पाकिस्तानी सूडचक्रात कुलभूषण जाधव

विवेक मराठी    18-Jul-2020
Total Views |
कोरोनासारख्या महामारीने पाकिस्तान हवालदिल झाले आहे. त्यांची आर्थिक स्थितीही दयनीय झाली आहे. मात्र हे सर्व असूनही सध्या पाकिस्तानी लष्कराकडून भारतीय सरहद्दीवर सातत्याने गोळीबार केला जातो आहे, तो पाकिस्तानमधून घुसवण्यात येणाऱ्या दहशतवाद्याांना संरक्षण देण्यासाठी आहे. यासाठी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये अनेक तळांवर दहशतवाद्यांचे प्रशिक्षण चालू असते. स्वाभाविकच आहे की, त्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीही पाकिस्तानने आताच कुलभूषण जाधव यांचा प्रश्न उपस्थित केला असण्याची शक्यता आहे.




pakistan_1  H x

पाकिस्तानवर सध्या ठग, गुंड, नरराक्षस, विकृत, विचित्र, स्वैराचारी, बुद्धिभ्रष्ट, भ्रमिष्ट, चक्रम, दरोडेखोर, बुभुक्षित, वैचारिक दिवाळखोर, सत्त्वशून्य निर्बुद्ध, अविवेकी आणि आपमतलबी अक्कलशून्य यांचे राज्य आहे, असा समज बनावा अशी अवस्था आहे. ज्यांना न्याय आणि अन्याय यामध्ये साधा भेदही करता येत नाही, अशा मंडळींच्या हाती सत्ता गेल्यावर दुसरे होणार तरी काय? सध्या पाकिस्तानमध्ये निर्नायकी अवस्था आहे. मी हे अतिशय संतापाने लिहिले आहे आणि त्या संतापाचा स्फोट झाल्याने वरील सर्व दूषणे दिली आहेत, असे कृपा करून समजू नका. पाकिस्तान हे राष्ट्रच मुळात काही टोळ्यांच्या हातात गेले असल्याने त्यावर राज्य करणारे जे कोण आहेत, त्यांना चांगले आणि वाईट या दोन शब्दांमधला अर्थही कळेनासा झाला आहे.


कुलभूषण जाधव हे पाकिस्तानी तुरुंगात आहेत. त्यांच्या प्रकरणात हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेवर पाकिस्तानने फेरविचार करायला पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत भारतीय प्रतिनिधींना विनाअडथळा पोहोचू दिले पाहिजे, या शब्दात पाकिस्तानला खडसावले. पाकिस्तानने चालढकल सुरू केली. त्यानंतर एकदा भेटीचे नाटक झाले. आता पुन्हा एकदा ही भेट आम्ही घडवून आणत आहोत, असे पाकिस्तानने जाहीर केले आणि ही भेट कोणत्याही अडथळ्याविना आणि पाकिस्तानी व्यक्तीच्या उपस्थितीविना व्हावी, असे ठरलेले असताना पाकिस्तानने आपले दोन हस्तक तिथे हजर ठेवले. भारतीय प्रतिनिधींनी त्यास आक्षेप घेतला असता पाकिस्तानने हे असे काही ठरलेलेच नव्हते, असे सांगून कानावर हात ठेवले. कोणतीही गोष्ट सरळ मार्गाने करायचीच नाही, असा पाकिस्तानी क्षुद्रपणा असल्यानेच असेल, पाकिस्तानने यात फार फेरफार केले नाहीत आणि चोराच्या उलट्या बोंबा मारल्या. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी लगेचच पत्रकारांना सांगितले, "भारतीय प्रतिनिधींना जाधव यांच्याशी बोलण्यात रसच नव्हता. ते आले आणि समोरच्या ग्लासवर किंवा अन्य कोणत्या तरी गोष्टीवर आक्षेप घेत तिथून निघून गेले." जाधव हे आत्यंतिक तणावाखाली असल्याने आणि पाकिस्तानने त्यांचे बोलणे ‘रेकॉर्ड’ करायला प्रारंभ केल्याने भारतीय अधिकाऱ्यांनी त्यास आक्षेप घेऊन तिथून काढता पाय घेतला. भारतीय वकिलातीत सध्या कोणी मराठी अधिकारी आहे की नाही माहीत नाही, अन्यथा तो तिथे असता तर त्यांच्यात मराठीतून संवाद होऊ शकला असता. मागल्या खेपेला जाधव यांच्या आईला आणि पत्नीला मराठीतून बोलण्यास पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी मनाई केली होती. त्या वेळी तर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी स्त्रियांशी वाईट वागण्याचा अतिरेक केला होता.

