समरस भारताचे विश्वरूपदर्शन (भाग ३)

विवेक मराठी    08-Jul-2020
Total Views |

@डॉ. सुवर्णा रावळ

भारतातील कोरोनाची लढाई ही महाभारतातील लढाईप्रमाणे आहे. आता ती अजून चरमसीमेपर्यंत जाईल, यातून जिंकेल तो भारतच. त्याच समरस भारताचे विश्वरूपदर्शन भटके-विमुक्तांना घडले. कोटी कोटी संख्येत असणारे भटके आणि विमुक्त प्रचलित शब्दात वंचित असतील, परंतु दुर्लक्षित अजिबात नाहीत. भारताचा समाजपुरुष त्यांच्यामागे, त्यांच्यासाठी खंबीरपणे उभा आहे. जगण्याच्या लढाईत तो एकाकी नाही, सर्व समाज त्यांच्यासाठी त्यांच्याबरोबर उभा आहे हा विश्वास खूप काही सांगून जातो.


rss_1  H x W: 0
 
पश्चिम महाराष्ट्र व देवगिरी प्रांतांच्या पावलावर पाऊल टाकून विदर्भ प्रांतातही भटके विमुक्तांमध्ये काम सुरू व्हावे, असे वाटत होते. अर्थात विदर्भातील बेड्यांवर (वस्त्यांवर) काम आधीच सुरू होते. १९९५-९६ला शेषनगरचे पारधी वस्ती जळीत कांड खूप गाजले होते. भटके-विमुक्त विकास परिषदेने या अन्याय-अत्याचाराच्या विरोधात मुख्य भूमिका निभावली. तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी स्वत: प्रवास करून, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शासनस्तरावर जलद गतीने हालचाल करून या विषयाचा तडा लावला होता. भटके-विमुक्त विकास परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांनी हा विषय खूप गंभीरपणे लावून धरला होता आणि तेव्हापासूनच संघाने विदर्भामध्ये पारधी बेड्यावरचे काम गतीने लावून धरले होते. कालांतराने भ.वि.वि. परिषदेने शैक्षणिक क्षेत्रात भटके-विमुक्तांमध्ये शिक्षणाचा प्रवाह गतीने प्रवाहित करण्यासाठी अनेक प्रयोग केले, संशोधन केले, यश-अपयशाचे अनेक अडथळे पार करून ‘पालावरची शाळा’ हा यशस्वी प्रयोग राबविण्याचे ठरविले. वस्तीवरील/पालावरची भटके-विमुक्तांची मुले प्रमाण शाळेमध्ये या ना त्या कारणाने येत नसतील, तर शाळाच पालावर घेऊन जायचे असे परिषदेने ठरविले. 'शिक्षण-शिक्षक-शाळा आपल्या पालावर' ही संकल्पना त्यानंतर याला आरोग्य, स्वच्छता, वस्तीविकास असे विविध आयाम जोडले गेले. भटके विमुक्त समाजात या पालावरच्या शाळांचा स्वीकार खूप वेगाने झाला.

नागपूरच्या एका प्रवासात मकरढोकळा व उधासा या नाथपंथी डबरी गोसावी समाजाच्या वस्त्यांना भेटी द्यायला गेले होते. तसे पाहायला गेले, तर इथला समाज आर्थिकदृष्ट्या बर्‍यापैकी सक्षम, वस्तीमध्ये अनेकांची घरे पक्की (काँक्रीटची) व काही कच्ची. पुरुष मंडळी मंतरलेले खडे यांचा व्यापर करणारे, अगदी झारखंडपर्यंत जाऊन व्यापार करणारे. परंतु शिक्षण शून्य. एकही मूल शाळेतच जात नाही असे जेव्हा समजले, तेव्हा याच प्रवासात इथे पालावरची शाळा सुरू झाली पाहिजे असे निश्चित झाले. त्याच समाजातला प्रवीण जगताप नावाचा थोडेबहुत शिकलेला युवक शिक्षक होण्यास तयार झाला (आता संयोजक आहे). एक मुलगीही शिकलेली मिळाली आणि मकरढोकळा, उधासा येथे शाळा सुरू झाली. या दोन्ही शाळा विदर्भातील नंतरच्या कामाच्या प्रयोगशाळा ठरल्या.

