शिवाजी महाराजांची माणसे आणि परकीयांचे अभिप्राय – भाग १

विवेक मराठी    18-Aug-2020
Total Views |
 
@डॉ. अजित आपटे

पोर्तुगीजांनी मुंबई इंग्रजांच्या ताब्यात दिली, तेव्हाचा हा पत्रव्यवहार आहे. ह्या दोन्ही सत्ता समुद्रावर अत्यंत प्रबळ होत्या आणि त्या प्रसंगी तरी त्या एकत्र होत्या. तरी पोर्तुगीजांना काळजी वाटत होती. महाराजांच्या ताकदीचा हा पुरावाच मानला पाहिजे.
 

shivaji_1  H x  

शिवाजी महाराजांचे आणि इंग्रजांचे संबंध कसे होते, त्याबद्दल गेल्या काही लेखांमध्ये आपण माहिती घेत आहोत. महाराजांचे संबंध ह्यामध्ये अर्थातच त्यांच्या माणसांचाही समावेश होतो. त्यांच्याबद्दल इंग्रजांचे काय मत होते तेही पाहणे योग्य होईल.

गोव्याहून (टेलर) सुरतला (पेटिट) पत्र

शके १५८६, पौष शु. ७ - १४ डिसेंबर १६६४


वेंगुर्ल्याच्या डच अधिकाऱ्याने वखार तरी शिवाजीपासून सुरक्षित ठेवण्याचे कारण देऊन मसालेही गोव्यात आणले आहेत. शिवाजीच्या धामधुमीमुळे आमचा काहीच माल खपला नाही. शिवाजीने हुबळी व इतर सधन शहरे लुटून बऱ्याच प्रमुख व्यापाऱ्यांना कैद केल्याची खात्रीलायक बातमी आली. त्यामुळे कारवारच्या बाजूचे बाजार असेच मंदीचे असणार. तो पुढे कुठे जाणार हे जरी नक्की समजले नसले, तरी आमचे कारवारचे दोस्त शिवाजी सन्निध येताच माल हलवण्याची तयारी करत आहेत. १७ दिवसांपूर्वी दिसलेल्या धूमकेतूचे परिणाम काय होतात याबद्दल कित्येकांची मने चूर होऊन गेली आहेत. आम्ही कारवारला असताना आमचे गलबत राजापूरला नेऊन लावल्यास काही विक्री नक्की होईल, असे रावजी पंडिताचे पत्र आले.

तात्पर्य - महाराजांच्या माणसाला कोकणात बसून कारवारातील बाजारपेठेची उत्तम माहिती होती. तसेच ती माहिती योग्य ठिकाणी पोहोचवण्याची तत्परताही होती. इंग्रजांनाही तो चांगला माहीत होता. कारण टेलर हा गोव्यातला माणूस पेटिट ह्या सुरतेतल्या माणसाला त्याबद्दल लिहितो आहे. महाराजांच्या महत्त्वाच्या माणसाच्या (सुभेदार रावजी सोमनाथ यांच्या) व्यापारी हुशारीचा (Market Intelligenceचा) तो पुरावाच आहे. तसेच महाराजांची संपर्क यंत्रणा (Communication System)सुद्धा उत्तम असल्याचाही तो पुरावा आहे. ह्या दोन गोष्टींना व्यापारवृद्धीत खूप महत्त्व असते, हे वेगळे सांगायला नको. तसेच कोणाचाही माल कुठेही खपला तरी स्वराज्याला त्यावरची जकात मिळून उत्पन्नवाढ होणारच होती, हे बारीक पण महत्त्वाचे व्यवधान रावजीला होते, हे विशेष! - इंग्लिश फॅक्टरी रेकॅार्ड ११ (पृ ३५१).

