शेअर बाजाराची तोंडओळख

विवेक मराठी    20-Aug-2020
Total Views |

शेअर बाजारातील गुंतवणुकीस सुरुवात करताना एकदम खूप मोठी रक्कम एकाच कंपनीत गुंतवू नये. नामांकित कंपन्यांच्या समभागातच सुरुवातीस गुंतवणूक करावी. आपल्या गुंतवणुकीपैकी किती टक्के गुंतवणूक शेअर बाजारात करावी, याचा एक ठोकताळा आहे. १०० वजा आपले वय इतके टक्के गुंतवणूक शेअर्समध्ये करावी.

market_1  H x W

मराठी माणसाला शेअर बाजाराचे जरा वावडेच आहे असे म्हटले, तर गैर ठरू नये. ‘शेअर बाजार’ म्हणजे सट्टा मार्केट किंवा जुगार अशी मराठी माणसाची एक सर्वसाधारण धारणा असते. बालपणापासून ‘प्ले सेफ’ किंवा ‘सावधपणे गुंतवणूक करा’ असे सल्ले मोठ्यांकडून ऐकलेले असल्याने मराठी माणूस शेअर बाजारात गुंतवणूक करायला अनिच्छुक असतो. बरे, आपण नाही केली गुंतवणूक शेअर बाजारात तर काय शेअर बाजार बंद थोडीच पडतो? त्यात गुंतवणूक करून अधिक उत्पन्न मिळवण्यापासून आपणच वंचित होतो. ‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे। उदास विचारे वेच करी’ यात ‘उदास विचारे’लाच अधिक महत्त्व दिल्याने आपण धन जोडण्यापासून वंचित होतो.

खरे म्हणजे आपण ‘वॉरन बफे’ वाचतोच मुळी सेवानिवृत्तीनंतर. ऐन उमेदीच्या व जोखीम घेण्यास योग्य वेळ किंवा वय असताना जर आपण ‘वॉरन बफे’ वाचला, तर शेअर बाजार या संस्थेशी ऐन तारुण्यात आपली ओळख होईल आणि शेअर बाजार म्हणजे जुगार अशी विधाने आपण करणार नाही. मात्र शेअर बाजारात गुंतवणूक करताना काही पथ्ये पाळावी, अन्यथा त्यात नुकसान निश्चित आणि मी अशा अनेक व्यक्ती बघितल्या आहेत की ज्यांनी मोठ्या उत्साहाने १-२ वर्षे शेअर बाजारात गुंतवणूक केली, पण गुंतवणूक वृद्धी न झाल्याने ‘पुन्हा त्या वाटेला न गेलेलेच बरे’ अशा विचाराने शेअर बाजाराकडे त्यांनी कायमची पाठ फिरवली.

संपत्ती निर्माण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे समभागातील किंवा इक्विटीमधील गुंतवणूक. ही गुंतवणूक दोन मार्गांनी करता येते - पहिला आणि सोपा मार्ग म्हणजे कुठल्यातरी म्युच्युअल फंडाच्या इक्विटी योजनेत गुंतवणूक करायची आणि दुसरा मार्ग म्हणजे स्वत:च शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांच्या समभागात स्वत:चे पैसे गुंतवायचे. ज्यांना गुंतवणूक या विषयाचे वावडे असते किंवा त्याकडे रोज लक्ष द्यायला वेळ नसतो किंवा वेळ द्यायचा नसतो, अशांनी प्रत्यक्ष शेअर बाजारात सहभागी न झालेलेच बरे. त्यांनी म्युच्युअल फंडांच्या इक्विटी योजनांत आपली गुंतवणूक करावी. फंड मॅनेजर आपले कौशल्य पणाला लावून गुंतवणुकदारांना चांगल्या दराने परतावा देतात. मात्र ज्यांना थोडा वेळ नियमितपणे अर्थविषयक घडामोडींकडे देणे शक्य आहे आणि त्याची आवड आहे, अशा व्यक्तींनी ऐन उमेदीच्या काळापासून शेअर बाजारात गुंतवणूक सुरू करावी.

प्राथमिक आवश्यकता - डी मॅट खाते

डी मॅट खाते असल्याशिवाय शेअर बाजारात गुंतवणूक करता येत नाही. भारतात आजमितीस ४ कोटीपेक्षा जास्त डी मॅट खाती आहेत. भारतातील डिपॉझिटरीमध्ये (डीपीमध्ये) डी मॅट खाते उघडता येते. सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस लिमिटेड (CDSL) किंवा नॅशनल सर्विसेस डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) यापैकी कुठल्याही डीपीमध्ये डी मॅट खाते उघडता येतो. सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये जसे आपण महत्त्वाचे दस्तऐवज, सोने वगैरे ठेवतो, त्याचप्रमाणे डी मॅट खात्यामध्ये तुमच्याजवळ असलेल्या समभागांची नोंद होत असते. सेबीच्या सूचनेनुसार ज्या डी मॅट खात्यामध्ये वर्षभरात एकही व्यवहार (शेअरची खरेदी किंवा विक्री) झाला नाही, असे खाते सुप्त किंवा डॉरमंट समजले जाते. ४ कोटी डी मॅट खात्यांपैकी केवळ १ कोटी खात्यांतच मागील वर्षी व्यवहार झाले - म्हणजे जवळपास ७५ टक्के डी मॅट खाती निष्क्रिय किंवा डॉरमंट होती. एका सर्वेक्षणानुसार अनेक ब्रोकर्सकडील किंवा शेअर दलालांकडील ८०-८५ टक्के खाती निष्क्रिय असल्याचे दिसून आले. निष्क्रिय खातेदारांना याबाबत विचारले असता प्रामुख्याने वेळेचा अभाव आणि सुरुवातीच्या काळात शेअर बाजारात झालेले आर्थिक नुकसान ही दोन कारणे प्रामुख्याने निदर्शनास आली.


