खिलाफत चळवळीकडील शतकव्यापी वाटचाल

विवेक मराठी    31-Aug-2020
Total Views |
@डॉ. श्रीरंग गोडबोले

खिलाफत चळवळीची औपचारिक सुरुवात १९१९मध्ये झाली असली, तरी तिची पार्श्वभूमी सुमारे शंभर वर्षे आधीच सुरू झाली होती. इस्लामवादाच्या ह्या शतकव्यापी वाटचालीत सन १८५७चा उठाव हा महत्त्वाचा टप्पा होता, पण त्याचीही पार्श्वभूमी अठराव्या शतकात तयार झाली होती. 

seva_1  H x W:
सन १९१९ ते १९२४ ह्या काळात झालेली खिलाफत चळवळ सैद्धान्तिक आणि ऐतिहासिक आधारावर बेतलेली होती. हिंदुस्थानच्या भूमीवर पहिल्या मुस्लीम आक्रमकाने पाऊल ठेवताच खिलाफतचे अवडंबर माजविण्यास सुरुवात झाली. आधुनिक काळात, १८३०च्या दशकापासूनच हिंदुस्थानातील मुस्लिमांना तुर्कस्तानच्या खलीफाविषयी पुळका वाटू लागला होता. ह्यात सूफी, उलेमा, मध्यमवर्गीय बुद्धिजीवी, मुस्लीम पत्रकार आणि सर्वसामान्य मुस्लीम यांचा समावेश होता. खिलाफत चळवळीची औपचारिक सुरुवात १९१९मध्ये झाली असली, तरी तिची पार्श्वभूमी सुमारे शंभर वर्षे आधीच सुरू झाली होती. इस्लामवादाच्या ह्या शतकव्यापी वाटचालीत सन १८५७चा उठाव हा महत्त्वाचा टप्पा होता, पण त्याचीही पार्श्वभूमी अठराव्या शतकात तयार होत होती. सन १८५७च्या उठावाला स्वातंत्र्यसमर म्हणून अवश्य गौरविले जाते. पण ब्रिटिशांविरुद्ध हिंदूंच्या दृष्टीने असलेले हे स्वातंत्र्यसमर यशस्वी झाले असते, तर हिंदुस्थानवर कोणी राज्य केले असते? हा महत्त्वाचा प्रश्न उरतोच. मुस्लिमांसाठी ह्या प्रश्नाचे उत्तर सुस्पष्ट होते. ब्रिटिश अमलाखालील हिंदुस्थान त्यांच्यासाठी दार-उल-हरब (इस्लामचे वर्चस्व नसलेला युद्धाचा प्रदेश) होते. शेकडो वर्षांच्या दार-उल-इस्लाम अर्थात इस्लामी अमलाखालील हिंदुस्थानच्या इतिहासात तो डोळ्यांना खुपणारा व्यत्यय होता. सन १८५७च्या उठावाचे जिहादी स्वरूप आणि त्याचा खिलाफत चळवळीशी असलेला संबंध डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढील शब्दांत स्पष्ट केला आहे - "जिज्ञासूने १८५७च्या बंडाचा इतिहास अभ्यासावा. तसे त्याने केल्यास, अंशतः का होईना, तो वस्तुतः ब्रिटिशांविरुद्ध मुस्लिमांनी पुकारलेला जिहादच होता असे त्याला आढळून येईल. ब्रिटिशांनी भारत बळकावून देशाला दार-उल-हरब बनवले आहे अशी सैय्यद अहमद ह्यांनी मुस्लिमांना अनेक दशके शिकवण देऊन ज्या बंडाची चिथावणी दिली त्याचेच मुस्लिमांच्या दृष्टीने हे पुनरुत्थान होते. हे बंड म्हणजे भारताला पुनः दार-उल-इस्लाम बनवण्यासाठी मुस्लिमांचा प्रयत्न होता. अलीकडील उदाहरण म्हणजे १९१९ साली अफगाणिस्तानने भारतावर केलेले आक्रमण होय. ब्रिटिश सरकारचा द्वेष करणाऱ्या खिलाफतवाद्यांच्या नेतृत्वाखाली भारताला मुक्त करण्यासाठी त्याची सूत्रे भारतातील मुस्लिमांकडे होती." (पाकिस्तान ऑर द पार्टिशन ऑफ इंडिया, बी.आर. आंबेडकर, ठाकर अँड कंपनी लि. १९४५, पृ. २८८). 

