मुस्लीम समुदायाची आरोग्य कर्मचाऱ्यांवर दगडफेक, पोलिसांनाही दुखापत

विवेक मराठी    23-Jul-2020
Total Views |


corona_1  H x W

राजापूर, (वि.सं.कें.) :  कोरोना रुग्णाला सरकारी रुग्णालयात नेण्यासाठी आलेल्या आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांवरच मुस्लिमांच्या २००-२५० जणांच्या मोठ्या समुदायाने दगडफेक केल्याची घटना तालुक्यातील ‘साखरी नाटे’ गावात घडली. बुधवार, २२ जुलै रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेत आरोग्य कर्मचारी व पोलिसांना किरकोळ दुखापत झाली आहे. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आरोग्य अधिकाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. सर्वेक्षणासाठी पुन्हा या गावात जाण्यास या कर्मचाऱ्यांनी नकार दिला आहे. या प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव गावात केंद्रीय राखीव पोलीस दलाला पाचारण करण्यात आले आहे.

रविवार, १९ जुलै रोजी कोरोनामुळे गावात एका मध्यमवयीन महिलेचा मृत्यू झाला. तत्पूर्वीही गावात एक कोरोनामृत्यू झाला होता. 20 जुलै रोजी ग्रामपंचायत सभेत निर्णय झाला व त्यानुसार २१ जुलै रोजी आरोग्य अधिकारी येऊन गावाचे सर्वेक्षण करून गेले. भाजपा नेते अमजद बोरकर यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन सर्व नागरिकांना केले होते. बुधवार २२ रोजी एका रुग्णवाहिकेतून आरोग्य अधिकारी एका ५५ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णास सरकारी रुग्णालयात नेण्यासाठी आले असता त्या रुग्णवाहिकेवर व पुढे असणाऱ्या पोलिसांच्या गाडीवर गावकऱ्यांनी दगडफेक केली. गावातील दफनभूमीजवळ ही घटना घडली. सध्या कोरोनाच्या काळात अंत्यविधीस केवळ 20 जणांना परवानगी असताना अन्य एका मृताच्या दफनविधीसाठी बुधवारी हा मोठा समुदाय दफनभूमीत एकत्र आला होता.

गावातील डॉक्टरांनी १५-२० कोविड संशयितांना तपासणी करण्यास सांगितले होते. गेल्या काही दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. राजापूर तालुक्यातही हे प्रमाण अधिक आहे. साखरी नाटे या मुस्लिमबहुल वस्ती असणाऱ्या गावात मागील एका आठवड्यापासून अनेकांना कोरोनाची लक्षणे आढळली असून सरकारी रुग्णालयात जाऊन रुग्ण तपासणी करण्यास नकार देत आहेत. नाटे आणि साखरी नाटे या दोन गावांमध्ये कोरोनापासून बचाव करण्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती केली जात आहे. घराबाहेर पडू नका, थेट संपर्क टाळा अशा सूचना मशिदीत जाऊन दिल्या जात असल्या तरी नागरिक ते पाळण्यास तयार नाहीत. आशा वर्कर्स यांच्या आठवडा फेरीत, त्यांना माहिती न देणे, तपासणी करू न देणे असे प्रकार इथे बरेच दिवस घडत आहेत. मेलो तरी चालेल पण तपासणी करणार नाही अशी उत्तरे दिली जात आहेत. संक्रमणाचा धोका लक्षात घेऊन, कोरोना रुग्णाचे अंत्यसंस्कार मुस्लीम दफनविधीनुसार करण्यास परवानगी दिली जात नाही. १९ जुलै रोजी मृत झालेल्या नातेवाईकांनी मृतदेह आपल्या ताब्यात देण्यास सांगितले होते.