संघसमर्पित नरेंद्र चितळे

विवेक मराठी    16-Jul-2020
Total Views |

@अरुण करमरकर
रा. स्व. संघात विविध जबाबदाऱ्या समर्पणाच्या भावनेतून पार पाडणारे स्वयंसेवक नरेंद्र चितळे उर्फ बाळासाहेब चितळे यांचे १३ जुलै रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते. त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारा लेख.


chitale_1  H x

स्वच्छ, पांढरेशुभ्र दुटांगी धोतर आणि आणि पांढरा सुती सदरा किंवा झब्बा असा वेष आता दिसणेही दुर्मीळ झाले आहे. परंतु सामान्यपणे साठ-सत्तर वर्षांपूर्वीच्या पिढ्यांमध्ये हा वेष महाराष्ट्रात गावोगावी रूढ होता. त्या काळातल्या संघप्रचारकांपैकी अनेकांच्या बाबतीत तर याव्यतिरिक्त अन्य वेष परिधान केलेले त्यांचे रूप आठवतच नाही. अशा काळातले एक अस्सल स्वयंसेवक नरेंद्र गोपाळ उर्फ बाळासाहेब चितळे. अलीकडच्या, वृद्धापकाळातल्या काही वर्षांपूर्वीपर्यंत (जवळजवळ पन्नास वर्षे) आम्ही त्यांना त्याच विशुद्ध भारतीय परिवेषात पाहत आलो. उंच शिडशिडीत शरीरयष्टी, लख्ख गोरा रंग आणि अतिशय प्रसन्न, हसरी मुद्रा धारण करणारे एक मृदुभाषी संघ अधिकारी. 

चितळ्यांचे अगदी मूळचे गाव चिपळूण. चिपळूणच्या पाग मळा भागात आजही त्यांच्या आप्तांची काही घरे आहेत. गोपाळराव, म्हणजे बाळासाहेबांचे वडील मात्र शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी विदर्भात अकोला येथे स्थलांतरित झाले. त्यामुळे बाळासाहेबांची जन्मभूमी विदर्भ अकोला. १९२२ सालचा जन्म. संघ संस्थापनेच्या काळातच गोपाळराव यांचा संघाशी घनिष्ठ संबंध जुळला. संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांनी अकोला जिल्हा संघचालक म्हणून त्यांची नियुक्ती केली. त्यामुळे वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षांपासूनच नरेंद्र चितळे यांना संघाचे संस्थापक आणि पहिले सरसंघचालक डॉक्टर केशवराव हेडगेवार यांचा अगदी निकट सहवास लाभला. लहानपणापासूनच घरातून देशभक्तीचे आणि संघनिष्ठेचे बाळकडू त्यांना लाभले आणि त्यांनीही तो वसा-वारसा आयुष्यभर जोपासला. १९४१ साली, वयाच्या विसाव्या वर्षी एका सरकारी नोकरीच्या निमित्ताने बाळासाहेब ठाण्याला स्थलांतरित झाले. स्टेनो टायपिस्ट म्हणून नोकरी करीत असतानाच संघाचे कामही ते करू लागले आणि ठाणे ही त्यांची कर्मभूमी बनली. १९४८ साली संघावर बंदी आली. त्याविरुद्धच्या सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. परिणामी त्यांची सरकारी नोकरी सुटली. त्यानंतर एका खाजगी कंपनीत टायपिस्ट या पदावर काम करण्यास सुरुवात करून त्याच कंपनीचे व्यवस्थापक या नात्याने ते निवृत्त झाले. 
 
