बाप्पा, फुलू दे बाजार पुन्हा

विवेक मराठी    21-Aug-2020
Total Views |
कितीही नाकारले, तरी उत्सवांचा आनंद खरेदीत असतो हे आपल्या मानवी स्वभावाला पूरक आहे. या वर्षीच्या या जीवघेण्या संकटामुळे आपण या आनंदाला मुकलो आहोत. व्यावसायिकांचे अतोनात नुकसान झाले आणि अर्थव्यवस्थेवरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. पण हे सण-उत्सवच आपल्याला बळ देतात, आशा दाखवतात आणि अशा संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग ओशोधण्याची दृष्टीही देतात‌.


 The economics of Ganesho

कोरोनाच्या संकटाने या वर्षी सर्वच सण-उत्सवांचा उत्साह पार धुऊन टाकला आहे. गणेशोत्सव तोंडावर येईपर्यंत तरी या परिस्थितीत फारसा बदल नव्हता. मानवाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत सण-उत्सवांचा जन्म नेमक्या कोणत्या काळात झाला, याचे उत्तर शोधणे कठीण आहे. पण त्यांनी मानवाला भौगोलिक-सांस्कृतिक ओळख दिली, आनंदाचे, उत्साहाचे कारण दिले, त्याच्या सामाजिक जाणिवा अधिक प्रगल्भ केल्या. त्यामुळेच आजच्या आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाच्या काळातही त्यांचे महत्त्व कायम राहिले. भारतीय सण-उत्सवांचा गाभा तर निसर्ग किंवा ईश्र्वरी कृपेविषयी कृतज्ञता व्यक्त करणे आणि समाजबंध दृढ करणे हाच आहे. मात्र काळाच्या ओघात त्याला आणखी एक आयाम नकळत जोडला गेला, तो म्हणजे बाजारपेठ. आजच्या काळात तर तोच अधिक प्रभावी ठरू लागला आहे. प्रत्येक सण-उत्सवाच्या स्वागतासाठी आपल्याही आधी बाजारपेठा सजतात आणि आपल्यातही उत्साह भरतात. परंपरांना नावीन्याचा साज चढवण्याची चढाओढ इथे लागते. मोठ्या व्यावसायिकांपासून ते छोट्यातील छोट्या फेरीवाल्यापर्यंत प्रत्येकासाठी अर्थार्जनाची संधी इथे उपलब्ध असते. लाखो-कोटीची उलाढाल या बाजारपेठांमध्ये होते. आयात-निर्यातीचे व्यवहार होतात ते वेगळेच.


मार्चच्या सुरुवातीला जेव्हा लाॅकडाउन सुरू झाला, तेव्हा जीवनावश्यक वस्तू आणि सेवा वगळता अन्य सर्वच बाबींवर बंदी आणण्यात आली होती. सर्वच बाजारपेठा ओस होत्या. लोकांमध्ये भीतीचे सावट होते, आजही आहे. हे कितपत चालेल याचा त्या वेळी कोणालाही अंदाज येत नव्हता आणि दुर्दैवाने अद्यापही तो घेणे शक्य झालेले नाही. या मधल्या काळात आलेल्या छोट्या-मोठ्या सणांचे स्वागत थंडपणे झाले. नाही म्हणायला सोशल माध्यमांच्या व्हर्च्युअल जगाचा उत्साह कायम होता. लोक लाॅक-अनलाॅकच्या संभ्रमात असतानाच श्रावणातील व्रतवैकल्यांना सुरुवात झाली. सोबत सण-उत्सवांची मालिका सुरू झाली आणि बाजारपेठांमध्ये थोडी जान आली. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत व्यवहार सुरू झाले. अर्थात दर वर्षीची गर्दी नाहीच.

