विघ्नहर्त्याचं ‘निर्विघ्न’ विसर्जन

विवेक मराठी    28-Aug-2020
Total Views |

गणेशोत्सवाला आलेलं विकृत स्वरूप जावं, त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा बसावा आणि गणेशोत्सवाचं पावित्र्य व श्रद्धेतला खरा मानसिक आनंद यांचं महत्त्व आपल्याला पटावं, यासाठी गेली एक ते दोन दशकं विविध स्तरांवर प्रबोधन होत आहे. ही प्रबोधनचळवळ आज चांगली प्रस्थापित आणि सुसंघटित झाली आहे आणि त्याला लोकसहभागातून कृतीची जोड मिळून ती वृद्धिंगत होत आहे. अनेक स्वयंसेवी संस्था यात हिरिरीने सहभागी होत आहेत. आणखी काही वर्षं हा प्रवास सुरू ठेवावाच लागेल


GANPATI_1  H x  

यंदाच्या गणेशोत्सवाबाबत गेले काही दिवस व्हॉट्स ऍपवरून एक संदेश सगळीकडे फिरतो आहे - 'आज लोकमान्य टिळकांचं निधन होऊन बरोब्बर १०० वर्षांनी त्यांना अभिप्रेत असलेला गणेशोत्सव साजरा होत आहे. अंदाधुंद मिरवणुका, कानठळ्या बसवणारे डीजे, दंगामस्तीपूर्ण नाचगाणी हे अलीकडे गणेशोत्सवाला आलेलं आणि दर वर्षी वाढत जाणारं विकृत स्वरूप यंदा कोरोनाच्या वातावरणामुळे दिसलं नाही. सार्वजनिक गणेशोत्सवही यंदा थोडक्यात, आटोपशीर, शांत आणि सुटसुटीतपणे पार पडताना दिसत आहेत. १०० वर्षांनंतर आज टिळक धन्य झाले असतील.’

व्यापक बदल हा चटकन होत नाही. तो हळूहळूच होतो. किंबहुना, हळूहळू झालेला बदलच टिकाऊ असतो. गणेशोत्सवाला आलेलं विकृत स्वरूप जावं, त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा बसावा आणि गणेशोत्सवाचं पावित्र्य व श्रद्धेतला खरा मानसिक आनंद यांचं महत्त्व आपल्याला पटावं, यासाठी गेली एक ते दोन दशकं विविध स्तरांवर प्रबोधन होत आहे. ही प्रबोधनचळवळ आज चांगली प्रस्थापित आणि सुसंघटित झाली आहे आणि त्याला लोकसहभागातून कृतीची जोड मिळून ती वृद्धिंगत होत आहे. अनेक स्वयंसेवी संस्था यात हिरिरीने सहभागी होत आहेत. आणखी काही वर्षं हा प्रवास सुरू ठेवावाच लागेल.

गणेशविसर्जनामुळे होणाऱ्या नदी, तलाव, खाड्या, समुद्र अशा अत्यंत मौल्यवान जलस्रोतांच्या प्रदूषणाच्या समस्येची दखल केंद्र सरकारने सर्वप्रथम २००८ साली घेतली आणि २०१० साली केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (Central Pollution Control Board - CPCB) गणेशोत्सव साजरा करण्याबाबत काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या. गणेशमूर्ती बनवण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी माती आणि नैसर्गिक रंगांच्या वापरला प्रोत्साहन, निर्माल्याचं स्वतंत्र संकलन, विसर्जनाच्या जागा निश्चित करणं, विसर्जित केलेल्या गणेशमूर्तींचा पुनर्वापर, विसर्जनानंतर किनाऱ्याची स्वच्छता, विसर्जन तलावांची निर्मिती, विसर्जनानंतर जलस्रोतांमधील पाण्याच्या गुणवत्तेची तत्काळ तपासणी, इ. इ. प्रकारच्या गोष्टींची अंमलबजावणी करण्याच्या सूचना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना दिल्या होत्या. या वर्षी, म्हणजेच २०२० साली या मार्गदर्शक सूचना आवश्यक बदलांसह पुन्हा जारी करण्यात आल्या. २०१०च्या सूचनांच्या तुलनेत त्या अधिक विस्तृत, सविस्तर आणि कडक आहेत. कुटुंबं, गणेश मूर्तिकार, सार्वजनिक गणेश मंडळं, स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळं यांना स्वतंत्रपणे मार्गदर्शक सूचना दिल्या गेल्या आहेत. अर्थात, या सूचना प्रत्यक्षात किती लोकांपर्यंत पोहोचतात आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत होते हा संशोधनाचा विषय होऊ शकतो, परंतु आज समाजमाध्यमांमुळे याबाबत जनजागृती भरपूर होत आहे.

