पुण्याचा गणेशोत्सव सेवामय

विवेक मराठी    23-Aug-2020
Total Views |
सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे यंदाचा गणेशोत्सव साजरा होणार असला, तरी पुण्यातील विविध गणेशोत्सव मंडळांचे उत्साही कार्यकर्ते मात्र स्वस्थ बसलेले नाहीत. त्यांची ऊर्जा, वेळ आणि आर्थिक शक्ती त्यांनी कोरोनाशी संबंधित वा अन्य सामाजिक उपक्रमांत, मदतकार्यांत गुंतवली आहे.


ganpati_1  H x

लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेचा पाया रचला, त्याला आता सव्वाशे वर्षांहून अधिक काळ लोटला. आज सार्वजनिक गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील एक मानबिंदू आणि लाखो–कोट्यवधी गणेशभक्तांसाठी श्रद्धेचा, अभिमानाचा असा उत्सव. त्यातही विशेषतः पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा तर अलीकडच्या काळात केवळ राज्यातीलच नाही, तर देश-विदेशांतील भाविकांच्या, पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे.

गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत, विशेषतः घरगुती गणपतींच्या विसर्जनानंतर शेवटच्या तीन-चार दिवसांच्या काळात पुण्यातील बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता, छ. शिवाजी रस्ता, कुमठेकर रस्ता आदी रस्त्यांसह सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ, कसबा पेठ असा जुन्या वा मध्यवर्ती पुण्याचा भाग गर्दीने अक्षरशः ओसांडून वाहत असतो. आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घ्यायला, विविध आकर्षक देखावे–सजावट पाहायला, जमलंच तर या निमित्ताने सहकुटुंब थोडीफार खरेदी करायला व अशा असंख्य गोष्टींकरिता राज्याच्या व देशाच्या कानाकोपर्‍यातून भाविकांची गर्दी पुण्यात लोटते. अनंत चतुर्दशीच्या दिवशीच्या विसर्जन मिरवणुका हा तर आणखी वेगळा विषय.. विविध ढोल पथकं, उत्साही कार्यकर्ते, भाविक यांच्या तुडुंब गर्दीत बाप्पा विसर्जनासाठी निघतात आणि या मिरवणुका चक्क चतुर्दशीनंतरच्या दुसर्‍या दिवसापर्यंत लांबतात. रस्त्यांवर तर पाऊल ठेवायलाही जागा नसते.


मात्र, यंदा यातली काहीच धामधूम, उत्साह, भव्यता बघायला मिळणार नाही. याला कारण अर्थातच, गेले पाच-सहा महिने महाराष्ट्र, भारतासह संपूर्ण जगभराच्याच मानगुटीवर बसलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव. गर्दी टाळणं हाच हा प्रादुर्भाव रोखण्यावर आजही प्रभावी उपाय असल्याने साहजिकच गणेशोत्सवदेखील अत्यंत साधेपणाने साजरा होणार आहे. श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठापना, नियमित पूजा-अर्चा, विसर्जन आदी धार्मिक विधी, तेदेखील निवडक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केले जाणार असून अन्य कोणत्याही गोष्टी - उदा., देखावे, भव्य सजावट वगैरे यंदा बघायला मिळणार नाही. सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे यंदाचा गणेशोत्सव साजरा होणार असला, तरी पुण्यातील विविध गणेशोत्सव मंडळांचे उत्साही कार्यकर्ते मात्र स्वस्थ बसलेले नाहीत. त्यांची ऊर्जा, वेळ आणि आर्थिक शक्ती त्यांनी कोरोनाशी संबंधित वा अन्य सामाजिक उपक्रमांत, मदतकार्यांत गुंतवली आहे. पुण्यातील मानाचे पाच गणपती आहेत -


१) कसबा गणपती (पुण्याचे ग्रामदैवत),
 
२) तांबडी जोगेश्वरी गणपती,

३) गुरुजी तालीम गणपती,
 
४) तुळशीबाग गणपती आणि
 
५) केसरीवाडा गणपती.