गणेशोत्सव हा अखंड‌ महाराष्ट्रासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. आतापर्यंत कितीही आपत्तीचा सामना करावा लागला, तरी गणरायाच्या स्वागतात कोणतीच कमतरता ठेवली जात नव्हती. या वर्षी मात्र कोरोनाच्या ग्रहणाने गणेशोत्सवाच्या उत्साहालाही ग्रासले. याची सुरुवात सार्वजनिक गणेश मंडळातील गणेशमूर्तींपासून झाली. अशीही या वर्षी श्री आगमनाची आणि विसर्जनाची मिरवणूक नसल्याने गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांचा विरस झाला आहे. मंडप नाही, देखावे नाही, दर्शनाची गर्दी नाही, दिखाव्याचे सोहळे नाहीत. ही वस्तुस्थिती मंडळांनीही स्वीकारली. त्यातच शासनाने केवळ २ ते ४ फुटांपर्यंत मूर्ती बसवण्याचे आवाहन मंडळांना केले. त्यामुळे 'लालबागचा राजा'सारख्या लोकप्रिय मंडळापासून अनेक लहान-मोठ्या मंडळांनी विशाल उत्सवमूर्ती बसवण्याचे टाळून केवळ पूजेची मूर्ती ठेवण्याचा निर्णय घेतला. खरे तर या संकटाच्या निमित्ताने ही सकारात्मक गोष्ट घडली. इतक्या वर्षांत पर्यावरणाचा विचार करून गणेशमूर्तींची उंची कमी ठेवण्याबाबत गणेशोत्सव मंडळांसाठी कठोर नियम लागू करूनही उपयोग होत नव्हता. मात्र या वर्षी छोट्या गणेशमूर्तींनीच उत्सवाची परंपरा कायम राखण्याचे अनेक मंडळांनी ठरवले आहे. तसेच ही मंडळे सोहळ्याऐवजी कोरोनातील मदतकार्य आणि अन्य सामाजिक कार्य यावर भर देताना दिसत आहेत. दुसरीकडे घरगुती गणपतीही साधेपणाने साजरा करण्याचा कल दिसून येत आहे. या सगळ्यात श्री मूर्तिकार आणि मूर्ती व्यावसायिक यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
 

 The economics of Ganesho

आपली नोकरी सांभाळून मूर्तिकलेचा कौटुंबिक वारसा जपणारा आमचा एक मित्र प्रसन्न जोशी याने याबाबत माहिती देताना सांगितले की "एकीकडे मोठ्या गणेशमूर्तींना मागणी कमी झाली आहे, तर दुसरीकडे छोट्या विक्रेत्यांना स्टाॅलवर सुरक्षेच्या दृष्टीने कमीत कमी मूर्ती ठेवाव्या लागत आहेत. मूर्तिकार वर्षभर मेहनतीने गणेशमूर्ती बनवत असतात. पण अचानक आलेल्या या संकटाने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे." मूर्तींच्या मागणीविषयी तो म्हणाला, "गेल्या काही वर्षांत पर्यावरणस्नेही गणेशमूर्तींविषयी प्रबोधन सुरू आहे. तसेच सध्याच्या वातावरणात पर्यावरणाच्या विचाराला प्राधान्य देण्याची गरज आहे. असे असतानाही यंदा शाडूच्या पर्यावरणस्नेही मूर्तींना अपेक्षित मागणी नाही. कारण शाडूच्या मूर्ती या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या तुलनेत महाग आहेत. सध्या लोक आर्थिक संकटाचाही सामना करत असल्याने कमी किमतीच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना अधिक प्राधान्य दिले गेले."

गणेशमूर्तींसोबतच दर वर्षी ग्राहकांच्या आकर्षणाचा विषय असतो सजावटीच्या आणि रोशणाईच्या सामानाचा. सोशल डिस्टन्सिंगमुळे दर्शनाला येणाऱ्या पाहुण्यांची गर्दी नसणार, त्यामुळे सजावट कोणासाठी करायची? असे निरुत्साही वातावरण आहे. पण बाप्पासाठी मखर, आरास यातून किमान मानसिक समाधान मिळणार, हेही तितकेच खरे.

चटईपासून पर्यावरणस्नेही मखर बनवणाऱ्या डोंबिवलीच्या माधवी पांढरे म्हणाल्या, "या वर्षी आमच्या मखरांना दर वर्षीपेक्षा थोडी कमी मागणी आहे. पण मागणी आहे. आम्ही पूर्ण काळजी घेऊन, योग्य प्रकारे सॅनिटाइझेशन करून ग्राहकांना मखर देत आहोत." मात्र अनेक मखर व्यावसायिकांनी या वर्षीच्या संकटाचा विचार करून मागणीप्रमाणे मखर बनवण्याचे धोरण स्वीकारले, तर काहींनी मखरच न बनवण्याचा निर्णय घेतला.

