मातीतील फुले

विवेक मराठी    26-Aug-2020
Total Views |

@भालचंद्र पिंपळवाडकर

महाराष्ट्राच्या मातीने आजवर अनेकांना मोठे केले. संघर्ष इथल्या माणसांच्या पाचवीलाच पूजलेला आहे. पण याच संघर्षातून पुढे आलेल्यांनी, उभे राहिलेल्यांनी आपापले प्रांत गाजवले. सारिका, राहुल आणि दत्तू ही तीन फुलेही याच मातीत जन्मलेली, वाढलेली. केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने या तिघांनाही 'अर्जुन पुरस्कार' जाहीर करून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा, इथल्या मातीचा गौरव केला आहे. या तिघांच्याही कष्टाला, जिद्दीला, चिकाटीला आज अर्जुन पुरस्काररूपी फळ आले आहे.


Maharashtra's Arjuna Awar


महाराष्ट्रीय माणूस कोणतीही गोष्ट लवकर मनावर घेत नाही. पण एखादी गोष्ट त्याच्या मनात बसली की ती तो पूर्ण केल्याशिवाय, त्या क्षेत्रात 'बेस्ट' केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही, हे आजवर अनेकदा सिद्ध झालेले आहे. याची अनंत उदाहरणेही देता येऊ शकतील. अत्यंत गावखेड्यातून आलेल्या उस्मानाबादची सारिका काळे, नाशिकच्या चांदवड तालुक्यातील दत्तू भोकनळ किंवा पाटोद्याच्या राहुल आवारे यांना जाहीर झालेला अर्जुन पुरस्कार ही त्याची ताजी उदाहरणे सांगता येतील. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या या फुलांचा दरवळ आज सर्वत्र पसरला आहे. या तिघांच्या नावावर लागलेली प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्काराची मोहोर मराठी माणसांची छाती फुगवणारी ठरली आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून अवघे जग कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने हैराण आहे. वरवर डोळ्यांना न दिसणाऱ्या कोरोना विषाणूने जगभरात व त्यातही विशेषतः भारतात आजवर आरोग्य या विषयाकडे किती दुर्लक्ष करण्यात आले, हे ठळकपणे दाखवून दिले. हे दुर्लक्ष झाले नसते, तर कदाचित या विषाणूने आतापर्यंत देशात घेतलेले ६० हजारावर जिवांचे प्राण वाचवता येऊ शकले असते, असे म्हणता येईल. अर्थात, आरोग्य हे देशात दुर्लक्ष केले जाणारे एकमेव क्षेत्र नक्कीच नाही. क्रीडा क्षेत्राकडेही आतापर्यंत खूप दुर्लक्ष झालेले आहे. विशेषतः आंतराराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदतालिकेत भारताचे नाव खालून कुठल्या तरी क्रमांकावर असते आणि महत्त्वाचे म्हणजे देशवासीयांना ते शोधावे लागते, यातच सर्व काही आले. क्रिकेट आणि बोटावर मोजता येतील असे काही खेळ सोडले, तर देशाची इतर खेळांत काय प्रगती आहे, हे न बोललेले बरे असे म्हणण्याची वेळ येते. त्यातही महत्त्वाचे म्हणजे ज्या खेळात प्रगती दिसते, त्यात शहरातील मोठ्या घरची मुले प्रगती करताना, नाव कमावताना दिसतात. या मुलांना एकतर घरातून भक्कम पाठिंबा असतो, मोठे आर्थिक पाठबळ मिळालेले असते. म्हणजेच खेळ, क्रीडाप्रकार हेदेखील श्रीमंतांची मक्तेदारी होऊन बसले होते. अर्थात ही काही स्थिती काही वर्षांपूर्वी नक्कीच होती. पण गेल्या काही वर्षांत यामध्ये नक्कीच बदल होत गेला आहे. गावखेड्यातला कुणीतरी एखादा खेळाडू अचानक एखाद्या खेळात रात्रीतून स्टार होतो आणि मग त्या खेळाडूचे आणि तो खेळत असलेल्या खेळाचे नाव सर्वत्र घेतले जाते, अशी असंख्य उदाहरणे आपल्या देशात पाहायला मिळालेली आहेत. नाशिकच्या कविता राऊतने धावण्याच्या स्पर्धेत नाव कमावले, 'सावरपाडा एक्स्प्रेस' म्हणून प्रसिद्ध झाली आणि नाशिकचे नाव जगभर झाले. त्याचबरोबर धावणे हा क्रीडाप्रकारही करियरचा विषय होऊ शकतो, हे सगळ्यांना कळले. अशी अनेक खेळाडूंची नावे किंवा खेळ प्रकार सांगत येऊ शकतील.