एका शाखेचे कार्यवाह ते विभागाचे - म्हणजे ठाणे, रायगड (त्या वेळचा कुलाबा) जिल्हा आणि पालघर जिल्हा अशा विस्तृत भूभागाचे कार्यवाह, घोष (बँड) प्रमुख इ. विविध जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या. ते विभाग कार्यवाह असतानाच्याच काळात ठाणे जनता सहकारी बँकेची स्थापना झाली आणि पुढे क्रमाक्रमाने नागरी सहकारी बँकांचे एक विस्तृत जाळे ठाणे जिल्ह्यात निर्माण झाले. त्यानंतर त्यांच्याकडे काही काळ भारतीय जनसंघ आणि बराच काळ विश्व हिंदू परिषद अशा अन्य क्षेत्रांमधील कामाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या गेल्या. त्याही त्यांनी अत्यंत निष्ठेने निभावल्या. मुळात, संघ सांगेल ते करायचे, आपले सर्व कर्तृत्व पणाला लावून करायचे आणि संपूर्ण समर्पण भावनेने करायचे ही स्वयंसेवकवृत्ती त्यांच्या अंगात पूर्णपणे भिनलेली होती. त्यामुळे १९४०पासून २०१०पर्यंत, जवळजवळ सत्तर वर्षे संघकार्यात आणि संघविचाराच्या अनुषंगाने उत्पन्न होणाऱ्या निरनिराळ्या जबाबदार्‍या सांभाळण्यात बाळासाहेब मग्न राहिले.
 
 
'धगधगती तत्त्वावर निष्ठा मान जिवाची हीच प्रतिष्ठा' ही सघंगीताची एक ओळ शब्दश: सार्थ करीत जगणाऱ्या बाळासाहेबांना अत्यंत दीर्घ आणि निरामय आयुष्य लाभले ते त्यांच्या सात्त्विक जगण्यामुळे. अखेरची काही वर्षे त्यांची दृष्टी चांगलीच मंदावली होती. निसर्गक्रमानुसार शारीरिक गात्रेही थकत चालली होती. चार मुलींपैकी, कर्जत येथे राहणाऱ्या त्यांच्या कन्येकडे ते शेवटची काही वर्षे राहत होते. मात्र प्रसंगपरत्वे ठाण्याला येण्याची उत्सुकता त्यांच्या मनात कायम असे. विशेषतः गुरुपौर्णिमेच्या दिवशी ठाण्यातल्या त्यांच्या मूळ शाखेवर येऊन ध्वजासमोर दक्षिणा समर्पण करणे याचा कटाक्ष त्यांनी आयुष्यभर जोपासला. वयाची ९७ वर्षे पूर्ण केल्यानंतर अशाच एका प्रसंगी ठाण्यात आले असताना त्यांची भेट घेण्याचा योग जेमतेम एक वर्षभरापूर्वीच मला लाभला. गप्पा मारत असताना त्यांच्या तोंडून जे उद्गार निघाले, ते त्यांची देशनिष्ठा आणि समर्पणाची उत्कट इच्छा यांचा प्रत्यय आणून देणारे होते. ठाण्याचे अच्युतराव वैद्य आणि दीर्घकाळ आणि जिल्ह्याचे कार्यवाह या नात्याने काम केलेले श्रीकांतराव जोशी असे दोघे ज्येष्ठ कार्यकर्ते माझ्यासोबत होते. बाळासाहेबांच्या प्रकृतीची, त्यांच्या वयाची चर्चा करीत असतानाच त्यांनी सहज म्हटले, "बाळासाहेब, दोनच वर्षांनी तुमचा शतकमहोत्सव साजरा करायचा आहे..." त्यावर बाळासाहेब हसले आणि म्हणाले, "येणाऱ्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींना दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेले पाहण्याची तेवढी इच्छा माझ्या मनात आहे. ती पूर्ण झाली की मी जायला मोकळा आहे. मला शतकपूर्तीची आस नाही!"

खरोखरच शतकपूर्तीची वाट पहात ते थांबले नाहीत. ९९व्या वर्षाची पूर्ती करण्यास दोनच महिने उरले असताना १३ जुलै रोजी त्यांनी कर्जत मुक्कामी शांतपणे डोळे मिटले आणि आपला देह पंचमहाभूतांच्या चरणी विलीन केला.
 
सामान्य गृहस्थी जीवन जगतानाही ते कसे समाजभक्तीने भारून टाकता येते, 'स्वयंसेवक' हे अभिधान समृद्ध करीत कसे जगायचे असते याचा वस्तुपाठ सिद्ध करणाऱ्या नरेंद्र उर्फ बाळासाहेब चितळे यांच्या चिरंतन आणि प्रेरक स्मृतींना कोटिश: प्रणाम!