Kulbhushan Jadhav in the  

कुलभूषण जाधव हे गेल्या चार वर्षांपासून पाकिस्तानात खितपत पडलेले आहेत. ते नौदलाचे माजी अधिकारी आहेत ही गोष्ट खरीच आहे. पण ते त्यांच्या व्यवसायानिमित्त इराणमधल्या चबाहर बंदरावर गेले असताना ‘आयएसआय’च्या हस्तकांनी उचलून नेले आणि त्यांना पाकिस्तानी लष्कराच्या स्वाधीन केले. जर्मन राजकीय अधिकारी गुंतेर मुलाक यांनी ‘पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स’मध्ये बोलताना जाधव यांना तालिबानांनी इराणमधून उचलले आणि ‘आयएसआय’ला विकले, असे म्हटले होते. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की तालिबानी टोळ्या आणि ‘आयएसआय’चे हस्तक यांच्यात तसा फार फरक नाही. त्यांना पाकिस्तानच्या हवाली करण्यात आल्यावर त्यांची अटक बलुचिस्तानात दाखवण्यात आली. यासंबंधीचे वृत्त न्यूज या पाकिस्तानी इंग्लिश वृत्तपत्राने तेव्हा प्रसिद्ध केले होते. त्यांना पकडून इस्लामाबादला आणल्यावर त्यांचे हाल हाल करण्यात आले आणि त्यानंतर हे प्रकरण पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयापुढे हेतुत: नेण्यात आले आणि त्या न्यायालयाने जाधव यांना फाशीची शिक्षा दिली.

आता जाधव यांचा फेरविचार अर्ज निघाला, तर तो पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयापुढे विचारार्थ येईल. त्याचे काय होईल हे सांगता येणे अवघड आहे. पाकिस्तानी न्यायव्यवस्थाही लष्कराच्या नजरेपासून जास्त दूर जाऊ शकत नाही. जाधव हे गुप्तहेर आहेत हा पाकिस्तानी दावा आहे. त्यांनी पाकिस्तानात कराचीला तसेच बलुचिस्तानात घातपाती कारवाया केल्या असल्याचे म्हटल्यावर जिनिव्हा कराराच्या कलम ३६नुसार भारतीय प्रतिनिधीला त्यांना भेटू देणे क्रमप्राप्त होते. पाकिस्तानकडे अनेकवार तशी मागणी केल्यानंतरही पाकिस्तानने त्यास दाद दिली नाही. तेव्हा भारताने कुलभूषण जाधव प्रकरण हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेले. त्याचा निकाल भारताच्या बाजूने लागून भारतीय दूतावासातल्या प्रतिनिधीस जाधव यांना भेटू देण्यात यावे आणि जाधव प्रकरणाची फेरसुनावणी करण्यात यावी, असे या निकालात म्हटले आहे. जोपर्यंत त्याची अंमलबजावणी केली जात नाही, तोपर्यंत त्यांना फाशी दिले जाता कामा नये, असेही या न्यायालयाने पाकिस्तानला बजावले. हा निकाल गेल्या वर्षी १७ जुलै रोजी लागला. मात्र तेव्हा न्यायालयाने किती काळात त्यांना ही संधी देण्यात यावी ते सांगितलेले नव्हते. जाधव यांना अपील करण्याची मुदत १९ जुलै रोजी संपत असल्याचे पाकिस्तान सरकारनेच ठरवून टाकले. त्यासाठी त्यांनी दि. २० मे २०२० रोजी एक वटहुकूम काढला. त्यात कुलभूषण जाधव यांना आपल्या फाशीच्या शिक्षेच्या विरोधात अपील करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली. कुलभूषण हे भारतीय नागरिक असल्याने त्यांना हा वटहुकूम कसा लागू होऊ शकतो, हे त्या सरकारचे कोणी प्रतिनिधी सांगू शकतील असे वाटत नाही.

