विकल करणारे वादळ

विवेक मराठी    18-Jul-2020
Total Views |

आसाममधले लोकप्रिय नेते हेमंत बिस्वसर्मा यांच्यापासून लागलेली ही गळती काँग्रेसला अधिकाधिक विकल बनवत आहे. राहुल गांधी यांच्या सर्व प्रकारच्या मर्यादा स्पष्ट दिसत असूनही, ही गळती रोखण्यासाठी, पक्ष वाचविण्यासाठी कोणी पुढे येत नाही हे दुर्दैव आहे. त्याऐवजी गांधी घराण्यावरची निष्ठा सिद्ध करण्यात आणि पक्षासाठी घातक असे अंतर्गत राजकारण करण्यात काँग्रेसमधले काही दिग्गज व्यग्र आहेत...


Sachin Pilot & Co will be

'हे सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. ते पडेल ते त्यांच्यातल्या अंतर्गत विरोधामुळेच' हे उद्गार गेले काही दिवस आपल्या राज्याच्या विरोधी पक्षनेत्याच्या तोंडून आपण ऐकत आहोत. आणि ही भविष्यवाणी खरी करून दाखवण्याचा सत्ताधाऱ्यांनी चंग बांधला आहे की काय, असे वाटावे अशा बातम्याही कानावर येत आहेत. महाराष्ट्रातले सरकार न पाडण्याचा भाजपाचा हा पवित्रा योग्यच आहे. भाजपाने दुसऱ्या राज्यातही अगदी असाच पवित्रा घेतला आहे असे वाटते, ते राज्य म्हणजे राजस्थान. फक्त तिथे तसा पवित्रा घेतल्याची भाजपाने जाहीर वाच्यता केलेली नाही. मात्र आतापर्यंतची त्यांची कृती हेच दर्शविणारी आहे.

राजस्थानमध्ये बहुमतात निवडून आलेली काँग्रेस सत्तेवर असली, तरी पक्षांतर्गत माजलेल्या दुहीमुळे काँग्रेसच्या हातून सत्ता जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर, आणखी एक धडाडीचा तरुण नेता गमावण्याची वेळ या अतिवृद्ध पक्षावर आली आहे. वास्तविक, शंभरी ओलांडलेली उमर हे एखाद्या राजकीय पक्षाचे बलस्थान आहे, असायला हवे. अर्थात तो पक्ष जर बदलत्या काळाची पावले ओळखून विचारसरणीत, कार्यपद्धतीत बदल करत असेल आणि देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देत असेल, तरच दीर्घायू हे त्या पक्षाचे बलस्थान ठरेल. मात्र हे समजण्याची ताकद आणि त्यानुसार कृती करायचा उत्साह यापैकी काहीच काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वात आढळत नाही. परिणामी, देशातला सर्वात ज्येष्ठ राजकीय पक्ष मरणासन्न वाटावा अशा स्थितीत एकेक दिवस काढतो आहे.

उद्याची आव्हाने समर्थपणे पेलण्यासाठी तरुण नेतृत्व पुढे यायला हवे, ते टिकायला हवे, त्यांना स्वतःला वाढण्यासाठी आणि पक्षमजबुतीसाठी कर्तृत्वाच्या नवनव्या संधी निर्माण करून द्यायला हव्यात, हे ना हंगामी अध्यक्ष मनावर घेत, ना कार्यकारी अध्यक्ष. त्याऐवजी जुन्या खोडांचे हट्ट पुरवण्यात एकेका तरुण नेतृत्वाला पक्षापासून दूर करण्याचे काम २०१६पासून सातत्याने चालू आहे. केवळ भाजपावर पक्षफोडीचा आरोप करण्यात धन्यता मानण्याऐवजी, या वस्तुस्थितीकडे त्यांनी लक्ष द्यायला हवे.

आसाममधले लोकप्रिय नेते हेमंत बिस्वसर्मा यांच्यापासून लागलेली ही गळती काँग्रेसला अधिकाधिक विकल बनवत आहे. राहुल गांधी यांच्या सर्व प्रकारच्या मर्यादा स्पष्ट दिसत असूनही, ही गळती रोखण्यासाठी, पक्ष वाचविण्यासाठी कोणी पुढे येत नाही हे दुर्दैव आहे. त्याऐवजी गांधी घराण्यावरची निष्ठा सिद्ध करण्यात आणि पक्षासाठी घातक असे अंतर्गत राजकारण करण्यात काँग्रेसमधले काही दिग्गज व्यग्र आहेत, तर काही उदासीन. (ज्योतिरादित्य, पायलट तरुण आहेत, पण एसेम कृष्णांसारखी बुजुर्ग व्यक्तीही ८०-८५च्या वयात पक्षाला सोडचिठ्ठी देते, त्यामागची कारणे काँग्रेसने समजून घ्यायला हवीत. काँग्रेसमध्ये सर्व प्रकारचे मानमरातब मिळाल्यावरही कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात ते भाजपात आले. तात्पर्य - पक्षांतरामागे नेहमीच सत्तेचा हव्यास नसतो. त्याहीपेक्षा महत्त्वाची आणि गंभीर कारणे असू शकतात, हे काँग्रेसने लक्षात घ्यावे.)

