येर ते बापुडे काय रंक

विवेक मराठी    07-Jul-2020
Total Views |

राजाकडे सत्ता असते. या सत्तेचा वापर बुद्धिबळाने करायचा असतो. तुकाराम महाराज म्हणतात,
'बळ, बुद्धी, वेचुनिया शक्ती| उदक चालवावे युक्ती||
नाही चळन तया अंगी| भावे लवणामागे वेगी ||'
- आपले बळ, बुद्धी खर्च करून पाणी हवे तिकडे न्यावे. पाण्याच्या अंगी एकच गुण, तो म्हणजे ते उताराने धावत असते. ज्या बिजाला पाणी द्यावे तसे ते होते. मिरचीला दिले तर तिखट होते, ऊसाला दिले तर गोड होते. राजशक्तीचा वापर असा बळाने, बुद्धीने करायचा असतो. तिखट आणि गोड हे तिचे गुणधर्म आहेत. तिचा बुद्धीने वापर केला तर कोरोनाचे संकट राजशक्तीच्या हातात येईल. विठ्ठलाचे म्हणणे एवढेच आहे की, बळ, बुद्धी दिली आहे, तिचा वापर करा. माझ्या चमत्काराची वाट बघू नका.


आषाढी एकादशीला पंढरपुरात दर वर्षी विठोबाची शासकीय पूजा केली जाते. महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने पूजा करण्याचा सन्मान मुख्यमंत्र्यांना मिळतो. आपल्या धर्माप्रमाणे पूजा सपत्नीक करावी लागते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तशी सपत्नीक पूजा केली. मुख्यमंत्री पूजेला जातील की व्हिडिओ काॅन्फरसद्वारा पूजा करतील, असा प्रश्न अनेकांना पडला होता. परंतु ते गेले, त्यांनी पूजा केली, सर्व महाराष्ट्राला बरे वाटले.


pandharpur ashadhi ekadas

पूजा करताना त्यांनी विठ्ठलाला साकडे घातले की, महाराष्ट्रासह अवघ्या विश्वाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट दे. राज्यातील सर्व नागरिकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मला बळ दे. ट्विटरवरून त्यांनी विठ्ठलाला केलेल्या प्रार्थनेचा संदेशही पाठवला. राज्यकर्त्याने कोणताही विषय सुरू केला की त्यावर राजकारण केले जाते. तेव्हा ते मोदी असोत की ठाकरे असोत. विठ्ठलाच्या पूजेचे राजकारण करू नये. तो एक धार्मिक आणि पवित्र सोहळा आहे. त्यावर सकारात्मक लिहिणेच आवश्यक आहे.

उद्धव ठाकरे कोणाच्या संगतीने मुख्यमंत्री झाले, महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना निवडले आहे का, जनतेच्या वतीने त्यांना बोलण्याचा अधिकार आहे का, असे प्रश्न आता विचारण्यासारखे नाहीत. महाराष्ट्र कोरोना महामारीने ग्रासला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यात मुख्यमंत्र्यांना सपशेल अपयश आलेले आहे. रोज जे नवीन नवीन आदेश येतात, त्यावरून काय करावे, हे त्यांना समजेनासे झाले आहे. हा विषयदेखील आकडेवारी देऊन लिहिण्यासारखा आहे, पण तो आता नको. विठ्ठल महाराष्ट्राची माउली आहे, देवता आहे, सर्वशक्तिमान आहे. तुकारामांच्या भाषेत सांगायचे तर 'जाऊ देवाचिये गावा, घेऊ तेथेच विसावा। देवा सांगू सुख-दु:ख, देव निवारील भूक' अशी मराठी मानसाची आर्त हाक असते. मुख्यमंत्र्यांनी तिचे प्रतिनिधित्व केले आहे. विठ्ठल ही देवता फार आगळीवेगळी देवता आहे. तिच्या हातात कोणते शस्त्र नाही. विठ्ठल हे श्रीकृष्णाचे रूप असले, तरी सुदर्शन चक्र नाही. रामाच्या हातात धनुष्यबाण असतो, तसा धनुष्यबाण नाही. महादेवाच्या हातात त्रिशूळ असतो, तसा त्रिशूळही नाही. गणपतीच्या हातातील परशूदेखील नाही. ते निर्गुण निराकाराचे रूप आहे. 'एकलाचि मी ठायीचे ठायी' असे तिचे स्वरूप आहे.