ganpati_1  H x

याशिवाय, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, अखिल मंडई मंडळ गणपती, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, हुतात्मा बाबू गेनू मंडळ गणपती हे आणखी काही महत्त्वाचे, प्रसिद्ध गणपती आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव हा जसा श्रद्धेच्या, सांस्कृतिक परंपरेच्या दृष्टीने महाराष्ट्राचा मानबिंदू, तसाच तो आर्थिक उलाढालीच्या दृष्टीनेही महत्त्वाचा विषय आहे. पुण्यासारख्या सव्वाशेहून अधिक वर्षांची गणेशोत्सव परंपरा असणार्‍या शहरात तर या काळात हजारो कोटींची उलाढाल होते. यामध्ये अगदी लहानमोठे फूलविक्रेते, सजावट साहित्य विक्रेते, सजावट व देखावे साकारणारे कलाकार, चहा वा अन्य खाद्यपदार्थ विक्रेते इथपासून ते मोठमोठे सराफ आदी असंख्य घटकांचा समावेश होतो. याबद्दल बोलताना पुण्यातील गणेशोत्सव परंपरेचे अभ्यासक आनंद सराफ म्हणाले की, “यंदाच्या सर्व परिस्थितीमुळे सार्वजनिक गणेशोत्सवाचं अर्थकारण एरवीच्या तुलनेत तब्बल २० टक्क्यांपर्यंत खाली घसरणार आहे. वर्गणी, जाहिराती, प्रयोजक आदी गोष्टींवरही मोठा परिणाम होणार आहे. याशिवाय, विविध गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही गेल्या चार-पाच महिन्यांत वैयक्तिक आघात झेलले आहेत. उदा., कोरोनामुळे कुटुंबातील वा जवळच्या व्यक्तींचे मृत्यू किंवा आर्थिक संकट इत्यादी. त्यामुळे यंदाचा उत्सव सर्वांचीच कसोटी पाहणारा उत्सव आहे आणि समाजात विविध मदतकार्यांत आघाडीवर असणार्‍या गणेशोत्सव कार्यकर्त्यांच्या ‘क्रायसिस मॅनेजमेंट’चीही या निमित्ताने कसोटी असणार आहे.” यापूर्वी १९१८च्या सुमारास पुण्यात प्लेगची साथ पसरली, तेव्हा अशा प्रकारचं वातावरण गणेशोत्सव काळात पाहायला मिळालं होतं, त्यानंतर २००८च्या काळात स्वाइन फ्लू साथीच्या काळात पुण्यातील गणेशोत्सवाने काही प्रमाणात बंधनं अनुभवली. हे काही अपवाद वगळता गेल्या काही दशकांत अशी अभूतपूर्व परिस्थिती प्रथमच उद्भवली असल्याचीही माहिती सराफ यांनी दिली.

पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे सा. ‘विवेक’शी बोलताना म्हणाले की, “सरकारने गणेशोत्सवाबाबत ज्या काही सूचना केल्या आहेत, त्यांचं पालन करून उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येईल. यंदाच्या वर्षी दगडूशेठ गणपतीच्या कायमस्वरूपी मंदिरातच श्रींची प्रतिष्ठापना होते आहे. तसेच, ठिकठिकाणच्या भाविकांना बाप्पाचं दर्शन घरबसल्या ऑनलाइन माध्यमांतून घेता येण्याची सोयही उपलब्ध करण्यात आली आहे, ज्यात प्राणप्रतिष्ठा सोहळा, ऋषिपंचमी कार्यक्रम, मंगलारती अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे.” पुण्यातील ससून रुग्णालयात दररोज २ हजार व्यक्तींच्या रोजच्या जेवण-नाश्ता इ.ची व्यवस्था दगडूशेठ ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आली आहे. याशिवाय, जवळपास १ हजार कोरोना रुग्णांचीही जेवण-नाश्त्याची व्यवस्था ट्रस्टने केली असल्याचं त्यांनी संगितलं. लॉकडाउन काळात आर्थिक संकटात सापडलेल्या, हातावर पोट असणार्‍या कष्टकरी वर्गातील सुमारे १५ हजार लोकांना एक महिन्याचं अन्नधान्य पुरवण्यात आलं, तसंच ट्रस्टच्या ८ रुग्णवाहिका आहेत, त्याही रुग्णसेवेत कार्यरत असल्याचं गोडसे यांनी नमूद केलं.


ganpati_1  H x

पुण्याचं ग्रामदैवत व गणेशोत्सवातील मानाचा गणपती म्हणजे कसबा गणपती. सर्व मंडळांप्रमाणेच कसबा गणपती मंडळही यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करणार आहे. “सर्व पूजा, अभिषेक, मान्यवरांच्या हस्ते होणार्‍या आरत्या, सकाळी होणारं अथर्वशीर्ष, भजनी मंडळांचे कार्यक्रम, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चा कार्यक्रम यासह अनेक सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रम इ. गोष्टी रद्द करण्यात आल्या आहेत. मांडवात दर वर्षी होणारी पत्रीपूजा वगळता अन्य कोणत्याही प्रकारची सजावटदेखील यंदा करण्यात आलेली नाही. इतकंच नव्हे, तर प्रतिष्ठेचा ‘कसबा गणपती पुरस्कार’देखील या वर्षी रद्द करण्यात आला आहे” अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी दिली. दुसरीकडे, सामाजिक मदतकार्यात पहिल्या लॉकडाउनपासूनच कसबा गणपती मंडळ सक्रिय आहे. दररोज पाचशे ते आठशे जणांना पाणी व अन्नवाटप, मास्कवाटप, पीपीई किटवाटप, आर्सेनिक गोळ्यांचं वाटप, सोशल डिस्टन्सिंगची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं इ. कार्यदेखील कसबा गणपती मंडळाकडून करण्यात आलं आहे. मानाचा दुसरा गणपती अर्थात, तांबडी जोगेश्वरी गणेशोत्सव मंडळाच्या गणेशोत्सवात जोगेश्वरी गजाननाची मूर्ती चांदीच्या देव्हार्‍यात विराजमान असते व विसर्जनाच्या वेळेस ती चांदीच्या पालखीतून नेण्यात येते. बाप्पाचं आगमन आणि विसर्जन धूमधडाक्यात करण्यात येतं. मात्र, या वेळी ही आगमनाची आणि विसर्जनाची भव्य मिरवणूक असणार नाही. तसंच, मांडवाचा आकारदेखील या वर्षी बराच कमी करण्यात आला आहे. दैनंदिन आरत्या, पूजा, अथर्वशीर्ष, गणेशयाग व अन्य धार्मिक कार्यक्रम साधेपणाने होत आहेत आणि विशेष म्हणजे या वेळेस तांबडी जोगेश्वरी गणेशोत्सव मंडळाने आठ दिवस रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. आपल्या मंडळाशी संबंधित कारागीर, बॅंडवादक, नगारा वादक, विद्युतकाम करणारे आदींना मंडळातर्फे यंदा अन्नधान्य वाटप करण्यात येत असून विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींची मार्गदर्शनपर सत्रं ऑनलाइन स्वरूपात आयोजित करण्यात आल्याची माहितीही मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार यांनी दिली.