तदनंतर २०१७ला असेच एका सायंकाळी राजेंद्र जेनारकरांचा फोन आला. "ताई, मी भंडारावरून बोलतोय. इथल्या वडार समाजाच्या मुलांसाठी पालावरची शाळा सुरू करायची आहे. भटके-विमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून तुमची परवानगी पाहिजे." कुठलेही सेवा कार्य सुरू करायचे म्हटले की अगोदर विचार येतो तो काम करणारा कार्यकर्ता (इथे शिक्षक) आणि अर्थव्यवस्था, याला धरूनच मी त्यांना याविषयी विचारणा केली. यावर ते म्हणाले, "याचा भार परिषदेवर पडणार नाही. आम्ही ते करू." मी नकार देण्याचे कारणच नव्हते. सर्व स्वतंत्र असणार होते आणि पुढे झालेही तसेच. आज विदर्भाचे काम स्वतंत्र आहे. एकाच वेळी आठ वस्त्यांवर पालावरच्या शाळा सुरू झाल्या. अमोल साकुरे, महेंद्र गोबाडे, तिकडे प्रवीण जगताप इत्यादी शिक्षक हे काम पाहू लागले. आता आठ शाळांचे मिळूण ४५०-५०० विद्यार्थी शिक्षण घेताहेत. त्यानंतर इतर ठिकाणी आशाच पालावरच्या शाळा सुरू झाल्या. आता विदर्भातील भटके विमुक्तांमधील काम हे ‘भटके-विमुक्त कल्याणकारी संस्था’ या नावाने सुरू आहे.

rss_1  H x W: 0 

‘भटके-विमुक्त कल्याणकारी संस्था’ या संस्थेचा सगळ्यात प्रभावी आणि उठून दिसणारा उपक्रम म्हणजे ‘बिर्‍हाड परिषद’ (पाल-बिर्‍हाड). दिलीप चित्रावेकर हे धडाडीचे कार्यकर्ते. त्यांचे या विषयातले आकलन, कार्यक्षमता, धडाडी आणि तेवढीच अलिप्तता बघितली की अचंबित व्हायला होते. पाचव्या बिर्‍हाड परिषदेत माझा त्यांच्याशी चांगला परिचय झाला आणि एक प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व, संघाचा स्वयंसेवक ‘मै नही, तू’ या तत्त्वाचे पालन किती उच्च प्रमाणात करू शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण. शेकडो कार्यकर्त्यांना 'तू पुढे चल, आम्ही आहोत तुला आधार द्यायला.'

कोरोनाच्या या लॉकडाउनच्या काळात विदर्भातील भटके-विमुक्तांच्या वस्ती-वस्तीवर कार्यकर्ता जोडण्याचे व त्याला शासकीय, सामाजिक यंत्रणाशी जोडण्याचे त्यांचे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे. लॉकडाउन काळात भटके-विमुक्तांच्या वस्त्यांवर मदतीचा आढावा घेतला की हे लक्षात येईल.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भटके विमुक्त कल्याणकारी संस्था - विदर्भ प्रांत

कोरोना प्रकोप कालावधीत झालेले मदतकार्य


मानवी सहृदयता...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही स्वयंसेवकांनी 'बंधुभाव हाच धर्म' हे ब्रीद असलेल्या, भटके-विमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून या समाजबांधवांना जागृत करण्याचा, त्यांना यथोचित न्याय मिळवून देण्याचा, त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्याचा विडा उचलला. विदर्भात २००३पासून हे कार्य सुरू आहे.

