दिव्य ध्येयासाठी समर्पित जगदेवरामजी उरांव

विवेक मराठी    17-Jul-2020
Total Views |

@शशिकांत घासकडवी
 
 देशातील जनजाती बांधवांचा स्वाभिमान जागृत करत त्यांच्यासाठी अविरत झटणारे अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमचे अध्यक्ष जगदेवराम उरांव यांचे १५ जुलै रोजी निधन झाले. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा हा लेख.

RSS_1  H x W: 0


'दिव्य ध्येय की ओर तपस्वी, जीवनभर अविचल चलता है||' ही संघगीतातली ओळ आपण सर्वच नेहमी ऐकतो, पण प्रत्यक्ष जीवनात तसं जगणं फार थोड्या लोकांना जमतं. अशा थोड्या पण महान विभूतींच्या मालिकेतील एक पुष्प म्हणजेच मा. जगदेवरामजी होत. भारतमातेच्या परमवैभवासाठी जनजाती समाजाचा सर्वांगीण विकास हे दिव्य ध्येय मानून त्यांनी अविचलपणे त्या ध्येयाप्रत वाटचाल केली.

आताच्या छत्तीसगड राज्यात जशपूरनगरजवळ असलेल्या कोमडो या लहानशा उरांव जनजातीच्या गावात सन १९४८च्या सुमारास त्यांचा जन्म झाला. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी संघशाखेत जायला सुरुवात केली. या संस्कारक्षम वयातच त्यांना देशभक्ती व समाजसेवेचं बाळकडू मिळालं. १९६२ ते १९६७ या कालावधीत एक हरहुन्नरी बालक ते गावासाठी, समाजासाठी तळमळीने काम करणारा युवक असा त्यांचा प्रवास झाला. अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे संस्थापक स्व. बाळासाहेब देशपांडे यांनी याच भागात १९५२मध्ये वनवासी कल्याण आश्रमाची स्थापना केली. त्यांचा या भागात सर्वत्र संचार सुरू असतानाच जगदेवरामजींसारखा उत्साही तरूण त्यांच्या संपर्कात न आला असता तर नवलच. ते १९६७मध्ये उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण झाले. १९६८मध्ये वनवासी कल्याण आश्रमाच्या शाळेत शिक्षक म्हणून दाखल झाले. आयुष्यातील दिव्य ध्येयाच्या दिशेने सुरू झालेल्या त्यांच्या प्रवासाची ही नांदीच म्हणावी लागेल. १९७१मध्ये कल्याण आश्रमाच्या उच्च माध्यमिक विद्यालयात त्यांनी शारीरिक शिक्षक म्हणून आपल्या कामास प्रारंभ केला. हे करत असतानाच ते १९७२मध्ये पदवी परीक्षा व १९७५मध्ये पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झाले. हे सर्व लौकिक शिक्षण तर सुरू होतंच, त्याहीपेक्षा स्व. बाळासाहेब देशपांडे, स्व. मोरूभैय्या केतकर यांच्या सहवासात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडणही सुरू होती. जनजाती समाजाची तत्कालीन स्थिती, जशपूरनगर परिसरात असलेली ख्रिश्चन मिशनची दहशत लक्षात घेता या कामाचा विस्तार झाला पाहिजे, ही बाळासाहेबांची तळमळ, धडपड ते स्वत: अनुभवत होते. एवढंच नाही, तर त्यांच्या कामात एक धडाडीचे शिलेदार म्हणून ते सहभागी होत होते. त्यामुळे वनवासी कल्याण आश्रमाचे एक खंदे कार्यकर्ते म्हणून त्यांचा या भागात लौकिक तयार झालेला होता. १९७५मध्ये देशात सर्वत्र आणीबाणी घोषित करण्यात आली. त्यामुळे एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून त्यांना ६ महिन्यांचा कारावासदेखील भोगावा लागला. आणीबाणी उठवल्यानंतर जगदेवरामजींनी पुनश्च आपलं काम सुरू केलं.

१९७८च्या सुमारास वनवासी कल्याण आश्रमाला संस्थापक स्व. बाळासाहेब देशपांडे यांनी अखिल भारतीय स्वरूप देण्याचा निर्णय घेतला. स्व. बाळासाहेबांसोबत त्यांचं देशभर भ्रमण सुरू झालं. या भ्रमंतीत त्यांनी देशभरातील जनजाती समाजाची स्थिती, संस्कृती, परंपरा या सर्वांचं जवळून अवलोकन केलं. कल्याण आश्रमाला भविष्यात एक अखिल भारतीय नेतृत्व देण्याची योजनाच स्व. बाळासाहेबांच्या मनात असावी. त्यानुसार १९८५मध्ये त्यांना कल्याण आश्रमाच्या अ.भा. उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलं. १९९३पर्यंत कधी बाळासाहेबांच्या समवेत, तर कधी स्वतंत्रपणे त्यांचा प्रवास सुरू झाला. १९९३मध्येच स्व. बाळासाहेबांची प्रकृती खालावली होती, म्हणून मा. जगदेवरामजीकडे कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. स्व. बाळासाहेबांच्या निधनानंतर ते १९९५मध्ये अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. तब्बल २५ वर्षे स्व. जगदेवरामजींनी कल्याण आश्रम व जनजाती समाजाचं समर्थपणे नेतृत्व केलं.