२०२०च्या मार्गदर्शक सूचनांमधली एक महत्त्वाची सूचना म्हणजे सर्व गणेश मूर्तिकारांनी तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे नोंदणी करणं बंधनकारक आहे. तसंच मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती बनवणाऱ्या कारखान्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेकडे अनामत रक्कम ठेवून परवाना मिळवणंही बंधनकारक केलं गेलं आहे आणि पर्यावरणीय नियमांचं उल्लंघन केल्यास ही अनामत रक्कम जप्त करण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले गेले आहेत. परवानाधारक मूर्तिकारांकडूनच मूर्ती बनवून घ्यावी, अशा सूचना सरकारने सार्वजनिक गणेश मंडळांना दिल्या आहेत. आणखी एक महत्त्वाची सूचना म्हणजे या सर्व मार्गदर्शक सूचनांचं सगळीकडे व्यवस्थित पालन झालं की नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांची कशा प्रकारे अंमलबजावणी केली याचा सविस्तर अहवाल तयार करून तो राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करायचा आहे.
 

गणेशोत्सव पर्यावरणपूरकरित्या साजरा करण्याच्या कामी आज स्वयंसेवी संस्थांचं योगदान खूप मोठं असल्याचं पाहायला मिळतं. आज पुणे शहर हे एका सकारात्मक आणि कृतिशील पर्यावरण चळवळीचं केंद्र झालं आहे, ज्यात पर्यावरणतज्ज्ञ प्रकाश गोळे यांनी स्थापन केलेल्या इकॉलॉजिकल सोसायटीचा मोठा वाटा आहे. 'इकॉलॉजिकल सोसायटी', पुण्याच्या मुळा-मुठा नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी कार्य करणारी 'जीवितनदी', शहरात कचरा संकलनाचं मोठं कार्य करणारी 'स्वच्छ', निसर्गपुनरुज्जीवनाबाबत सल्लागार म्हणून काम करणारी 'ऑयकॉस', तसंच 'इकोएक्झिस्ट', 'श्री फाउंडेशन', 'रोटरी क्लब', 'कमिन्स इंडिया फाउंडेशन' अशा अनेक संस्था पुणे शहरात गणेशविसर्जनाच्या पर्यावरणपूरक व्यवस्थापनाच्या कार्यात, प्रबोधन आणि प्रत्यक्ष कृती या दोन्ही स्तरांवर कार्यरत आहेत. या संस्थांकडून शाळांमध्ये आणि समाजमाध्यमांद्वारे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत व्यापक प्रबोधन केलं जातं. या संस्थांनी एकत्र येऊन दि. २० ऑगस्ट रोजी एक वेबिनार आयोजित केली होती, ज्यामध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या सूचना समजावून सांगण्यात आल्या आणि निसर्गाची हानी न करता गणेशोत्सव कसा साजरा करावा याबाबत शास्त्रीय कारणांसहित मार्गदर्शन करण्यात आलं.


seva_1  H x W:

आळंदी येथील 'श्री फाउंडेशन' ही संस्था गेली सहा वर्षं 'मूर्तिदान' उपक्रम राबवते. यामध्ये लोकांना गणेशमूर्ती नदीत विसर्जित करण्याऐवजी ती 'श्री फाउंडेशन' संस्थेला दान करण्याचं आवाहन केलं जातं. दान केलेल्या मूर्ती पुन्हा पुढील वर्षी डागडुजी आणि रंगकाम करून विक्रीसाठी उपलब्ध केल्या जातात व त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून अनाथ मुलांना आर्थिक मदत केली जाते. गेल्या वर्षी सुमारे ३५ हजार मूर्ती या संस्थेला दान केल्या गेल्या आणि या वर्षी हा आकडा आणखी वाढेल, असं संस्थेचे अध्यक्ष सागर पाडाळे यांनी सांगितलं. 'पुनर्वापर' (Reuse) हे पर्यावरण रक्षणाचं तत्त्व या उपक्रमात पाळलं जातं. पुण्यातल्याच 'स्वच्छ' (SWaCH) या संस्थेतर्फे निर्माल्य संकलनाचा व्यापक कार्यक्रम गेली पाच वर्षं राबवला जातो. पुण्यातल्या मुळा-मुठा नद्यांच्या १८ ते २२ घाटांवर संस्थेचे स्वयंसेवक निर्माल्य संकलन करतात आणि संकलित केलेलं निर्माल्य सेंद्रिय खतनिर्मितीसाठी पाठवलं जातं. गेल्या वर्षी 'स्वच्छ' संस्थेतर्फे पुणे शहर आणि परिसरात १२७ टन निर्माल्य संकलित करण्यात आलं. संस्थेचे स्वयंसेवक विसर्जनाच्या दिवशी घाटांवर उभे राहून लोकांना गणेशविसर्जन नदीत न करता ते स्वतंत्र हौदांमध्येच करावं यासाठी आवाहन करत असतात. 'इकोएक्झिस्ट' (eCoexist) ही संस्था पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची निर्मिती करते. माती, कागदाचा लगदा, गाईचं शेण, इ. विघटनशील पदार्थांपासून बनवलेल्या विविध आकारांच्या मूर्ती, तसंच वनस्पतींपासून बनवलेले नैसर्गिक रंग ही संस्था उपलब्ध करून देते. तसंच तरुणांना अशा प्रकारच्या मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षणही या संस्थेकडून दिलं जातं.

संपूर्ण पुणे शहरात घरगुती आणि सार्वजनिक मिळून दर वर्षी सुमारे ५ लाख गणेशमूर्ती आणल्या आणि विसर्जित केल्या जातात. यंदा महानगरपालिकेने घरगुती गणेशमूर्तींसाठी २ फूट आणि सार्वजनिक गणेशमूर्तींसाठी ३ फूट अशी उंचीची मर्यादा घालून दिली होती. मूर्तीचं घरच्या घरीच विसर्जन करण्याचं आवाहन पालिकेने केलं होतं आणि मूर्ती लगेच विरघळण्यासाठी अमोनिअम बायकार्बोनेटची पावडरही पालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आली होती. लोकांनी नदीघाटांवर गर्दी करू नये, म्हणून पालिकेकडून सोसायट्यांमध्ये फिरते हौद उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पुण्यातील कसबा, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम मंडळ, तुळशीबाग, केसरीवाडा या आणि अन्य मानाच्या गणपती मंडळांनी मिरवणूक न काढता मंडपातच गणेश विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईमध्येही २४ विभागांमध्ये सुमारे ३०० कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्यात आले आहेत, ज्यांमध्ये फिरत्या तलावांचाही समावेश आहे. रत्नागिरीची भारतीय पर्यावरण तंत्रज्ञान संस्था गेली १४ वर्षं मांडवी समुद्रकिनाऱ्यावर निर्माल्य संकलनाचं काम करते आहे. संकलित केलेलं निर्माल्य भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्रात सेंद्रिय खत निर्मितीसाठी पाठवलं जातं. अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी या उपक्रमात उत्साहाने सहभागी होतात. या वर्षी रत्नागिरी नगर परिषदेने ही जबाबदारी उचलली आहे. सांगलीमध्ये 'नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटी', नाशिकमध्ये 'निसर्गसेवक युवा मंच' आणि 'गोदा संवर्धन मोहीम' अशा अनेक संस्था स्थानिक पातळीवर उत्तम प्रबोधनकार्य आणि कृती करत आहेत. सांगलीमध्ये 'नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटी', नाशिकमध्ये 'निसर्गसेवक युवा मंच' आणि 'गोदा संवर्धन मोहीम' अशा अनेक संस्था स्थानिक पातळीवर उत्तम प्रबोधनकार्य आणि कृती करत आहेत. अनेक लोकांनी वैयक्तिक पातळीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न केला. ज्येष्ठ राजकीय नेत्या आणि 'संजीवनी फाउंडेशन' च्या संस्थापक विशाखा गायकवाड यांनी आपल्या घरी 'वृक्षगजानन' ही संकल्पना राबवली. शेतातल्या मातीपासून बनवलेली छोटी गणेशमूर्ती स्थापन करून दीड दिवसाने बागेतच तिचं विसर्जन केलं.

