एक कहाणी शिक्षणाची

विवेक मराठी    16-Aug-2020
Total Views |

@शुभदा प्रवीण अघोर

 प्रत्यक्ष शाळेला ऑनलाइन शाळा हा पर्याय कधीच होऊ शकत नाही, मात्र पूरक निश्चितच असू शकतो. आपण ऑनलाइन शिक्षण हा पर्याय काही विषयांकरता निश्चितच निवडू शकतो आणि कोण जाणे, भविष्यात आपल्या शिक्षण प्रक्रियेत ऑनलाइन एज्युकेशनचा समावेश होऊ शकतो. तेव्हा आपण सर्वांनी त्याकरता तयार राहायला हवे. सदय परिस्थितीत शाळा पूर्ववत सुरू होईपर्यंत मात्र स्क्रीन टाइम कमी ठेवून अभ्यासक्रमाच्या मागे न लागता सकारात्मक दॄष्टीकोन ठेवून ही जीवन शिक्षणाची प्रक्रिया आनंददायक करण्याचा सांघिक प्रयत्न आपण सर्वांनी मिळून करू या ना!


seva_1  H x W:  

“जरा जेवणाकडे लक्ष द्या! काय आहे इतकं त्या मोबाइलमध्ये?” व दुसरे “वा! व्हॉट ऍन आयडिया सरजी!” पहिले नकारत्मकतेकडे, तर दुसरे सकारत्मकतेकडे झुकणारे वाक्य! दोन्हीत मोबाइल कॉमन आहे. पहिल्यात मनोरंजनाकरता, तर दुसऱ्यात शिक्षणाकरता वापर केला आहे. 'शिक्षण' या संकल्पनेत व अध्ययन-अध्यापनातही काळाप्रमाणे बदल झाले. आर.टी.ई.मुळे - राइट टू एज्युकेशन ऍक्टमुळे शिक्षणाचा हक्क सर्वांना प्राप्त झाला, तसेच नवीन शैक्षणिक धोरण २०२०मुळे प्रथमच तीन ते सहा या वयोगटातील मुलांचा विचार करण्यात आला. अनेक मुलांना आपापल्या आवडीनुसार व कलाप्रमाणे मोफत व सक्तीचे शिक्षण घेता येईल, याचीही काळजी आज घेतली जात आहे. गुरुकुल पद्धती ते आजपर्यंतच्या शाळा हाही काळाप्रमाणे झालेला बदलच!

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तक मंडळाने पाठ्यपुस्तकात आमूलाग्र बदल केला आहे. सर्व मुलांना समजावे याकरता शिक्षकांनी पालकांनी संबंधित चित्राचा, क्यूआर कोडचा व विविध वेबसाइट्सचा व लिंकचा वापर करावा व विषयासंबंधी अधिक ज्ञान मिळावे हा हेतू होता. यावरून माहिती तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित होते. यामुळे विद्यार्थी जागतिक स्तरावरही पोहोचू शकतात.

नवीन शिक्षणपद्धतीसाठी पूर्वतयारी

आज अचानक या वर्षी कोेरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्याकरता देशभरात टाळेबंदी लागू झाली. शाळा बंद झाल्या, मात्र १५ जून २०२०पासून
ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात यावे, असा शासनाकडून आदेश आला आणि याकरता स्मार्ट फोन, संगणक, टॅबलेट, लॅपटॉप, टीव्ही इ. साधनेही हवीत. काही शैक्षणिक संस्थांनी प्रत्यक्ष शिक्षण सुरू होण्याआधी याबाबत पालकांना एक प्रश्नावली पाठवून माहिती मिळवली. त्याप्रमाणे कार्यवाही करून काही विद्यार्थ्यांना जुने मोबाइल, काहींना डेटा पॅकही पुरवले गेलेे.

या संबंधीचे पूर्वज्ञान - तसे पाहायला गेले, तर अंदाजे एक दशकापूर्वीच शिक्षण व इतर क्षेत्रांत संगणकाचा प्रवेश झाला होता. पण हा पर्याय शिक्षणाकरता अपरिहार्य नसल्याने त्याकडे विशेष लक्ष दिले गेले नाही, असे मला वाटते. शासनाच्या एमएससीआयटी या अभ्यासक्रमामुळे शिक्षक तंत्रज्ञानाशी परिचित होते, तसेच काही विदयार्थीही! काही शाळाही तंत्रस्नेही होत्या.

विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठीची शिक्षकांची धडपड - आता मात्र ऑनलाइन शिकवायचे होते. सगळ्यांनी 'प्रयोगातून चुका सुधारण्याची' (ट्रायल-एरर) पद्धत अवलंबली. थोडयाफार फरकाने शिक्षण प्रकिया सगळीकडे सुरू झाली. यात किती तास शिकवावे, काय शिकवावे, कोणता प्लॅटफॉर्म वापरावा यावर ऊहापोह झाला. अनेक चर्चा झाल्या. अनेक मतप्रवाह बनले. शासनाकडूनही तास व वेळा यांच्यात इयत्तांप्रमाणे व मुलांच्या वयाप्रमाणे बदल सुचवण्यात आला. यात एक दिसून आले की शिक्षकांमध्ये शैक्षणिक साधनांची देवाणघेवाण वाढली आहे, शिक्षक अधिक मेहनत घेताना दिसत आहेत. अनेक वेबिनारना हजेरी लावून आपले ज्ञान वाढवत आहेत.