ganpati_1  H x

पुण्यातील मानाचा तिसरा गणपती - अर्थात गुरुजी तालीम मंडळानेही या गणेशोत्सवात मदतकार्यात पुढाकार घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजूंना अन्नधान्य वाटप, पोलीस कर्मचार्‍यांना मास्क–सॅनिटायझरचं वाटप, गरजू रुग्णांना रक्तदान आदी उपक्रम मंडळाच्या माध्यमातून राबवण्यात आले आहेत. तसंच, मुख्यमंत्री साहायता निधी व अन्य विविध सामाजिक कामांकरिता मंडळातर्फे निधी संकलन करण्यात आलं असल्याचं मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांनी सांगितलं. मानाचा चौथा गणपती - अर्थात तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशोत्सवातील सजावट हे एक प्रमुख आकर्षण असतं. शिल्पकार प्रा. एस.डी. खटावकर यांच्या पुढाकारातून नावीन्यपूर्ण सजावटी हे या गणपतीचं गेल्या अनेक दशकांपासून एक वैशिष्ट्यच बनलं. या उपक्रमातून अनेक नामवंत कलाकारही इथे घडले. प्रा. खटावकर यांचे पुत्र विवेक खटावकर हेदेखील प्रसिद्ध शिल्पकार असून ते तुळशीबाग गणेशोत्सव मंडळाची जबाबदारी सांभाळत आहेत. यंदाच्या गणेशोत्सवाबाबत ते म्हणाले की, “गणेशोत्सवात अनेक कारागीरांच्या हाताला काम मिळत असतं. गणेशोत्सवाच्या आधीपासून तीन-चार महिने ते या कामात असतात व त्यातून त्यांना रोजगार मिळत असतो. अशा अनेक घटकांवर या सर्व परिस्थितीचा अत्यंत प्रतिकूल परिणाम झाला आहे. या वर्षी आम्ही अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करत असलो, तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि त्याव्यतिरिक्त कोकणात झालेल्या वादळाच्या काळात वा इतर अनेक गोष्टींमध्ये मंडळाने मोठ्या प्रमाणात मदतकार्यात पुढाकार घेतला आहे.” मानाच्या गणपतींव्यतिरिक्त अन्य महत्त्वाच्या व प्रसिद्ध गणपतींपैकी आणखी एक प्रमुख नाव म्हणजे अखिल मंडई गणेशोत्सव मंडळाचा गणपती. वरील सर्व मंडळांप्रमाणेच ‘अखिल मंडई’नेही दर वर्षीचा डामडौल रद्द करत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचं नियोजन केलं आहे. त्याचप्रमाणे गणेशोत्सव काळात या उत्सवाशी निगडित विविध घटकांतील गरजू, गरीब व्यक्तींना - उदा., मंडप उभारणारे कामगार, कारागीर इत्यादींना अन्नधान्य वाटप आणि असं विविध प्रकारचं सामाजिक कार्य मंडळाने मोठ्या प्रमाणात केल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी ‘विवेक’शी बोलताना दिली.

सार्वजनिक गणेशोत्सवाला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा आत्मा म्हटलं जातं. आज कोरोनाच्या या सर्व संकटकाळामुळे हा गणेशोत्सव आपल्याला मोठ्या जड अंतःकरणाने आणि आपल्या सर्वांच्याच हितासाठी म्हणून साधेपणाने, गर्दी न टाळता साजरा करावा लागतो आहे. मात्र, यानिमित्ताने शेकडो, हजारो गणेशोत्सव कार्यकर्त्यांची ऊर्जा विविध सामाजिक उपक्रमांमध्ये गुंतली आहे आणि यातून या गणेशोत्सव काळात हे उत्साही कार्यकर्ते ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ या ओळीला अनुसरून बाप्पाची सेवाच करत आहेत.