जेव्हा त्यांच्याकडे अखिल भारतीय अध्यक्षपदाची सूत्रं सोपवण्यात आली, त्या वेळी स्व. बाळासाहेबांच्या असंख्य स्मृती त्यांच्या मनात दाटून आलेल्या होत्या. आपल्या शांत, संयमी अशा ओघवत्या शैलीत या आठवणींना उजाळा देत त्यांनी विनम्रपणे बाळासाहेबांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या विचारांचं व कर्तृत्वाचं पाथेय आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आयुष्यभर करण्याचा एक विश्वास त्यांनी त्या वेळी व्यक्त केला व आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी तो अथकपणे निभावला.

जगदेवरामजींचं एकूण व्यक्तित्वच अत्यंत शांत, संयमी, निगर्वी व साधेपणाने भरलेलं होतं. जनजाती समाजाची अखिल भारतीय स्तरावर सर्वात मोठी असणारी संघटना म्हणजे अ.भा. वनवासी कल्याण आश्रम. एवढ्या मोठ्या संघटनेचे अध्यक्ष असूनही सर्व कार्यकर्त्यांना ते अत्यंत जवळचे वाटायचे, यांचं प्रमुख कारण त्यांचा सर्वांप्रती असलेला सामान्य व्यवहार हेच होय. देशभरातल्या अत्यंत दुर्गम भागात भेटलेल्या सामान्य कार्यकर्त्यांशीही ते आपुलकीने गप्पा मारत. सामान्य कार्यकर्त्यांना भेटता यावं, यासाठी ते आपल्या प्रवासात निवास व्यवस्था कार्यालयात न करता सामान्य कार्यकर्त्याच्या घरीच आग्रहाने करायला सांगत.

१९९६च्या सुमारास महाराष्ट्रात राज्यव्यापी जनजागरण अभियान घेण्यात आलं. त्या वेळी महाराष्ट्रात जनजाती वस्ती असलेल्या सर्व जिल्ह्यांत त्यांचा प्रवास आयोजित करण्यात आला होता. सर्व जिल्ह्यांत जनजाती संमेलनं मोठ्या संख्येने घेण्यात आली. या सर्व संमेलनांतून त्यांनी देशभरातील जनजाती समाजातील रितीरिवाज व परंपरा यांच्यातील एकात्मता हा विषय अत्यंत साध्या सोप्या भाषेत मांडला होता. या प्रवासानंतर अनेक जनजाती समाजातील कार्यकर्ते कल्याण आश्रमाच्या कामात सहभागी झाले होते.

कल्याण आश्रमात जनजाती हितरक्षा मंच हा नवीन आयाम नुकताच जोडण्यात आला होता. त्याचा पहिला अभ्यासवर्ग उदयपूर येथे घेण्यात आला. तीन दिवस झालेल्या या वर्गात जगदेवरामजी पूर्णवेळ उपस्थित होते. या वर्गाचा समारोप करताना त्यांनी या आयामाची गरज समर्पक शब्दांत व्यक्त केली. ते म्हणाले की जनजाती समाजात आपल्या मूलभूत समस्यांविषयीची जाणीव निर्माण होत नाही, कारण आपला समाज सकाळ उजाडली की झोपल्या झोपल्याच कणगीत हात घालून आजच्यापुरते धान्य आहे का याची चाचपणी करतो व पुन्हा झोपी जातो. म्हणून तो भविष्याचा विचार करत नाही. ही स्थिती बदलण्यासाठीच जनजाती हितरक्षा मंचाची गरज त्यांनी प्रतिपादन केली.


RSS_1  H x W: 0

त्यांनी विविध जनजाती समाजांतील परंपरागत उत्सवांना व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. प्रामुख्याने उरांव जनजातीतील रोहतासगढ उत्सवाला त्यांनी व्यापक स्वरूप प्राप्त करून दिलं. या पुनर्जागृतीमुळे देशभरातील उरांव समाज एका सूत्रात बांधण्यात त्यांना यश आलं. जनजाती समाजातील सरना उत्सवालादेखील व्यापक स्वरूप प्राप्त करून दिलं. भोपाळ विद्यापीठाच्या सहकार्याने 'जनजाती समाज की प्रतिमा एवं वास्तविकता' या अभ्यासपूर्ण चर्चासत्राचे आयोजन त्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं होतं. शबरीकुंभ, झाबुआ येथील विशाल वनवासी संमेलन, या सर्व कार्यक्रमात त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान होतं.

