष जग मात्र काळे-पांढरे नसते. निरागस नसते. इथे पावलापावलाला चांगल्या मूल्यांना टिकून राहण्यासाठी सामना करावा लागतो, दमछाक होते. अशा वेळी चांगल्याला जिंकून देणाऱ्या या परिकथा मोठ्यांनाही भावतात. त्यांच्या जगण्याचा आधार बनतात. एल फ्रॅंक बॉम लिखित 'द वंडरफुल लँड ऑफ विझार्ड ऑफ ओझ' ही गाजलेली
परीकथा. यावर आधारित १९३९मध्ये प्रदर्शित झालेला 'विझार्ड ऑफ ओझ' हा चित्रपट म्हणजे वास्तव आणि कल्पनारम्यता याचा सुरेख संगम.

ह्या कथेची नायिका आहे कॅन्सास येथे आपल्या आत्याबरोबर राहणारी डोरोथी गेल ही अनाथ मुलगी. आत्याचे कुटुंबीय, तिच्या शेतावर काम करणारी तीन माणसे (हंक, झके, हिकोरी) व कुत्रा टोटो एवढेच छोटेसे जग आहे तिचे. कथेत नायिकेबरोबर खलनायिका हवीच. ही आहे त्यांची शेजारीण मिस एल्विरा गल्च. कधीकाळी टोटोने तिचा चावा घेतला असतो, म्हणून त्याला इजा करण्याची ती संधीच शोधत असते. ही दुष्ट बाई टोटोचा जीव घेईल या भीतीने डोरोथी घरातून पळ काढते.
वाटेत तिला भेटतो प्रोफेसर मार्व्हल. तिची आत्या काळजीने त्रस्त झाली आहे हे सांगून, तिची समजूत घालून तो तिला घरी पाठवतो. तेवढ्यात वादळाला सुरुवात होते. याचा जोर एवढा प्रचंड असतो की घराची खिडकी तुटून डोरोथीच्या डोक्यावर आदळते. याने डोरोथी बेशुद्ध पडते. हे कमी म्हणून की काय, वाऱ्याची एक मोठी वावटळ तिचे घरच उडवून देते. डोरोथीला जेव्हा जाग येते, तेव्हा तिचे करडे कॅन्सास पूर्ण बदलून गेले असते.

आतापर्यंतचा चित्रपट सेपिया रंगात आहे. वादळानंतर, विटकर रंगातील पडदा या नवीन जगाच्या दर्शनाने रंगीबेरंगी होतो. हे जग असते जादुई. सगळेच वेगळे असते इथे. व्हायोलिनचे सुरेल सूर ऐकू येतात. त्या सुरांच्या सोबतीने आकाश इंद्रधनुष्याच्या रंगात न्हाऊन निघते. इथे मोठी फुले असतात. तलाव असतात. छोट्या झोपड्या असतात. दोन दिशांना जाणारे रस्तेही असतात. यातला पिवळा रस्ता डोरोथीच्या प्रवासाची दिशा निश्चित करतो.
 
या वादळामुळे एक चांगली गोष्ट मात्र घडते. डोरोथीचे घर पूर्वेकडील एका दुष्ट चेटकिणीच्या अंगावर पडून ती चेटकीण मरते. ही चेटकीण मेल्यामुळे येथील लोक अतिशय आनंदित होतात. ही साधीसुधी मुलगी एका क्षणात नायिका होते. येथील लोक तिचा जयजयकार करतात. डोरोथीला मात्र आपल्या घरी परतायचे असते. येथील चांगली चेटकीण, तिला मेलेल्या चेटकिणीच्या लालचुटुक चपला देते आणि पाचूनगरीतील जादूगाराला भेटण्यास सांगते. तोच तिला घरी परतण्यास मदत करेल असेही सांगते. ह्या पिवळ्या रस्त्यावरून जादूगाराच्या शोधात जात असताना डोरोथीला तीन साथीदार भेटतात. मेंदू नसलेले बुजगावणे, हृदयाच्या शोधात असलेला पत्र्याचा माणूस आणि एक अतिशय भित्रा सिंह.


Wizard of Oz_1  
स्वतःजवळ जे नाही त्याची अपेक्षा सर्वांनाच असते, मग हे तरी अपवाद कसे ठरणार! बुजगावण्याला हुशारी हवी असते, पत्र्याच्या माणसाला हृदय आणि सिंहाला धैर्य. पाचूनगरीत राहणाऱ्या जादूगाराला शोधण्यात हेसुद्धा सामील होतात. मजा म्हणजे यांचे चेहरे डोरोथीच्या शेजाऱ्यांसारखेच असतात.

