बंडखोरी - आयुष्याला उद्ध्वस्त करणारी की दिशा देणारी?

विवेक मराठी    03-Aug-2020
Total Views |
@हिमाली कोकाटे

प्रत्येक लहान-मोठ्या बंडखोरीची एक किंमत चुकवावी लागते. त्यासाठी थोड्याफार प्रमाणात स्वभावात, आचारात निर्ढावलेपण आणावंच लागतं. मृदू स्वभाव बदलून कणखर व्हावं लागतं. यातली किती आणि कोणती किंमत आपण चुकवू शकतोय याची गणितं मांडून सोडवावी लागतात. प्रत्येक निर्णयातल्या भल्या-बुऱ्या परिणामांना एकट्याने तोंड द्यायची आणि त्यांना पुरून उरायची हिंमत लागते. बंडखोरी करायचीयं, पण हिंमत गोळा करता येत नाहीये ऐसा कैसा चलेगा दीदी? 


seva_1  H x W:

गेल्या आठवड्यात एकीसोबत काही दिवस हाॅस्पिटलमध्ये राहण्याचा प्रसंग ओढवला. ते UGC (Urgent Gynaecology Centre) असल्याने तिथे कोविडचे रुग्ण नव्हते, पण त्या संदर्भातली सर्व काळजी मात्र घेतली जात होती. हे सर्व अचानक झालं असल्याने मी लॅपटाॅप घेऊन हाॅस्पिटलच्या वेटिंग रूममधूनच ॲाफिसचं शक्य होईल तितकं काम करत होते


तिथे बाकी सर्व नेहमीचंच रडगाणं होतं, पण जेमतेम १७-१८ वर्षांच्या मुली ८-९ महिन्यांची वाढलेली पोटं घेऊन इथे-तिथे पसरलेल्या पाहिल्या की अंगावर काटा येत होता. त्यातल्याच एकीकडे काही आठवड्यांचं एक मरतुकडं, सतत किरकिरणारं बाळ होतं. तिच्या बोलण्यातून कळलं की ती मेथ (drug methamphetamine) ॲडिक्ट होती/आहे आणि गरोदरपणातही ती ते पूर्णपणे सोडू शकली नव्हती, त्यामुळे तिचं बाळही आता व्यसनाधीन आहे. प्रसूती झाल्यावर आईच्या शरीरातून मिळणारा मेथचा पुरवठा बंद झाल्याने तो एवढासा जीव ‘विड्राॅवल’मध्ये होता आणि म्हणून थकून झोपेपर्यंत त्याचं रडणं चालूच होतं

