व्यायाम सुरू करताना

विवेक मराठी    29-Jul-2020
Total Views |
@शरद केळकर
 
व्यायाम करताना आपण काही मूलभूत नियम पाळायचे असतात, ते म्हणजे आपला पोशाख हा व्यायामाचाच असावा. पोहायला गेलात, तर स्विमिंग कॉश्च्यूम्स आवश्यक आहेत. तिथे ट्राउझर्सवर पाण्यात उतरायचे नाही, त्याचप्रमाणे जर व्यायामशाळेत जायचे असेल, तर शॉर्ट्स / ट्राउझर्स, टी-शर्ट हा पोशाख पाहिजे. त्याचप्रमाणे इनडोअर आणि आउटडोअर व्यायामप्रकारांसाठी वेगवेगळे शूज पाहिजेत, स्वत:चा नॅपकिन / टॉवेल आणि पिण्याच्या पाण्याची बाटली पाहिजेतच.
 
exercise_1  H x

'व्यायाम म्हणजे काय?' ह्या अगदी मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करून व्यायामा चे विविध प्रकार, त्यांची वर्गवारी, त्यांची उपयुक्तता आणि फायदे, व्यायामाचे वेळापत्रक, व्यायामाच्या आधीचे व्यायामप्रकार (वॉर्मिंग अप) आणि व्यायामानंतरचे व्यायामप्रकार (कूलिंग डाउन), त्यांची आवश्यकता आणि प्रकार हे सर्व आपण आतापर्यंत जाणून घेतले. आता प्रत्यक्ष व्यायामप्रकार सुरू करायच्या दृष्टीने आपल्याला सर्व माहिती उपलब्ध झाली आहे.

आता व्यायामशाळेत प्रत्यक्ष व्यायाम सुरू करताना, 'मी कुठला, कसा आणि किती व्यायाम करावा?' ह्या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला एका ट्रेनरची / प्रशिक्षकाची आवश्यकता असते. मी आधी म्हटल्याप्रमाणे, आपल्याला व्यायामाची सवय नसताना, सुरुवात करताना आपले स्नायू व्यायामाला सरावले पाहिजेत, त्यांचे टोनिंग झाले पाहिजे ह्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

व्यायामाची सवय नसताना व्यायाम सुरू करत असाल, तर मी कायम गमतीने म्हणतो की पहिली गोष्ट काय करायची? तर व्यायामशाळेची / ट्रेनरची फी भरायची! म्हणजे होते काय, तर पहिले काही दिवस व्यायामप्रकार नीट जमत नसताना, किंवा मसल्स टोनिंग झालेले नसल्याने, अंगदुखीमुळे आपला व्यायामाचा उत्साह कमी होत असतो, तेव्हा आपल्याला व्यायामाचा कंटाळा येण्याची शक्यता असते, अशा वेळी फी भरलेली असल्याने, व्यायाम बुडवायची शक्यता कमी होते, कारण कुठेतरी 'आपण पैसे भरले आहेत, म्हणजे आपण दांड्या मारता कामा नये' असे आपल्या डोक्यात असते.

ह्यातला गमतीचा भाग सोडला, तर आपण हे कायम लक्षात ठेवले पाहिजे की काहीही झाले तरी आता आपण व्यायाम सुरू कला आहे, तर तो नियमितच करायचा आहे. कारण व्यायामाचे फायदे मिळायला हवे असतील, तर नियमित व्यायामाला पर्याय नाही. आठवड्यात साधारणपणे साडेचार ते साडेपाच तास व्यायाम झालाच पाहिजे, हेच आपले ध्येय असले पाहिजे आणि व्यायामाचा रोजचा वेळ ५ किंवा ६ दिवसांत बर्यापैकी सम प्रमाणात विभागला गेला पाहिजे. बर्यापैकी अॅक्टिव्ह असणार्यांनी आणि विशेष प्रमाणात शारीरिक व्याधी नसणार्यांनी रोज सरासरी ४० मिनिटांप्रमाणे आठवड्यात कमीत कमी साडेतीन तास व्यायाम तर केलाच पाहिजे. अर्थात, मी हे मेडिकल डिस्क्लेमरसह लिहितो आहे की, ज्यांना काही शारीरिक व्याधी असतील, त्यांनी आपल्या व्यायामाचा एकूण साप्ताहिक वेळ, काठिण्यपातळी आणि आपण कुठला व्यायाम केलेला चालणार आहे / चालणार नाही, ह्या बाबतीत आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि तो आपल्या ट्रेनरला / इन्स्ट्रक्टरला / प्रशिक्षकाला सांगूनच व्यायाम सुरू करावा.



