मानवतेच्या मंदिराला सेवाव्रतींचा आधार!

विवेक मराठी    28-Jul-2020
Total Views |
 @संजय देवधर

अनाथ बालके व निराधार महिला यांचा मायेने सांभाळ करणारी संस्था म्हणजे आधाराश्रम! नाशिकमध्ये ६० वर्षांहून अधिक काळ मानवतेच्या मंदिराचे कार्य अविरत सुरू आहे. कोरोनाच्या संकटाने जनजीवन ठप्प झालेले असतानाही येथील १५० मुलामुलींचा सांभाळ प्राणपणाने करण्यात आला. देणग्यांंचा स्रोत आटला, सरकारी अनुदानाची रक्कम कमी प्रमाणात मिळाली, तरीही न डगमगता संस्थाचालकांनी मुलांची आबाळ होऊ दिली नाही. उलट लॉकडाउन पथ्यावरच पडले आणि मुलांची तब्येत सुधारली. सेवाव्रतींच्या आधाराने मानवतेचे वेगळे दर्शन घडले.

Adharashram, NGOS_1 


संस्थेचे अध्यक्ष विजय दातार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "आधाराश्रम ही संस्था निराधारांना केवळ अन्न, वस्त्र व निवारा देऊन थांबत नाही. बालकांना शिक्षण, उत्तम आरोग्य देऊन पुनर्वसनाद्वारे चांगला माणूस, नागरिक बनविते. त्यांच्या आयुष्यातील अंधार नष्ट करून सौख्याचे हास्य त्यांच्या चेहऱ्यावर फुलविते. कविवर्य कुसुमाग्रजांनी 'मानवतेचे मंदिर' या यथार्थ शब्दांत या अविरत साधनेचा गौरव केला. तो सार्थ ठरविण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे."

लक्ष्मीबाई दातार यांच्या प्रेरणेने त्यांचे सुपुत्र वैद्यराज स.वा. उर्फ अण्णाशास्त्री दातार यांनी राहत्या घरातच अनाथ महिलाश्रम सुरू केला. दि. ४ एप्रिल १९५४ रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हे सेवा कार्य सुरू झाले. त्यांना पत्नी मीनाक्षी यांनी साथ दिलीच, त्याशिवाय मुकुंदशास्त्री बापट, इंदूताई खाडिलकर, इंदिराबाई बापट, पु.रा. वैद्य यांनी सहकार्य केले. कालांतराने अनाथ बालकांना आधार देण्याच्या कल्पनेतून 'आधाराश्रम' असे संस्थेचे नामांतर करण्यात आले. प्रारंभी दातार, बापट, तसेच डॉ. रा.वि. केळकर यांच्या घरातच आश्रमाचे काम चाले. काही वर्षांतच जागा कमी पडायला लागली. तत्कालीन नगरपालिकेने ९९ वर्षांच्या कराराने घारपुरे घाटाजवळ जागा दिली. १९७० साली तेथे वास्तू उभारण्यात आली. बांधकामासाठी अण्णाशास्त्रींनी स्वतःचे व बंधूंचे घर गहाण ठेवून आश्रमाला कर्ज मिळवून दिले. त्यांचे हे औदार्य व आत्मीयता अतुलनीयच म्हणावी लागेल. आश्रमातील बालकांची संख्या १५०वर पोहोचली, तेव्हा प्रशस्त जागेचा प्रकल्प हाती घेण्यात आला. डॉ. निशिगंधा मोगल व डॉ. शोभा बच्छाव यांनी त्यांच्या आमदारनिधीतून प्रत्येकी १० लाख रुपयांचे योगदान दिले. अनेक देणगीदारांनी, हितचिंतकांनी मोलाची भर घातली व सध्याची भव्य वास्तू आकाराला आली.