त्या मुलींचं शिक्षण, घरची परिस्थिती, कौटुंबिक जडणघडण हे काहीही माहीत नसताना त्यांच्याविषयी मत बनवणं चुकीचं असलं, तरीही राग येत होता. त्यांचा असा नाही, पण एकंदरीतच खूप उदास आणि चिडचिडं वाटतं होतं. यातल्या बऱ्याच जणी एकट्या किंवा फार फार तर समवयस्क मित्रमैत्रिणींसोबत होत्या. एक सोडून कुणाही बरोबर वडीलधारं माणूस दिसत नव्हतं त्यांनी त्यांच्या आयुष्यात अशा निवडी का बर केल्या असतील? मुळात किती जणींची ही स्वत:ची निवड आहे आणि किती जणींवर हे लादलं गेलं असेल? कुठल्याही आधाराशिवाय या मुली पुढे कशा जगतील? त्यांची मुलं बहुतेक अडाॅप्शनसाठी जातील किंवा मेथवालीच्या केसमध्ये फाॅस्टर केअरमध्ये. या मुलांचं नेमकं पुढे काय होत असेल? असे एक नि अनेक प्रश्न डोक्यात फिरत होते. अनोळखी व्यक्तींशी स्वत:होऊन बोलण्याचा स्वभाव नसल्याने मी हातातल्या कामाकडे सारखं माझं लक्ष वळवत होते. पण त्या बाळाचं संथ, मधूनच आचके दिल्यासारखं रडणं कानावर पडून माझं आतडं तुटतं होतं. माझे हात एक-दोन क्षणांसाठी की-बोर्डवर थांबायचे आणि परत टायपिंग सुरू करायचे. एका रात्री ९च्या सुमारास ती मुलगी (बाई?) परत येऊन वेटिंग रूममध्ये बसली. या वेळी तिच्याजवळ बाळ नव्हतं. तिच्यासोबतच्या प्रौढ महिलेचं आणि हिचं एकाएकी काय बिनसलं ते कळलं नाही, पण अचानक दोघी मोठ्या आवाजात भांडू लागल्या. ती बाई या मुलीची आई होती आणि ती तिला इतक्या कमी वयात मूल जन्माला घातल्याबद्दल, शिक्षण सोडल्याबद्दल आणि तिच्या मादक द्रव्याच्या व्यसनाबद्दल दूषणं देत होती. हे सर्व चुपचाप ऐकून न घेता मुलगी दुप्पट आवाजात तिच्यावर ओरडून तिला ती आता लहान नसल्याची आठवण परत परत करून देत होती. हे जेमतेम पाच-दहा मिनिटं चाललं. नर्स येऊन त्यांना शांत बसण्याची जरब देऊन जाताच ती आई बसल्या जागीच रडायला लागली आणि थोड्या वेळात पर्स घेऊन निघून गेली. तिची मुलगी उठून तिच्या मागे जाईल असं वाटलं एका क्षणी, पण ती गेली नाही. “Such a Bitch!” असं मोठ्याने ओरडून ही होती तिथेच बसून आपले हात जोरजोरात चोळायला लागली.

माझ्या आत काहीतरी हललं. आपल्याकडे सर्वंच परिवार हे राजश्री प्रॉडक्शनसारखे नसले, तरी कमी वयातल्या एका मुलीकडून स्वत:च्या आईविषयी असले उद्गार ऐकायची आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांना सवय नसते. तिच्या बोलण्या-वागण्यातून, त्यांच्या भांडणातून एकच गोष्ट मला समजत गेली की तिच्या आयुष्यात तिने बऱ्याच गोष्टी स्वत:ची निवड आणि निर्णय म्हणून कमी आणि पालकांविरुद्ध बंडखोरी म्हणून जास्त केल्या होत्या. आपण त्याची काय किंमत चुकवतोय याची जाणीव होण्याइतकी परिपक्वताही तिच्यात नव्हती. ती यावीही कुठून? आपल्याकडे १६-१७ वर्षांच्या मुलांना आपण अंड्यातली बाळं समजतो. इथे हिला स्वत:ला एक बाळ होतं, त्याचा बाप बहुतेक हे दान तिच्या ओटीत घालून फरार झाला होता. आता तिची आईही निघून गेली होती. एकटेपण आणि जबाबदाऱ्या यांचीच तिला आता सोबत. पण हे सगळे माझे विचार होते. ती मात्र वरवर तरी शांतच होती
 

हा फक्त यूकेचा प्राॅब्लेम नाहीये. नाॅट एनीमोअर.

आजकाल आपल्याकडेही बंडखोरी ही फॅशन मानली जाते. जितक्या कमी वयात कराल तितके तुम्ही ‘वोक’ असता. या बंडखोरीचं उदात्तीकरण करणारं साहित्य/कलाकृती आजूबाजूला आहेत. तसे अनुभव आपलं अनुभवविश्व किती समृद्ध करतात वगैरेचे किस्सेही रंगवून सांगितले जातात.

