हा हिंदूंचा आनंदोत्सव आहे

विवेक मराठी    24-Jul-2020
Total Views |
श्रीराम मंदिर भूमिपूजनाच्या सोहळ्यात सहभागी होऊ शकत नाही यांची खंत वाटत असली, तरी हिंदू मानस असे सांगते की, कणाकणात राम आहे, हेच मानस प्रकट करण्यासाठी हिंदू समाजाने पाच ऑगस्ट रोजी घराघरातून दीपोत्सव करत कणाकणातील रामाची अनुभूती जगाला दिली पाहिजे. पाच ऑगस्ट २०२० रोजी हिंदू समाजाने अभूतपूर्व आनंदोत्सव साजरा केला, याची नोंद इतिहासात झाली पाहिजे.

shree ram temple:  This i


पाच ऑगस्ट २०२० हा दिवस आपल्या देशाच्या दृष्टीने सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल. जे स्वतःला हिंदू समजतात, त्यांच्या जीवनात हा दिवस अमृतसिद्धीचा आहे. प्रदीर्घ काळ हिंदू समाजाने प्रभू रामचंद्रांच्या जन्मस्थानावरील कलंक धुऊन काढण्यासाठी अविरत प्रयत्न केला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेल्या या जन्मस्थान मुक्तिआंदोलनाचे नेतृत्व जरी वेगवेगळे असले, तरी हिंदू समाज म्हणून एकच जनभावना होती, ती म्हणजे श्री रामजन्मभूमी मुक्त झाली पाहिजे, परकीय धर्मांध आणि श्रद्धास्थानाचे पावित्र्य नष्ट करणाऱ्या आक्रमकांची निशाणी नेस्तनाबूत झाली पाहिजे, श्रीरामांच्या मंदिरावर भगवा ध्वज पुन्हा अभिमानाने फडकला पाहिजे याचसाठी हा प्रदीर्घ लढा चालू होता. या लढ्यातील दोन महत्त्वाचे दिवस म्हणजे ६ डिसेंबर १९९२ आणि ९ नोव्हेंबर २०१९. सहा डिसेंबर रोजी परकीय आक्रमकांची निशाणी धुळीला मिळाली, तर नऊ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने 'जन्मभूमी श्रीरामाचीच' असा निर्वाळा दिला. रामजन्मभूमीत भव्य मंदिर उभारण्यासाठी न्यास स्थापन करण्यासाठी न्यायालयाने सूचना दिल्या होत्या. आता पाच ऑगस्ट रोजी प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराचे भूमिपूजन देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी करतील, या घटनेचा हिंदू समाजाला आनंद झाला आहे.