सन १८५७-पूर्व अखिल-इस्लामवादी चळवळी

हिंदुस्थानवरील इस्लामी सत्ता अस्ताला जात असताना, इस्लामवादाच्या निखाऱ्यांना फुंकर घालण्याचे काम शाह वलिउल्लाह (१७०३-१७६२) ह्याने केले. त्याने निर्वाचित खिलाफतीचा आणि काफिरांविरुद्ध जिहाद करण्याच्या पवित्र कर्तव्याचा पुरस्कार केला. हिंदुस्थानवर राज्य करण्याचे मुस्लिमांमधील त्राण नाहीसे होत असताना एकोणिसाव्या शतकातील इस्लामी विद्वानांच्या एका संपूर्ण पिढीला इस्लामच्या रक्षणाची प्रेरणा देण्याचे काम ह्याच्याच लेखणीने केले. आपल्या मुस्लिमेतर शेजाऱ्यांशी मुस्लीम जितके फटकून वागतील, तितके ते अल्लाहचे अधिक चांगले बंदे होतील असे त्याचे म्हणणे होते (द मुस्लिम्स ऑफ ब्रिटिश इंडिया, पी. हार्डी, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस, १९७२, पृ. २९,३०). सन १८५७चा उठाव असो किंवा खिलाफत चळवळ असो, मुस्लीम नेतृत्वाने दोन्ही वेळेस हिंदूंची मदत घेतली ती स्वार्थापोटी, त्यात कोणतीही तत्त्वनिष्ठा नव्हती. शाह वलिउल्लाहची मजहबी शिकवण केव्हाही दृष्टीआड झाली नव्हती.

ज्याचा डॉ. आंबेडकरांनी उल्लेख केला तो सैय्यद अहमद बरेलवी (१७८६-१८३१) हा इस्लामवादाचा दुसरा महत्त्वाचा शिलेदार! हा पूर्वी चक्क एक पिंडारी डाकू असून त्याला अनेक सूफी गटांचा आशीर्वाद मिळाला होता. सन १८२६मध्ये ह्याने महाराजा रणजीतसिंहांविरुद्ध जिहाद पुकारला होता. ह्याला जानेवारी १८२७मध्ये 'इमाम' घोषित करून त्यास 'बइया' (प्रेषितांनी सुरू केलेली स्वामिभक्तीच्या शपथेची प्रथा) देण्यात आली. मुस्लिमांनी हिंदू तीर्थयात्रा करणे, हिंदू सणांमध्ये भाग घेणे, ब्राह्मणाज्योतिषांचे मत मागणे अशा गोष्टींची त्याने निंदा केली. त्याच्या शिष्यांना ब्रिटिश सत्ता उलथवून टाकायची आहे ह्याचा अंदाज ब्रिटिशांना आला होता (हार्डी, उपरोक्त, पृ. ५३-५४).

मुस्लिमेतरांपासून अथवा त्यांच्या प्रभावापासून अलिप्त राहणे हा अखिल-इस्लामवादाचा अनिवार्य घटक आहे. सैय्यद अहमद बरेलवीच्या काळातच हाजी शरियत-अल्लाह (१७८१-१८४०) निपजला. ह्याने १८२१ साली बंगालमध्ये फरैजी (फर्ज- कुराणप्रणीत कर्तव्य) चळवळ उभी केली. कुफ्र (श्रद्धाहीनता) आणि बिदा (नावीन्य, इस्लाममध्ये नवीन गोष्टी घुसडणे) नाकारणे ह्या चळवळीचे मूलतत्त्व होते. डुडु मियाँ (१८१९-१८६२) ह्या त्याच्या मुलाने फरैजींची कट्टर संघटना बांधली. बंगालमध्ये फोफावलेली दुसरी हिंसक इस्लामी चळवळ टीटू मीर (१७८२-१८३१) ह्याने सुरू केली. आपल्या शिष्यांनी विशिष्ट प्रकारे दाढी वाढविण्यावर आणि धोतर नेसण्यावर ह्याचा भर होता. ही चळवळ मोडून काढण्यासाठी ब्रिटिशांनी नेटिव्हांचे पायदळ धाडले (हार्डी, उपरोक्त, पृ. ५५-५९). हिंदुस्थानातील मुस्लिमांचे पूर्वज बलात्काराने बाटलेले हिंदूच होते. शेकडो वर्षे इस्लामी दास्यात राहूनही त्यांच्यातील हिंदू चालीरिती इस्लाम नष्ट करू शकला नव्हता. हिंदुस्थानातील मुस्लिमांमध्ये असलेले हे इस्लामेतर अवशेष नाहीसे करणे हा सर्व इस्लामवादी चळवळींचा प्रमुख कार्यक्रम होता.