तुम्ही सिगरेट फुंकत असाल, गांजा पीत असाल, दारूसंगे चखणा घेत ‘बसत’ असाल, मित्रांच्या मागे मोटरसायकलवर बसून हिंडत असाल, तुमचं पहिलं अफेअर वयाच्या १७व्या वर्षी झालं असेल आणि त्यानंतर अनेक पुरुष तुमच्या आयुष्यात येऊन गेले असतील, करियरसाठी शिक्षण आणि आयुष्य यापेक्षा आयुष्य भागवता येईल एवढंच शिकून कमावण्यासाठी लहान-मोठी कामं केली असतील, लग्न न करता कोणाबरोबर राहिला असाल आणि त्याबरोबर लग्न केलं असेल किंवा नसेल, घरातल्यांविरुद्ध बंडाची रणशिंगं फुंकली असतील, प्रतिष्ठा-परंपरेला झुगारून देऊन प्रश्न विचारले असतील, स्वयंपाक किंवा इतर स्त्रीसुलभ कला शिकला नसाल, लग्नाशिवाय मूल होऊ दिलं असेल, टाॅमबाॅइश राहून अखिल पुरुषजातीविषयी विखार पेटवला असेल, लग्नच न करण्याचा निर्णय घेतला असेल.. असंच आणि बरंच काही.

हे सगळं कूल वाटतं. खरंच असेलही..

पण यातल्या किती गोष्टी समजून उमजून विचारपूर्वक केल्या गेल्या आहेत आणि किती फक्त आणि फक्त आपण काळाच्या किती पुढे आहोत हे दाखवण्यासाठी, फॅशन म्हणून, स्त्रीवाद किंवा स्त्रीस्वातंत्र्याचा पाॅइंट प्रूव्ह करण्यासाठी केल्या गेल्या आहेत, यावर त्यांचं ‘कूल’ असणं अवलंबून आहे. मला हे सर्व करायचं आहे आणि ते करण्याचं स्वातंत्र्य माझ्या घरच्यांनी मला द्यावं हा माझा हट्ट आहे; पण ह्या प्रत्येक निवडीच्या मागे परिणामांची एक मोठी मजबूत साखळी आहे, जिला जाणून घेण्याचे कष्ट मला घ्यायचे नाहीत. त्या साखळीचं वजन मात्र मी एकटी, माझ्या खांद्यांवर पेलू शकत नाही. जेव्हा हे परिणाम प्रत्यक्षात समोर येतील, तेव्हा मला परत घरच्यांकडे यायचंय. तेव्हा त्यांनी एकही शब्द न उच्चारता मुकाटपणे माझ्या मूर्खपणाला आयुष्याचे अनुभव असं म्हणून शुगरकोट करून मला परत पंखांखाली घ्यावं, ही अपेक्षा आहे.
 

ही अपेक्षा बाळगणं हे मात्र 'अनकूल' आहे. नो क्वेश्चन्स आस्क्ड!
 

तुमच्यासमोर एक अशी मुलगी, स्त्री आहे जिच्याकडे हे अनुभव नाहीत. तिचं आयुष्य आखून दिलेल्या रेषांमधलं राहिलं आहे. त्या रेषा ओलांडायची तिची इच्छा नाही, तिच्यात ती हिंमत नाही किंवा इच्छा आणि हिंमत, दोन्हीही नाही. घरातले 'सातच्या आत घरात'चे आणि इतर संस्कार तिला जाचक वाटले नसतील, मान मोडून अभ्यास करायच्या वयात तिने अभ्यासच केला असेल, दारू, सिगरेट याचं तिला आकर्षण नाही कारण घरी किंवा आजूबाजूला तसं वातावरण नसेल. तिच्या आयुष्यात ती मनातल्या मनात कोणावर भाळलीही असेल, पण घरच्यांच्या पसंतीने, जोडीदाराला भेटून, त्याच्याशी बोलून सवरून मग रीतसर पद्धतीने लग्न केलं असेल, मुलं होऊ दिली असतील, ती नटत मुरडत असेल, सर्वसामान्य संसारात असणारा टिपिकल नवरा-बायकोचा रोल, त्यातल्या जबाबदाऱ्या, त्यातली बंधनं आणि त्यातल्या नात्यांतली उतरंड तिला मान्य असेल. तिला झेपेल त्या गतीने आणि मतीने घडवलेलं करियर असेल किंवा चूल आणि मूल सांभाळायचा तिचा निर्णय असेल... असंच आणि बरंच काही..