यामधील अडचणी - शहरी भागात अधिक प्रमाणात या सर्वांची बऱ्यापैकी ओळख होती, तर काही गावांतही ई-लर्निंग सुरू झाले होते. या शिक्षणात प्रामुख्याने विविध नेटवर्कच्या माध्यमातून शिकवले जाते. कनेक्टिव्हिटी नसेल, तर मुले ऑनलाइन वर्गात येऊ शकत नाहीत, हे खरे आहे. आज खेडेगावातील मुले शिक्षणाची आस असूनही या माध्यमांची व स्मार्ट फोनची उपलब्धता नसल्याने शिकण्यास असमर्थ ठरत आहेत, ह्याची हळहळ वाटतेच. शासनाने व शिक्षणतज्ज्ञांनी वेगळे पर्याय शोधायला हवेत.

शिक्षणपद्धतीबद्दलची मानसिकता - सद्य परिस्थितीत आता शाळा सुरू होणार नाहीत किंवा कधी सुरू होतील हे सांगता येत नाही, हे सत्य सर्वांनी स्वीकारायला हवे, ही पहिली गोष्ट. दुसरे असे की सर्वसाधारण मुले किंवा दिव्यांग मुले काय, अभ्यासात खूप दिवसांचा खंड पडला की विसरतात, म्हणून अध्ययनातील सलगता राखणे व मुलांच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून वंचित न ठेवणे याकरता ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय निवडला गेला आहे. इकडे आपण मुले किंवा विद्यार्थी यांचा विचार करत आहोत. दिव्यांग मुलांच्या समस्या खूप वेगळया आहेत, हे मान्य आहे, पण मुले म्हणूनच त्यांचाही प्रथम विचार व्हायला हवा.


seva_1  H x W:

सकारात्मक दॄष्टीकोन - या वेळेचा आपत्ती की इष्टापत्ती म्हणून उपयोग करायचा, हे सजग पालकांनी ठरवावे. खरे तर, शिक्षकांनी विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान कसे पोहोचवता येईल याकरता आता त्यांचा कस लागत आहे. शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळाला आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे पाठयपुस्तके डाउनलोड करून वाचता येत आहेत. अभ्यासपूरक यूट्यूब व्हिडिओज विद्यार्थ्यांना दाखवता येत आहेत. मुलांचे श्रवणकौशल्य वाढवण्याकरता आज अनेक 'स्टोरी टेलिंग ऍप्स उपलब्ध आहेत.

सजगता - आता शिक्षण आणि मनोरंजन याकरता तंत्रज्ञानाचा किती व कसा वापर करावा, याकरता आपण शिक्षक व घरी पालक यांनी विचार करायला हवा. स्क्रीन टाइम हा दोन्हीकरता कमीच हवा. मला तर वाटते की पालकांना आपल्या पाल्याबरोबर क्वालिटी टाइम घालवण्याकरता ही चालून आलेली संधी आहे. आता प्रवासाचा ताण नाही, तो अमूल्य वेळ वाचत आहे. मुलांनाही वेळेचे नियोजन शिकवता येईल व शिस्तही लागेल. घरातील कामात सहभाग घेऊन जीवनकौशल्येही शिकवता येतील.

ताणतणावाचे नियोजन - खेळातून अभ्यास विशेषतः लहान वर्गातील मुलांकरता करायला हवे. विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक आणि पालक गट यांनी एक संघ म्हणून काम करावे. त्यामुळे परस्पर विश्वासचे एक नातेही तयार होईल. ऑनलाइन शिक्षणात पालक सहभाग वाढला आहे, ही चांगली गोष्ट आहे. डोळ्यांचे, हाताचे, मानेचे व्यायाम, बैठे व्यायाम व रोज पाच सूर्यनमस्कार घालणे, अधूनमधून डोळ्यावर पाणी मारणे हा थकवा घालवण्याकरता उत्तम उपाय होऊ शकतो. हे तर हे करायला हवे, शेवटी आपले मूल शिकले पाहिजे ही कोणत्याही पालकांची इच्छा असतेच.

जीवनशिक्षण - शिक्षण हे पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता जीवन शिक्षण हवे. विद्यार्थी हा परीक्षार्थी नव्हे, तर ज्ञानार्थी व्हायला हवा. प्रत्येक नवी गोष्ट शिकताना अडचणी गॄहीत धरायला हव्यात व आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने होणारे ऑनलाइन शिक्षण हे आत्ताच्या काळात शिक्षणापलीकडे जाऊन मी म्हणेन विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहण्याचे एकमेव व अनिवार्य साधन झाले आहे, असे मानायला हवे. आणि मुलांच्या शिक्षणाचा हक्कही या आधारे आपण पूर्ण करत आहोत व माननीय पंतप्रधानांच्या डिजिटल इंडियाच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत, असेही वाटते.

नवे आयाम - शेवटी प्रत्यक्ष शाळेला ऑनलाइन शाळा हा पर्याय कधीच होऊ शकत नाही, मात्र पूरक निश्चितच असू शकतो. आपण ऑनलाइन शिक्षण हा पर्याय काही विषयांकरता निश्चितच निवडू शकतो आणि कोण जाणे, भविष्यात आपल्या शिक्षण प्रक्रियेत ऑनलाइन एज्युकेशनचा समावेश होऊ शकतो. तेव्हा आपण सर्वांनी त्याकरता तयार राहायला हवे. सदय परिस्थितीत शाळा पूर्ववत सुरू होईपर्यंत मात्र स्क्रीन टाइम कमी ठेवून अभ्यासक्रमाच्या मागे न लागता सकारात्मक दॄष्टीकोन ठेवून ही जीवन शिक्षणाची प्रक्रिया आनंददायक करण्याचा सांघिक प्रयत्न आपण सर्वांनी मिळून करू या ना!

 
८९८३२१६५२५

विजय शिक्षण संस्थेचे प्रगती विद्यालय (कर्णबधिरांसाठी),
दादर ( विशेष शिक्षक व समुपदेशक)