अनेक अडचणींवर मात करत, मजल-दरमजल करत ते पाचूनगरीत पोहोचतात. पण मेलेल्या चेटकिणीची तेवढीच दुष्ट बहीण त्यांची वाट पाहत असते. तिला डोरोथीवर सूड उगवायचा असतो. तिची सर्व शक्ती असते ती जादूच्या झाडूत. पाचूनगरीतील प्रोफेसर मार्व्हेलसारखाच दिसणारा जादूगार या सर्वांना तो झाडू आणून देण्यास सांगतो. जर झाडू मिळाला तरच या सर्वांच्या इच्छा पूर्ण होणार असतात. आता सुरू होते ती अस्तित्वाची लढाई.
 
चांगला विरुद्ध वाईट हा संघर्ष असला, तरी ही आहे परिकथा. इथे चांगले आणि वाईट यांना विभागणारी रेघ स्पष्ट दिसते. परिकथेतील संकल्पनेत संदिग्धता नसते. अनेक अडचणींवर मात करून डोरोथी जिंकते. वाइटाचा नाश होतो. जादूचा झाडू घेऊन डोरोथी पाचूनगरीतील शहाण्या जादूगाराकडे परतते. पण तिच्या लक्षात येते की हा कुणी जादूगार नाही, तर एक सर्वसामान्य माणूस आहे. तो या सर्वांना समजावतो की ज्या गोष्टींच्या मागे ते धावत आहेत, त्यांच्याकडे ह्या गोष्टी आहेत. या चौघांचा प्रवास कठीण असतो. त्यांना अनेक अडचणी येतात, अनेक वेळा त्यांच्या पदरी निराशा येते, तरीही या सर्वांवर मात करून, आत्मविश्वासाच्या बळावर ते डोरोथीला वाचवण्यात यशस्वी होतात. त्यांना यश मिळते, कारण ते हुशार असतात, धीट असतात आणि दुसऱ्यांना मदत करण्यासाठी आवश्यक असलेले चांगले मन त्यांच्याकडे असतेच. जादूगार त्या सर्वांना या गोष्टीची जाणीव करून देतो, हेच मोठे पारितोषिक असते.
 
तसे म्हणाल तर ही आहे बालकथा. यातील तात्पर्य मात्र सर्वांना काही ना काही शिकवून जाते. या जगात असलेली तुमची ओळख किंवा तुम्हाला मिळालेला नावलौकिक अनेक वेळा फसवा असतो. आभासी असतो. हा दुधारी तलवारीचे काम करतो. डोरोथी खरे तर साधी, भित्री मुलगी असते. पहिल्या वेळेला जेव्हा चेटकीण मरते, तो खरे तर अपघात असतो. पण ती मेल्यामुळे येथील लोकांच्या नजरेत डोरोथी वीरांगना बनते. हे कौतुक तिचा आत्मविश्वास वाढवते. अर्थात तुम्हाला स्वतःबद्दल विश्वास नसेल, आदर नसेल तर मात्र न्यूनगंडाने तुमचे आयुष्य पोखरून जाते. डोरोथीच्या मित्रांचे आयुष्य यामुळेच फुकट जात असते.
'कार्य कितीही कठीण असो, कष्ट आणि चिकाटी यशाचे दार उघडते' हा महत्त्वाचा संदेश या गोष्टीतून मिळतो. जपलेली मैत्री आणि सांघिक कार्य हे यशाचा मार्ग सुकर करते. लहानशा डोरोथीसाठी चेटकिणीला मारणे सोपे नसते. पण बुजगावण्याचा युक्तिवाद, पत्र्याच्या माणसाचे कौशल्य आणि सिंहाची शक्ती या साऱ्या गोष्टी तिच्या मदतीला येतात. तिचे काम सोपे करतात. त्यांच्या मदतीने ती घरी जाऊ शकते, तर तिच्या सहकार्याने त्यांच्या आयुष्यातील निराशा नष्ट होते. चित्रपटातील डोरोथीच्या तोंडी असलेले 'समव्हेअर ओव्हर द रेनबो' हे गीत अजूनही लोकप्रिय आहे.