धर्मशास्त्राचा विचार काळानुसारच व्हायला हवा

पर्यावरण रक्षणाच्या हेतूने आपले सण-समारंभ साजरे करण्याच्या पद्धतींमध्ये योग्य ते बदल करणं यात काहीच गैर नाही. कृत्रिम तलावांमध्ये गणेशविसर्जन करणं अथवा घरातच प्रतिकात्मक विसर्जन करणं हे अनेकांना मान्य होत नाही, कारण धर्मशास्त्र सांगतं की गणेशमूर्तीचं आणि निर्माल्याचं विसर्जन वाहत्या पाण्यातच व्हायला हवं. हे तत्त्वतः बरोबर आहे. परंतु १०० वर्षांपूर्वीचा गणेशोत्सव आणि आजचा गणेशोत्सव यांच्यातला फरक लक्षात घ्यायला हवा. त्या काळी अविघटनशील प्लास्टर ऑफ पॅरिस उपलब्ध नव्हतं. कॅडमियम, शिसं, अर्सेनिक अशी विषद्रव्य असणारे रंग मूर्ती रंगवण्यासाठी वापरले जात नव्हते. धर्मशास्त्र सांगतं की नदीच्या किनाऱ्यावर स्वतः जाऊन माती आणावी, तिची अंगठ्याच्या आकाराएवढी मूर्ती बनवावी आणि तिची पूजा करून ती पुन्हा नदीतच विसर्जित करावी. एवढ्या छोट्या प्रमाणात हे होत असेल, तर वाहत्या पाण्यात विसर्जन करायला काहीच हरकत नाही. चक्रीयता (Cyclicity) हे पर्यावरण रक्षणाचं तत्त्व पूर्वीच्या काळी आपसूकपणे पाळलं जात होतं. मात्र आज मूर्तीसाठी वापरले जाणारे पदार्थ आणि त्यांचं प्रमाण या दोन्ही गोष्टी विघातकरित्या बदलल्या आहेत. निर्माल्य हे विघटनशील आहे, मग ते नदीत सोडायला काय हरकत आहे? असाही प्रश्न अनेकांकडून उपस्थित होतो. परंतु शेवटी विघटन करण्याचीदेखील नदीची एक क्षमता आहे. या नैसर्गिक क्षमतेच्या बाहेर टनावारी निर्माल्य एकाच वेळी नदीत विसर्जित केलं गेलं, तर ते नदी परिसंस्थेला घातकच ठरतं. शाडूच्या मातीच्या बाबतीतही तेच आहे. टनावारी शाडूची माती कुठूनतरी एका ठिकाणाहून उत्खनन करून आणली जाते आणि नदीत मिसळली जाते, तेव्हा नदीच्या तळाशी तिचा जाड चिकट थर तयार होतो, ज्यामुळे पाण्याचा निचरा होण्याची प्रक्रियाच बंद पडते. त्यामुळे स्थानिक मातीचा वापर करून बनवलेली छोट्या आकाराची मूर्ती हीच पर्यावरणपूरक ठरते. पूर्वी नद्या या स्वच्छ आणि वाहत्या होत्या. भारतीय संस्कृतीत नदीला मातेसमान मानलेलं आहे. म्हणून नदीत मूर्तीचं आणि निर्माल्याचं विसर्जन करणं आणि स्नान करणं हे पवित्र मानलेलं आहे. परंतु आज आपण नद्यांच्या गटारगंगा करून ठेवलेल्या आहेत. धरणं बांधून त्यांचा प्रवाहीपणाच घालवून टाकला आहे. मूर्ती नदीत विसर्जित करण्याअगोदर नदीचं पावित्र्य तरी आपण राखलंय का? याचा विचार व्हयला हवा.


GANPATI_1  H x

भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक, खगोलशास्त्रज्ञ आणि ज्येष्ठ पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनीही आपल्या घरच्या गणेशमूर्तीचं घरीच बादलीत विसर्जन केलं आणि ही पद्धत धर्मशास्त्रविरोधी नसून निसर्गपूरक आहे, असा संदेश फेसबुक लाइव्ह व्हिडिओच्या माध्यमातून दिला. आजच्या काळात धर्मशास्त्र आणि पर्यावरण यांची सांगड कशी घालायची याबाबत पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीतर्फेही खूप प्रबोधन केलं जात आहे. 'धारयते इति धर्म:' म्हणजेच जो समाजाची धारणा करतो तो धर्म. मग आजच्या काळात समाजाची धारणा काही वेगळ्या पद्धतींनी होत असेल, तर त्या पद्धती धर्मशास्त्रविरोधी निश्चितच नाहीत. तेव्हा, धर्मशास्त्राचा विचार कालसापेक्षच व्हायला हवा!