seva_1  H x W:

मुस्लीम जमात कट्टर असून तिला बदलणे अशक्य असल्याचे ब्रिटिशांच्या एव्हाना ध्यानात आले होते. सन १८३८मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि अफगाण अमिरातीमध्ये पहिले अफगाण युद्ध पेटल्यावर ब्रिटिश आणि वहाबी पंथीय मुस्लीम यांच्यात तेढ निर्माण झाली. वायव्य प्रांतात आपले तंबू ठोकून राहणारे वहाबी, अफगाणांच्या बाजूने लढत होते, इतकेच नव्हे, तर ते तेथील ब्रिटिश सैन्यातील काही मुस्लीम शिपायांना चिथावत असल्याचा संशय होता (द वहाबीज इन दि १८५७ रिवोल्ट: अ ब्रीफ री-अप्रेजल ऑफ देयर रोल, इक्तिदार आलम, सोशल सायंटिस्ट, खंड ४१ , मे-जून २०१३, पृ. १७).

सन १८५७चा जिहाद

सन १८५७च्या उठावासंबंधी हिंदू, मुस्लीम आणि ब्रिटिश यांचा भिन्न दृष्टीकोन इतिहासकार थॉमस मेटकाल्फ ह्यांनी पुढील शब्दांत दिला आहे - 'आपल्या जातीचा अधिक्षेप होण्याची भीती बाळगणाऱ्या हिंदू शिपायांनी असंतोषाची पहिली ठिणगी टाकली, हे साधारणपणे मान्य करण्यात आले. परंतु, त्यानंतर मुस्लिमांनी त्या असंतोषाच्या वणव्याला फुंकर घातली आणि स्वतःला चळवळीच्या शिरोभागी ठेवले. कारण राजकीय सत्तेकडे जाणारी शिडी म्हणून ते ह्या मजहबी गाऱ्हाण्यांकडे पाहत होते. ब्रिटिश राज्याचा नायनाट करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून मुस्लीम षड्यंत्र आणि मुस्लीम नेतृत्वाने शिपायांच्या बंडाचे एका राजकीय कारस्थानात रूपांतर केले, हा ब्रिटिश दृष्टिकोन होता.' (दि आफ्टरमाथ ऑफ रिवोल्ट: इंडिया १८५७-१८७९, प्रिन्सटन, १९६५, पृ. २९८).

उत्तर प्रदेशच्या आणि दिल्लीच्या विविध भागांत असलेल्या बंगाल सैन्याच्या तुकड्यांनी मे-जून १८५७मध्ये उठाव केला. स्थानिक मुस्लिमांतून आलेल्या सशस्त्र जिहादींचा त्यात सहभाग होता. ग्वाल्हेर तुकडीच्या बाबतीत झाले, तसे काही ठिकाणी नेतृत्व मुस्लीम शिपायांकडे होते. अलाहाबाद, लखनौ आणि ग्वाल्हेरला सशस्त्र जिहादींचे नेतृत्व वहाबींकडे नसून सूफींकडे होते. हिंदू प्रमुख आणि शिपायांचे नेते आपल्याला दुय्यम भूमिकेत न राहता समान पातळीवर असलेल्या मित्राच्या भूमिकेत असताना अशा इंग्रजविरोधी सशस्त्र संघर्षात भाग घेण्यास सैद्धान्तिक आधार आहे का, ह्याविषयी काही वहाबी नेत्यांच्या मनांत संभ्रम होता. म्हणून ते १८५७च्या जिहादमध्ये भाग घेण्यास कचरत होते. (द खिलाफत मूव्हमेंट इन इंडिया, १९१९-१९२४, मुहम्मद नईम कुरेशी, लंडन विद्यापीठाला सादर केलेला प्रबंध, १९७३, पृ.१८, १९).