मुलांसाठी घर म्हणजे सर्वस्व. तरीही ते जसजसे मोठे होतात, तसतसे स्वप्नांचे इंद्रधनुष्य त्यांना भुरळ पाडते. याच्यापलीकडे असणारे जग नवीन असते, आकर्षक असते आणि कदाचित फसवेसुद्धा असू शकते. सुरक्षिततेच्या कुंपणातून बाहेर पडलेले मूल इथे फसू शकते, अडकू शकते, हरवते. अशा वेळी त्याच्या मनाला धीर देऊन त्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी मित्र आवश्यक असतात. चित्रपटाच्या शेवटी डोरोथीला घरी नेण्यासाठी हा जादूगार बलून बनवतो. ऐन वेळी त्यातून टोटो उडी मारतो आणि त्याला वाचवायला डोरोथीसुद्धा स्वतःला झोकून देते. बलून तर उडून जातो, पण अशा वेळी एक चांगली चेटकीण तिला सांगते की तुला नेणारे जादूचे बूट तर तुझ्याकडे आहेतच. तेच तुला घरी पोहोचवतील. 'केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे' ही उक्ती किती सार्थ ठरते इथे. चित्रपटाच्या शेवटी डोरोथी आपल्या घरीच पलंगावर स्वप्नातून जागी झालेली दिसते. घरासारखी दुसरी जागा नाहीच, हे तिला आता मनापासून पटते.

Wizard of Oz_1   
हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली होती. जग बदलत चालले होते. कुटुंबसंस्थेला तडे जात होते. अशा वेळी घरात मिळणारे प्रेम, सुरक्षितता यांची महती पटवून देणारी ही कलाकृती लहानांबरोबर मोठ्यांनाही आवडून गेली. इथे घर या शब्दाचा अर्थ तुम्ही जिथे राहता एवढाच मर्यादित नाही. सुरुवातीला घरापासून लांब जाणारी डोरोथी आपल्या घरी जाते, कारण तिला आपल्या माणसांची किंमत समजते. बुजगावण्याचे घर तर शेतावर असते. पण तो ओझमध्ये स्थायिक होतो. पत्र्याचा माणूस आणि सिंहसुद्धा स्थलांतर करतात आणि दुसरीकडे स्थायिक होतात, कारण तिथे आपण आनंदी असू याची त्यांना खात्री पटते. जी जागा तुम्हाला स्थैर्य देते, सुख देते तेच तुमचे घर बनते हा संदेश या चित्रपटातून दिला जातो.
 
घरापासून जादुई नगरीत जाण्यासाठी दोन रस्ते असतात. पिवळ्या रंगाच्या विटांपासून बनलेला रस्ता डोरोथीचे भाग्य ठरवतो. रस्ता म्हणजेच तुमचे आयुष्य. वेगवेगळ्या वळणावळणांनी ते आकार घेते. इथे तुम्ही मित्र जोडता, काही लोक तुमच्याशी शत्रुत्व धरतात.. त्यांच्याबरोबर राहून किंवा प्रसंगी लढूनच तुम्ही स्वतःला घडवता. आलेले प्रसंग आणि त्यातून तावून सुलाखून बाहेर पडणे तुमचे व्यक्तिमत्त्व घडवते. आयुष्य सरळ नसतेच, पण तुमची स्वप्ने आणि ती पूर्ण होतीलच हा आशावाद तुम्हाला सकारात्मक बनवतो. योग्य दिशेने केलेले प्रयत्न आणि चांगले वर्तन यशाचा मार्ग सुकर करते. आयुष्याला परिकथा बनवणे हे आपल्याच हातात असते, ही हमी देऊन हा चित्रपट संपतो.
 
या चित्रपटाचा राजकीय, आर्थिक, सामाजिक नजरेतून अर्थ लावण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण लेखकाच्या मते ही मुलांसाठी लिहिलेली परिकथा आहे. त्यातील सहजतेमुळे ती मोठ्यांनाही आवडली. डोरोथीचे काम करणाऱ्या ज्युडी गारलँडला स्पेशल अकादमी पुरस्काराने नावाजले गेले. ह्याचे संवाद गाजले, संगीताने लोकप्रियतेचे उच्चांक मोडले, ह्यातील स्पेशल इफेक्ट काळाच्याही पुढे होते. सर्व रसांनी परिपूर्ण अशी ह्या कलाकृतीने सलमान रश्दीसारख्या लेखकांना लिहिण्याची प्रेरणा दिली. पूर्णतः व्यावहारिक असलेल्या चित्रपट क्षेत्रात एक परिकथा आज ऐंशी वर्षांनीसुद्धा मानाचे स्थान पटकावून आहे, हेच किती जादुई आहे!