exercise_1  H x

नियमितपणा ह्या गोष्टीला इतर गोष्टींप्रमाणे व्यायामातही महत्त्व आहेच, कारण नियमितता असेल तरच आपले मसल्स टोनिंग होणार आहे, आपला स्टॅमिना वाढणार आहे, आपल्या स्नायूंची ताण आणि दाब सहन करायची क्षमता वाढणार आहे, आपले रक्ताभिसरण चांगले राहणार आहे, आपल्या शरीराला / स्नायूंना पुरेशा प्रमाणात प्राणवायूचा आणि आवश्यक मूलद्रव्यांचा पुरवठा होणार आहे. ह्या सर्वांचा परिपाक म्हणजे आपण सुदृढ, ताकदवान, धडधाकट बनणार आहोत, आपला उत्साह वाढणार आहे आणि आपली रोगप्रतिकारशक्तीही वाढणार आहे. सध्याच्या कोविड-१९ महामारी परिस्थितीत सर्वच डॉक्टर आणि तज्ज्ञ आपल्या रोगप्रतिकारशक्तीचे महत्त्व सांगत असताना आपल्याला त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

आपण व्यायामात अनियमितता ठेवली, तर व्यायामामुळे मिळणार्या फायद्यांचा आलेख निश्चितपणे वर-खाली होतो आणि त्यामुळे आपण ठरवलेले ध्येय / साध्य गाठायला आपल्याला वेळ लागतो. हा वाढणारा वेळ आपल्याला व्यायामापासून आणखीनच परावृत्त करतो आणि मग आपण व्यायामापासून आणखीनच लांब जायला लागतो.

आपल्याला व्यायामाचा कंटाळा येऊ नये, ह्यावर एक उत्तम उपाय म्हणजे आपण एक ग्रूप बनवायचा किंवा समविचारी व्यक्तींच्या ग्रूपमध्ये सामिल व्हायचे. आपण एखाद्या ग्रूपमध्ये व्यायाम करत असू, तर व्यायामाशिवाय त्या ग्रूपमध्ये होणारे सोशलायझिंग, निर्माण होणारी मैत्री, एकमेकांना मदत करायच्या वृत्तीत होणारी वाढ, ग्रूपच्या सदस्यांमध्ये निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा, आयुष्यभरासाठी निर्माण होणारे बंध हे नकळत होणारे आणि व्यायामाच्या उद्दिष्टांना पूरक ठरणारे फायदेही आपल्याला मिळतात.

व्यायाम करताना आपण काही मूलभूत नियम पाळायचे असतात, ते म्हणजे आपला पोशाख हा व्यायामाचाच असावा. पोहायला गेलात, तर स्विमिंग कॉश्च्यूम्स आवश्यक आहेत. तिथे ट्राउझर्सवर पाण्यात उतरायचे नाही, त्याचप्रमाणे जर व्यायामशाळेत जायचे असेल, तर शॉर्ट्स / ट्राउझर्स, टी-शर्ट हा पोशाख पाहिजे. त्याचप्रमाणे इनडोअर आणि आउटडोअर व्यायामप्रकारांसाठी वेगवेगळे शूज पाहिजेत, स्वत:चा नॅपकिन / टॉवेल आणि पिण्याच्या पाण्याची बाटली पाहिजेतच.

पुढच्या भागात आपण विविध प्रकारच्या प्रत्यक्ष व्यायामप्रकारांची माहिती घेऊ.



(चाळिशी ओलांडलेल्या 'यंग सिनिअर्स'साठी फिटनेस ट्रेनर
#एक्झरब्लॉग)
९८२३०२०३०४