मुळातच जाधव यांच्याबाबत आंतरराष्ट्रीय न्यायालयाने एक निकाल दिलेला असताना त्याला बाजूला सारून वटहुकूम काढणे हेसुद्धा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा अवमान करणारे आहे. १९ जुलै रोजी आपल्या वटहुकमाची मुदत संपत असल्याचे पाकिस्तान सरकारने भारत सरकारला कळवले असेलच असेही नाही. तसे कळवले, तर भारत पुन्हा आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाईल ही पाकिस्तान सरकारला वाटणारी भीती असली पाहिजे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाला बाजूला सारण्याचे अधिकार प्रत्येक देशाला असतील, तर मग आंतरराष्ट्रीय न्यायालयाची गरजच काय? एखाद्याा देशाच्या वटहुकमाने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल बदलता येऊ शकतो, हे कोणत्या निकालात किंवा कायद्यााच्या पुस्तकात लिहिलेले आहे हे पाकिस्तानला सांगता यायला हवे. जाधव यांचा हा सर्व प्रश्न पुन्हा एकदा आपल्याला आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे उपस्थित करावा लागेल, असे त्या न्यायालयात आधीचा खटला जिंकून आलेले वकील हरीश साळवे यांनी म्हटले आहे.

दरम्यान जाधव यांनी आपल्याला अपील करायचे नाही, असे म्हटले असल्याचा व्हिडिओ पाकिस्तानने जाहीर केला आहे. एकतर पाकिस्तानच्या छळवादाला कंटाळून त्यांनी पाकिस्तानला हवे असणारे निवेदन व्हिडिओद्वारे दिले असण्याची शक्यता आहे. जाधव यांच्या पत्नी आणि मातोश्री यांना काचेअलीकडून जाधव यांची भेट घ्यावी लागली होती, तेव्हा याचे प्रत्यंतर आलेले होते. त्यांना ही भेट घेताना गळ्यातील मंगळसूत्र आणि कपाळावर असलेले कुंकू काढून जाधव यांना सामोरे जावे लागले. कुलभूषण यांनी आपल्या आईचे कोरे कपाळ पाहून तेव्हा ‘बाबा कसे आहेत’ असे विचारले होते. जाधव यांच्यावर दहशत एवढी की त्यांना मराठीत बोलू दिले गेले नाही. सुरक्षेचे कारण देऊन त्यांच्या चपलाही काढून घेण्यात आल्या आणि दुसऱ्या चपला देऊन त्यांना या भेटीसाठी पाठवण्यात आले. या चपलांमध्ये भारतीय दूतावासाने छुपा कॅमेरा आणि ध्वनिमुद्रण करणारी छुपी चिप बसवली असल्याचे बाहेर जमलेल्या पत्रकारांना सांगण्यात आले. तिथे त्यांची गर्दी जमवली होती. वास्तविक दोन्ही देशांमध्ये झालेल्या समझोत्यानुसार, पत्रकारांना या भेटीच्या जागेपासून दूर ठेवण्याचे ठरलेले होते, असे तेव्हाच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी तेव्हा राज्यसभेत सांगितले होते. आई आणि पत्नी यांना साड्या बदलायला लावून त्यांना सलवार-कमीझ परिधान करायला लावले होते, ही त्यांच्या विकृतीची कमाल होती. हे आपण विसरून चालणार नाही. विशेष म्हणजे या भेटीच्या वेळी भारतीय दूतावासातल्या राजकीय प्रतिनिधीला तिथे असूनही जाधव यांना जिथे ठेवले होते तिथपर्यंत जाऊ दिले गेले नाही, अन्यथा त्याने त्यास आपला आक्षेप नोंदवला असता.