२५ मार्चपासून पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी, कोरोना संक्रमणावर विजय मिळविण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाउन घोषित केला. अशा वेळी भीक मागून, कसरती करून, केस गोळा करून, झाडू विकून, बहुरूपीचे सोंग घेऊन, हातावर कमावून पोट भरणारा व जीवनक्रम पुढे रेटणारा हा समाजबांधव. या समाजबांधवांचे काय? अशाच कठीण प्रसंगी धावून येतो तो संघस्वयंसेवक. तुमच्या सुखदुःखात सहभागी होऊ असा शब्द, आपल्या या उपेक्षित समाजबांधवांना ज्यांनी दिला, ते भटके-विमुक्त कल्याणकारी संस्थेचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवक बंधू आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून, शासकीय सूचनांचा योग्य मान राखून, स्वत:ची नीट काळजी घेऊन या भटक्या समाजबांधवांपर्यंत पोहोचत आहेत. कोरोना महामारीमुळे आलेली ही भयंकर आपदा आहे. १९ मार्चला मोदीजींनी राष्ट्राला संबोधित केले. 'जनता कर्फ्यू'ची हाक दिली. 'घरी थांबणे' हीच देशसेवा. आमच्या या समाजबांधवांनी घरातच राहून आणि पाच वाजता टाळ्या वाजवून खरी 'देशसेवा' केली.
 
 
भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनीलजी मेंढे यांनी, संघाचे स्वयंसेवक, भटके विमुक्त कल्याणकारी संस्था पदाधिकारी यांची मा. जिल्हाधिकारी यांच्याबरोबर बैठक घेऊन त्यांना या भटके समाजबांधवांची माहिती देण्यात आली. वस्ती प्रमुख, परिवारांची संख्या, कार्डधारकांची संख्या, रेशन कार्ड नसणाऱ्यांची संख्या अशी संपूर्ण माहिती भटके विमुक्त कल्याणकारी संस्थेतर्फे शासनास देण्यात आली. शासनाने लगेच त्याची दखल घेत यंत्रणा कामाला लावली. या लॉकडाउनदरम्यान वस्त्यावस्त्यांमध्ये जाण्यासाठी दहा स्वयंसेवक आणि दोन गाड्या यांची शासनामार्फत परवानगी घेण्यात आली. शासनाने केलेल्या सहकार्याचे कौतुक करायलाच हवे. शासकीय मदत यायला वेळ लागणार हे गृहीत धरून, सगळ्यांनी सढळ हातांनी या सेवा कार्याला मदत करावी, असे आवाहन जनतेला करण्यात आले. भंडारा येथील भटके-विमुक्त कल्याणकारी संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या निवासी अभ्यासिका म्हणजे छात्रावास येथे 'साहित्य संकलन केंद्र' तयार करण्यात आले. जीवनावश्यक साहित्याचा ओघ सुरू झाला. सव्वीस तारखेला साहित्यवाटप करण्यात एक सुसूत्रता आली.

भंडारा जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भटके विमुक्त कल्याणकारी संस्था यांच्या माध्यमातून नगरातील सेवा वस्तीतून आणि जिल्ह्यातील भटके समाजबांधवांच्या वस्त्यांमधून जीवनोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील ५४ वस्त्यांवर स्वयंसेवक/कार्यकर्ते पोहोचले. सुरुवातीला धान्य, तांदूळ, गहू, कणीक वाटण्यात आले. पुढे चहा, साखर, तेल, तिखट, हळद, मीठ, मसाले, बेसन आणि सोयाबीन वड्या असे साधारणत: आठवडाभर पुरेल एवढे, एकत्रित (किट) साहित्य वाटप करण्यात आले. काही ठिकाणी अशा तीन ते चार खेपा झाल्या. दि. १० मे २०२०पर्यंत भंडारा नगरसह जिल्ह्यातील ८ तालुक्यांत ५४ वस्त्यांमधून १४९४ किट्स वाटण्यात आली. एकूण लाभार्थी संख्या ७४७०. एकंदर कार्यकर्ते संख्या १५०. २१६१ व्यक्तींना मास्क वाटप करण्यात आले. दि. १७ एप्रिलला स्व. अण्णाजी कुलकर्णी स्मृतिदिनप्रीत्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात २० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे सहकार्य लाभले.