दादरच्या छबिलदास हायस्कूलच्या गल्लीत दर वर्षी मखरांचे ३०-३५ स्टाॅल असतात. त्यांपैकी एक स्टाॅल असतो दबडे कुटुंबीयांचा. सहा महिने राबून हे कुटुंबीय पर्यावरणस्नेही मखर बनवतात आणि गणेशोत्सवाच्या आधी काही दिवस या परिसरात स्टाॅल लावतात‌. या वर्षीचा अनुभव सांगताना रुना दबडे म्हणाल्या, "दर वर्षी गणेशोत्सवाच्या आधी छबिलदासच्या गल्लीत पाय ठेवायलाही जागा नसते. यंदा मात्र वाहतूक व्यवस्था अंशतः सुरू असल्याने ग्राहकांची अजिबातच गर्दी नव्हती. शेवटच्या २-३ दिवसांत तुरळक गर्दी होती. आम्ही पुठ्ठा, कागद, बांबू, चटया आदींपासून मखर बनवतो. डिसेंबरमध्ये कामाला सुरुवात झाली. लाॅकडाउनमुळे मार्चनंतर मखर बनवण्याचे काम ठप्प झाले होते. त्यामुळे कमी मखर बनवले गेले. काहींचं तर रंगकामही बाकी होते. ग्राहक नसल्याने या वर्षी फक्त १० टक्केच मखर विकले गेले. आम्ही मखर घरपोच देण्याची सुविधा देऊनही प्रतिसाद कमी होता."

सजावटीच्या आणि रोशणाईच्या सामानाची उपलब्धता आणि त्याला मिळणारा ग्राहकांचा प्रतिसाद यांच्याबाबतीतही वेगळी स्थिती नव्हती. दुकानांमध्ये यंदाही चिनी बनावटीच्या सजावटीच्या आणि रोशणाईच्या वस्तू दिसत होत्या. पण ते गेल्या वर्षीचे राहिलेले सामान होते. पुण्या-मुंबईतून गौरी-गणपतीसाठी कोकणात जाणारे चाकरमानी सोबत सजावटीचे सामान घेऊन जातात. या वर्षी मात्र सुरक्षेच्या कारणास्तव तसे करणे लोक टाळत होते. त्याचाही परिणाम खरेदीवर झालेला दिसतो. शिवाय सतत बरसणाऱ्या पावसाने खरेदीचा जो काही उरलासुरला उत्साह होता, त्यावरही पाणी ओतले.


 The economics of Ganesho

याशिवाय गणेशोत्सवात महत्त्वाची खरेदी असते ती पूजेसाठीच्या फूल-पत्रींची. दादरचे फूलमार्केट श्रावणाच्या आधीपासूनच फुलायला लागलेले असते ते थेट दिवाळीपर्यंत हेच चित्र असते. तिन्ही उपनगरीय रेल्वेमार्गांच्या अगदी शेवटच्या टोकापासून येथे नोकरी-व्यवसायासाठी येणाऱ्यांसाठी हे खरेदीचे ठिकाण. पण मार्चपासून उपनगरीय लोकल सेवा बंद झाली आणि हा मोठा ग्राहक वर्ग लाॅकडाउनमध्ये अडकला. त्या वेळी फूलमार्केटही बंद होते. फूलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे सर्व पीक पडून राहिले. फुले जमिनीत नांगरून टाकण्याची वेळ त्यांच्यावर आली. शेतकऱ्यांबरोबरच फूलविक्रेत्यांचेही खूप नुकसान झाले.

फूल व्यावसायिकांचे एक प्रतिनिधी राजेंद्र हिंगणे म्हणाले, "फुले जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत येत नसल्याने फूल मार्केट सुरू करायची परवानगी नव्हती. मग आम्ही वाॅर्ड ऑफिसरकडे जाऊन सगळी परिस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली आणि फूलमार्केट सुरू करण्याची मागणी केली. मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळण्यासाठी फूल व्यावसायिक प्रतिनिधींनी तयार केलेली योजना त्यांच्यासमोर सादर केली. या दरम्यान शेतकऱ्यांनाही लवकरच फूलमार्केट सुरू करणार असल्याचे आश्र्वासन दिले. या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर ८ जूनपासून फूलमार्केट सुरू करण्यात आले. फूलविक्रेते उपनगरी भागांतून अगदी नालासोपारा, विरार किंवा कर्जत, टिटवाळा आदी भागांतून दादरला येत असतात. पण लोकल बंद. प्रवासाची अन्य साधने उपलब्ध नव्हती, जी होती ती गरीब फूल व्यावसायिकांच्या आवाक्याबाहेर होती. अनेक व्यावसायिक गावीच राहिले होते. तसेच मार्केट सुरू केल्यानंतरही ग्राहकांची गर्दी कमीच होती. त्यात पावसाने या वर्षी कहर केला. कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी व संततधार पावसामुळे फुले भिजून खराब होत आहेत. त्यामुळे श्रावणातले सणवार सुरू झाले आणि गणेशोत्सव तोंडावर आला, तरी फूलमार्केटमध्ये म्हणावी तशी गर्दी दिसत नव्हती."