बंडखोरांनी दिल्ली घेतल्यावर नाममात्र बादशाह असलेल्या बहादुर शाह जफरने दि. ११ मे १८५७ला बख्त खान (मृत्यू १८५९) ह्यास विद्रोही सैनिकांचा सेनापती नियुक्त केले. शंभर जिहादींना घेऊन बख्त खान दिल्लीस आला होता. अमीर-उल-मुजाहिदीन (जिहादींचा आज्ञाधिपती) मौलाना सरफराज अलीच्या नेतृत्वाखाली हनसी, हिस्सार, भोपाळ आणि टोंक अशा ठिकाणांहून आलेल्या रुहेला अफगाणांचा बख्त खान मार्गदर्शक होता. (बख्त खान: अ लीडिंग सिपॉय जनरल ऑफ १८५७, इकबाल हुसेन, प्रोसीडिंग्स ऑफ दि इंडियन हिस्ट्री काँग्रेस, खंड ४६, १९८५, पृ.३७६). हिंदू-मुस्लीम ऐक्याच्या भोंगळ कल्पना मुस्लिमांच्या मनांस चुकूनसुद्धा कधी शिवल्या नाहीत. दि. २० मे १८५७ ला 'बादशाह' बहादुर शाह जफरला दिलेल्या निवेदनात मौलवी मुहम्मद सैद म्हणतो, "हिंदूंविरुद्ध मुस्लिमांच्या भावना भडकविण्यासाठी जिहादचे निशाण उभारण्यात आले आहे." दि. १४ जून १८५७ला पंजाबचा चीफ कमिशनर लॉरेन्स ह्यास दिल्लीतील आपल्या छावणीतून मेजर जनरल रीड पत्रात लिहितो, 'ते शहरात हिरवे निशाण दाखवत असून हिंदूंना दमदाटी करत आहेत.' दि. ४ जून १८५७ला वाराणसीहून आलेल्या अधिकृत अहवालात 'विश्वेश्वराच्या मंदिरावर हिरवे निशाण फडकविण्याचा काही मुसलमानांनी चंग बांधला आहे' असे म्हटले होते. (द सिपॉय म्युटिनी अँड द रिवोल्ट ऑफ १८५७, आर.सी. मजुमदार, फर्मा केएलएम, १९५७, पृ.२३०).

सन १८५७च्या जिहादच्या म्होरक्यांचे अखिल-इस्लामवादी लागेबांधे पाहण्यासारखे आहेत. सय्यिद फदल अली, रहमतुल्लाह कैरानवी, हाजी इमदादुल्लाह मक्की, नवाब सिद्दीक हसन खान आणि मौलाना जाफर थानेसरी आदी मंडळींना १८५७च्या जिहादमधील त्यांच्या सहभागासाठी शिक्षा होणे अटळ झाले, तेव्हा त्यांनी हिंदुस्थानातून धूम ठोकली. ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या बंदरांचा, प्रवासमार्गांचा आणि दूरसंचार जाळ्याचा उपयोग करीत त्यांनी अखिल-इस्लामवादी संधान बांधले. हिंदुस्थानच्या उपसागरातून ते जलमार्गाने मुस्लीम जगतातील मक्का, कैरो आणि कॉन्स्टॅन्टिनोपल यासारख्या शहरांत गेले. (फ्युजिटिव्ह मुल्लाह्स अँड आउटलॉड फॅनॅटिक्स: इंडियन मुस्लिम्स इन नाइनटीन्थ सेंच्युरी ट्रान्स-एशियाटिक इम्पेरियल रायवलरीज, सीमा अल्वी, मॉडर्न एशियन स्टडीज, खंड ४५, नोव्हेंबर २०११, पृ.१३३७-१३८२; पहा त्यांचेच - मुस्लीम कॉस्मोपॉलिटॅनिजम इन द एज ऑफ एम्पायर, हार्वर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, २०१५).

रौलट सेडिशन कमिटी अहवाल 

ब्रिटिश सत्तेला उलथवून त्या जागी इस्लामी सत्ता स्थापन करण्याचे उद्योग ब्रिटिशांच्या चिंतेत भर घालत होते. 'हिंदुस्थानातील क्रांतिकारक चळवळीचे स्वरूप आणि व्याप्ती' वर प्रकाश टाकणारा 'सेडिशन कमिटी रिपोर्ट' (राजद्रोह समिती अहवाल) १९१८ साली प्रसिद्ध करण्यात आला. ह्यास 'रौलट सेडिशन कमिटी अहवाल' असेही म्हटले जाते. एकूण २२६ पानी अहवालात 'मुहम्मदन करंट' (मुस्लीम प्रवाह) नावाचा भाग आहे. अहवालातील संबंधित भागात (पृ. १७८-१७९) खालील नोंदी सापडतात - 

१) क्रायमियन युद्धाच्या वेळेसच (१८५३) हिंदुस्थानातील मुस्लिमांची तुर्कस्तानला सहानुभूती असल्याचे लक्षात आले होते.
 