हेदेखील कूल आहे ना रे!
 

असं आयुष्य काढणाऱ्या स्त्रीला, तिने फक्त बंडखोरी केली नाही म्हणून "श्या, तू तर जगलीच नाहीस" असं हिणवणं हे अनकूल आहे. नो क्वेश्चन्स आस्क्ड!
 

खरं तर ही दोन्ही दोन टोकांची उदाहरणं आहेत. खऱ्या आयुष्यात आपल्या आसपास बागडणाऱ्या आपल्या सख्या ह्या या दोनांचं बेमालूम मिश्रण असतात. आपल्या पुढच्या पिढ्यांतल्या मुलीदेखील अशाच असतील. त्यांना यातल्या कुठल्याही एका साच्यात बसवणं शक्यच होणार नाही.
 

आणि तरीही याबाबतच्या एककल्ली विधानांची अधूनमधून फॅशन येत असते. कुटंबव्यवस्था ही जुनाटच आहे बुवा, सगळे संस्कार म्हणजे स्त्रीस्वातंत्र्यावर घाला घालायलाच बनवण्यात आलेत आणि ते सर्व, म्हणजे एकही सुटता कामा नये, असं म्हणून सर्वच्या सर्व झुगारून देता आलं पाहिजे, तरच तुम्ही कूल आहात. मी काॅलेजात असताना ह्यांव केलंय नी त्यांव केलंय.. मी सिगरेट प्यायले, दारू पिऊन राडा केलाय, बाॅयफ्रेंडला घेऊन पोलिसात गेलेय ‘तरच’ मी खूप स्मार्ट आहे.. मुलासारखी, मुलांच्या खांद्याला खांदे लावून जगते आहे.. असं म्हणून स्वत:ची लाल करणं हे महाभयानक हास्यास्पद आहे खरं तर.
 
 

१६-१७ वर्षांच्या, मध्यमवर्गीय कुटुंबात त्या सुरक्षिततेत वाढलेल्या मुलांकडे निवड करायला, निर्णय घ्यायला, बरं-वाईटातला फरक ओळखू येण्यासाठी लागणारा अनुभव आणि विचारांची परिपक्वता बहुतेकदा नसते. अशात चुकीच्या निवडीपायी, निर्णयांमुळे त्यांचं अवेळी नुकसान होऊ नये यासाठी त्यांना आखून दिलेले काही नियम म्हणजेच घरचे संस्कार. यातले किती आणि कोणते आजच्या पिढीसाठी समर्पक आहेत हे पाहणं, जिथं ते नाहीतच तिथे नवीन संस्कार निर्माण करणं, संस्कारांमागचा मथितार्थ, त्यामागचे फायदे तोटे मुलांना समजावून देऊन त्यांना त्यांचे निर्णय घेऊ देणं, पण त्याचबरोबर एक पालक म्हणून तुमची जबाबदारी संपून एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून त्यांची स्वत:च्या जबाबदारीची सुरू होणारी हद्द, त्यातली ‘अकाउंटेबिलिटी’ समजावून सांगणं हे पालक करू शकतात. त्यासाठी बंड पुकारणं हा एकमेव मुद्दा किंवा ट्रिगर नाही. हे सगळ्या वयात व्हावं लागतं.
 