कविता राऊतसारख्या गावखेड्यातील अनेक मराठी मुलांनी खेळाच्या माध्यमातून मराठी पताका देशपातळीवर उंचावली आहे. पण अपवाद वगळले, तर यातील अनेकांच्या पाठीवर पुरस्काररूपी थाप मात्र पडू शकली नाही. खेड्यापाड्यातून आल्यामुळे त्यांच्याकडे कुणाचे लक्षच गेले नाही. पुरस्कारासाठी पात्र असूनही त्यांच्यामागे भक्कमपणे उभे राहणारे कुणी नसल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले. एकीकडे कोणत्याही सुविधा नाहीत, त्यातच स्वबळावर मेहनतीने पुढे येऊनही त्या मेहनतीला पुरस्काररूपी बळ मिळाले नसल्याने अनेक खेळाडू मागे राहून गेले, तर काही जण कुणाच्या तरी हाताला धरून पुरस्काराच्या यादीत अनपेक्षितपणे झळकून गेले, तर काही पात्र असूनही पुरस्काराच्या बाबतीतही 'वंचित' राहिले. अर्थात हे साऱ्यांच्याच बाबतीत घडले असे म्हणता येणार नाही. काही गुणी खेळाडू या बाबतीत नक्कीच नशीबवान ठरले.

हे सारे आठवायचे कारण म्हणजे दोन दिवसांनी येत्या २९ ऑगस्टला सारिका काळे, दत्तू भोकनळ आणि राहुल आवारे या गुणी खेळाडूंना प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला जाणार आहे. या तिघांनाही नुकताच हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. या तिघांचेही कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. अत्यंत गावखेड्यातून आलेल्या या तिघांनीही त्यांच्या गावात त्यांच्या क्रीडाप्रकाराच्या कोणत्याही सुविधा, प्रशिक्षण उपलब्ध नसताना गाव, तालुका, जिल्हा, राज्य किंवा देशपातळीवरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःच्या नावाचा ठसा उमटवण्याचे काम केले आहे. या तिघांना अर्जुन पुरस्कार जाहीर होणे ही त्यांचे कुटुंब, गाव किंवा जिल्हा यांच्यासाठीच नव्हे, तर अवघ्या मराठी जनांसाठी भूषणावह बाब ठरली आहे.

Maharashtra's Arjuna Awar 

यातील पहिले नाव म्हणजे सारिका काळे. उस्मानाबाद जिल्ह्याच्या रुईभर नावाच्या खेड्यातून आलेल्या या सावित्रीच्या लेकीने आज अर्जुन पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षांपासून क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारी सारिका आज भारताच्या खो-खो संघाची कर्णधार आहे. सारिकाने अनेक राज्य, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये संघाला सतत विजय मिळवून दिला आहे. वयाच्या अकराव्या वर्षी सारिकाने क्रीडा क्षेत्रात पाऊल टाकले. शालेय स्तरावरील खो-खो स्पर्धेतील तिचे थक्क करणारे क्रीडाकौशल्य कौतुकास्पद होते. २००६-०७मध्ये तिची महाराष्ट्र संघात निवड झाली. आपल्या अथक परिश्रमाने सलग २० राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने संघाला यश मिळवून दिले. सांघिक खेळांमध्ये तिने महाराष्ट्र संघाला १२ सुवर्ण व चार कास्यपदके मिळवून दिली. २०१०-११मध्ये महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी तिची निवड झाली. छत्तीसगढमध्ये झालेल्या स्पर्धांमध्येही तिने सुवर्णपदक मिळवले. नंतर तीन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने कर्णधारपद भूषवले. २०१५-१६मध्ये तिची भारतीय संघात निवड झाली. तिच्या नेतृत्वाखाली भारतास सुवर्णपदक मिळाले. २०१६मध्ये आसाम - गुवाहाटी येथील खो-खो स्पर्धेसाठी कर्णधारपदी निवड व तेथेही तिने सुवर्णपदक असा तिचा प्रवास झाला. क्रीडा क्षेत्रातील नैपुण्यामुळे राज्य शासनाच्या शिवछत्रपती राज्यस्तरीय पुरस्कारासह अन्य पुरस्कारानेही तिचा सन्मान करण्यात आला. एकीकडे काजू, बदाम खाऊन डाएट फॉलो करणारे क्रीडापटू आणि दुसरीकडे बेताच्या परिस्थितीतून खो-खो खेळणारी आणि त्यात टोकाचे यश कमावणारी सारिका. तिचा हा प्रवास खरेच क्रीडा क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची, नाव कमावण्याची इच्छा असणाऱ्या नवख्या क्रीडापटूसाठी नक्कीच प्रेरणादायक आहे. गावच नव्हे, तर तालुका आणि जिल्हा पातळीवरही खेळाशी संबंधित कोणत्याही चांगल्या सुविधा, सोयी उपलब्ध नसताना सारिका खडतर मेहनतीतून या उंचीवर पोहोचली आहे. "खरे तर खेळामध्ये गरीब-श्रीमंतीचा काहीच संबंध नाही, पण परिस्थिती नसेल तर अडचणी नक्कीच येतात" असे सारिका जेव्हा म्हणते, तेव्हा त्यात काहीही खोटे नसते. कारण याच गरिबीने कधीकाळी सारिकावर खेळाला बायबाय करण्याची वेळ आणली होती. पण तिचे क्रीडा मार्गदर्शक प्रा. डॉ. चंद्रजित जाधव यांनी आणि काकांनी योग्य वेळी तिच्या वडिलांची समजूत घातली आणि सोलापूरला खेळू देण्यासाठी तयार केले. त्या वेळी घडलेला हा प्रकारच तिच्या जीवनासाठी 'टर्निंग पॉइंट' ठरला, असेच म्हणावे लागेल. तिथून पुढे निघालेल्या सारिकाने आजवर मागे वळून पाहिलेले नाही. 'अर्जुन'साठी तिची झालेली निवड यामागे तिची जिद्द, खडतर मेहनत, जीव झोकून देऊन परिश्रम करण्याची तयारी, 'द बेस्ट' करून दाखविण्याची वृत्ती याच बाबी आहेत, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये.