Adharashram, NGOS_1 

आधाराश्रम येथे १ दिवसापासून ते ६ वर्षे वयोगटातील ३२ मुलगे व १२ वर्षांखालील ११८ मुली आहेत. वयोमर्यादा पूर्ण झाल्यावर शासकीय नियमानुसार त्यांना रिमांड होम, मुलींचे वसतिगृह येथे पाठविण्यात येते. शासनाने आधाराश्रमाला शिशुसंगोपन केंद्र व स्पेशलाइज्ड ऍडॉप्शन एजन्सी म्हणून मान्यता दिली आहे. दर वर्षी येथून साधारणपणे २० ते २५ बालकांना दत्तक दिले जाते. आतापर्यंत १ हजारांपेक्षा जास्त बालकांना मातापिता मिळाले आहेत. मुलगाच हवा हा आग्रह आपण समाजात सर्वत्र बघतो. विशेष म्हणजे अनेक पालकांनी मुलीच दत्तक घेतल्या आहेत. अपत्य दत्तक घेण्यासाठी येणारी अनेक जोडपी मुलीलाच प्राधान्य देतात. परदेशी दांपत्येही येथे येऊन मुली दत्तक घेतात. कारा (सेंट्रल ऍडॉप्शन रिसोर्स ऑथॉरिटी) या स्वायत्त संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. सन २०१२पासून जन्मतः शारीरिक किंवा मानसिक अपंगत्व आलेल्या मुला-मुलींना परदेशी दांपत्याला दत्तक दिले जाते. अशा प्रकारे अनेक बालके परदेशात गेली आहेत. लॉकडाउनपूर्वी सुमारे पाच बालके दत्तक देण्यात आली. तेवढ्याच बालकांची दत्तक प्रक्रिया सध्या सुरू असून लवकरच ती मार्गी लागेल, असे समन्वयक राहुल जाधव यांनी निदर्शनास आणून दिले. आधाराश्रमात तीन पाळ्यांंमध्ये कर्मचारी काम करतात. लॉकडाउन काळात कर्मचाऱ्यांना घरून ये-जा करणे अशक्य होते. त्यामुळे व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांचे दोन गट करून आधाराश्रमातच त्यांची सलग तीन तीन दिवस राहण्याची-जेवण्याची व्यवस्था केली. त्यामुळे बालकांची आबाळ झाली नाहीच, उलट त्यांना मायेचा स्पर्श लाभल्याने अशक्त मुलांच्या तब्येतीत सुधारणाच झालेली दिसून आली. महिला कर्मचाऱ्यांनी घरचे प्रश्न बाजूला सारून संस्थेला सहकार्य केले, असेही जाधव यांनी अभिमानाने सांगितले.

 
Adharashram, NGOS_1 
संस्थेचे कार्यवाह प्रा. प्रभाकर केळकर यांनी संस्थेच्या कार्याविषयी अधिक माहिती दिली. ते म्हणाले, "आधाराश्रमाच्या स्थापनेपासूनच सर्व पदाधिकारी सेवाभावी वृत्तीने व निरलस भावनेने योगदान देतात. उपाध्यक्ष डॉ. सुनेत्रा सरोदे, शुभदा बर्डे, दुसऱ्या कार्यवाह सुनीता परांजपे, तसेच कार्यकारिणी सदस्य राजन चांदवडकर, कल्याणी दातार, शुभांंजली पाडेकर, राजेंद्र सराफ, प्रा. निशा पाटील, डॉ. प्रवीण सुपे, प्रतिमा बुरकुले, केशव सहस्रबुद्धे कार्यकारिणी सदस्य समर्पित भावनेने जोडलेले आहेत. विश्वस्त डॉ. श्रीकांत पूर्णपात्रे, डॉ. अनुराधा केळकर, वैद्य स्वानंद पंडित हे संस्थेचे आधारस्तंभ आहेत. एक विश्वस्त माजी खासदार माधवराव पाटील यांचे नुकतेच निधन झाले. सामाजिक कार्यकर्ते तुषार निकम, दीपाली पालेकर, प्रणाली पिंगळे, तृप्ती मकवाना, समन्वयक सुवर्णा जोशी यांच्यासह सर्व कर्मचारी आपुलकीने समरस झाले आहेत. त्यांच्यासह अनेक देणगीदार, हितचिंतक यांचा मिळून एक विशाल परिवार आहे. दर वर्षी संस्थेत नव्याने सुमारे ४० ते ५० बालके दाखल होतात. बऱ्याचदा पोलिसांच्या मार्फत मुले येतात. काही वेळा कुमारी माता, विधवा आपले पोटचे गोळे नाइलाजाने आणतात. कधीतरी एखाद्या हॉस्पिटलमधून मुले पाठविली जातात. कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना स्वीकारले जाते. पूर्वी निराधार महिलांनाही आधार दिला जायचा. मात्र तो विभाग नंतर बंद करण्यात आला. त्या माध्यमातून सुमारे ६० आश्रमकन्यांंचे विवाहदेखील लावून देण्यात आले होते. त्या मुली माहेरच्या ओढीने आधाराश्रमात पतीसह येतात व आठवणींना उजाळा देतात. संस्थाही लेक व जावयांंप्रमाणे त्यांचे स्वागत करते. त्या वेळचा त्यांच्या चेहऱ्यावर पसरणारा आनंद अवर्णनीय असतो."