'स्वप्न जे देखिले डोळा ते प्रत्यक्ष येतसे' अशी हिंदू समाजाची स्थिती झाली असताना काही मंडळींना मात्र या आनंदसोहळ्यामुळे अस्वस्थ वाटू लागले आहे. श्रीराम मंदिर भूमिपूजनाने आत्ता इतके अस्वस्थ होण्याचे काय कारण? ते उभारले जाणार, हे तर आंदोलन सुरू झाले तेव्हाच ठरले होते. शिलान्यास पूजनाने ते अधोरेखित करण्यात आले. आता तो वज्रनिश्चय प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने पावले पडायला लागली आहेत, इतकेच. त्यातच आता 'राम मंदिर बांधून कोरोना जाईल का?' असा प्रश्न विचारला गेला. याच सद्गृहस्थाने रामायण-महाभारताची गरज नाही असे विधान केले होते. एकूण रामाविषयी, पर्यांयाने हिंदू समाज आणि संस्कृती यांच्याविषयी अनास्था असणाऱ्या मंडळींची अडचण या भूमिपूजनाच्या सोहळ्याने केली आहे. महाराष्ट्रातील एक खासदार म्हणतात की, "मोदी अयोध्येला जात आहेत, देशावरचे कोरोना संकट नष्ट झाले आहे का?" हा केवळ मोदीद्वेष नाही, तर श्रीराम, मातृभूमी आणि इथली चिरंतन संस्कृती याविषयीचा अनादर आहे. काही बोरूबहाद्दर तर आपल्या विद्वत्तेचे प्रदर्शन मांडून आपली पातळी दाखवून देत आहेत. अडवाणींची रथयात्रा ज्यांनी रोखली, त्या लालूप्रसाद यादव यांना भूमिपूजनाला बोलवा, रामजन्मभूमी प्रकरणाचा निकाल दिला त्या न्यायमूर्ती रंजन गोगोई यांना निमंत्रण द्या. बाबरी ढांचा पतनासंबंधी खटला रद्द करा.. या आणि अशा अनेक सूचना त्यांनी दिल्या आहेत. या सूचना देताना बाबरी ढांचा 'आम्हीच' पाडला या कपोलकल्पित कथेची आठवण करून देण्यास ते विसरले नाहीत. २०१९च्या आधी अयोध्येच्या परमपवित्र भूमीत न गेलेले या निमित्ताने स्वत:ची जत्रा, स्वत:चा गुलाल या न्यायाने नाचवत आहेत आणि त्यातून संपूर्ण हिंदू समाजाचे मनोरंजन होत आहे. आधी 'मंदिर मग सरकार' ही स्वत: केलेली घोषणा बासनात बांधून ठेवून सत्ताशय्या करणारे जेव्हा अशा तत्त्वज्ञानाच्या गोष्टी सांगतात, तेव्हा नक्की जळजळ कशाची आहे? हे हिंदू समाजास कळत असते. हिंदुत्वाचा आपला बेगडी मुखवटा याआधीच गळून पडला आहे, हे या मंडळींनी लक्षात घ्यायला हवे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या न्यासाच्या माध्यमातून, पाच ऑगस्ट रोजी होणाऱ्या मंदिर भूमिपूजनाचे आयोजन होत आहे. कोट्यवधी हिंदूंचे लघुरूप म्हणून हा न्याय कार्यरत आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. हे भूमिपूजन खूप छोट्या स्वरूपात होत आहे. करोनाचे संकट नसते, तर या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आसेतुहिमालय हिंदू समाज अयोध्येच्या दिशेने निघाला असता. पण हिंदू समाजाचे अंगभूत वैशिष्ट्य असे की त्याला स्थळकाळाचे भान सदैव असते आणि म्हणूनच महामारीच्या संकटात तो अयोध्येस जाण्याचा हट्ट करत नाही. महामारी, प्रशासनावरचा ताण, प्रचंड संख्येने लोक एकत्र येण्याचे होणारे दुष्परिणाम त्याला कळतात, म्हणूनच तो आग्रही भूमिका घेत नाही. हिंदूंच्या अंगभूत वैशिष्ट्याचा काही लोक चुकीचा अर्थ घेतात ही गोष्ट वेगळी असली, तरीही हिंदू समाज सनातन आहेच, त्याचबरोबर तो नित्यनूतन आहे, काळासमवेत चालताना तो आवश्यक ते बदल घडवून आणण्यासाठी तत्पर असतो, हेही या निमित्ताने अधोरेखित होत आहे ही आनंदाची बाब आहे.

अयोध्येत रामजन्मभूमीवर भव्य मंदिर निर्माण होणारच आहे. अनंतकाळापासून अयोध्या हे हिंदू समाजाचे श्रद्धाकेंद्र आहे. आता मंदिर साकार झाल्यावर या श्रद्धा अधिक उजळून निघतील, यात शंका नाही. प्राप्त परिस्थितीत आपण अयोध्येस जाऊ शकत नाही, भूमिपूजनाच्या सोहळ्यात सहभागी होऊ शकत नाही यांची खंत वाटत असली, तरी हिंदू मानस असे सांगते की, कणाकणात राम आहे, हेच मानस प्रकट करण्यासाठी हिंदू समाजाने पाच ऑगस्ट रोजी घराघरातून दीपोत्सव करत कणाकणातील रामाची अनुभूती जगाला दिली पाहिजे. पाच ऑगस्ट २०२० रोजी हिंदू समाजाने अभूतपूर्व आनंदोत्सव साजरा केला, याची नोंद इतिहासात झाली पाहिजे.