शके १५८६, श्रावण वद्य ६ - ३ ऑगस्ट १६६४

शिवाजीजवळ गलबतांची संख्या भरपूर असल्यामुळे तो सहज रात्री छापे घालून गलबत घेईल, म्हणून जमिनीपेक्षा पाण्यावरच त्याचे भय अधिक बाळगले पाहिजे. त्यातून वखारीतून माल हलवताना तर लुटीचे भय फारच आहे. केवळ शिवाजीच नव्हे, तर गरीब असल्यामुळे लखम सावंतही डल्ला मारण्यास कमी करणार नाही. बरे, शिवाजी विध्वंसक असूनही आजपर्यंत मुख्यत्वे बड्या साहेबिणीला खूश करायची वरवरची तरी त्याची इच्छा असल्यामुळे शिवाजीने वेंगुर्ल्याला धक्का लावलेला नाही. आतापर्यंत हा लुटारू आणि कु़डाळमधील त्याचे साथीदार यांनी आम्हाला मित्रत्वानेच वागवले आहे. सरसभेदार रावजी सोमनाथ पंडित यांने सौत व्हिलियट नावाच्या व्यापाऱ्याला अनेक वेळा आग्रहाने आपल्या भेटीला बोलावल्यामुळे तो नोव्हेंबर २२ तारखेला कुडाळला जाऊन त्याला भेटला. राजापूरला सुमुहूर्तावर सौतने येऊन राहावे असा आग्रह करून त्याने त्याबद्दल बटेव्हियाला वरिष्ठांनाही लिहून कळवावे, असे रावजी पंडिताने त्याच्याकडून कबूल करून घेतले. शिवाजीकरता एक घोडा मिळवावा असाही त्याचा आग्रह होता. मात्र त्याच्या ह्या मागणीला कोणताही आडपडदा न ठेवता मार्गातील वाहतूक वगैरे अनेक अडचणी सांगितल्यावर त्याची तबियत गेली. तरीदेखील इंग्रजांनी पुन्हा राजापूरला येऊन वखार घालावी यासाठी त्यांच्याकडे जाऊन रदबदली व मध्यस्थी करावी अशीही विनंती त्याने केली. इंग्रजांच्यामते रावजी हा बडा बदमाष असल्याकारणाने त्यानी समयोचित सबबी सांगून त्यास नकार दिला आहे. कुडाळवर वारंवार स्वाऱ्या झाल्यामुळे त्याची बहुत पायमल्ली झाली आहे. इंग्रज कंपनीकडून काही माल आपण विकत घेतो पाठवून द्या, त्यालाही रावजीच्या विनंतीला नकार दिला आहे. पूर्वी लखम सावंताकडून घेऊन इनाम म्हणून दिलेली कित्येक खेडी शिवाजीने सावंतांना आता परत दिली आहेत. मक्केला पाठवलेल्या दोन लहान गलबतांचे व्यापारावर फारच फायदा झाल्याने रावजी आणखी ८-९ गलबते मक्का, काँगो, मस्कत, इराण यांचेकडे पाठवण्यासाठी तयारीत आहे. परंतु त्याला परवाना मिळणे शक्य नाही. त्या प्रांतात शिवाजीला मोठा मान असून, लोक त्याच्यावर प्रेम करतात. या वर्षी पिके चांगली आली आहेत. तथापि वेंगुर्ला आणि कानडा येथे तांदूळ महाग विकतो. कानड्यातल्या लढाया, मलप्पा मल्लूचा कायमचा मक्ता, सिद्दीच्या व सुरतेकडच्या मुलखातला दुष्काळ आणि शिवाजीच्या सैनिकांमुळे होणारा खप (दैनिक) यामुळे असे होते. गोवा प्रांतात दर वर्षी चौल, वसई, मुंबई या भागातून त्यांना लागतो तितका तांदूळ लोक भरतात. परंतु मुघलांनी तो भाग उजाड करून टाकल्यामुळे त्यांनाही येथूनच तांदूळ भरावा लागणार.