त्यांच्या भेटीचे हे असे नाटक घडविण्यात आले. आता त्या निकालाचा दुसरा भाग म्हणजे त्यांना फेरविचार याचिका करू देण्याचा. कुलभूषण जाधव यांना काय वाटते ते विचारून घ्या आणि निर्णय घ्या, असे काही त्या न्यायालयाने म्हटलेले नव्हते. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशाचे पूर्ण पालन करत नाही, तोपर्यंत कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती लागू आहे हे उघड आहे. दूतावासाच्या प्रतिनिधीची जाधव यांच्याबरोबरची भेट ही एकांतात असायला हवी, हे काही नव्याने सांगायला हवे असे नाही. ती घडवली जात नाही, तोपर्यंत ती स्थगिती अस्तित्वात राहणार आहे. ही स्थगिती डावलणारा हा वटहुकूम आहे, म्हणजेच तो न्यायालयाचा अवमान करणारा आहे, असे त्या न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचे काम आपल्या सरकारला आता करावे लागणार आहे. ते तातडीने हाती घेतले जावे, अन्यथा पाकिस्तान कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही.

कुलभूषण यांनी फेरविचार याचिका दाखल करायला नकार दिल्याचे पाकिस्तान सरकारने जाहीर केले, याचाच अर्थ आता त्यांच्या दयेच्या अर्जाचाच काय तो पर्याय जाधव यांच्यासमोर आहे, असे पाकिस्तानला दाखवायचे आहे. जाधव यांचा असा अर्ज म्हणजेच त्यांच्याकडून ‘सर्व गुन्ह्यांची कबुली’ मिळवण्याचा हा प्रकार आहे. या व्हिडिओमध्ये जाधव यांनी स्वत: ‘मी सैनिक आहे आणि मी इथे कशासाठी आलो होतो ते मला माहीत आहे आणि जे केले त्याची शिक्षा मला भोगलीच पाहिजे’ यासारखे मत व्यक्त केले आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी पढवल्याप्रमाणे ते बोलले आहेत. याचा अर्थ सर्व उपाय थकल्याचे वाटून ते तसे बोलले असावेत. कुलभूषण यांनी फेरविचार याचिका करायची नाही, असे म्हटले याचा अर्थ त्यांना दयेचा अर्ज पुढे रेटायचा आहे, असा होतो. म्हणजेच त्यांना आपला गुन्हा कबूल करावा लागेल. गुन्हा कबूल करणे म्हणजे आपल्याला बाँबस्फोट घडवायला पाठवण्यात आले होते आणि त्याबद्दल आपल्याला खेद होतो, असेही त्यांना स्पष्ट करावे लागेल. म्हणजेच भारत हा पाकिस्तानमध्ये असेच दहशतवादी उद्योग करत असतो, असे सांगण्यासारखे होणार आहे. समजा, त्यांचा दयेचा अर्ज फेटाळण्यात आला, तर त्यांची फाशी अटळ असेल.


Kulbhushan Jadhav in the

माझ्या मते कुलभूषण यांच्याबाबतीत पुढील शक्यता संभवतात. पाकिस्तानच्या दुष्टाव्याची आजवरची परंपरा लक्षात घेतली तर हे घडू शकते असे वाटते. काय आहेत या शक्यता?

१) ते ज्या कोणत्या तुरुंगात आहेत, तिथेच त्यांच्यावर हल्ला घडवला जाईल आणि त्यात त्यांना मारले जाईल. फाशीचे सगळेच कैदी एकाच बराकीत ठेवले गेले असण्याची शक्यता आहे किंवा त्यासाठी ते तिथे आणूनही ठेवले जातील.

२) त्यांना फेरविचार याचिका करायची नसल्याने आपल्यापुढे दुसरा पर्याय नव्हता असे सांगून लष्करी न्यायालयाने दिलेल्या निकालाची अंमलबजावणी म्हणून त्यांना त्या तुरुंगातच फासावर लटकवले जाईल.

३) जाधव यांना पत्रकारांसमोर हेतुत: आणून त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती होऊ दिली जाईल. तिचे प्रत्यक्ष चित्रण होऊ दिले जाईल आणि मग त्यांना मृत्यूदंड दिला जाईल.

हे असेच घडेल असे नाही, पण हे शत्रूराष्ट्र पाकिस्तान आहे हे विसरून चालणार नाही.