Maharashtra's Arjuna Awar

'अर्जुन'वर नाव कोरणारा दुसरा पठठ्या म्हणजे पहिलवान राहुल आवारे. मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील, पण बीड जिल्ह्याच्या पाटोदामध्ये राहिलेला, वाढलेला राहुल आज कुस्तीत आंतरराष्ट्रीय मैदाने गाजवत आहे. गावापासून काही अंतरावर वडिलांनी उभारून दिलेल्या पत्र्याच्या शेडरूपी खोलीत सराव करणारा राहुल आज पैलवान हरिश्चंद्र मामा बिराजदार यांच्या प्रशिक्षणामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कुस्तीच्या फडात भल्याभल्या मल्लांना चितपट करतोय, हे खरेच वाखाणण्याजोगे आहे. अवघ्या तिसरीत असल्यापासून वडिलांच्या प्रेरणेने राहुलला कुस्तीचे व्यसन जडले आणि ते आजवर कायम आहे. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावल्यानंतर राहुल आवारे हे नाव जगभर झाले. पण यामुळे हुरळून न जाता राहुल आजही नवोदित खेळाडूसारखी मेहनत घेत नव्या आव्हांना सामोरे जाण्यासाठी, नव्या यशाला गवसणी घालण्यासाठी प्रयत्न करतोय, हे खरेच कौतुकास्पद आहे. खडतर कष्ट, जिद्द, मेहनत आणि चिकाटी हेच त्याच्या यशाचे गमक असून हेच त्याला अर्जुन पुरस्कारापर्यंत घेऊन आले आहे, हे नक्की.


Maharashtra's Arjuna Awar

नौकानयन (रोइंग) हा क्रीडाप्रकार तसा आपल्यासाठी नवीन. पण याच खेळाने देशाला महाराष्ट्राने दत्तू भोकनळ नावाचा आंतरराष्ट्रीय खेळाडू दिला. तळेगाव रोही (ता, चांदवड, जि. नाशिक) या छोट्याशा खेड्यातून आलेल्या दत्तूचा आजवरचा प्रवास सारिका आणि राहुल यांच्यासारखाच अत्यंत प्रतिकूल परिस्थितून झाला आहे. विहीर खोदकाम करणारे वडील गेल्यानंतर दत्तू शेतीत राबून, मोलमजुरी करून शिकला. याच शिक्षणाच्या जोरावर २०१२मध्ये लष्करी सेवेत दाखल झाला. इथपर्यंत त्याला रोइंगचा 'र'सुद्धा माहित नव्हता. पण शरीरयष्टी चांगली असल्याने सुभेदार कुदरत यांनी त्याला या खेळाची माहिती देऊन खेळण्याची गोडीही लावली. २०१४मध्ये पुण्यात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने दोन सुवर्णपदके मिळवली. ती त्याला २०१६मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत घेऊन गेली. ऑलिम्पिक स्पर्धेत पदक हुकले असले, तरी पुढे आशियाई स्पर्धेत मात्र त्याने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. अर्थात हे सर्व यश मिळवताना दत्तू आपल्या शेतीला, मातीला विसरलेला नाही. आजही सुटीत घरी आल्यावर दत्तू वडिलोपार्जित शेतीत रमतो. शेती हीच श्रीमंती असे सांगताना दत्तू कुठेही खजिल होत नाही. आता दत्तूचा अर्जुन पुरस्काराने गौरव होत आहे, ही फक्त त्याच्या गावापुरती नाही, तर अवघ्या महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे.

महाराष्ट्राच्या मातीने आजवर अनेकांना मोठे केले. संघर्ष इथल्या माणसांच्या पाचवीलाच पूजलेला आहे. पण याच संघर्षातून पुढे आलेल्यांनी, उभे राहिलेल्यांनी आपापले प्रांत गाजवले. सारिका, राहुल आणि दत्तू ही तीन फुलेही याच मातीत जन्मलेली, वाढलेली. केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने या तिघांनाही 'अर्जुन पुरस्कार' जाहीर करून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा, इथल्या मातीचा गौरव केला आहे. या तिघांच्याही कष्टाला, जिद्दीला, चिकाटीला आज अर्जुन पुरस्काररूपी फळ आले आहे. मराठी मातीतील या तीन फुलांचा सुगंध असाच बहरावा, याच शुभेच्छा!