२) हिंदुस्थानातील ब्रिटिश सत्तेच्या जागी नवीन इस्लामी साम्राज्य स्थापन करण्याची आकांक्षा मजहबवेड्या मुस्लिमांच्या एका छोट्या, धूसर गटाला होती.
३) 'रेशमी पत्र' नावाचे एक कारस्थान उघडकीस आले. वायव्य सीमेवर हल्ला करून आणि त्याला पूरक देशात मुस्लीम बंड माजवून ब्रिटिश सत्ता नष्ट करण्याचे त्याचे उद्दिष्ट होते.
४) मौलवी ओबेदुल्लाह सिंधी नावाच्या एका बाटलेल्या शिखाने अब्दुल्ला, फतेह मुहम्मद आणि मुहम्मद अली नावाच्या साथीदारांसह ऑगस्ट १९१५ मध्ये वायव्य सीमा ओलांडली होती. देवबंदी मौलवींच्या द्वारे हिंदुस्थानभर एक अखिल-इस्लामवादी आणि ब्रिटिशविरोधी चळवळ पसरविण्याचा त्याची इच्छा होती.
५) ओबेदुल्लाहने तुर्की-जर्मन वकिलातीच्या सदस्यांची भेट घेतली. मक्का-मदिना असलेल्या अरबस्तानच्या किनारपट्टीवरील हिजाज प्रदेशाचा तुर्की सैनिकी राज्यपाल असलेल्या गालिब पाशाकडून जिहादचे घोषणापत्र घेऊन मौलवी मुहम्मद मियाँ अन्सारी १९१६ साली हिंदुस्थानात परतला होता.
६) अल्लाहच्या सैन्यात हिंदुस्थानातून रंगरुटांची भरती करून इस्लामी सत्तांची युती व्हावयाची होती. मदिना हे तिचे मुख्यालय करून स्थानिक सेनापतींच्या हाताखाली दुय्यम मुख्यालये कॉन्स्टॅन्टिनोपोल, तेहरान आणि काबुल येथे स्थापन व्हावयाची होती.

परदेशस्थ मुस्लिमांची भूमिका

परदेशांत - विशेषतः ब्रिटनमध्ये राहत असलेल्या हिंदुस्थानी मुस्लिमांनी अखिल-इस्लामवादी भावना भडकविण्यात मोठी भूमिका बजावली. अंजुमन-ई-इस्लाम नावाची संस्था १८८६ सालीच लंडनला सुरू झाली होती. तिच्या हिंदुस्थानात शाखा होत्या. पुढे मृतप्राय झालेल्या ह्या संस्थेत प्राण फुंखण्याचे काम अब्दुल्ला अल-मामुन सुहरावर्दी (१८७५-१९३५) ह्या हिंदुस्थानी बॅरिस्टरने केले आणि तिला 'द पॅन-इस्लामिक सोसायटी ऑफ लंडन' असे नाव दिले. सोसायटीने तुर्कस्तानशी थेट संबंध जोडलेच, शिवाय 'पॅन-इस्लाम' नावाच्या मुखपत्रातून तुर्कस्तान आणि इस्लामविषयक मुस्लीम भावना जोरकसपणे मांडल्या. सप्टेंबर १९११मध्ये ब्रिटिशांच्या आणि फ्रेंचांच्या साहाय्याने इटलीने ऑटोमन साम्राज्याचा भाग असलेल्या त्रिपोली (सध्या लिबिया) शहरावर छापा मारताच हिंदुस्थानातील मुस्लिमांमध्ये रोष उत्पन्न झाला. लंडन मुस्लीम लीगने तुर्कस्तानच्या मदतीसाठी स्वयंसेवक भरती करण्याची धमकी दिली. त्रिपोलीतील पीडितांना आर्थिक मदत करण्यासाठी 'रेड क्रिसेंट सोसायटी'ची स्थापना करण्यात आली. लाहोरपासून मद्रासपर्यंत शिया आणि सुन्नी मुस्लिमांनी तिच्या कोषात दान केले. (कुरेशी, उपरोक्त, पृ. १९-२३). 