जगदेवरामजींच्या एकूण व्यक्तिमत्त्वात असलेलं साधेपण व सामान्यत्व हे माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना प्रभावित करून जात असे ते त्यांच्या ठायी असलेल्या प्रेम व आश्वासक नेतृत्वगुणांमुळे. म्हणून त्यांच्यातील असामान्यत्व ठळकपणे समोर येतं.

एक इंग्लिश विचारवंत डेसमंङ टुटू सामान्यत्वातील असामान्यत्वाविषयी असं म्हणतो की,
'Your ordinary acts of love and hope point to the extraordinary promise that every human life is of inestimable value.' हे वचन स्व. जगदेवरामजींना तंतोतंत लागू पडतं.

स्वा. सावरकरांच्या शब्दांत सांगायचं झालं, तर
'अनेक फुले फुलती। फुलोनिया सुकोनी जाती।
कोणी त्यांची महती गणती। ठेवली असे।।
परी जे गजेंद्रशुंडेने उपटीले। श्री हरीसाठी मेळे।।
कमल - फूल ते अमर ठेले । मोक्षदायी पावन।।'

भारतमातेच्या सेवेसाठी अमर ठरलेलं कमलपुष्प म्हणजेच जगदेवरामजी होते, असं म्हटलं, तर अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यांचा सर्व जीवनपट उलगडून पाहताना आपल्याला हीच अनुभूती येते. स्व. बाळासाहेब देशपांडे यांच्या गजेंद्रशुंडस्वरूप तीक्ष्ण नजरेने जगदेवरामजींसारखे कमलपुष्प हेरून ते भारतमातेच्या सेवेत समर्पित करण्यात आलं, म्हणूनच आज संपूर्ण भारतवर्षात त्यांच्या कार्याच्या रूपाने अमर झालं आहे. पावित्र्य आणि मोक्ष यापेक्षा वेगळं असू शकत नाही. त्यांच्या पावन स्मृतींना विनम्र

श्रद्धांजली!


शोक संदेश
अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम के अध्यक्ष आदरणीय श्री जगदेवराम जी उरांव का आज अचानक देहावसान हम सभी संघ स्वयंसेवक तथा कल्याण आश्रम के कार्यकर्ताओं के लिए दुःख से स्तिमित कर देने वाला नियति का निर्मम आघात है। किशोरावस्था में ही वे कल्याण आश्रम तथा संघ के संपर्क में आये व तब से उनका ध्येयसमर्पित जीवन ध्येय की कठिन साधना में आखरी सांस तक संलग्न रहा। अपने मृदु स्वभाव व परिपक्च बुद्धि के कारण वे सभी कार्यकर्ताओं में प्रेम व सम्मान के अधिकारी बन, कल्याण आश्रम के माध्यम से समाज के वनवासी बंधुओं की आवाज बनकर, नेतृत्व के रूप में उभरे। कल्याण आश्रम के कार्य के साथ ही उनके कर्तृत्व का विस्तार होकर उस कार्य के समान ही वह सभी कार्यकर्ताओं के मन को संभालने वाले तथा कल्याण आश्रम की वैचारिक प्रस्थापना को दृढ़ रखने वाले आधार रूप वटवृक्ष के रूप में उभरे। उनके इस अचानक देहावसान के कारण उनके परिवार जन, कल्याण आश्रम के कार्यकर्ता तथा संघ के स्वयंसेवकों को शीतल छाया देने वाला एक वटवृक्ष चला गया है। हम सब समदुःखी हैं। इस वेदनादायी प्रसंग में जिस कार्य के लिए स्व.जगदेवराम जी ने अपने संपूर्ण जीवन का उत्सर्ग किया उस कार्य को उसकी पूर्ण सिद्धि तक पहुँचाने का कर्तव्य भी अभी शेष है। उस कर्तव्य पथ पर सतत आगे बढ़ते रहने का धैर्य, तितीक्षा,संगठन कुशलता इत्यादि गुणों का भी स्वर्गीय जगदेव राम जी की स्मृति ही हमको प्रदान करती रहेगी। उनकी इस पवित्र स्मृति में अपनी व्यक्तिगत तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की ओर से श्रद्धांजलि अर्पण करते हुए दिवंगत जीव की शांति व सदति के लिए हम प्रार्थना करते हैं।
 
मोहन भागवत, सरसंघचालक

सुरेश (भय्याजी) जोशी, सरकार्यवाह
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ


 
@शशिकांत घासकडवी
९५२७१५३९२५
RSS