पोटाची खळगी भरण्यासाठी दुसऱ्या गावात तसेच परप्रांतात गेलेले हे समाजबांधव विविध ठिकाणी अडकून पडले आहेत अशांची माहिती लागली. भटके-विमुक्त कल्याणकारी संस्थेतर्फे गावातील व्यक्तींशी संपर्क साधून मदत पोहोचती झाली. भंडारा जिल्ह्यातील आमगाव येथे दोन कुटंबे अडकून पडली होती. त्यांना त्याच गावातील आपल्या स्वयंसेवक बंधूने मदत पोहोचती केली. अकोला येथील काही कुटुंबे गुजरात राज्यातील सुरत येथे कामानिमित्त गेली होती. नाथजोगी समाजाचे हे सगळे समाजबांधव लॉकडाउनमुळे तिथेच अडकून पडलेत ही माहिती भंडारा आणि अकोल्याच्या कार्यकर्त्यांना कळली. सुवर्णाताई रावळ, साजन वाघमारे तसेच संघाचे प्रचारक यांनी प्रयत्न केले. यंत्रणा कामाला लागली आणि परप्रांतात अडकलेल्या या साऱ्या समाजबांधवांना दुपारपर्यंत दिलासा मिळाला. सुरतच्या बांधवांनी सढळ हाताने त्यांना मदत केली. पंजाबमधील फगवाडा येथे शिबारी समाजाचे काही भटके बांधव अडकले होते. तेथील स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्याद्वारे या समाजबांधवांना मदत करण्यात आली. रायपूर येथे अडकलेल्या काही कुटुंबापर्यंत वात्सल्यमूर्ती यांनी सहयोग दिला.

दुसऱ्या जिल्ह्यात बांधवांना स्थानिक लोकांच्या मदतीने कार्य सुरू असतानाच, आपल्या गावात, जिल्ह्यात, दुसऱ्या ठिकाणाहून तर काही भटके समाजबांधव आले नाही ना? याचीसुद्धा चौकशी सुरू झाली आणि होय! वर्धा, बुटीबोरी, चंद्रपूर, येथून पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या भटके बांधवांनासुद्धा मदतीचा हात पुढे करण्यात आला. अन्नधान्याची मदत झाली. छत्तीसगडमधून व्यवसायानिमित्त आलेल्या अशा काही समाजबांधवांना भंडारा येथे मदत करण्यात आली. चार वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्या अशा कुटुंबांना मदत पोहोचती झाली. आजही स्वयंसेवक बंधू/कार्यकर्ते, वस्त्यावस्त्यांवर जाऊन तिथल्या अडचणी जाणून घेऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या आपदग्रस्त समाजबांधवांना धीर देताहेत. या संदर्भात जनजागृती करीत आहेत. दुपट्टा बांधण्याच्या सूचना, दूर दूर बसण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. 'नरसेवा हीच नारायणसेवा' असे आपण ऐकतो. सर्वच वस्त्यांवर आज शासनातर्फे मोफत धन्यपुरवठा होतो आहे, ही एक मोठी उपलब्धी म्हणावी लागेल. शासनातर्फे गहू-तांदळाची मदत केली जाते. आपण त्यांना स्वयंपाकाच्या साहित्याचा पुरवठा करतो. काही ठिकाणी स्वत:होऊन काही समाजबांधवांनी "आमच्याकडे सध्या साहित्य आहे, दुसऱ्यास हे किट द्यावे" असे म्हटले, तेव्हा माणुसकी जागी आहे ह्याचा अनुभव आला.

समाजातील प्रत्येक घटक स्वत:होऊन मदतीसाठी समोर येत आहे. देणगीदारांनी २,२०,००० रुपये देणगी दिली. १२५ दात्यांनी वस्तुस्वरूपात मदत केली. भंडारा येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांसाठी सुरू असलेली अत्यल्प दरातील भोजनव्यवस्था कोलमडून पडली. अशा वेळी भटके विमुक्त कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून ती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय झाला. नातेवाइकांना पुन्हा जेवण मिळणे सुरू झाले. 'सेवा है यज्ञ कुंड..' हे व्रत ज्याचे ध्येय आहे, ते 'नमे कर्म फले स्पृहा..' या भावनेनेच कार्यरत असतात.