market_1  H x W

आपण कुठल्याही शेअर ब्रोकरकडे आपले डी मॅट खाते उघडू शकता. बहुतेक सर्व बँका हा व्यवसाय करतात, तसेच मोतीलाल ओस्वाल, शेरखान, आयसीआयसीआय डायरेक्टर डॉट कॉम, अ‍ॅन्नेल ब्रोकिंग अशी ब्रोकर्सची काही प्रसिद्ध नावे आहेत. कुठल्या ब्रोकरकडे खाते उघडायचे हे ठरवताना त्यांचे ब्रोकरेज किती, ग्राहक सेवा कशी, तसेच योग्य सल्ला देणारी यंत्रणा त्या ब्रोकरकडे आहे, याची खात्री करून घ्यावी. शेअर ब्रोकर आपल्या सूचनेनुसार शेअरची खरेदी/विक्री करतो. तो कधीही तुमच्या शेअरवर मालकी दाखवू शकत नाही किंवा तुमच्या पैशावर स्वत:चे नावे शेअर खरेदी करू शकत नाही. शेअरर्सचे खरेदी/विक्रीचे व्यवहार पूर्णत: इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होत असल्याने ब्रोकर या व्यवहारात कुठलीही हेराफेरी करू शकत नाही. हे सर्व व्यवहार पेपरलेस पद्धतीने होतात. डी मॅट खाते उघडताना बँक खात्याचा तपशील, पॅन कार्ड, फोटो, आधारकार्ड असे दस्तऐवज द्यावे लागतात.

शेअर बाजारातील गुंतवणुकीस सुरुवात करताना एकदम खूप मोठी रक्कम एकाच कंपनीत गुंतवू नये. नामांकित कंपन्यांच्या समभागातच सुरुवातीस गुंतवणूक करावी. आपल्या गुंतवणुकीपैकी किती टक्के गुंतवणूक शेअर बाजारात करावी, याचा एक ठोकताळा आहे. १०० वजा आपले वय इतके टक्के गुंतवणूक शेअर्समध्ये करावी. उदाहरणार्थ, वय ३० असेल तर बचतीपैकी ७० टक्के गुंतवणूक शेअर्समध्ये करावी. वय जसे वाढेल तसे हे प्रमाण कमी करावे.

शेअर बाजार आणि नोंदीकृत कंपन्यांची वर्गवारी

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर ५०००हून अधिक, तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर १६००हून अधिक कंपन्या नोंदीकृत आहेत. काही कंपन्या दोन्ही एक्स्चेंजवर नोंदीकृत आहेत. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक (बीएसई) हा सर्वात जास्त मार्केट कॅपिटलायझेशन (शेअरची किंमत × बाजारातील शेअर्सची संख्या) असलेल्या तीस कंपन्यांच्या किमतीवर ठरत असून निफ्टी हा पन्नास कंपन्यांच्या किमतीवर ठरत असतो. सुरुवातीस नामांकित कंपन्यांमध्येच गुंतवणूक करावी. आपली गुंतवणूक वेगवेगळ्या सेक्टर्समधील कंपन्यांत करावी - उदा., बँकिंग, फार्मा, इंजीनिअरिंग इत्यादी.

मार्केट कॅपिटलायझेशनवरून स्टॉक एन्स्चेंजवरील कंपन्यांची वर्गवारी लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप अशी केली असते. सुरुवातीस लार्ज कॅप कंपन्याच निवडाव्या. अनुभवानंतर व अभ्यासानंतर मिड कॅप कंपन्यांत गुंतवणूक करावी. स्मॉल कॅप कंपन्यांकडे दुर्लक्ष करावे. गुंतवणूक ही दीर्घ मुदतीची करावी. रोपट्याचे झाड आणि नंतर वृक्ष किंवा वटवृक्ष व्हायला जसा वेळ द्यावा लागतो, तशीच शेअर बाजारातील गुंतवणूक कालांतराने बँकेच्या व्याजदराहून अधिक परतावा देते, हे अभ्यासांती दिसून आले आहे.

तारुण्यात जोखीम नाही घ्यायची, तर केव्हा? नोकरी लागल्यावर सुरुवातीसच शेअर बाजारात गुंतवणूक सुरू करावी. गुंतवणूक करताना कोणती पथ्ये पाळावी, त्याबद्दल पुढील लेखात.

(लेखक राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे वित्त सल्लागार, तसेच इर्डा (IRDA) अर्थात विमा नियामक आणि विकास प्राधिकरण या भारतातील विमा क्षेत्रावर कायद्याचे नियंत्रण ठेवणाऱ्या मंडळाचे माजी सदस्य आहेत.)