हा नवसाचा देव नाही. नवसाला पावणारा देव म्हणून त्याची ख्याती नाही. तो मान अन्य देवांना आहे. तुकाराम महाराजांनी स्पष्ट शब्दात सांगितले, 'नवसा लागी पुत्र होती, तरी का करणे लागे पती'. हा देव भक्तांना पावणारा आहे. भक्तीचे सोंग करणाऱ्यांना तो पावत नाही. इकड- तिकडचे अभंग म्हटले, तुळशीची माळ घातली, चार फुले आणि तुळशीची चार पाने वाहिली की देव प्रसन्न होत नाही. भक्त कसा आहे, हे तो पाहतो. भक्ताचे अंत:करण निर्मळ हवे, शुद्ध भक्तिभाव हवा, त्याचे कुणाशी वैर नसावे, दया, क्षमा, शांती हा त्याचा स्वभाव असावा. असंगाशी संग त्याने करू नये. सर्वांच्या कल्याणाची त्याची भावना असावी. फसवणूक, खोटे बोलणे, दांभिकता, मान-सन्मान, यापासून तो दूर असावा. असे भक्त पांडुरंगाला प्रिय असतात. त्यांच्या मदतीला तो धावून जातो. सर्व विठ्ठलभक्तांच्या विठ्ठल सहवासाच्या अनेक कथा आहेत.

असा हा आगळावेगळा देव आहे. तुम्हाला जर माझ्या मदतीची गरज असेल तर प्रथम तुम्ही चांगले व्हा. 'पुण्य परउपकार, पाप ते परपीडा' ही भावना ठेवून जगा, मी तुमच्या पाठीशी सदैव आहे. आणि जर तुम्ही यापेक्षा विपरीत वागाल, तर तुम्हाला कुकर्माची फळे भोगावी लागतील, त्यातून सुटका नाही. यासाठी चांगली संगत धरा, चांगले विचार करा, उगाचच कशाचा गर्व करू नका. पांडुरंगाचे सांगणे आहे की, धन, मान, सत्ता, संपत्ती क्षणाचे सुख देणारे आहे. अगडबंब संपत्ती असलेला रावण मेल्यानंतर एक कवडीदेखील बरोबर घेऊन जाऊ शकला नाही, असे तुकारामांनी सांगितले.

सत्ताधारी जे असतात, त्यांना उद्देशून तुकाराम महाराजांचे काही अभंग आहेत. त्या अभंगांचे अर्थ येथे देतो. एकापुढे शून्य लिहिले तर दहा होते, पण एक काढून टाकले तर शून्य होते. राजाने कातडीचे चलन केले तरी चालते, कारण त्यामागे सत्ता असते, तिचा अव्हेर कोण करणार? राजाने आपले लाडके कुत्रे स्वत:च्या खांद्यावर किंवा सिंहासनावर बसविले तरी चालते. एक जण पालखीची दांडी खांद्यावर घेऊन पालखी वाहतो आहे, तर दुसरा आरामात बसला आहे, सगळे नशिबाचे खेळ. असे नशिबाचे खेळ महाराष्ट्रात चालू आहेत.

राजाकडे सत्ता असते. या सत्तेचा वापर बुद्धिबळाने करायचा असतो. तुकाराम महाराज म्हणतात,
'बळ, बुद्धी, वेचुनिया शक्ती| उदक चालवावे युक्ती||
नाही चळन तया अंगी| भावे लवणामागे वेगी ||'
- आपले बळ, बुद्धी खर्च करून पाणी हवे तिकडे न्यावे. पाण्याच्या अंगी एकच गुण, तो म्हणजे ते उताराने धावत असते. ज्या बिजाला पाणी द्यावे तसे ते होते. मिरचीला दिले तर तिखट होते, ऊसाला दिले तर गोड होते. राजशक्तीचा वापर असा बळाने, बुद्धीने करायचा असतो. तिखट आणि गोड हे तिचे गुणधर्म आहेत. तिचा बुद्धीने वापर केला तर कोरोनाचे संकट राजशक्तीच्या हातात येईल. विठ्ठलाचे म्हणणे एवढेच आहे की, बळ, बुद्धी दिली आहे, तिचा वापर करा. माझ्या चमत्काराची वाट बघू नका. तुम्ही सात्त्विक होऊन धर्मभावनेने काम केले, तर पांडुरंग तुमच्या पाठीशी उभा राहील आणि तसे झाले नाही, तर आपल्यासारख्या सामान्य माणसाला
'आलिया भोगासी, असावे सागर| देवावरी भार घालुनिया||
मग तो कृपासिंधु निवारी सांकडे| येर ते बापुडे काय रंक ||'
- देवाच्या आधाराशिवाय सगळे दरिद्री आहे, असे म्हणण्याची पाळी आपल्यावर आणतील का?