ग्राहकांविषयीचा अनुभव सांगताना ते म्हणाले, "माझे एक मित्र दर वर्षी घरच्या गणपतीला रोज ताज्या फुलांची आरास करतात. मात्र या वर्षी त्यांनी स्वत:च फोन करून सांगितले की या वर्षी अगदी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करणार आहोत." सध्या एकूण ६००-६५० व्यापाऱ्यांपैकी १००-एक फूल व्यावसायिक मार्केटमध्ये येत असल्याचे हिंगणे यांनी सांगितले. तसेच दिवाळीपर्यंत फूलबाजार पूर्णपणे सुरू होईल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.


 The economics of Ganesho

हीच परिस्थिती गौरी-गणपतीचे दागिने, गौरीच्या साड्या, खाद्यपदार्थ, पूजेचे सामान इत्यादींच्या खरेदीबाबतही दिसून आली. मालाची उपलब्धता आणि ग्राहकांचा प्रतिसाद दोन्ही कमी. यात उत्पादकांपासून किरकोळ विक्रेत्यांपर्यंत सगळ्यांचेच नुकसान झाले. मात्र यातही अनेकांनी डिजिटल मार्केटिंगचा किंवा ऑनलाइन मार्केटिंगचा पर्याय स्वीकारून आपल्या उत्पादनांना ग्राहकांपर्यंत पोहोचवले. केवळ अॅमेझाॅन, फ्लिपकार्ट, स्नॅप डील यांसारखे मोठमोठे ऑनलाइन शाॅपिंग पोर्टल्सच यात आघाडीवर नाहीत. तर फेसबुक, व्हाॅटस अॅप, इन्स्टाग्राम यांसारख्या समाजमाध्यमांचा वापर करत अनेक छोटे व्यावसायिक, तरुण, महिला आपल्या उत्पादनांचे मार्केटिंग करत आहेत. समाजमाध्यमांवर ग्रूपच्या रूपात अशा ऑनलाइन बाजारपेठा प्रकटल्या आहेत, ज्यावर मोदकाचे पीठ, मोदक आणि अन्य पदार्थ, पूजेचे सामान, सजावटीच्या वस्तू, दागिने, कपडे इ. गोष्टी त्यांच्याविषयीच्या माहितीसह आणि त्या त्या व्यावसायिकांच्या संपर्कासह उपलब्ध असतात. इतकेच नाही, तर या वस्तू घरपोच मिळण्याची व्यवस्था असते.

कितीही नाकारले, तरी उत्सवांचा आनंद खरेदीत असतो हे आपल्या मानवी स्वभावाला पूरक आहे. या वर्षीच्या या जीवघेण्या संकटामुळे आपण या आनंदाला मुकलो आहोत. व्यावसायिकांचे अतोनात नुकसान झाले आणि अर्थव्यवस्थेवरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. पण हे सण-उत्सवच आपल्याला बळ देतात, आशा दाखवतात आणि अशा संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्याची दृष्टीही देतात‌. एखाद्या खाद्यतेलाकडून छोटीशी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती भेट देण्याची कल्पना असो किंवा सोसायटीच्या गणेशोत्सव मंडळाच्या समाजकार्याचे कौतुक करणाऱ्या आजोबांवर चित्रित लोकप्रिय मिठाईउत्पादकांची जाहिरात असो, ती अशाच दृष्टीतून निर्माण झाली असावी. ही दृष्टी आमच्या लाडक्या बाप्पाने प्रत्येकाला द्यावी आणि सर्व बाजारपेठ पुन्हा पहिल्यासारखी फुलताना 'आत्मनिर्भर भारत'चे स्वप्न प्रत्यक्षात साकारावे, हीच श्रीचरणी प्रार्थना!