२०१९मध्ये काँग्रेसला राजस्थानात एकहाती सत्ता स्थापता येण्याएवढे बहुमत मिळाले. त्या यशाचे शिल्पकार होते सचिन पायलट. त्यांचे घराणेच काँग्रेसशी एकनिष्ठ म्हणावे असे. पायलट तरुण असले, तरी गेली १८-१९ वर्षे ते पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. दीड तपाची राजकारणातली सक्रियता आणि अलीकडच्या विधानसभा निवडणुकीत मिळवून दिलेले यश, या दोन गोष्टी त्यांची मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा न्याय्य ठरवते. राजस्थानतल्या गुजर आणि मीना या मतपेढीवर प्रभाव असणाऱ्या समाजगटांचे समर्थन असलेला सचिन पायलट यांच्यासारखा तरुण, तडफदार नेता पक्षाकडे असणे हा केवढा मोठा ॲसेट आहे. पण ते त्यांच्या लक्षात तरी येत नाही किंवा एकूणच पक्षावर साचलेली मरगळ जुन्या जाणत्यांना असे काही सुचू तरी देत नाही.

-५ वर्षांपूर्वीपर्यंत राहुल गांधींच्या भोवती पक्षातल्या तरुण कार्यकर्त्यांचे जे कडे होते, ते राहुल आणि पक्ष दोघांसाठीही उपकारक होते. अशांच्या सान्निध्यात राहुल गांधींच्या नेतृत्वक्षमतेतली उणीव झाकली जात होती. ही मंडळी म्हणजे काँग्रेस पक्षात थोडी धुगधुगी शिल्लक असल्याचीच खूण होती. त्यातले हेमंत बिस्वसर्मा राहुल गांधी यांनी केलेल्या दुर्लक्षाला कंटाळून बाहेर पडले. आंध्रात जगन मोहन रेड्डी यांनीही वेगळी वाट धरली. अल्पेश ठाकोर, प्रियांका चतुर्वेदी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. ज्योतिरादित्य सिंदिया यांच्यासारख्या भरवशाच्या साथीदाराने हात सोडला. इतके सगळे आघात होऊनही बधिरलेले काँग्रेसश्रेष्ठी भानावर येण्याचे नाव घेईनात. अशा बिकट परिस्थितीत पायलट यांनी बंड पुकारले. हे बंड थंड करण्याऐवजी, 'ज्याला पक्ष सोडायचा आहे त्यांनी खुशाल सोडावा' असे सांगत मतभेदाची दरी आणखी वाढवण्याचे काम राहुल गांधी यांनी केले. त्यांचे हे विधान निष्ठावंत कार्यकर्त्यांबद्दलच्या बेपर्वाईचे द्योतक होते. विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून आपली योग्यता सप्रमाण सिद्ध केल्यावर, राज्यात काँग्रेस आणि स्वतःच्या नेतृत्वाविषयी जनमत तयार केल्यानंतर मुख्यमंत्रिपदाची आकांक्षा बाळगणे यात गैर काय? यातूनच पक्षातील नेतृत्वाची पुढची फळी तयार होत जाते, याची जाण युवराजांना नाही, तरी त्यांच्या मातोश्रींना असणे अपेक्षित होते. मात्र पायलट यांच्या न्याय्य मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली. त्यानंतर गेहलोत-पायलट यांच्यामधले मतभेद वाढत गेले. परस्परांवरील आरोप-प्रत्यारोपांमध्येच राजस्थानचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री अडकले. अगदी मोजकीच राज्ये हातात असताना आपल्या अपयशाचे खापर भाजपाच्या माथी फोडण्यात काँग्रेसश्रेष्ठी धन्यता मानत आहेत. सत्तेच्या राजकारणात विरोधी पक्ष हा शत्रू नसला, तरी प्रतिस्पर्धी असतोच. तो तुमच्यातले कमकुवत दुवे शोधत, चाल करण्याची - वरचढ होण्याची संधी साधणारच. राजकारणात हे अटळ असते. अशा वेळी त्याच्या नावाने शंख करत स्वतःचे आणखी हसे करून घ्यायचे की स्वतःच्या चुका सुधारायच्या? हे काँग्रेसने लक्षात घेतले, तरी परिस्थिती थोडी तरी बदलेल.

भाजपाविरोधात कडवी झुंज देत सचिन पायलट यांनी राजस्थान मिळवून दिले. आपली राजकीय स्वप्ने पूर्ण करण्यासाठी उद्या त्याच भाजपात जाण्याचा पर्याय जर सचिन पायलट यांना नाइलाजाने निवडावा लागला, तर याचे शिल्पकार कोण असतील? सध्या तरी असा काही विचार नसल्याचे पायलट म्हणत आहेत, पण पुढचे कोणी सांगावे? कदाचित ते प्रादेशिक पक्ष स्थापन करतील. त्या माध्यमातून राज्यात स्वतःची प्रतिमा निर्माण करतील. स्वतःच्याच मार्गात अशी नव्या प्रादेशिक पक्षाची धोंड निर्माण करण्याचे 'कर्तृत्व'ही काँग्रेसच्या नावावर जमा होईल. या प्रादेशिक पक्षाला उद्या भाजपाने पाठिंबा दिला, तरी ही परिस्थिती काँग्रेसीजनांच्या नतद्रष्टतेतून निर्माण झालेली आहे, हे सत्य कधी बदलणार नाही.
पायलट यांच्या रूपाने घोंगावत असलेल्या वादळाचा अंत नेमका कसा होईल, हे कळायला आणखी काही दिवसांचा अवधी लागेल. तो कसाही झाला, तरी त्याची जास्तीत जास्त झळ काँग्रेसला बसणार, हे अटळ आहे.