अशा या आमच्या सेवाकर्मीना, कार्यकर्ता बंधूंना प्रणाम. सकारात्मक विचारांनीच आणि 'सब समाज को लिये साथ मे, आगे है बढते जाना' हे ठरवूनच आपल्याला या कोरोना प्रकोपावर विजय मिळवायचा आहे.

विदर्भामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अकोला, भंडारा, यवतमाळ जिल्ह्यांत भटके-विमुक्त कल्याण संस्थेचे काम चालते. बैगावैदू (औषधी वनस्पतीचे ज्ञान असणारे, आयुर्वेद जाणकार) सरोदी (घरडी/ताटात देवीचे टाक घेऊन, देवीचा महिमा सांगत फिरणारे व मिळालेल्या भिक्षेवर गुजराण करणारे), नंदीबैलवाले, पारधी बेडा, सोंझारी (सोन+झारी - नदी-ओढा-पाण्याच्या खालील जमीन खांदून झार्‍यांनी सोने उत्खनन करणारे - वाळूतून, मातीतून सोन्याचे कण वेगळे करणारे. यासाठी झारा (चाळणी) वापरतात.) यांना विकासमार्गावर आणण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून चालते. नियमित कार्यकर्ता सम्मेलने घेतली जातात. हे सर्व समाजातील दानशूर व्यक्तींच्या आधारे चालते. त्या-त्या समाजातील शिक्षित कार्यकर्ता पालावरच्या शाळेचा आचार्य म्हणून (बोलीभाषेतून शिकवणारा) काम करतो. तोच संघटनेचाही कार्यकर्ता असतो. समाजसंघटनेसाठी झोकून देऊन काम करतो. भटके-विमुक्तांच्या अस्तित्वाचे विषय शासनाशी निगडित (अनेक प्रकारची प्रमाणपत्रे) असतात. यामुळे प्रशासकीय अधिकारी संवाद व प्रकल्प/वस्ती भेटीचा कार्यक्रम यांवर भर दिला जातो.
 

rss_1  H x W: 0 

या लॉकडाउनच्या काळात संस्थेकडे असणारी भटके-विमुक्त समाजाच्या वस्त्यांची इत्थंभूत माहिती शासकीय यंत्रणेला देता आली, जी सरंपच, तलाठी, प्रांताधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडेही नव्हती. जिल्हाधिकार्‍यांनी दिलीपजींना फोन करून सर्व सूची मागवून घेतली आणि ते म्हणालेसुद्धा, "आमच्या कुणाकडेच या समाजाची वस्ती सूची नाही. आश्चर्य आहे." संस्थेने सर्व जिल्ह्यांतील भटके विमुक्त समाजाच्या वस्त्यांची सूची दिली आणि शासकीय मदत पोहोचण्यास मदत झाली.

उर्वरित महाराष्ट्रात - म्हणजे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, देवगिरी या प्रांतांतही या लॉकडाउनच्या काळात सर्व पालावरच्या शाळा असणार्‍या वस्त्या, संपर्कित वस्त्या जवळजवळ सर्व जिल्ह्यांमध्ये समाजाच्या आधाराने मदत पोहोचविण्याचे काम भटके विमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून झाले. प्रत्येक १० शाळांचा एक गटप्रमुख, प्रत्येक जिल्ह्याचा एक संयोजक, प्रत्येक प्रांतात एक उपाध्यक्ष, संपूर्ण महाराष्ट्र म्हणून एक अध्यक्ष व एक कार्यवाह अशी प्रमुख कार्यकर्त्याची फळी या कार्यात अतिशय कठीण काळातही सर्व वस्त्यापर्यंत मदत पोहोचती करीत होते. रा.स्व. संघाची यंत्रणा (सेवा भारती) तर होतीच. रा.स्व. संघ जनकल्याण समितीच्या माध्यमातून सर्व पूर्तता करण्याचे प्रयत्न होत होते. याच काळात अनेक नवीन दानशूर व्यक्ती क्षणाचाही विलंब न लावता चारही लॉकडाउनच्या काळात मदतीसाठी पुढे आल्या. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर-सांगली-जयसिंगपूर इथला अनुभव असा आहे की, एकीकडे एक जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत होती, आर्थिक किंवा वस्तू नसण्याने प्रमुख कार्यकर्ते चिंतेत, वस्त्या उपाशी राहण्याच्या चिंतेत.. अशा वेळेस ईश्वर कुठल्या न कुठल्या रूपात उभा राहतो. तानाजी रावळ हा इचलकरंजीमध्ये राहणारा, कोल्हापूरचा परिषदेचा संयोजक याच चिंतेत मदतीसाठी फिरत होता. यामध्ये इचलकरंजीमध्ये रामूशेट इनानी व मराठे या उद्योजकांकडे गेला. त्यांनी क्षणाचाही विलंभ न लावता सर्व धान्याची व्यवस्था केली. फक्त वाटपासाठी आमच्याकडे कुणी नाही अशी खंत व्यक्त केली. नंतर मी त्यांना धन्यवाद देण्यासाठी फोन केला. यावर त्यांची प्रतिक्रिया - "आम्हीच तुमचे धन्यवाद मानतो आम्हाला या सेवेत सहभागी करून संधी दिल्याबद्दल. भटके-विमुक्तांच्या कामासाठी इथून पुढेही कधीही आणि कितीही मदत लागली तर सांगा, आम्हाला मदत करायला आनंद वाटेल." मी या लेखमालेला नाव दिले आहे ते अशाच कारणासाठी.