आधाराश्रमाचे विविधांगी कार्य!
आधाराश्रमाच्या कार्याची दखल घेऊन शासनासह अनेकांनी पुरस्कार देऊन गौरव केला आहे. संस्थेतर्फे बाहेरगावाहून नाशिकला येऊन नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह बांधले आहे. गोदावरी नदीच्या काठावर असणाऱ्या या कर्मचारी महिला वसतिगृहात ८० महिलांना प्रवेश दिला जातो. अल्पदरात आवश्यक सुविधा पुरविल्या जातात. अशा प्रकारची सोय उपलब्ध करून देणारी नाशिक शहरातील ही पहिली संस्था आहे. वृद्धाश्रम ही काळाची गरज झाली आहे. त्या दृष्टीने संस्थेने संकल्प केला आहे. शासकीय पातळीवर जागा उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दानशूर देणगीदारांंनाही तसे आवाहन करण्यात येत आहे. केवळ शासकीय अनुदान व देणग्या यातून जमणारी रक्कम वाढते खर्च भागविण्यासाठी अपुरी पडते. या मानवतेच्या मंदिरात वाढदिवस किंवा प्रिय आप्तांच्या स्मरणार्थ मिष्टान्न भोजन, तसेच वस्तुरूपाने मदत करता येते. या संदर्भात एकच उदाहरण पुरेसे बोलके आहे - चणे-फुटाणे विकून आपला चरितार्थ चालविणाऱ्या बाळोबा भालेकर यांनी मृत्यूपूर्वी १ लाख रुपयांची देणगी देऊन आभाळमनाचा प्रत्यय दिला होता. आपणही या सामाजिक यज्ञरूपी कार्यात आपली दानसमिधा अर्पण करू शकता. देणग्यांना ८०-जीअन्वये आयकरात सवलत आहे. आधाराश्रम, नाशिक या नावाने धनादेश पाठवता येतील. PAN AAATA3354R आहे. आर्थिक मदतीशिवाय नाशिक परिसरातील व्यक्ती आश्रमात येऊन समयदानदेखील करू शकतात. सुसंस्कार वर्ग चालविणे, खेळ, व्यायाम, योग करवून घेणे, अभ्यासाची तयारी करुन घेणे अशीही सेवा देता येते. अधिक माहितीसाठी राहुल जाधव यांच्याशी ९८९०९७७२३९ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
 

संस्थेतील बालकांसाठी मुकुंद बालमंदिर ही बालवाडी चालविण्यात येते. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासाठी समोरच्याच रुंगठा विद्यालयात पाठविण्यात येते. त्यांच्या कलागुणांचा विकास व्हावा यासाठीही विशेष प्रयत्न केले जातात. संगीत, हस्तकौशल्य, चित्रकला, नृत्य या विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी नाशिकमधील तज्ज्ञ कलाकार सहकार्य करतात. आश्रमाच्या प्रांगणात बालोद्यान विकसित करण्यात आले असून तेथे विविध प्रकारची खेळणी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. अपंग बालकांसाठी ऍम्वे फाउंडेशनच्या देणगीतून फिजिओथेरपी केंद्र तयार करण्यात आले आहे. डॉ. घोलप नियमितपणे अपंग बालकांची तपासणी करून गरजेनुसार उपचार करतात. याशिवाय डॉ. अनुराधा दशपुत्रे, डॉ. नंदिनी किबे, डॉ. अर्चना केळकर, डॉ. प्रशांत भदाणे हे वैद्यकीय सेवा देतात. नियमित आरोग्य तपासणी केली जाते. लॉकडाउनच्या काळातही विशेष तपासणी करून पुरेपूर दक्षता घेण्यात आली. परिणामी एकाही बालकाला साधा सर्दी-खोकल्याचाही त्रास झाला नाही. आश्रमातर्फे समुपदेशन केंद्र व संगीतोपचार केंद्र हे उपक्रम राबविले जातात. त्यामुळे बालकांच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येतो. परदेशात दत्तक गेलेली बालकेही मोठेपणी नाशिकला आवर्जून भेट देतात व आधाराश्रमात येऊन कृतज्ञता व्यक्त करतात. निराधार जिवांंना पित्याची छाया व मातेची माया देणाऱ्या मानवतेच्या या मंदिरात सर्वांचेच स्वागत केले जाते. आपणही भेट देऊन सहकार्याचा हात पुढे

संजय देवधर
९४२२२७२७५५