खिलाफत चळवळीचे पडघम

बल्गेरिया, ग्रीस, मॉन्टेनिग्रो आणि सर्बिया ह्या बाल्कन राज्यांनी ऑक्टोबर १९१२मध्ये तुर्कस्तानवर स्वारी करताच हिंदुस्थानातील मुस्लिमांमध्ये प्रक्षोभ निर्माण झाला. आपसातील मतभेद विसरून सारे उलेमा एक झाले. कवी आणि इस्लामी विद्वान शिबली नुमानी ह्याने 'इस्लाम खतरे में' ही नेहमीची आरोळी ठोकली. अबुल कलाम आजाद नावाच्या नुमानीच्या शिष्योत्तमाने जिहादची वेळ येऊन ठेपली असल्याची घोषणा केली. त्या काळात संयुक्त प्रांतात (उत्तर प्रदेश) पत्रकार असलेल्या शौकत अली (१८७५-१९५८) ह्यांनी त्यांच्या 'कॉम्रेड' पत्रातून स्वयंसेवक दल उभारण्याचे आवाहन केले. 'कॉम्रेड'चे संपादक आणि शौकत अलींचे बंधू मुहम्मद अली ह्यांनी अलिगढ विश्वविद्यालयासाठी जमविलेला निधी तुर्कस्तानला कर्ज देण्यासाठी वापरावा असे सुचविले. डॉ. मुख्तार अहमद अन्सारी (१८८०-१९५६) ह्यांच्या नेतृत्वाखाली एक अ.भा. वैद्यकीय मंडळ डिसेंबर १९१२च्या शेवटी कॉन्स्टॅन्टिनोपलला पोहोचले. ह्या मंडळाने तुर्कस्तानातील 'तरुण तुर्क' नेत्यांशी संधान बांधलेच, शिवाय इजिप्शियन राष्ट्रवाद्यांशीदेखील संपर्क साधला. मॅसिडोनियातून आलेल्या मुस्लीम निर्वासितांचे तुर्कस्तानातील अनातोलिया भागात पुनर्वसन करण्याची योजना मांडण्यात आली. तिच्या जोडीला मदिनेत विश्वविद्यालय, इस्लामी बँक आणि सहकारी संस्था स्थापन करण्याचे मनसुबे रचण्यात आले. ह्या योजनेचा पाठपुरावा करत 'कॉम्रेड'ने हिंदुस्थानातील मुस्लिमांना तुर्की रोखे विकत घेण्याचे आवाहन केले. 

अखिल-इस्लामवादाचाच एक भाग म्हणून मे १९१३मध्ये 'अंजुमन-ई-खुद्दाम-ई-काबा' (काबाच्या सेवकांची सोसायटी) नामक संस्था स्थापन करण्यात आली. लखनौच्या फिरंगी महाल मदरशाचे मौलाना अब्दुल बारी (१८७९-१९२६) तिचे अध्यक्ष आणि एम.एच. हुसेन किडवाई व अली बंधू तिचे अन्य प्रवर्तक होते. ह्या संस्थेने स्वतःपुढे दोन उद्दिष्टे ठेवली होती - मुस्लिमांना संघटित करून कुठल्याही मुस्लिमेतर आक्रमणाचा विरोध करणे आणि इस्लामच्या पवित्र स्थळांवर स्वतंत्र आणि परिणामकारक मुस्लीम सार्वभौमित्व प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने तुर्कस्तानला एकमुखी सशक्त मुस्लीम सत्ता म्हणून बळ देणे. हिंदुस्थानात गडबड माजविण्यासाठी पैशाने लगडलेले तुर्की पाहुणे संशयास्पद रितीने इथे पाठविण्यात येत आल्याच्या बातम्या होत्या. तुर्की सरकार हॅम्बर्ग येथील एका जर्मन कंपनीकडून रायफलींची खरेदी करून त्या हिंदुस्थानातील मुस्लिमांना देणार असल्याचे वृत्त होते. (कुरेशी, उपरोक्त, पृ. २२-२९). सर्बिया आणि ऑस्ट्रिया ह्या दोन देशांमध्ये जुलै १९१४मध्ये ठिणगी पडून पहिले महायुद्ध सुरू झाले, तेव्हा हिंदुस्थानातील परिस्थिती ही अशी होती. दारूगोळा ठासून भरलेला होता. काडी पडण्याचा तेवढा अवकाश होता!
क्रमश:


९८९००२४४१२