तिकडे लातूरला परिषदेचा कार्यवाह नरसिंग झरे, शेखर पाटील, उमरग्याचा संजय विभूते, मुंबईमध्ये नरेश पोटे असे अनेक कार्यकर्ते व कार्यकर्त्या यासाठी झटत होत्या. संख्येतच सांगायचे झाले तर ते असे सांगता येईल -


कोकण, प. महाराष्ट्र व देवगिरी प्रांत -

विभाग - १६, खंड ६३, तालुका २४४, १४८९ ठिकाणे (स्थान) १०३८ वस्ती, या सेवा कार्यात सहभागी एकूण कार्यकर्ते - ७५५, लाभान्वित परिवार संख्या - १४२९६८, वितरित सामग्री - ८७२४६० कि. सामग्री प्रकारामध्ये ज्वारी, बाजरी, तांदूळ, साखर, तेल, गहू, रवा, मीठ, डाळ, बेसन, साबण, भाज्या याव्यतिरिक्त वस्ती सॅनिटाइज करणे, मास्क वितरण, क्वारंटाइन केलेल्या (बाहेरच्या गावातून - पुणे-मुंबईहून आलेल्या) लोकांना धान्य वितरण, स्थलांतर करणार्‍यांना भोजन वितरण. ३६८ गावांमध्ये फसलेल्या लोकांना त्यांच्या गांवापर्यंत पोहोचविण्याची (वाहन) व्यवस्था. ४६ वस्तीतले लोक अन्य गावात फसले होते, त्यांना फसलेल्या ठिकाणीच त्या त्या गावाशी जोडून देऊन त्यांची व्यवस्था करणे. २७२४० कुटुंबांकडे (व्यक्ती) रेशनकार्ड नाही त्यांना प्रशासकीय यंत्रणेशी जोडणी, ९३ वस्त्यांमध्ये तयार भोजन - यामध्ये ३२१८ व्यक्तीं लाभार्थी, त्या त्या नोडल अधिकार्‍याशी त्यांच्या भागातील भटके-विमुक्त समाजाच्या वस्त्या जोडणे (शासकीय नोंदणी नसणारे - सूचीबाहेरील) नोडल अधिकारी नेमण्याचा आग्रह. एकूण २८६ महिला कार्यकर्त्यांचा सहभाग, एकूण ७३ गावांमधून धान्य जमा करून भटके समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम, जवळजवळ सात हजार लोकांना त्या त्या गावात शेतमजूर भटके-विमुक्त समाजातील जोडून दिले - शेतमाल, भाजी विक्री यासारख्या उद्योगासाठी शेतकर्‍यांना जोडून देण्याचे काम भटके-विमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून या काळात झाले व चालू आहे.