ऊदाहरणच घ्यायचं झालं, तर ‘सातच्या आत घरात’ हा संस्कार घेऊ, कारण बऱ्याच लोकांना हे मागासलेपणाचं लक्षण वाटतं. तर सकाळ-दुपारच्या वेळेत शाळा-काॅलेजमध्ये शिकणारी मुलं, त्यांचे क्लासेस आटपून सात-आठपर्यंत घरात असावीत ही चुकीची अपेक्षा नाही. मी स्वत: या संस्कारात वाढले आहे, पण पुढे इंजीनिअरिंगला गेल्यावर मला तीन लोकल ट्रेन्स बदलून ये-जा करावी लागायची. शेवटच्या दोन सेमिस्टर्स प्रोजेक्ट सबमिशनसाठी कुठे कुठे हिंडत फिरावं लागायचं. तेव्हा याबाबत व्यवस्थित बोलून ‘दहाच्या आत घरात’ असा आधीचा संस्कार बदलण्यात आला. पुढे नोकरी लागल्यावर मी सकाळी सातला घर सोडायचे ते रात्री १ला घरी, झोपण्यापुरती यायचे. नंतर RFPsची कामं चालू असतील आणि कधी खूपच उशीर झाला, तर ॲाफिसच्याच डाॅर्मिटरीत झोपायचे, त्यामुळे मुळात घरी येण्याचा संस्कारही शिथिल झाला. हे व्हायला चांगली १५-२० वर्षं लागली. कारण एक मुलगी म्हणूनच नाही, तर व्यक्ती म्हणून या वर्षांत झालेली माझी वाढ त्यांनी पाहिली आणि त्यातून ही स्वत:चे निर्णय आता स्वत: घेऊ शकते हा विश्वास माझ्या पालकांना आलेला होता. संस्कारांचं हे महत्त्व बंडखोरी करण्याच्या फॅशनमुळे कमी होत नाही. आपण फक्त हे संस्कार का आणि कसे लागू करतोय एवढं डोळसपणे पाहणं हेच महत्त्वाचं. संस्कार झालेले सगळे शामळू आणि ते अंधपणे झुगारणारे जांबाज असं नसतं. स्त्रिया वर्षानुवर्ष बंधनात राहिल्या आहेत आणि त्यांच्या विकासासाठी ती बंधन झुगारून देण्यासाठी बंडखोरी हवीच आहे; पण ती बंधन झुगारून देताना आपला तोल जाऊन आपण दुसऱ्या टोकाला जातोय का, हे वेळोवेळी तपासणं हेही महत्त्वाचं. बंधनं झुगारून देणं म्हणजे स्वैराचाराला आमंत्रण देणं, हे चुकीचं आहे

आणि त्यातूनही हटके काही करण्याचं भूत असेलच, बंडखोरी करायचीच असेल, स्त्रीवाद समजून घ्यायचा असेल, तर त्याला सिगरेट, दारू आणि बाॅयफ्रेंड्स यासारख्या क्षुल्लक आणि ‘नो व्हॅल्यू ॲड’ गोष्टींसाठी मर्यादित का ठेवायचं? हे अनुभव पाठीशी नसतील, तर तुम्ही आयुष्याच्या रेसमध्ये मागे पडला आहात असं मुळीच नाही. लक्षात असू दे की हे अतिशय सामान्य, कुठलीही केपेबिलिटी आणि कष्ट न लागणारे ‘अनुभव’ आहेत, ‘अचिव्हमेंट्स’ नाहीत.
 

तुमच्यातल्या बंडखोरीची आग शिक्षण, करियर आणि व्यक्ती म्हणून घडण्यासाठीच्या इतर बाबींसाठी चेतवा ना!

शिक्षणावरची बंधनं झुगारून द्या. मुलींनी परिचारिका, शिक्षिकाच व्हावं असं घरच्यांचं मत आहे? तुम्ही सायंटिस्ट होऊन बंडखोरी करा.

बाविसाव्या वर्षी लग्न, तिशीच्या आत दोन मुलं हेच मत आहे. पण तुम्हाला उशिरा लग्न करायचंय, मुलं त्याहून उशिरा किंवा नकोतच, तर तुम्ही तुमच्या आवडत्या करियरवर लक्ष देऊन बंडखोरी करा.

मुलींची इन्व्हेस्टमेंट सोन्यातच हवी ही जबरदस्ती असेल, तर स्वत: होम लोन काढून स्वत:च घर घेऊन बंडखोरी करा.