शांततेमुळे व्यापाराला पुन्हा बरे दिवस येत आहेत. निरनिराळ्या प्रदेशांक़डे जाण्याकरता एकामागून एक अकरा गलबते सुटली आहेत. – डाग ऱजिस्टर (पृ ३२१)

तात्पर्य – या पत्रामधून महाराजांचा व्यापाऱातला वाढता प्रभाव, रावजी सोमनाथाची विक्रीवृद्धीतील (Sales Promotionमधील) उत्तम कामगिरी, व्यापारी कौशल्य, चिकाटी, आवश्यक गळेपडूपणा, त्याची आंतरराष्ट्रीय व्यापाराची समज, धन्याशी असणारी निष्ठा, मराठ्यांची वाढणारी आरमारी दहशत, मराठ्यांचे सैन्यासाठी धान्य खरेदी करण्याचे (लूट नाही) धोरण, त्यांची शिस्त, तेथील जनतेचे शिवाजी महाराजांविषयीचे प्रेम इ. अनेक वैशिष्ट्यांचा समुच्चय लक्षात येतो. इंग्रजांनी 'बडा बदमाष' म्हणून रावजी सोमनाथाचा एक प्रकारे गौरवच केला आहे. ब्रिटिशांनी राजापूरमध्ये परत वखार घालावी, यासाठी डचांची मध्यस्थी घेण्याची कल्पनाही अभिनव वाटते. कारण व्यापार चांगला करण्यासाठी अशाच गुणांची प्रामुख्याने गरज असते. इंग्रज व डच व्यापाऱ्यांची धूर्त बुद्धी, प्रसंगावधान यांचेही दर्शन घडते. अशा माणसांच्या उरावर बसूनच महाराजांनी व त्यांच्या माणसांनी स्वराज्याचा धाक निर्माण केला! 'शठं प्रति शठ्यंम्'चे हे जबरदस्त उदाहरण आहे.

वरीलप्रमाणे आपण इंग्रज आणि डचांचा पत्रव्यवहार पाहिला. पश्चिम किनाऱ्यावर आणखी एक पुरातन पण तगडा परकीय प्रतिस्पर्धी होता, तो म्हणजे 'पोर्तुगीज!' ते काय म्हणतात ते आता बघू.

गोव्याच्या पोर्तुगीज गव्हर्नरकडून इंग्रज गव्हर्नरला

शके १५८६, पौष शु. ८ - डिसेंबर १६ इ.स, १६६४


तुमच्या पत्राची उत्तरे दिली नाहीत, याचे कारण पत्रात केलेल्या मागणीस अनुसरून कृती करणे हेच उत्तम उत्तर असे वाटते. आता उद्या एक इसम आम्ही नेमतो. तो जाऊन मुंबई तुमच्या ताब्यात देईल. कारण या कामात शिवाजीच्या आरमाराचा संबंध येत असल्याने, तुमचा (इंग्रजांचा) त्याच्याशी सलोखा नसल्यास या जहाजातून येणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेची काळजी मला घेतली पाहिजे. – इंग्लिश फॅक्टरी रेकॅार्ड (डॅन २) (पृ. ३४५).

पोर्तुगीजांनी मुंबई इंग्रजांच्या ताब्यात दिली, तेव्हाचा हा पत्रव्यवहार आहे. ह्या दोन्ही सत्ता समुद्रावर अत्यंत प्रबळ होत्या आणि त्या प्रसंगी तरी त्या एकत्र होत्या. तरी पोर्तुगीजांना काळजी वाटत होती. महाराजांच्या ताकदीचा हा पुरावाच मानला पाहिजे.

प्रत्यक्षात महाराजांनी अधिक चलाखीने या परिस्थितीचा फायदा घेऊन आपल्या सेनापतित्वाखाली बसरूरची पहिली नाविक मोहीम उरकून घेतली. पोर्तुगीज व इंग्रज मुंबईच्या देवाणघेवाणीत अडकले होते. इतर गोष्टींकडे त्यांचे साहजिकच दुर्लक्ष झाले होते. त्याचा फायदा घेऊन महाराज गोव्याच्या पलीकडच्या बसरूरवर हल्ला करून, लूट गोळा करून महाराष्ट्रात परतलेसुद्धा! पोर्तुगीज मुंबईत अडकल्याचा फायदा घेऊन गोव्यात महाराजांनी त्यांना हुलकावणी दिली आणि आपला कार्यभाग साधला. संघर्ष टाळल्यामुळे महाराजांचा खर्च व वेळ हे दोन्ही वाचले, त्याचबरोबर समय व्यवस्थापनसुद्धा साधले. ह्यालाच आजच्या व्यवस्थापनशास्त्रात 'Time Management' असे भारदस्त नाव आहे!