या लेखाला ‘समरस भारताचे विश्वरूपदर्शन’ हे शीर्षक शोभेसाठी दिलेले नाही. भारतीय समाजव्यवस्था मूलत: समरस समाजव्यवस्था आहे. या समरसतेचा भाव संकटसमयी वेळोवेळी प्रकट झालेला दिसतो. बंधुभाव हाच धर्म असे मानणारा व व्यवहारात आणणारा इथला हिंदू संकटसमयी आपल्या गरीब-वंचित बांधवाला उपाशी मरू देत नाही. ‘सेवा है यज्ञकुंड, समिधा सम हम जले’ असे ब्रीदवाक्य व्यवहारात उतरवणारा स्वयंसेवक असो वा हीच आमची प्रार्थना अन्‌ हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे आपल्या कृतीने सिद्ध करणारा हा भारतीय समाज. संकटसमयी जात-धर्म-पंथ याच्या पलीकडे फक्त गरजवंत हे ‘माणक’ या कार्यात सहभागी असणार्‍यांच्या मनात होते आणि भारताची शक्ती यातच आहे. खरे भारतीय तत्त्वज्ञान, हिंदू तत्त्वज्ञान हेच तर आहे. बाकी वातानुकूलित कार्यालयात बसुन भारताच्या नसणार्‍या दोषांवर आपली लेखणी झिजवून आपण विचारवंत असल्याचा आव आणून पोळी भाजून घेणारे, वंचितांचे राजकारण करणारे या काळात कुठे दिसले नाहीत. त्यांना समाजाने मारलेली ही चपराकच आहे असे म्हणावे लागेल. या कोरोना संकटसमयी सेवा कार्यात रात्रंदिन न थकता निर्लेपपणे कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांनी बंधुत्वाची परिभाषा अधोरेखित केली, या कार्यात दानदात्यांनी दातृत्वाची परिभाषा प्रकट केली, तर स्वत:च्या जिवाची पर्वा न करता करोना योद्धा - म्हणजे डॉक्टर्स, नर्सेस, स्वच्छता कर्मचारी व अन्य सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी मातृत्वाच्या परिभाषेला कृतीतून शब्दांकित केले. असे म्हणतात की महाभारताच्या युद्धात श्रीकृष्णाने क्षत्रिय योद्धा अर्जुनाला, सारथी संजयला, अंध धृतराष्ट्राला, मरणारे-मारणारे, रक्षण करणारे, कुटिल डाव खेळणारे सत्‌-असत्‌ सर्व प्रकृतीना विश्वरूपदर्शन घडविले. या विश्वरूपदर्शन साक्षात्कारानंतर खरी लढाई सुरू झाली. भारतातील कोरोनाची लढाईही अशीच आहे. आता ती अजून चरमसीमेपर्यंत जाईल, यातून जिंकेल तो भारतच. त्याच समरस भारताचे विश्वरूपदर्शन भटके-विमुक्तांना घडले. कोटी कोटी संख्येत असणारे भटके आणि विमुक्त प्रचलित शब्दात वंचित असतील, परंतु दुर्लक्षित अजिबात नाहीत. भारताचा समाजपुरुष त्यांच्यामागे, त्यांच्यासाठी खंबीरपणे उभा आहे. जगण्याच्या लढाईत तो एकाकी नाही, सर्व समाज त्यांच्यासाठी त्यांच्याबरोबर उभा आहे हा विश्वास खूप काही सांगून जातो.

आणि म्हणूनच पुढची लढाई जिंकण्यासाठी भटके विमुक्त कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून लगेचच एका कुटुंबातील एक युवक/युवती यांना थोडेसे आर्थिक भाग-भांडवल देऊन विक्रेते, उद्योजक बनविण्याचा उपक्रम हाती घेतला व तो यशस्वी होतोय. मागणारे हात आता फळभाज्या, फळे, पालेभाज्या, किराणा आदीचे विक्रेते झालेत व आपले कुटुंब स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न करताहेत. तो स्वतंत्र लेखाचा विषय आहे. पुढे लिहीन भटक्यांना उत्पादक-उद्योजक बनविण्याच्या अनुभवकथा.

९२२५१०४३१२