लग्नात हुंडा म्हणून वडिलांना कर्जबाजारी व्हावं लागतंय, तर अशा ठिकाणी सोयरीक करायची नाही यावर बंडखोरी करा. 

मुलगी आहात आणि समलैंगिक आहात, तर त्यावरून तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाण्यापेक्षा स्वत:ला, स्वत:च्या आवडीला स्वीकारून त्याबद्दल मोकळेपणे बोलून बंडखोरी करा.

तुमचा साथीदार तुमच्यावर हात उगारत असेल, तर त्याचा तो हात तिथेच रोखण्यासाठी बंडखोरी करा.

एकट्या मुलीने परगावी, परदेशी कसं राहावं ह्या मानसिकतेविरोधात बंडखोरी करा, प्रवास करा, भरपूर वाचा, नवीन लोकांना भेटा, वेगवेगळ्या कल्चर्सची माहिती घ्या, घरातूनच एखादा छोटासा व्यवसाय सुरू करा, लग्न-मूल यामुळे शिक्षण, नोकरीत खंड पडला असेल तर त्याचा पुनश्च हरिओम करा.

किती उदाहरणं देऊ?

पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, एक व्यक्ती म्हणून स्वत:ला जोखून घ्या. स्वत:च्या मर्यादा ओळखा आणि त्यापलीकडे कसं जाता येईल याचं शांत डोक्याने नियोजन करा. याचं कारण म्हणजे प्रत्येक लहान-मोठ्या बंडखोरीची एक किंमत चुकवावी लागते. त्यासाठी थोड्याफार प्रमाणात स्वभावात, आचारात निर्ढावलेपण आणावंच लागतं. मृदू स्वभाव बदलून कणखर व्हावं लागतं. यातली किती आणि कोणती किंमत आपण चुकवू शकतोय याची गणितं मांडून सोडवावी लागतात. प्रत्येक निर्णयातल्या भल्या-बुऱ्या परिणामांना एकट्याने तोंड द्यायची आणि त्यांना पुरून उरायची हिंमत लागते. बंडखोरी करायचीयं, पण हिंमत गोळा करता येत नाहीये ऐसा कैसा चलेगा दीदी?

स्वत:च्या बंडखोरीतले फक्त रोचक भाग सांगून आपल्याला यूजलेस फील करून देणाऱ्या ताई-माई-अक्कांना त्यांनी चुकवलेल्या किमतीबद्दलसुद्धा विचारा. अक्का ते सांगायला विसरतात नेहमी. आणि ती किंमत आपल्याला स्वत:च्या बजेटबाहेरची वाटतं असेल, आपल्याला नाकासमोरचं चालणं प्यारं वाटतं असेल, तर वही सही - वाट्याला आलेलं आयुष्य कुठलाही अफसोस न बाळगता घालवायलासुद्धा हिंमत लागतेच शेवटी. नाकासमोर चालणं म्हणजे रूढी पाळणं नव्हे किंवा अन्याय सहन करणं मुळीच नव्हे; पण आपण साधं, सोप्पं, सात्त्विक आणि संथ आयुष्य जगायचंय की बंडखोरी करून यातल्या कशाला फाटा द्यायचाय, ही वैयक्तिक निवड असायला हवी. प्रत्येक घरात गांधी, शिवबा, फुले आणि आंबेडकर जन्माला येत नाहीत, पण प्रत्येकाला मान मिळायला हवा एक व्यक्ती म्हणून. तो फक्त बंडातूनच मिळतो किंवा मिळावा असं नाही. आजकालच्या दुटप्पी आणि संधिसाधू जगात नाकासमोर चालणं हेही दुरापास्त बनलंय.

'तू माझ्या साच्यात बस, नाहीतर तुझी किंमत शून्य' असं दुनिया सांगत असेल, तर त्याकडे पाठ फिरवून स्वत:च्या संस्कारांच्या, सामान्यपणाच्या मस्तीत जगणं हीसुद्धा बंडखोरीच नाही का?

हिमाली कोकाटे
लंडन