पाकिस्तानला काहीही करून काश्मीरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित करायचा आहे. पाकिस्तानकडून काश्मीर प्रश्नाबरोबरच कुलभूषण जाधव यांच्या प्रश्नाचीही सांगड घातली जाईल, अशी शक्यता आहे. पाकिस्तानमध्ये सध्या जरी लोकशाहीने निवडून दिलेले इम्रान खान यांचे सरकार असले, तरी ते लष्कराच्या हातातले बाहुले आहे. लष्कराच्या हो मध्ये हो आणि नाही मध्ये नाही, मिळवणारे हे सरकार आहे. त्याला स्वत:चे काहीही मत नाही. पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानची ‘इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स’ ही लष्कराची गुप्तचर संघटना जे काही म्हणेल, तेच इम्रान खान यांचे सरकार करील यात शंका नाही. पाकिस्तानचे लष्कर कुलभूषण जाधव यांना सोडून द्या, असे सांगणार नाही. हा प्रश्न एकदाचा निकालात काढा, म्हणजे तो वारंवार जगाच्या व्यासपीठावर उपस्थित केला जाणार नाही, असे त्या लष्कराचे मत असेल यात शंका नाही.

सध्या पाकिस्तानी लष्कराकडून भारतीय सरहद्दीवर सातत्याने गोळीबार केला जातो आहे, तो पाकिस्तानमधून घुसवण्यात येणाऱ्या दहशतवाद्यांना संरक्षण देण्यासाठी आहे. कोणत्याही काळात करण्यात येत असलेल्या गोळीबाराच्या छायेतच या दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसवण्यात येते. भारतीय गुप्तचरांच्या अंदाजानुसार असे पाचशेवर दहशतवादी पाकिस्तानी हद्दीतून घुसण्याच्या तयारीत आहेत. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये अनेक तळांवर त्यांचे त्यासाठीचे प्रशिक्षण चालू असते. स्वाभाविकच आहे की, त्यावरून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठीही पाकिस्तानने आताच कुलभूषण जाधव यांचा प्रश्न उपस्थित केला असण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनाने घातलेले थैमान आणि पाकिस्तानची सध्याची डळमळीत आर्थिक स्थिती लक्षात घेता पाकिस्तानला भारतासंबंधात रोज नवे कोणते तरी प्रश्न उपस्थित करायची इच्छा होत असते. मग इम्रान खान कधी नरेंद्र मोदींचा उल्लेख एकेरीत करून आपल्या बौद्धिक पातळीचे दर्शन घडवतात, तर कधी ते काश्मीरमधल्या मानवाधिकाराच्या तथाकथित हननाच्या प्रशद्ब्राावर आपले तोंड उघडतात. पण पाकिस्तानात मानवाधिकाराला कसे चिरडून टाकले जात असते, त्याविषयी भाष्य ते कधीही करत नाहीत.

इम्रान खान हे केवळ पाकिस्तानी लष्कराच्या हातचेच बाहुले आहे असे नाही, तर ते पाकिस्तानमध्ये असणाऱ्या धर्मांध शक्तीच्या हातातलेही खेळणे आहे. अगदी अलीकडचे एक उदाहरण द्यायचे झाले, तर इस्लामाबादमध्ये उभारण्यात येणाऱ्या कृष्ण मंदिराच्या बातमीचे देता येईल. इस्लामाबादमध्ये सहाशे ते सातशे हिंदू कुटुंबे अस्तित्वात आहेत. त्यांच्यासाठी आणि तेही राजधानीच्या शहरात कृष्ण मंदिर उभारणार, ही तशीही मोठी बातमी म्हणावी लागेल. त्यासाठी १० कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. गंमत पाहा, दुसऱ्याच दिवशी जमात ए इस्लामीने या मंदिराच्या उभारणीला विरोध करणारे निवेदन प्रसिद्ध केले. त्याबरोबर या संबंधीचा जो प्रस्ताव होता तो संपुष्टात आणण्यात आला. 'दोन पावले पुढे जाऊन दहा पावले मागे जाणारा नेता' ही इम्रानखान यांची ओळख आहे. त्यांनी सत्तेवर येताच भारताला आवाहन केले होते की, भारताने एक पाऊल पुढे टाकले तर आम्ही दोन पावले पुढे टाकायला तयार आहोत. ज्यांना एक पाऊलसुद्धा धड टाकता येत नाही, ते भारताला पाऊल उचलायला सांगतात हेच नवलविशेष.

अरविंद व्यं. गोखले
९८२२५५३०७६